बेरीज वजाबाकी आयुष्याची ( मुक्ता आगाशे)- भाग २

To ASA Kahi nirnay gheil Ase ghari kunalach vatale navigate.pan says Paul mage ghyayche Nahi ASA than nishchay Vishal me Lela hota.

बेरीज वजाबाकी आयुष्याची  (मुक्ता आगाशे)- भाग२
अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी

"काय होईल माझं नि माझ्या अभागी बाळाचं? संसाराच्या या हवन कुंडात नावाप्रमाणेच माझी समिधा तर पडणार नाही ना...! असा विचार  कर करून तिचे डोके शिणून गेले. आणि तशा  त्या अवस्थेतच कधी ती निद्रेच्या आधीन झाली ते तिला कळलंच नाही.


"शुक शुक, समिधा ये समू...,दार उघड ना..!"अगदी हलकासा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती खडबडून जागी झाली.


बाजूच्या खिडकीतून विशाल तिला आवाज देत होता. पटकन उठून तिने कानोसा घेतला. सासरे झोपलेले दिसले,  चोर पावलांनी ती दारा जवळ आली अन अलगद दाराची कडी उघडून विशाल ला आत घेतले.


त्याला सुखरूप घरी परत आलेला बघून तिचा जीव भांड्यात पडला. मनावरचा ताण हलका झाला.


"अहो जेवता का थोडं?"तिने हळूच विचारलं.

"नको ग भूक मेली माझी."तो उत्तरला.

तेवढ्यात कुजबुजण्याचा आवाज ऐकून सासूबाई सुद्धा जवळ आल्या.
"लेकरा असं उपाशी राहून कसं चालेल, दोन जीवांची पोरगी ती, आता त्यांच्यासाठी तरी तुला सांभाळून वागावच लागेल. कसेही दोन घास पोटात घालून घे आणि मग झोप."


आईच्या  आणि  बायकोच्या आग्रहाखातर त्याने बळेच दोन घास पोटात टाकले आणि कुणाशी काहीही न बोलता सगळे झोपायला निघून गेले.


रात्री विशाल आला तेव्हा सासरे जागेच होते. रागाच्या भरात ते त्याला बोलले असले तरी त्याने जीवाचे काही बरे वाईट तर केले नाही ना ही शंका त्यांना भेडसावत होतीच. त्यामुळे तो आल्यावरही ते झोपेचे सोंग घेऊन पडून राहिले होते.


बापलेकांमध्ये अबोल्यामुळे एक असह्य दुरावा जाणवत होता.

"अहो एक वेळा संधी द्या ना पोराला, एक वेळा देऊन बघा पैसे..."सासू नवऱ्याला विनवत होती.


"ही कितवी वेळ आहे रमा, मी दरवेळी पैसे द्यायचे आणि ते याने मित्रांवर उडवायचे...! फक्त एकदा ,फक्त एकदा असं म्हणत कितीदा संधी दिली मी याला पण याच्यात काही सुधारणेला वावच नाही. मी विचार करून सांगेन काय करायचं ते. " सासरे निग्रहाने म्हणाले.


तसं त्यांचंही काय चुकलं होतं म्हणा, कुठेतरी एका टप्प्यावर विशाल चं  हे मित्र वेड  कमी होणं आवश्यकच होतं.'


विशाल सुद्धा आता घरून काही मागण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा त्याच्या मित्रांवर अतूट विश्वास होता. अशावेळी आपले मित्रच आपल्यासाठी धावून येतील अशी वेडी खात्री त्याला होती.दिवस असेच चालले होते.

एका शनिवार-रविवारी भाऊ आणि वहिनी दोघेही गावी आले होते.
आल्यापासून विशालला ते सततच घरी बघत होते.

"अरे विशाल तू दुकानात नाही चालला का?"मोठा भाऊ सागरने विशालला विचारले.


"नाही दादा, इकडे शेतीकडे काम आहे ना तर मी इकडे चक्कर लावून येतो म्हणून आज दुकान बंद ठेवले ."विशालने खोटेच सांगितले


शेवटी वडिलांनी मोठ्या लेकाजवळ मन मोकळे केलेच. समिधाची जाऊ कान देऊन बापलेकांच्या गोष्टी ऐकत होती.


"एकदा विशालला संधी देऊन पाहू म्हणतो , यावेळी जर तो सुधारला नाही तर मात्र मग मी कधीच पैसे देणार नाही."वडील सागरला सांगत होते.


"आजवर खूपदा असं झालं म्हणताय ना, मग आता तरी कशाला पैसे देता बाबा, तुम्हाला वाटते तो सुधारेल?"मोठा भाऊ सागर बोलला.


"चुकलं माकलं तरी आपलेच लेकरू आहे ,वाटते एक संधी देऊनच बघावी." बाबा


"काही गरज नाही अशी संधी बिंधी द्यायची, पुष्कळ पैसे उडवले आजवर त्याने तुमचे. थांबवा आता हे कुठेतरी. तुम्हाला सांगणं होत नसेल तर मी सांगते." आतून गुपचूप सगळं ऐकत असलेली जाऊ अचानकपणे बाहेर येऊन बोलायला लागली


नेमका तितक्यात च विशाल बाहेरून घरी आला...

"काय भाऊजी काय चालवलय हे तुम्ही? विनाकारण किती पैसा  उधळत आहात बाबांचा? तुम्हाला काय वाटते तुमचा एकट्याचाच अधिकार  आहे या सगळ्या गोष्टींवर? खूप झालं आजवर यापुढे एक छदाम सुद्धा मिळणार नाही बाबांच्या पैशातली.आणि बाबा त्यांना तर काही कळत नाही पण तुम्ही एवढे मोठे  आहात तरी तुम्हाला पण कळत नाही  कां की आपल्याला एक मोठा मुलगा आहे. त्याचाही संसार आहे ,त्यालाही तुमच्या आधाराची गरज आहे.

मी तर म्हणते ,आजवर यांनी यांच्या वाटेचं सगळं संपवून टाकलं आहे. आता यांना तुमच्या पूर्ण संपत्तीतून बेदखलच करून टाका म्हणजे प्रश्नच मिटला . यापुढे यांच्यावर एक जरी दमडी खर्च केली तरी मला चालणार नाही" सविता अगदी बेछूटपणे वाटेल ते आरोप करत बोलत होती.


"अग सविता किती बोलशील थोडे चूप रहा ना."सागर म्हणाला

"आजवर तेच करत आले ,आता काही मी चूप राहणार नाही. भाऊजींनी आत्ताच्या आता हे घर सोडावं आणि आपलं पहावं. कारण हे इथेच राहिले तर पुन्हा बाबांना इमोशनली ब्लॅकमेल करणार आणि पैसे उकळणार."सविता अगदी मनाला येईल ते बडबडत होती आणि गरळ ओकत होती.


विशाल नुकताच त्याच्या मित्रांकडे जाऊन आला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकाराने वडिलांना पैसे मागायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आजपर्यंत आपण मित्रांचे एवढे केले तर यावेळी मित्र आपल्याला आवर्जून मदत करतील असा त्याला विश्वास होता.


पण प्रत्येकानेच हात वर केले होते.साधी त्याची खाली खुशाली सुद्धा विचारायला कोणी तयार नव्हते. प्रत्येक जण काही ना काही बहाणे देत मोकळा झाला होता. तसेही हारलेल्या थकलेल्या घोड्यावर कोणीच पैसा लावत नसतो.


त्याच मनस्थितीत घरी परतला असताना अगदी गेटमध्ये पाय ठेवल्याबरोबर वहिनींचे विखारी शब्द त्याच्या कानावर पडले. विशालला वापस आलेला बघताच ती अजूनच तावातावानी बोलू लागली. तसंही  नआज नाहीतर उद्या वाटणी बद्दल बाबांशी बोलून घ्यायचं या उद्देशाने ते दोघे इथे आलेले. त्यामुळे स्वतःहून चालून आलेल्या संधीचा फायदा उठवून घ्यायचा विचार तिने केला.


खरं तर आजपर्यंत ते दोघे सुद्धा सासऱ्यांकडून ओरबाडूनच घेऊन गेलेले. शहरात मोक्याच्या ठिकाणी घेतलेला प्लॉट आणि त्यावर बांधलेलं दुमजली घर, ज्याचा भरपूर किराया येत होता ही खरंतर वडिलांचीच कृपा होती. सागर च्या तुटपुंज्या पगारात एवढी माया जमवणं शक्यच नव्हतं. पण ती  आता चोराची साव बनली होती.


विशालला घरातून बाहेर काढून देण्याची भाषा ऐकून सासूबाई मध्ये पडली होती.
"सविता ,तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का? या घरचा मुलगा आहे तो, काही बेघर नाही किंवा पोरका नाही.  त्याची पत्नी अशी दोन जीवांची असताना त्याला घरातून घालवून देण्याची भाषा तुम्हाला शोभते तरी काय?"


"आई तुम्ही या विषयावर अजिबात बोलू नका ,विशालच्या अशा वागण्याला तुम्हीच कारणीभूत आहात, तुमच्याच पाठिंबा आणि लाडामुळे चढलाय आणि असा वागतो तो. बंद करा तुमचे हे अति लाड."
सविता बेछूट पणे बोलत होती आणि कुणाला जुमानतही नव्हती.

सासरे आणि मोठे दादा तर जणू मूग गिळून गप्प होते. आणि हेच विशालच्या मनाला खूप लागलं होतं. तेव्हा तो काहीच बोलला नाही.


"समू मी खूप चुकलो ग. या सर्व प्रकाराचा तुला खूप मानसिक ताण होतोय हे समजते मला. ज्या मित्रांवर आजवर मी बिनदिक्कत विश्वास ठेवला त्यापैकी एकही आज माझ्या मदतीला धावला नाही. आणि बाबांनी कदाचित संधी दिली असती पण मला खात्री आहे दादा आणि वहिनी ती देऊ देणार नाही. मी घर सोडायचा विचार करतोय तू साथ देशील माझी?"


या अशा अवस्थेत खरंतर हा सगळा मानसिक ताण समिधाला असह्य होत होता.पण आल्या परिस्थितीत पतीच्या स्वाभिमानाला धक्का न लागू देता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हेच तिला ठाऊक होतं.

दोन दिवसांनी बाळंतपणासाठी माहेरी जायचं असल्याने तिची तयारी झालीच होती.रात्रभरातून विशालने ही त्याचे सगळे सर्टिफिकेट, त्याच्या कामाचे सामान ,कपडेलत्ते सगळ्यांची बांधा बांध केली. लगेच समिधाने कपाटातून तिचा दागिन्यांचा डबा काढला. गळ्यातल्या साध्या काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राखेरीज सारे दागिने तिने पतीच्या हवाली केले.


तिची ती कृती पाहून विशाल अगदी भारावून गेला. जेव्हा सगळेच त्याची साथ सोडू लागले होते तेव्हा फक्त ती एकटी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी होती. 

"समू खरं सांगू *सुखाचा प्राजक्त जेव्हा बहारात असतो ना तेव्हा त्याचा सुगंध अन् त्याने दिलेले फुलांचे दान लुटण्यासाठी प्रत्येकच जण आतुर असतो पण त्याचा बहर ओसरला की तिकडे साधं कोणी फिरकूनही बघत नाही, जगरीत आहे ही.*हे असं असताना सुद्धा तू ठामपणे माझ्या पाठीशी आहेस हेच खूप आहे माझ्यासाठी.

"तुम्ही काळजी करू नका, उद्या बाबांकडे जाऊ ना, तेव्हा बोलू त्यांच्याशी यावर काहीतरी मार्ग जरूर निघेल, झोपा आता निवांत."समू त्याच्या हातावर हलकेच थोपटत आश्वासक स्वरात बोलली."


दुसऱ्या दिवशी जेवण खावण झाल्यावर विशालने समिधाला माहेरी नेऊन देत असल्याची आणि तो सुद्धा दुसरीकडे आपल्या भविष्याच्या शोधात बाहेर पडत असल्याची घरी कल्पना दिली.

तो असा काही निर्णय घेईल असं घरी कुणालाच वाटलं नव्हतं पण आता पाऊल मागे घ्यायचं नाही असा ठाम निश्चय विशाल ने केला होता.


काय झालं असेल पुढे? विशाल ला योग्य मार्ग सापडला असेल का, जिथे घरच्यांनीच साथ सोडली तिथे समिधाच्या वडिलांनी त्यांची त्याची साथ दिली असेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.


© डॉक्टर मुक्ता बोरकर -आगाशे
    मुक्तमैफल

🎭 Series Post

View all