बेरीज वजाबाकी आयुष्याची ४ अंतिम - मुक्ता
विशालचा मोठा भाऊ आणि वहिनी कितीही खराब वागले असले तरी सध्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न ऐन जीवन मरणाच्या ऐरणीवर आलेला. शेवटी रक्ताची नाती एवढ्या सहजासहजी तुटत नसतात. अशावेळी आपण आपल्या लोकांसाठी धावायचं नाही तर कधी ?असा विचार करत दोघेही मन मोठं करून भावाला भेटायला गेले.
पश्चात्तापदग्ध भाऊ अश्रू गाळत बसला होता. पण जेव्हा त्याला विशाल भेटायला गेला त्याच्या मनात एक नवा आशेचा किरण जागला.
"दादा काय अवस्था करून घेतलीस आपली, असं कसं झालं रे?"सागरची अवस्था बघून विशालने हळवेपणाने विचारले.
"माझं प्राक्तन म्हण किंवा माझ्या कर्माची फळं म्हण. पण माझी ही अवस्था झालीय. आता एक तर जन्मभर डायलिसिस वर राहायचं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करायची हे दोनच पर्याय उरलेत. दोन्ही पैकी काहीही करायचं म्हटलं तरी भरपूर खर्च येणार. काय करावं कुठलाच रस्ता दिसत नाही मला."भावाच्या बोलण्यातली हतबलता विशालच्या मनाला स्पर्शून गेली. अशावेळी जर आपण आपल्या भावासाठी काही करू शकलो नाही तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही असं त्याला वाटलं.
त्याने डॉक्टरांशी सागरच्या तब्येतीबद्दल चर्चा केली. डॉक्टरांनी त्याला सगळी प्रक्रिया, त्यासाठी येणारा खर्च ,ऑपरेशन करायसाठी मुंबईसारखे ठिकाण गाठावं लागेल या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली.
या सगळ्या प्रकाराने समिधा मात्र अतिशय तणावात आली होती. आता कुठे सगळं सुरळीत सुरू होतं आणि अचानकच मध्ये हे काय झालं तेच तिला कळत नव्हतं. भावासाठी आपला नवरा स्वतःची किडनी सुद्धा द्यायला तयार होईल की काय? असं आता तिला वाटायला लागलं होतं. सुदैवाने त्याचा रक्तगट वेगळा असल्याने ही शक्यता मावळली होती हेच त्यातल्या त्यात एक समाधान होते तिच्यासाठी.
सासुबाई साठी ला आल्या होत्या. पण काठीने मजबूत होत्या. रक्तगट , क्रॉस मॅच सारख्या अनेक टेस्टपर्यंत जवळपास सगळ्याच तपासण्यांमध्ये त्यांचे रिपोर्ट्स अगदी योग्य आले होते. शेवटी एका आईला आपल्या मुलाच्या जीवा शिवाय काय मोठं असते?आपण आपल्या मुलाच्या जीवाच्या कामी येऊ शकतो यासाठी ती माऊली धन्य झाली होती.
आई किडनी द्यायला तयार झाली होती आणि सगळ्या चाचण्यांची शृंखलाही तिने यशस्वीरित्या पार पाडली होती. विशालच्या येण्याने एक भक्कम आधार सागरला लाभला होता. त्यामुळे सागरला ऑपरेशन साठी मुंबईला नेणे, तिथे राहणे ,आई आणि सागर दोघांची व्यवस्था बघणे आणि मुख्य म्हणजे ऑपरेशन साठी लागणारा पैसा लावणे ह्या सगळ्याच कामांचे टेन्शन दूर झाले होते.
समिधाच्या जावेच्या डोक्यावरचे सारे ओझे देवाने अगदी अलगद उतरवले होते.
"काहीजण अगदी नशीब घेऊन येतात नाही, नाहीतर मी...! सरळ सुरळीत म्हणून काहीच नाही."नकळतच समुच्या मनात विचार तरळून गेला."जाऊदे !नशीब ज्याचं त्याचं."म्हणत तिने मनाला समजवलं.
अखेर ऑपरेशनचा दिवस उजाडला. अपेक्षेप्रमाणे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. खरंतर आई आणि भाऊ हे दोघेही एकाच वेळी बेडवर असल्याने विशालची चांगलीच धावपळ आणि तारांबळ उडाली होती. तरीही मोठ्या शिताफिने आणि हिमतीने त्याने ती सिच्युएशन सांभाळली. या सर्व गोष्टींची सागरच्या बायकोला अजिबात आच सुद्धा लागली नाही.
सुट्टी झाल्यावर आई आणि भावाला घेऊन विशाल भावाच्या घरी परत आला. औषध पाणी सगळी नीट व्यवस्था लावून देऊन तो आता आपल्या घरी परतला.
"सविता, आई जेवली का ग? आईला फळं वगैरे नीट दिलीस ना?"सागर सविताला विचारायचा.
"अहो, करते मी सगळं .तुम्ही कशाला लक्ष घालता यात, चांगलं खा,प्या आणि राहा. दोघांचं करणं म्हणजे काय मजा वाटते का तुम्हाला?"असं बोलून सविता त्याला निरुत्तर करायची.
सागरच्या आई रमाबाई मात्र अशी ही बाई असू शकते? हा विचारच करत राहायच्या.
"आई बघा हो ,पोराला वाचवणं तुमच्याच हातात आहे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही."असं म्हणून ऑपरेशनच्या आधी पदर पसरणारी सून कुठे अन आता काम निघाल्यावर सासूला दोन वेळेचं जेवण द्यायला महाग असलेली ही सून कुठे?"
*गरज सरो अन वैद्य मरो* म्हणतात ते अगदीच खरं याची चांगलीच प्रचिती आता त्यांना आली होती. पण कुणाला काय सांगणार? *कारण शेवटी आपलेच दात अन आपलेच ओठ*अशी स्थिती असलेली.
पंधरा दिवसांनी नणंद आणि सासरे दोघे भेटीला आले. ऑपरेशनच्या आधी एकदम टणटणीत असलेल्या रमाबाईंची इतकी खालावलेली तब्येत बघून दोघांनाही आश्चर्यच वाटले.
ते आश्चर्य ओसरायच्या आधीच "बाबा, दोघा दोघांचं करणं मला झेपत नाही, आता तुम्ही यांना गावाला घेऊन जा."असे स्पष्टपणे सवितेने त्यांना सुनावले.
सविता एकावर एक त्यांना धक्के देत होती पण इथे काहीही सांगून उपयोग नाही हा विचार करून सासरे ही अगदी गप्प बसले होते. परत जाताना रमाबाईंना वापस नेण्याशिवाय काही दुसरा पर्याय नव्हता.
रमाबाईंना मनात वाटत होतं ,*आपली अवस्था ना अगदी त्या पिकलेल्या रसाळ आंब्यासारखी आहे. जेव्हा तो पिकायला येतो तेव्हा त्याच्या सुगंधाने तो सगळ्यांना आकर्षित करतो. चांगला पिकल्यावर सगळेजण त्याच्या रसाची अगदी शेवटच्या थेंबापर्यंत गोडी चाखत असतात. अन एकदा का त्याच्यातला रस संपला की उरलेली कोय अन् साल कचरा म्हणून फेकून देतात.*आपल्या सोबतही काय वेगळं झालंय? गरज संपली तशी अडगळ म्हणून सुनेने आपली रवानगी गावीच केली ना..!
सासरे पत्नीला गावी घेऊन तर आले पण इथे करणारं कोण होतं? एवढं मोठं ऑपरेशन होऊन शरीराचा एक अवयव दान करून सुद्धा रमाबाईंची व्हावी तशी काळजी, सोय अजिबात होऊ शकली नव्हती.
आधीचेच थकलेले वय, त्यात पुरेशी काळजी नाही आणि खाण्यापिण्याची झालेली हेळसांड यामुळे त्यांनी काही दिवसातच अंथरूण धरले.
मधात विशाल गावाला गेला तेव्हा आईची अवस्था पाहून त्याच्या मनावर अक्षरशः आघात झाला. तसाही लहानपणापासूनच आई मध्ये त्याचा जास्त जीव होता. आईसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल असा विचार करूनच तो परतला.
"समू, आईची अवस्था फार वाईट झाली आहे ग, तिची अवस्था पाहून माझं कशातच मन लागत नाही आहे."
"तुमच्या वहिनीची करणी आहे ती! विशाल, बघा ना आईच्या किडनीची गरज होती तेव्हा किती लाडीगोडी लावत होती ती आईला. तुलासुद्धा गळ घालण्यासाठी तिने आईचाच वापर करून घेतला आणि आता काम झालं तर अक्षरशः दुर्लक्ष करते आहे. शोभते काय रे हे तिला? आपण काय करणार त्यात?"
"समू असं नको बोलूस ग, आई आहे ती माझी! पोरगा जिवंत असताना आईची अशी अवस्था असेल तर त्या मुलाच्या असण्याचा काय उपयोग?
समू प्लीज, आजवर जशी साथ दिलीस तशी अजून एकदा साथ दे ना?"
नवऱ्याचं आईवरचं प्रेम समूला माहीत होतं. माणुसकीच्या नात्याखातर आपण कुणासाठीही काही करतो आणि इथे लेक असतांनाही आईची अशी अवस्था होत असेल तर...? हा विचार करूनच तिला वाईट वाटायला लागलं. तिच्यावरचे संस्कार तिच्यातील माणूसकीचा झरा अजूनही टिकवून होते. दुसऱ्याच दिवशी स्वतः नवऱ्या सोबत जाऊन सासूला ती घेऊन आली.
सासूची अवस्था एवढी खराब झाली होती की बेडवरून उठण्याची ही तिच्या ताकद उरली नव्हती. सतत झोपून झोपून बेड सोअर व्हायची चिन्हे दिसू लागली होती. सासूचं सगळंच खाटेवर करावे लागे. वाटते तितके काहीच सोपे नव्हते. ऑफिसला जाईपर्यंत विशाल मदत करायचा पण पुढचं सगळं समुलाच करावा लागायचं. तिचं करता करता खूप वेळ व्हायचा. त्यातल्या त्यात बघायला येणाऱ्या नातेवाईकांमुळे अजूनच अडचण व्हायची. सासुबाई चे सगळे करता करता समिधाची स्वतःचीच अन्नावरची वासना उडू लागली होती. अलीकडे तर तिला तीच आजारी पडते की काय असं वाटायला लागलं होतं. पण जेवढे दिवस त्या होत्या तेवढे दिवस समूने अगदी मनापासून आणि कर्तव्याने त्यांचे सारे केले होते.
आज खरंतर या सगळ्या त्रासातून मरणाने त्यांची सुटका केली असंच तिला वाटत होतं. सासुचे जीवन म्हणजे बाईच्या जीवनाची शोकांतिका तिला वाटत होती. वाईट तर तिलाही वाटतच होतं पण सासूला या अवस्थेपर्यंत आणणारी जाऊ जेव्हा उगीचच हेल काढून दुःख प्रदर्शन करत होती त्याचा मात्र तिला फारच मनस्ताप होत होता.
म्हणून कान आणि मनाची कवाड बंद करून ती तशीच बसून राहिली होती.
समिधा मनात विचार करत होती..
खरंच माणसाचे आयुष्य हे एखाद्या गणितीय समीकरणापेक्षा काही वेगळे नाही......., नाही कां? सगळ्यांनाच वाटते या गणितात सुखाची बेरीज असावी आणि दुःखांची वजाबाकी.प्रत्येक क्षणाला आनंदाच्या गुणाकाराचे कोंदण असावे अन् या चौकटीला नजर लागू नये म्हणून एखाद्या काळया तिटा एवढे फक्त दुःख असावे.
पण खरे आयुष्य याहून फार वेगळे असते नाही..! इथे तर दुःखांचीच बेरीज अन् गुणाकार जास्त असतो. सुख असते नावापुरते. जसे तिचे आयुष्य होते. असे हे आयुष्याचे गणित सोडवणे हे फारच कौशल्याचे काम असते. कधी कुठं हातचं घ्यायचं तर कधी कुठे हातचं द्यायचं याची व्यवस्थित जाण हे गणित सोडवणाऱ्याला असली की मग मनासारखे उत्तर हाती लागते. कधी कधी तर जिकडे तिकडे सुखाची रेलचेल असतानाही व्यवस्थित ताळमेळ साधला न गेल्याने शेवटच्या क्षणी सुख निसटून जाऊन दुःख फक्त बाकी असते, जसं तिच्या सासूच्या आयुष्याचं झालेलं. कधी सगळीकडूनच कोंडी झाली असताना अचानक बाजूला काढून ठेवलेली सुखाची गंगाजळी खूप मोठा आधार बनून जाते.
तर कधी आपल्या सत्कर्मांची बेरीज जास्त असूनही मनासारखं दान पदरी पडत नाही. अशावेळी संचित, प्रारब्ध, कर्मफळ सिद्धांत अशा विविध प्रमेयांचा आधार घेत आयुष्याच्या या समीकरणाची उकल करायची आणि आहे त्यात समाधान मानून घ्यायचं.
कदाचित हेच शिल्लकीत टाकलेले सत्कर्म आपल्या नव्या प्राक्तनाची पायाभरणी असतील.
हे सगळं पाहिलं ना की कृष्णाने सांगितलेला कर्मयोग,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
हा सिद्धांत आजही काळाच्या कसोटीवर किती तंतोतंत खरा आहे याची खात्री पटते अन् आयुष्याच्या बेरीज वजाबाकीच्या गणिताचं कोडेही अलगद उलगडत जाते.
© डॉक्टर मुक्ता बोरकर -आगाशे
मुक्तमैफल
माणसाचे आयुष्य एखाद्या गूढ गणितीय समीकरणासारखे आहे.
एका सत्य घटनेला या विषयाच्या चौकटीत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या. धन्यवाद!????????