Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बेरीज वजाबाकी आयुष्याची (Dr. Vrunda F) भाग -४(अंतिम )

Read Later
बेरीज वजाबाकी आयुष्याची (Dr. Vrunda F) भाग -४(अंतिम )


बेरीज वजाबाकी आयुष्याची ( Dr. Vrunda F.)

भाग -चार. (अंतिम.)

ती निघाली होती, कुठे जायचंय काहीच ठाऊक नव्हतं.पाय नेतील तिकडे चालत राहिली. मनात ना कसली चिंता, ना कशाची भीती होती. अंधार पडत आला होता. चालून चालून पाय थकले होते. सकाळपासून पोटात काही नव्हते त्यामुळे जराशी ग्लानी आली होती. एका इमारतीच्या भिंतीला टेकून हातातील बाटलीतील पाण्याचा शेवटचा घोट तिने घेतला आणि ती तिथेच कोसळली.


जाग आली तेव्हा ती एका बिछान्यावर होती. तिच्या शेजारी पांढरे वस्त्र परिधान केलेली एक स्त्री बसली होती.


"कसं वाटतंय आता? बरं आहे ना?" त्या प्रेमळ स्वरात तिला वीणाचा भास झाला.

"मी कुठे आहे? आणि तुम्ही कोण?" क्षीण स्वरात तिने विचारले.

"मी समिधा. या महिलाश्रमांची व्यवस्थापिका. सायंकाळी तुम्ही बाहेर बेशुद्धावस्थेत आढळलात म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो. डॉक्टर चेक करून गेलेत. मानसिक ताणामुळे चक्कर आली असावीत असे म्हणाले ते. तुम्ही कुठे निघाला होतात?" समिधा तिला प्रेमाने विचारत होती.


"कुठे निघाले होते ते ठाऊक नाही पण योग्य ठिकाणी पोहचले हे मात्र नक्की." किंचित हसून सुचिता म्हणाली.

******

ती महिलाश्रमात आली त्याला आता वीस वर्षाचा काळ लोटला होता. काही दिवस तिथेच राहून तिने तिथे छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली. तिची आवड बघता समिधाने तिला पुढे शिकायला प्रोत्साहित केले आणि वयाच्या चाळीशीत समाजकार्याचा कोर्स करून स्वतःला त्यात जणू झोकूनच दिले होते.

अभी तिला स्वतःचे जग ओळखायला शिक म्हणाला होता. खरंच तिने तिच्या नव्या जगात प्रवेश केला होता. स्वतःचे अस्तित्व निर्माण करून स्त्रीत्व सिद्ध केले होते. महिलाश्रमासोबतच ती आता अनेक एनजीओ शी जुळली होती. वय वाढत चाललं तसे मुद्दाम वृद्धाश्रमाशी सुद्धा जुळली. आठवड्याचे काही दिवस तिथे येणाऱ्या वृद्धांसोबत घालवू लागली. आणि अशाच एका दिवशी तिचा भूतकाळ पुन्हा समोर उभा राहिला.


"विकास, आजचा काय हालहवाल?" वृद्धाश्रमातील व्यवस्थापकाला ती विचारत होती.

"नेहमीचे रुटीन हो मॅडम. दोन दिवसांपूर्वी एक नवीन पाहुणे आलेत. अल्झायमर झालाय. हॉस्पिटलवाल्यांनी इकडे पाठवलंय. त्यांच्या सोबत कोणीच नाही. मुलगा अमेरिकेत असतो, तो पैसे पाठवतो. पण इथे वडिलांकडे यायला वेळ नाही.

त्याने स्पष्टच सांगितलेय की एक कर्तव्य म्हणून तो हे करतोय, बाकी वडील म्हणण्यासारखं काही नातं नाहीये त्यांच्यात. जेवढी उत्तम काळजी घेऊ शकाल तेवढी घ्या पण अंतिम समयी येऊ शकेन अशी अपेक्षा ठेवू नका. असेही तो बोलला.

त्याने घसघशीत देणगी पाठवलीय. त्याच्या पुण्याईने आजोबा बरे झाले तर चांगलंच आहे. पण खरं सांगू मॅडम? काहीच आशा नाहीये. पंधरा दिवसापासून तर त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाहीये."

"असं नाही रे बोलायचं. चल मी भेटून येते तुझ्या आजोबांना." सुचिता त्याच्यासोबत नव्या पाहुण्याच्या खोलीत गेली.


"हे बघा मॅडम, हेच ते आजोबा. झोपले आहेत. सकाळी त्यांना थोडे खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं." विकास तिला सांगत होता.

"बरं, जा तू. मी माझ्या परीने प्रयत्न करून बघते." असे म्हणून सुचिता आत गेली.

बेडवरची व्यक्ती बघून तिला एकदम गरगरल्यासारखे झाले. दुसरे तिसरे कुणी नसून तो अजित होता. इतक्या वर्षांच्या काळात ना तिने कधी घरी फोन केला होता ना कोणी तिला शोधायचा प्रयत्न केला होता. आयुष्याच्या सांजवेळी मात्र नियतीने त्याला स्वतःहून तिच्या पुढ्यात उभे केले होते.

"अजित.." खोल स्वरात तिने हाक दिली. तिची हाक त्याच्या कानापर्यंत पोहचली नव्हती.

"अजित काय अवस्था करून घेतलीस रे स्वतःची? आपल्या आयुष्याची बेरीज वजाबाकी पूर्ण शून्य उरली आहे हे उमगल्यावर मी ते घर सोडले. एका मोठ्या शून्यातून काहीतरी निर्माण करायला लागले आणि या वळणावर तू असा अचानक आलास. आता रे आपला पुन्हा कसला हिशोब बाकी राहिलाय?" त्याच्याजवळ बसत तिने थरथरत्या हाताने त्याच्या हातावर हात ठेवला आणि तिलाही त्याच्या हाताची थरथर जाणवली.

तिचा आवाज नाही पण स्पर्श त्याच्या मेंदूपर्यंत पोहचला होता.

"अजित?" आनंद आणि आश्चर्याने तिने पुन्हा त्याला साद घातली. तिने बघितले, तो किलकिल्या नजरेने तिच्याकडे बघत होता. कदाचित ओळख पटली असावी.

"मॅडम तुम्ही म्हणालात तशी पेज घेऊन आलेय. बघा, पितात का?" तिथल्या सेविकेचा आवाज आला.

डोळ्यातील पाणी पुसून तिने चमच्याने त्याला भरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानेही तिला प्रतिसाद दिला. त्याच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा तिला स्पष्ट दिसत होत्या. डोळे पुसायला म्हणून तिने हात जवळ नेले आणि अचानक मॉनिटरचा बीप बीप आवाज बंद झाला. तिला डोळ्यात साठवतच त्याने अखेरचा श्वास सोडला होता.


"मॅडम," विकासच्या स्वराने ती भानावर आली.

"नवरा होता रे माझा. ज्याच्याशी फारकत घेतली तोच शेवटच्या वेळी माझ्याकडे आला. आयुष्य पुन्हा शून्य झाले रे विकास." डोळे पुसत ती म्हणाली.


"छे, हो मॅडम. तुम्हाला हिशोब कुठे येतो? तुमच्या आयुष्याची बेरीज वजाबाकी उरलीच कुठे? उलट या समीकरणाचा आलेख तर गुणाकारच्या पटीने वाढतोय. वीस वर्षांपासून कित्येकांच्या आयुष्याला तुम्ही नवी प्रेरणा दिली. त्यातलाच मीही एक आणि आज तर ज्याने तुम्हाला आयुष्यभर अव्हेरले त्याला दोन घास खाऊ घालून खूप मोठे पुण्य पदरी बांधून घेतलंत. त्याचा हिशोब कधी होऊ शकेल का?"


त्याचे बोलणे पटले होते तिला. एक दीर्घ श्वास घेऊन ती परत आश्रमातील इतर वृद्धांना भेटायला गेली. त्यांची सेवा करून तिच्या आयुष्याच्या हिशोबाचा आलेख कदाचित आणखी उंचावणार होता.

समाप्त.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे *
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//