बेरीज वजाबाकी आयुष्याची (Dr. Vrunda F) भाग -३

कथा तिच्या आयुष्याच्या हिशोबाची

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( Dr. Vrunda F.)
भाग - तीन.


तिने अभीच्या शिक्षणाचा मुद्दा समोर केला आणि त्याने एक पाऊल माघारी घेतले. यथावकाश अभी चांगल्या गुणांनी पास झाला. त्याचे दुसऱ्या शहरात इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन, होस्टेल.. सगळं निस्तरता निस्तरता दोन वर्ष अशीच सरली. आत्ता तो सुट्ट्यामध्ये घरी आला होता. नुकताच विसावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला होता आणि आज पुन्हा अजित तिच्यासमोर घटस्फोटाचे बोलत होता. यावेळी ना तिला अभीचे कारण पुढे करता आले अन ना ही त्याला नकार देता आले.

"आईऽऽ" खांद्यावर असलेला अभीचा हात आणि कानावर पडलेली त्याची हाक, दोन्ही स्पर्शाने तिचे अंतर्मन ढवळून निघाले.

"केव्हाची अशीच बसली आहेस. ये, जेवण करून घे." तिच्यापुढे गरम केलेल्या खिचडीचे ताट ठेवत तो म्हणाला.

ती फक्त त्याला न्याहाळत होती, 'कोणता अभी खरा? मघाशी ताट दूर सारणारा की आत्ता मायेने तिच्यासाठी स्वतः ताट घेऊन येणारा?'


"आता अशी बघू नकोस. खिचडी तेवढीही वाईट नव्हती झाली. आपण खाऊ शकतो." एक स्मित करत त्याने तिच्यासमोर घास पुढे केला. तिने बळेबळेच चार घास खाल्ले. गालावरचे सुकलेले अश्रू पुन्हा नवे ओल घेऊन येत होते.


"हेच. तुझे असे रडणे मला आवडत नाही गं. एक आई म्हणून तुझा खूप अभिमान आहे मला. बाबा आणि तुझ्यातील नाते आजवर कदाचित तू फक्त माझ्यासाठी निभावले असशील. पण आई, आता पुरे ना गं. एक स्त्री म्हणून तू स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिक ना.


आजवर आजी, आजोबा, बाबा, मी.. आमच्यासाठीच जगत आलीस. एकदा स्वतःसाठी जगून बघ. तुला तुझी स्पेस हवी आहे, ती देऊन बघ. माझा विचार करू नकोस गं. मी स्वतःला सांभाळेन. पण तू बाबाने दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन तुझ्या स्त्रीत्वाला जप. तुला काय हवेय ते स्वतःला विचार. आई जेव्हा तू आमचा विचार सोडून तुझ्यातील तिला गवसशील ना, तेव्हा आजवर वाटत आलीस त्यापेक्षा जास्त ग्रेट वाटशील मला."

तिला मिठी मरून तो परत तसाच आपल्या खोलीत गेला. उद्या होस्टेलला परत जायच्या तयारीला लागला.

अभी गेला तरीही सुचिता तिथेच बसून होती. शॉक लागल्यासारखी. मघाशी तिच्या मनात त्याच्याबद्दल दुखावल्याची भावना निर्माण झाली होती आणि आत्ता तो जे बोलला ते ऐकून ती दुसराच विचार करू लागली होती.

'म्हणता म्हणता किती मोठा झालाय माझा लेक? माझे बोट पकडून चालणारा, माझ्या हातून भरवून घेणारा, आज मला दिशा देऊन गेलाय. आपल्या हाताने त्याने मला भरवले. जे आजवर मला कळले नाही ते तो दोन मिनिटात मला शिकवून गेला. कुठून आले हे बळ, कुठून आले हे शहाणपण?'


डोळे पुसत ती उठून उभी राहिली. अभीच्या बोलण्याने काहीतरी जादू झाली होती खरी. आतापर्यंत द्वन्दात अडकलेले मन काहीतरी विचार करू पाहत होते. ती खोलीत गेली, बेडवर घटस्फोटाचा कागद आणि घराची कागदपत्रे तिची वाट बघत होते.


तिने एकवार आपल्या खोलीवरून नजर फिरवली. लग्न करून आली तेव्हा याच खोलीत ती बेडवर मान खाली घालून अजितची वाट बघत होती. डोळ्यात आलेले पाणी पुसून ती पुन्हा बाहेर आली. बाजूला असलेल्या एका खोलीचा हळूच दरवाजा उघडला. ही खोली तिच्या सासुसासऱ्यांची होती. खोलीत पाऊल टाकले आणि वीणाचा प्रेमळ स्पर्श तिला आठवला. तसाच आवंढा गिळून ती स्वयंपाकघरात गेली. तिचे स्वयंपाकघर, तिथल्या प्रत्येक वस्तूवर आजवर तिचा हात फिरला होता. तेथून निघून हॉल मध्ये येऊन ती सोफ्यावर मटकन बसली.


'अभी म्हणतोय स्वतःचं अस्तित्व शोध. तुझ्यातील तिला ओळख. कोण? कुठेय ती? ती इथेच आहे. याच वास्तूत. इथल्या प्रत्येक वस्तूत. अभी, हे घर म्हणजे माझे जग आहे रे. इथल्या प्रत्येक गोष्टीत जीव अडकलाय माझा. तू, तुझे बाबा आणि हे घर या शिवाय काहीच नकोय मला. कशी मी त्या कागदाच्या तुकड्यावर सही करू?' तिचा बांध पुन्हा फुटला.

******

सकाळी अभी त्याची बॅग घेऊन बाहेर आला. डायनिंग टेबलवर नाश्त्याची प्लेट घेऊन सुचिता त्याची वाट बघत होती.


"आई, निघतो गं मी. आता इथे परत येईन की नाही माहित नाही. काळजी करू नकोस. बाबासोबत नाही राहणार मी. तुझी जागा दुसऱ्या स्त्रीला देण्याचं धाडस माझ्यात नाहीये." तिच्याकडे बघून कसंणूस हसून तो निघाला.

"अभी, आईच्या हातचं शेवटचं खाणारही नाहीस?" दाराजवळ पोहचलेल्या त्याला तिच्या आर्त मनाने घातलेल्या सादेने थांबण्यास भाग पाडले.

"तुझ्या बाबाला फोन करून बोलावून घे. माझा निर्णय झालाय आणि दुपारपर्यंतच मला तो सांगायचा आहे. तुला तोपर्यंत थांबावेसे वाटले तर थांबू शकतोस."
त्याच्या उत्तराची वाट न बघता ती तिच्या खोलीत गेली.


"अजित हे डिवोर्स पेपर. तुला सही हवी होती ना? मी केलीये आणि हे घराचे पेपर्स. मला हे घर माझ्या नावे नकोय, म्हणजे मला हे घरचं नकोय. आजपासून, या क्षणापासून माझा या तुझ्याशी, या घराशी, इथल्या वस्तूंशी संबंध संपूष्टात आलाय." ती शांतपणे बोलत होती. आवाजात कसली अगतिकता, कसलेच भाव नव्हते. डोळ्यात एक निर्धार मात्र स्पष्ट दिसत होता.


"घर नकोय म्हणजे? कुठे जाणार आहेस तू?" तिचा निर्णय ऐकून अजितला धक्का बसला.


"ठाऊक नाही. पण हां, जीव वगैरे काही देणार नाही. जे आजवर जमलं नाही ते करून बघेन. माझ्यातल्या स्वतःला शोधून बघेन."

ती बॅग घेऊन निघाली. अजित ती काय बोलली याचा विचार करत बसला आणि अभी? तो डोळ्यातील पाणी पुसत मनातल्या मनात तिला 'ऑल द बेस्ट' म्हणत होता.


ती निघाली होती, कुठे जायचंय काहीच ठाऊक नव्हतं.पाय नेतील तिकडे चालत राहिली. मनात ना कसली चिंता, ना कशाची भीती होती. अंधार पडत आला होता. चालून चालून पाय थकले होते. सकाळपासून पोटात काही नव्हते त्यामुळे जराशी ग्लानी आली होती. एका इमारतीच्या भिंतीला टेकून हातातील बाटलीतील पाण्याचा शेवटचा घोट तिने घेतला आणि ती तिथेच कोसळली.

काय झाले असेल सुचिताला? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all