भाग -दोन.
सुचिता तशीच खुर्चीवर बसून राहिली. तिच्या भावनेचा बांध फुटला होता. अभीचे वागणे तिच्यासाठी अनपेक्षित होते. त्याला त्याच्या बाबाच्या बाहेरच्या संबंधाबद्दल माहिती होते आणि त्याबद्दल त्याचा काहीच आक्षेप नव्हता. हे सगळं तिला अनाकलनीय होते.
त्याचे एकेक शब्द तिच्या काळजाला चीर पाडत होते. अजित जसा तिच्या दिसण्या असण्याबद्दल बोलायचा, आज अभीसुद्धा तेच बोलला होता.
ती विचार करत तसेच बसून राहिली. तिचा सगळा भूतकाळ सरसर नजरेखालून सरकत होता. बावीस वर्षांपूर्वी एकदा बाजारात आईसोबत खरेदी करत असताना अचानक एका स्त्रीने तिच्या आईला आवाज दिला होता.
"विजू, किती वर्षांनी भेटत आहेस? आपल्या लग्नानंतर एकदा एका कार्यक्रमात भेटलो होतो, आपली मुलंही सोबत होती त्यानंतर आज भेटतोय." ती स्त्री आनंदाच्या भरात अविरत बोलत होती.
"वीणा? तू इथे कशी गं? ए अगं, तुला आठवते? तेव्हा आपण आपल्या मुलांचं एकमेकांशी लग्न करायचे हेही ठरवून टाकले होते." विजू हसून म्हणाली.
"हो अगं. माझा अजित आता लग्नाचा झालाय, तुझीही सूची मोठी झाली असेलच की." बोलता बोलताच तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या सुचिताकडे गेले.
"विजू, अगं हीच तर तुझी सूची नाही ना? किती सुंदर दिसतेय? मला सून पसंत आहे हं." वीणा म्हणाली तशी सुचिता चक्क लाजली. नुकतेच अठरावे ओलांडलेली ती लग्नाच्या विचाराने मोहरली होती.
मैत्रिणीशी अचानक झालेल्या भेटीत वीणा लग्न ठरवूनच घरी परतली. आल्या आल्या तिने अजित व त्याच्या बाबाला हे सांगितले आणि अजित खवळला. असे न बघता, न भेटता त्याचे लग्न ठरतेय, हेच त्याला पचनी पडत नव्हते.
वीणा मात्र तिच्या शब्दावर ठाम होती. या घरात सून म्हणून तिला फक्त आणि फक्त सुचिताच हवी होती. तिच्या हट्टापुढे शेवटी अजितचा नाईलाज झाला. लग्न ठरले आणि तीन महिन्यात सुचिताने अजितची अर्धांगिनी बनून घरात प्रवेश केला.
"केवळ आईच्या इच्छेखातर मी हे लग्न केलेय. बायको म्हणून ज्या क्वालिटी मला एका स्त्री मध्ये हव्या होत्या त्या नाहीयेत तुझ्यात. तुझं शिक्षण, तुझं दिसणं, तुझा रंग.. आपल्यात काहीच मॅच होत नाही. तेव्हा नवरा म्हणून माझ्याकडून फारशा अपेक्षा करू नकोस." पहिल्या रात्रीच अजितने तिला स्पष्ट सांगितले.
पहिल्या रात्रीची हुरहूर घेऊन ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. लग्न इतक्या घाईत झाले होते की त्यापूर्वी दोघांना एकत्र वेळ घालवायला जमलेच नाही. पहिल्यांदा आपला नवरा म्हणून अजित आपल्याशी कसा वागेल, हे नाते कसे फुलवेल या विचारात असतानाच त्याने मनातील खदखद सांगून खाली सतरंजीवर आपले अंग टेकले. ती मात्र अश्रुंच्या वर्षावात न्हाऊन निघत होती.
*******
आत्ताही तसेच अश्रू गालावर ओघळत होते. नवरा घराबाहेर, मुलगा जेवण झिडकारून त्याच्या खोलीत. आजवर अजितने नाही, किमान अभीने तरी समजून घ्यावं असे वाटत होते तर तोच तिची आणि त्या मोनाची तुलना करत मोनाला वरचढ ठरवून मोकळा झाला होता.
"माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. थोडासा जिद्दी असला तरी समजदार आहे, बदलेल तो." एकदा स्वयंपाकघरात टीपं गाळत असताना वीणाने सुचिताला पाहिले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.
त्या प्रेमाच्या स्पर्शाने तिचा ऊर पुन्हा भरून आला. लहानपणी बाबाचे हरवलेले छत्र. मामाच्या आसऱ्याने कशीबशी वाढलेली ती. आई जणू त्या घरात मोलकरीण बनलेली होती. अशा स्थितीत मोठी होताना अचानक वीणा तिच्या आयुष्यात आली होती आणि त्यानंतर तीन महिन्यातच तिचे जीवन बदलून गेले होते. सुखाच्या दारात पाय ठेवते आहे असे वाटले तोच एका दुःखाच्या दरीत आपला कडेलोट होतोय याचा साक्षात्कार तिला झाला. मात्र तिच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.
वीणा म्हणाली तसे अजित बदलत होता. सतरंजी वरचे अंथरून बेडवर आले होते. हळूहळू शरीराची देवाणघेवाण होऊ लागली होती. मनाचा व्यवहार मात्र कोरडाच राहिला. त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम कधी रुजलेच नाही आणि शरीराच्या झालेल्या व्यवहाराने तिच्या उदरात एक नवा बिजांकुर रुजायला लागला हे ध्यानातही आले नाही.
काही दिवसांनी अभीची दुडूदुडू पावले घरात फिरू लागली. त्याच्या बाळलिलेत रमताना अजितच्या वागण्याकडे तिने कानाडोळा केला.
"लेकरू आलंय ना पदरात? आता अजित देखील तुझ्या पदराची गाठ कधीच सोडणार नाही, हा शब्द आहे माझा." वीणा तिला समजावायची. तो शब्द मात्र शब्दच राहिला.
अभीचे बालपण, सासऱ्यांचे आजारपण आणि मग नंतर नंतर सासूने धरलेले अंथरुण.. सुचिताला स्वतःकडे लक्ष द्यायला जमलेच नाही. वीणाने जगाचा निरोप घेतला तेव्हा आपला सगळ्यात मोठा आधार गमावल्याचे दुःख तिला झाले. आई तर तिच्या लग्नानंतर दोन वर्षातच अल्पशा आजाराने गेली होती तेव्हापासून वीणाच तिची आई झाली होती. तिचाच आधार हरवल्यावर सुचिता अगदी एकटी पडली.
अभी आता मोठा होऊ लागला होता. त्याचे विश्व आईपासून हळूहळू दुरावू लागले होते. त्या विश्वात मित्र-मैत्रिणी, अभ्यास, काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न यांनी शिरकाव केला होता. अजित तर घरात कमी आणि बाहेरच जास्त राहू लागला होता. तिलाही आता या सगळ्यांची सवय झाली होती. कढत कुढत ती आपल्याच कोषात राहू लागली आणि एक दिवस अचानक अजितने बॉम्ब टाकावा तसा तिच्यासमोर विषय काढला.
"सुचिता, मला वेगळे व्हायचे आहे. म्हणजे मला घटस्फोट हवा आहे."
"अजित?" ती जणू गोठली होती. तसेही त्या घरात राहायचे म्हणून ते एकत्र असायचे. तरीही ते असणे सुद्धा तिच्यासाठी कमी नव्हते.
"इतकी वर्ष आपण एकत्र काढलीत आणि आत्ता हे घटस्फोट वगैरे?" हिंमत करून तिने विचारले.
"नाईलाज होता माझा. आईच्या हट्टामुळे मी काही करू शकलो नाही, पण आता बस्स! आता तुझ्यासोबत राहणे नाही जमणार मला आणि हो, काळजी करू नकोस. आईची लाडकी होतीस ना तू? तुला या घरातून मी बाहेर काढणार नाही. हे घर तुझ्या नावावर करतोय." तो स्पष्टपणे म्हणाला.
घटस्फोटाच्या बदल्यात?" ती आवंढा गिळून म्हणाली.
"तुला हवे तर तसे समज."
"अजित, काय बोलतोस तू हे? अभी बारावीला आहे त्याचा तरी विचार कर. त्याच्यावर काय परिणाम होईल ते कळतेय का?"
तिने अभीच्या शिक्षणाचा मुद्दा समोर केला आणि त्याने एक पाऊल माघारी घेतले. यथावकाश अभी चांगल्या गुणांनी पास झाला. त्याचे दुसऱ्या शहरात इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन, होस्टेल.. सगळं निस्तरता निस्तरता दोन वर्ष अशीच सरली. आत्ता तो सुट्ट्यामध्ये घरी आला होता. नुकताच विसावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला होता आणि आज पुन्हा अजित तिच्यासमोर घटस्फोटाचे बोलत होता. यावेळी ना तिला अभीचे कारण पुढे करता आले अन ना ही त्याला नकार देता आले.
काय करेल सुचिता? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा