बेरीज वजाबाकी आयुष्याची( भाग २ रा)(आर्या पाटील)

जेव्हा क्षणिक सुखापायी आयुष्याची गोळाबेरीज शून्य येते.

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( भाग २ रा)

©® आर्या पाटील

ती जाताच त्याने आईला कॉल केला.मनमोकळेपणाने आईला आपल्या प्रेमाची कबुली दिली. मेघना सोबत घेतलेला लग्नाचा निर्णयही सांगून दाखवला.

" माझ्या सुनेचा एखादा फोटो तरी दाखव." आई फोनवर म्हणाली.

" आता प्रत्यक्षच बघ." म्हणत तो फोनवरच लाजला.

घरून परवानगी मिळणारच याची त्याला खात्री होती पण खरी समस्या मेघनाच्या घरच्यांची होती. तिचे वडिल कडक शिस्तीचे होते त्यामुळे त्यांना तयार करणे हिच खरी परीक्षा होती.

इकडे घरी आल्यावर मेघनाची बदललेली मनस्थिती तिच्या आईच्या नजरेतून सुटली नाही.

" मेघना, आज घरी यायला उशीर का झाला ?" आईने प्रश्न केला.

" ते मैत्रिणीसोबत बाहेर गेले होते." उत्तर देतांना मेघनाची खाली गेलेली नजर त्यांना खूप काही सांगून गेली.

तोच त्यांची नजर तिच्या कपड्यांवर पडलेल्या रक्ताच्या डागावर गेली. त्या डाग्यांपासून अनभिज्ञ ती पुरती घाबरली.ओटीपोटातही कळ यायला सुरवात झाली होती.

" मेघना, मला खरं खरं सांग काय झालं आहे ते ?" आई गंभीर होत म्हणाली.

मात्र काही कळायच्या आत चक्कर येऊन ती खाली कोसळली. तात्काळ तिच्या आईने ओळखीच्या महिला डॉक्टरांना कॉल केला. तिला चेक करतांना डॉक्टरांना घडलेला सारा प्रकार लक्षात आला. आईला बाहेर बोलवून त्यांनी त्याची कल्पना दिली.

" मी पदर पसरते डॉक्टर यातलं काहीच बाहेर जाता कामा नये नाहीतर आमची इज्जत वेशीवर टांगली जाईल." मेघनाची आई रडत म्हणाली.

" कोणाला काहीच कळणार नाही काळजी करू नका. मेघनाला सांभाळा.तिच्याशी स्पष्ट बोला." म्हणत डॉक्टर निघून गेल्या.

त्या जाताच आईचा मोर्चा मेघनाकडे वळला.

शुद्धीवर आलेल्या तिला पाहून त्या चांगल्याच भडकल्या.

" कुठे शेण खाऊन आली आहेस सांग? तुला लाज नाही वाटली का हे करायला ?" म्हणत त्यांनी मेघनाच्या कानशिलात लगावली.

" आई, माफ कर मला पण आधी ऐकून घे." ती सांगतच होती की पुन्हा त्या आक्रमक झाल्या.

" काय ऐकायचं बाकी ठेवलस अजून ? हा असा दिवस दाखवण्याआधी तु मेली असतीस तर बरं झालं असतं." म्हणत त्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर हात उगारला.

" आई, माझं ऐक तरी" रडत रडतच ती म्हणाली.

" आता मी सांगते ते ऐक. उद्याच्या उद्या आपण गावी जाणार आहोत." म्हणत त्यांनी तिचा मोबाईल खेचून घेतला. तिला रूममध्ये बंद करून बाहेर आल्या.

ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. हर्षराजबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांच्या कानापर्यंत तिची साद पोहचत नव्हती. मेघनाचे बाबा घरी आल्यानंतर त्यांनी रडत रडतच त्यांना घडलेली सारी हकिगत सांगितली. जरी कडक शिस्तीचे असले तरी मेघना त्यांचा अभिमान होती. तिच्यावर आभाळाएवढा जीव होता त्यांचा.जाणारा तोल सावरत खुर्चीचा आधार घेत ते खाली बसले. भावना अनावर झाल्या आणि ते ओक्साबोक्सी रडू लागले. मेघनाच्या आईने त्यांना सावरले आणि गावी जाण्याचा मानस बोलून दाखवला. विचारांती त्यांनाही तो पटला. उद्या सूर्य उगवण्याआधीच निघायचे ठरले.

मेघनाने मात्र गावी जाण्यास स्पष्टपणे नकार दर्शवला.

बाबा रुममध्ये येताच तिची नजर आपोआप खाली गेली. डोळ्यांतून अश्रुधारा ओघळू लागल्या.

" बाबा, मी चुकले पण माझं प्रेम चुकीचं नाही. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर..." ती बोलतच होती की त्यांनी इशाऱ्यानेच तिला शांत केले.

" आम्हांला जिवंत पाहायचे असेल तर गावी जायला तयार हो नाहीतर आमच्या मृतदेहाला अग्नी दे आणि तुझ्या प्रेमाचा स्विकार कर." बाबांच्या अश्या बोलण्याने ती पूर्णपणे कोलमडली. कोणताही विरोध न करता ती तशीच त्यांच्या मागे निघाली.

इकडे घरून परवानगी मिळाल्यावर हर्षराजने मेघनाला कॉल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्येक वेळेस येणारी स्वीच ऑफची नोटिफिकेशन त्याला मात्र काळजीत टाकून गेली. कधी एकदा सकाळ होते आणि मेघनाच्या घरी जातो असेच काहीसे त्याला झाले. दुसऱ्या दिवशीही त्याने खूप वेळा प्रयत्न केला पण नंबर स्वीच ऑफच आला. शेवटी निर्धाराने तो तिच्या घराकडे निघाला. कुलूप बंद घर पाहून मात्र तो पुरता गोंधळला. शेजारी चौकशी केल्यानंतर ते गावी गेल्याचे कळले. गावाला काही महत्त्वाचे काम आहे एवढेच कारण त्यांना माहित होते. इकडे हर्षराज मात्र सैरभैर झाला. मेघनाने कधीच त्यांच्या गावाबद्दल काहीच सांगीतले नव्हते किंबहुना एवढ्या वर्षात कधी गावाला गेल्याचेही त्याने ऐकले नव्हते त्यामुळे तो अधिकच गोंधळला. पर्याय नसल्याने त्याने वाट पाहायचे ठरवले. जवळ जवळ आठ दिवस झाले पण तिचा काहीच पत्ता नव्हता. ना तिचा कॉल येत होता ना लागत होता. तिच्याशिवाय जगणं त्याला अशक्य झालं होतं.

असाच संध्याकाळी कामावरून परतल्यावर आईचा कॉल आला.

" हर्षराज, दोन दिवसांसाठी घरी येऊन जा. मामाच्या रुपेशचं लग्न ठरलय. त्याचा कॉल येईलच. घरी आल्यावर तुझ्या लग्नाचंही बोलून घेऊ " आईने सुखद धक्का दिला.

त्याने मात्र घडलेली हकिगत आईला सांगितली.

" असेल काही काम गावी.येईल ती लवकरच परत. तोपर्यंत तु इकडे येऊन जा. काळजी नको करूस सगळं सुरळीत होईल." आईने धीर दिला.

त्यांच्या बोलण्याने त्याच्या मनात सकारात्मकतेची नवी पालवी फुटली. शेजारी मेघनासाठी निरोप ठेवून तो मामाच्या गावी निघाला. मनातून मात्र तिचे विचार जात नव्हते.गावी पोहचताच त्याचे जंगी स्वागत झाले. लग्नाची तयारी धूमधडाक्यात सुरु होती. सगळ्यांच्या आनंदाला उधाण आले होते पण हर्षराज मात्र सगळ्यांमध्ये असूनही एकाकी होता.

" राज, तु ही लग्नाचं घे आता मनावर.." रुपेश मित्राच्या हक्काने म्हणाला.

हर्षराज फक्त हसला.

" होणाऱ्या वहिनीचा फोटो नाही बघणार का ?" म्हणत तो मोबाईलमधला तिचा फोटो दाखवू लागला तोच हर्षराजचा फोन वाजला.मेघनाचं नाव पाहताच त्याला कसलच भान राहिलं नाही. तो तसाच तेथून बाहेर पडला. फोन कट होईल म्हणून त्याने तो उचलला पण म्युजिक सिस्टीममुळे काहीच ऐकू येत नव्हते. तो तसाच धावत बाहेर आला मात्र तोपर्यंत फोन कट झाला होता. त्याने कॉल लावला पण आता नंबर स्वीच ऑफ येऊ लागला. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता परंतु काहीच फायदा होत नव्हता. त्याला आता तिथे थांबणे अशक्य झाले. घरच्यांना खूप महत्त्वाचे काम असल्याचे सांगून आल्यापावली तो पुन्हा माघारी.

प्रवासात असतांना मात्र तिचा मेसेज आला आणि तो पूर्णपणे कोलमडला.

" माझ्यावर प्रेम असेल तर मला कायमचं विसरून जा." मेसेज येताच त्याच्या पायाखालची जमिन सरकली. तात्काळ त्याने तिला कॉल केला पण पुन्हा एकदा तो स्वीच ऑफच आला. आता मात्र त्याचा जीव कासावीस झाला. काय करायचं ? कुणाला विचारायचं ? कुठे जायचं ? काहीच कळत नव्हते.हतबल झालेल्या त्याला कोणताच मार्ग सापडत नव्हता. शहरात आल्यानंतर त्याने पुन्हा तिच्या घराकडे धाव घेतली. घर अजूनही बंदच होते. त्याने पुन्हा शेजारी चौकशी केली पण त्यांच्याकडूनही काहीच कळत नव्हते किंबहुना त्यांच्या प्रश्नार्थक नजरा जास्त जीवघेण्या वाटत होत्या. त्यांच्या डोळ्यांतला त्याच्या विषयीचा संशय त्याला नकोसा वाटत होता. त्याने तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधला पण कोणालाही तिच्या गावाविषयी काहीच माहित नव्हते.

यासगळ्यात घरून खूप कॉल येत होते.त्याने एकही कॉल उचलला नाही. नजरेला फक्त मेघनाची आस लागली होती. तो चातकाप्रमाणे तिच्या येण्याची वाट पाहत होता पण ती येत नव्हती. जवळजवळ आठ दिवस झाले. तो नेहमीप्रमाणे तिच्या घराकडे आला. घर उघडलेलं पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. तो तसाच धावत तिच्या घरात पोहचला.मेघनाची चौकशी करायला आलेल्या त्याला पाहून तिचे बाबा चांगलेच भडकले.

" तुझ्यामुळेच माझ्या मुलीवर ही वेळ आली. ती कधीच अशी वागली नसती. तुच फूस लावलीस तिला." ते रागात म्हणाले.

" सर, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. कॉलेजपासून जपलय आम्ही ते. आता लवकरच लग्न करणार आहोत फक्त तुमच्या परवानगीसाठी.." तो बोलतच होता की त्यांनी त्याला मधेच अडवले.

" वासनेला प्रेमाचं नाव देऊन मोकळी होणारी तुमची पिढी तुम्हांला खरं प्रेम कधीच कळणार नाही. ते असतं तर एवढ्या खालच्या थराला गेला नसता." ते पुन्हा भडकले.

तशी त्याची नजर आपोआप खाली गेली. त्यांच्या बोलण्याचा रोष लक्षात येताच त्याच्या डोळ्यांसमोर मेघनाचा चेहरा आला. ती कोणत्या परिस्थितीला सामोरी गेली असेल याची कल्पनाही त्याला नकोशी वाटली.

" सर, मेघनाचा काहीच दोष नाही. माझ्या वागण्याची शिक्षा तिला देऊ नका. आम्हांला लग्न करायचं आहे. मेघनाला नेहमीच सुखात ठेवेन. तिच्या डोळ्यांत कधीच अश्रू येऊ देणार नाही. प्लिज तिला बोलवा ना." तो गयावया करत म्हणाला.

" तिला आयुष्यभराचं दुःख देऊन सुखात ठेवण्याची भाषा बोलतोस. प्रेम होतं मग तिच्या मनाचा विचार करायला हवा होता. यापुढे इथे अजिबात फिरकायचं नाही. इज्जतीसाठी नाहीतर आता तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. चलं निघ इथून.मेघना आता कधीच इथे येणार नाही आणि तुझ्या आयुष्यातही." म्हणत त्यांनी हात पकडून त्याला बाहेर लोटले.

त्यांच्या शब्दांनी तो गहिवरला.

" प्लिज असं बोलू नका. हवं तर पाय धरून माफी मागतो तुमची पण माझ्या मेघनाला दूर करू नका. मला भेटायचं आहे तिला. सप्तपदीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. सात जन्मासाठी तिचं व्हायचं आहे." तो विनंती करत म्हणाला.

" थांब. खूप बोललास पण आता नाही. तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मेघना तुला कधीच भेटणार नाही. चालता हो इथून." म्हणत त्यांनी त्याला ढकलले.

" मेघना, प्लिज बाहेर ये. मी आलो आहे.." तो रडवेला होऊन तिला साद घालू लागला.

तसे शेजारचे बाहेर जमा झाले.

मेघनाच्या आईला मेल्याहून मेल्यासारखे झाले. तिने हर्षराजला घरात घेतले आणि दरवाजा बंद केला.

" माझी तुला हात जोडून विनंती आहे झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता तरी थांब.मेघना जिथे कुठे आहे तिथे सुखात आहे.आतातरी तिच्या सुखाआड येऊ नकोस. शेजारच्या लोकांनी तिच्याबद्दल नकोनकोते बोललेलं नाही सहन होणार आमच्याने. आमच्या आत्महत्येला तु जबाबदार असशील." त्यांनी असे म्हणताच तो आणखी गहिवरला.

काहीही न बोलता मागे सरकला.

" मी शेवटपर्यंत तिची वाट पाहत राहीन." हात जोडत तो म्हणाला आणि तसाच मागे निघून गेला.

क्रमश:

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all