बेरीज वजाबाकी आयुष्याची( भाग ४ था)(आर्या पाटील)

जेव्हा क्षणिक सुखापायी आयुष्याची गोळाबेरीज शून्य येते.

 बेरीज वजाबाकी आयुष्याची ( भाग ४ था)

©® आर्या पाटील

रुपेश, तु ठिक आहेस ना ?" त्याला शांत झालेलं पाहून हर्षराज म्हणाला.

त्याने मानेनेच होकार दिला.

" लग्नानंतर दोन महिन्यांतच ती गरोदर असल्याचे कळले. किती आनंद झाला होता मला? तिला कुठे ठेवू नि कुठे नको असे काहीसे झाले होते. बाळगोपाळाच्या येण्याचे वेध मनाला उत्साही बनवत होते. त्या नऊ महिन्यांच्या कालावधीत आमचं नातं आणखी घट्ट झालं एवढं की ती कधीच माहेरी गेली नाही अगदी बाळंतपणालाही. 'श्री' चा जन्म झाला आणि आमच्या जगण्याला आनंदाची भरती आली. घराने जणू बाळसं घेतलं. जगण्याला सुखाने गुणले आणि आयुष्यात आनंदाची गोळाबेरीज कितीतरी पटीने वाढली. आमच्या दोघांच्या नात्यालाही नवं रुप मिळालं. नेहमीच माझं ऐकणारी ती हळू हळू मन मोकळं करायला लागली. अगदीच भरभरून नाही पण बोलायला लागली. बघता बघता फुलपाखरापरी आमच्या आयुष्याला सुखाचे रंग लावून दिवस सरत होते. श्री आता अडीच वर्षांचा झाला होता. एका अग्रगण्य शाळेत त्याचं नर्सरीत ॲडमिशन घेण्याचं ठरवलं. त्यासाठी पालकांचं आणि मुलाचं फिटनेस सर्टिफिकेट लागणार होतं. आम्ही ब्लडटेस्ट करून ते रिपोर्ट शाळेत जमा केले.

शाळेत मुख्याध्यापिका मॅडमची नजर आमच्या तिघांच्या ब्लडग्रुपवर पडली. दोन वर्षात जे माझ्या लक्षात आले नाही ते त्या रिपोर्टने दाखवून दिले.

" 'श्री' ला तुम्ही दत्तक घेतलं आहे का ?" मॅडम प्रश्नार्थक स्वरात म्हणाल्या.

" नाही. श्री आमचा मुलगा आहे." मी थोडा गंभीर होत म्हणालो.

" मग तरीही तुमचा तिघांचा ब्लडग्रूप वेगळा कसा. श्रीचा ब्लडग्रुप 'ए' पॉझिटिव्ह आहे जो तुमचा दोघांचाही नाही." म्हणत त्यांनी ते रिपोर्ट आमच्या पुढ्यात धरले.

मला काहीच कळेनासे झाले. क्षणभर ती ही गोंधळली. पुढच्याच क्षणी ते रिपोर्ट घेऊन आम्ही शाळेबाहेर पडलो आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहचलो.

डॉक्टरांकडून काही चुकी झाली असेल या वेड्या आशेने आम्ही पुन्हा ब्लडग्रूप चेक केले पण आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

तात्काळ तिची खाली गेलेली नजर मला खूप काही सांगून गेली.लग्नानंतरच्या तिच्या अबोल जगण्याची तात्काळ उकल झाली.काहीही न बोलता आम्ही घरी पोहचलो.

" मला बोलायचं आहे तुमच्याशी." रुममध्ये मी शून्यात हरवलो असतांना ती आली.

मी काहीच उत्तर दिले नाही.

" माझं प्रेम होतं एका मुलावर.एका मोहाच्या क्षणी आम्ही वाहत गेलो आणि लग्नापूर्वी..." ती सांगतच होती पण मला ऐकणं अशक्य झाल्याने मी तात्काळ तिला थांबवलं.

" मला एकटं राहायचं आहे. प्लिज.." म्हणत मी रुमचा दरवाजा उघडला.

तिने माझ्या मताचा सन्मान केला. काहीही न बोलता ती तशीच रूमबाहेर पडली. त्यानंतर मात्र आमच्या आयुष्यात सुखाला उतरण लागली. तिच्या भूतकाळाच्या वास्तवाने मी पुरता पोखरलो गेलो. ज्या 'श्री' शिवाय माझा क्षणही सरत नव्हता आज तोच माझ्या दुःखाचं कारण बनला होता. तो निरागस जीव मात्र 'बाबा' म्हणत माझ्या दिशेने झेपावायचा पण मी मात्र त्याच्यापासून दूर पळत होतो. काहीही चूक नसतांना माझ्या बाळाला शिक्षा देत होतो. घरी कोणालाही काहीच कळू नये म्हणून नॉर्मल राहण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो. तिने खूप वेळा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र तिला टाळलं. तिचं सत्य ऐकण्याची हिमंत नव्हती रे माझ्यात. ती फक्त माझी आहे हेच शाश्वत सत्य जगायचं होतं मला पण.." म्हणता म्हणता तो थांबला.

आता मात्र हर्षराजच्या मनात ओळखीची घालमेल झाली.

" मग तिचं सत्य ?" हर्षराज अगतिकतेने म्हणाला.

" तिचं सत्य सांगण्याची संधीच दिली नाही मी तिला. ती अगतिकतेने मला विनंती करत राहिली आणि मी मात्र माझ्या दुःखाच्या शेल्याखाली तिच्या भावनांना पूर्णपणे डावलले.आमच्या आयुष्याचं गणित पूर्णपणे विस्कटल होतं. ते सावरायचा प्रयत्न करता करताच ती गेली. आम्हां दोघांना क्षणात पोरकं करून तिने या दुःखातून स्वतःची मुक्तता करून घेतली." म्हणत तो पुन्हा रडू लागला.

" मग 'श्री' चं काय ?" हर्षराज भावनिक होत म्हणाला.

" तिच्या आयुष्यात काय घडलं,तो कोण होता या भूतकाळाला कायमचं संपवत मला शाश्वत प्रेम स्विकारायचं आहे.श्री हा आमच्यातील सुगंधीत प्राजक्त आहे. त्याच्या येण्याने आमच्या नात्याला प्रेमाचा बहर आला. हा बहर मला माझ्या श्रीच्या रुपात नेहमीच जपायचा आहे.तिला गमावलं आहे पण तिच्या श्रीमधील अस्तित्वाला नाही गमावायचे. श्री हा माझा मुलगा आहे आणि माझाच राहणार. कदाचित हे सत्य मी आधी स्विकारलं असतं तर माझी मेघना आज जिवंत असती.." म्हणत त्याने तिचा फोटो उचलला.

मेघना या एका शब्दाने हर्षराजच्या काळजात खोल कळ उठली. रुपेशचा हातातील फोटो पाहून आता मात्र त्याच्या पायाखालची जमिन सरकली.

ती त्याचीच मेघना होती.तीन वर्षांपूर्वी त्याला शेवटची भेटलेली मेघना डोळ्यासमोर तरळली. त्या दिवशी तिच्या डोळ्यांतील आर्त भाव आठवताच तो कोसळला. खुर्चीचा आधार घेत तो खाली बसला.

' माझ्या चुकीची शिक्षा तु भोगलीस. मी कसा माफ करू स्वतःला ? माझ्या एका मोहापायी तुझं आयुष्य संपलं. मी खुनी आहे तुझा' मन आक्रोश करू लागले. 

'मी खूप उशीर केला इथे पोहचायला. त्या दिवशी जर हे लग्न सोडून मी गेलो नसतो तर..' स्वगत होत तात्काळ त्याने आपला चेहरा ओंजळीत झाकला. तोच

" आई, आई.." म्हणत छोटा श्री रुममध्ये आला.

श्री चा आवाज ऐकताच हर्षराजची ओलेती नजर त्याच्यावर स्थिरावली. तो जागेवरून उठला आणि त्याच्या दिशेने सरसावला. काही कळायच्या आत त्याने त्याला उचलून घेतले. त्याच्या कपाळावर तशीच स्पर्शखूण उमटवली जशी तो मेघनाच्या कपाळावर रेखाटायचा. हर्षराजला पाहून श्रीच्या मनातही ओळखीची घालमेल झाली असावी. निरागस नजरेने तो त्याला न्याहाळू लागला. त्याच्या मधाळ डोळ्यांत त्याला त्याची मेघना भेटली, त्याच्या स्पर्शात त्याला तिची उब जाणवली. एका बाजूला मेघनाला कायमचं गमावल्याचं दु:ख तर दुसऱ्या बाजूला आपल्या प्रेमाचं प्रतिक अनुभवण्याचं सुख. किती टोकाचं जगणं होतं ते. बाकी शून्य उरलेल्या त्याच्या आयुष्यात अनाहूतपणे सुखाचं चांदणं पडलं होतं.

" बाबा, मला आई पाहिजे." बोबडं बोलत पुढच्याच क्षणी श्री रुपेशकडे झेपावला.

आयुष्य हातातून परत एकदा निसटून चालल्याची जाणिव झाली त्याला. या जाणिवेसरशी बुद्धीने पुन्हा डोकं वर काढलं.

' सांग त्याला श्री तुझा मुलगा आहे.' बुद्धी सांगत होती.

' नाही. तु चुकत आहेस. सगळं कळूनही रुपेशने मेघनाचा आत्मसन्मान जपला. घरच्यांना कळू दिलं नाही की श्री त्याचा मुलगा नाही. किंबहुना श्रीचं पालकत्व स्विकारून तो आताही तिचा आत्मसनान जपत आहे. मी पुन्हा एकदा स्वार्थासाठी माझ्या मेघनाचा बळी जाऊ देणार नाही. रुपेशला कधीच कळता कामा नये की श्री माझा मुलगा आहे.' मनाने समजावले.

या वेळेस त्याने मनाचा कौल स्विकारला.

श्रीला शेवटचं डोळ्यांत भरत त्याने आपला निर्धार पक्का केला.आभाळाएवढं दुःख झाकत त्याने रुपेशचं सांत्वन केलं. त्याच्या एका चुकीने तिच्या आयुष्याचं गणित कायमचं संपलं होतं ही जाणीव त्याला जगू देत नव्हती. शेवटी तिच्या आठवणींचा शेला पांघरुण तो कायमचा निघून गेला.आपल्या आयुष्याचं गणितही त्याने कायमचं सोडवलं असावं बहुधा कारण त्यानंतर ना तो कोणाला दिसला ना माघारी परतला.

समाप्त

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all