बेलभंडार भाग 9

शायिस्ताखानाला धडा शिकवायच्या योजनेत केशर आणि खंडोजी काय करतील?



बेलभंडार भाग 9


मागील भागात आपण पाहिले की बिजलीने छावणीत ये - जा करायचा परवाना मिळवायचे पाऊल टाकले. दुसरीकडे केशरने शरीफखानाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हाच बाजारातून एका पोरीला उचलण्यात आले. आता पाहूया पुढे.


चौघेही घोडेस्वार कोसळले आणि ती पकडलेली मुलगी थरथर कापत उभी होती. तेवढ्यात एका झाडामागे लपलेली स्त्री बाहेर आली. तो पर्यंत केशर धावत तिथे पोहोचली होती.

"पोरी,घाबरु नग. आता तू घरी जा." गुणवंता पुढे येऊन बोलली.

" व्हय,पोरी,आता हित थांबू नग." केशरने तिला सांगितले.

ती अजून घाबरलेली होती.
"केशर तू हिच्या संग जा. म्या आता छावणीत परत जाते." एवढे बोलून गुणवंता निघून गेली.

त्या पोरीने केशरकडे पाहिले.

"तुमी कोण हायेसा? मला लई भ्या वाटतंय." ती अजूनही थरथर कापत होती.

"पोरी,घाबरु नग. आम्ही शिवबा राजांची माणसं. तुझ नाव काय हाय? कुठ रहाती तू?" केशरने तिला प्रेमाने विचारले.

" म्या,राणी. तकड पलीकडच्या गावात रहाती." तिने घाबरत उत्तर दिले.

"चल माझ्या संग. म्याबी तिथं राहायला हाय जवळ." केशर पुढे चालू लागली.

"हे आस कामगिरीवर जायला भ्या वाटत न्हाय का? आस बाई माणसानं बाहेर पडायचं?" तिने परत प्रश्न विचारला.

" बाईला दुर्गा व्हता येत तस काली व्हता आल पायजे बघ."
केशर तिला चलताचलता उत्तर देत होती. राणीला घरी सोडून केशर परत आली.

शंकर आणि खंडोजी काम शोधून आले. शरीफखानाच्या दिवाणजीकडे कामाला राहिले होते दोघे. हे समजताच केशरचा चेहरा आनंदाने उजळला.


"शरीफखान घावला तर! शंकर दादा! कायबी कर पर मला तिथं कामाला ने." केशर त्याला म्हणाली.

"हाय का आता? खंडोजी आन त्याची बायको आशी जोडीच लागणार हाय नव्हं कामाला." शंकर हसत म्हणाला.

दिवाणजी ह्या आपल्या गाई म्हशी आन बारदाना त्यांच्या मळ्यात ठीवयाला देणार हाये. आन वाड्यात अधनमधन काय काम आसल ते आपून करायचं."

खंडोजी तिला नाटकी हसून सांगत होता.

"बरं धनी म्या तयार हाय. सांगा कदी जायचं?" केशर असे म्हणताच खंडोजी गोरमोरा झाला.

तेवढ्यात केशरला राणी आठवली. आपल्या दोन छोट्या भावंडाना घेऊन राहणारी.

"म्या आलेच जाऊन." केशर लगबगीने राणीकडे गेली.

इकडे शंकर आणि खंडोजी सामान भरू लागले.
अर्ध्या तासाने केशर परत आली. तिच्या सोबत बारा तेरा वर्षांची राणी आणि तिची बारकी भावंडं चिंगी आणि बाळू होते.

"बर का शंकरदादा,ही राणी हाय. माझी धाकली भावंडं हायेत अस समजा." केशर शंकरला उद्देशून बोलताना खंडोजीकडे पहात होती.

शेवटी हे सगळेजण पुण्याकडे निघाले. छावणीपासून जवळ असलेल्या मळ्यात त्यांनी आपले सगळे सामान टाकले आणि शेतातील त्या गोठ्यात आणि त्याशेजारी असलेल्या खोलीत आता त्यांना रहायचे होते.


बहिर्जी नाईकांनी नेमलेले सर्व हेर आपापल्या जागेवर पोहोचले होते. इकडे राजगडावर चिंतेचे ढग दाटून आले होते. खानाचे संकट हलायचे नाव घेत नव्हते. एक वर्ष होऊन गेले होते. खुद्द राजांचे बालपण ज्या लाल महालात गेले तिथेच खान डेरा टाकून बसला होता. खानाच्या छावणीच्या आतली माहिती मिळण्यास सुरूवात झाली आणि राजांच्या मनात एक अभूतपर्व धाडसी कल्पना आकार घेऊ लागली. ह्या छावणीत गनिमी काव्याने घुसायचे आणि सरळ खानाला कापून टाकायचे. ह्याच गोष्टीवर विचार विनिमय करण्यासाठी आज सदर भरली होती.


"बस,आता बहुत झाली सबुरी. आता गनीम कापायचा." राजे संतापाने गरजले.

" राजे,अविचार नको. छावणी प्रचंड मोठी आहे. ब्र म्हणता ब्रम्हहत्या व्हायची." निराजी रावजी समजावत होते.


" रयत त्रासली आहे. जर रयतच सुखी नसेल तर काय कामाचे स्वराज्य?" शिवबाराजे गरजले.

" राज,एक अर्जी हाय. फक्त आऊंदाच्या लगीनसराई पतर दम धरा. मंग खानाच लगीन त्यातच लावू." बहिर्जी म्हणाले.

"शाब्बास बहिर्जी. आमच्या मनातील मानस ओळखलात. लागा कामाला."

राजांनी आदेश दिला. सदर संपली आणि राजांनी मोजक्या सवंगड्याना भेटायला बोलावले.


"येसाजी,तान्हाजी,बहिर्जी,गड्यांनो आमच्या मनात एक योजना आहे." महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले.

"राज, निसत सांगून बगा. एकला घुसतो छावणीत." तान्हाजी मिशीला पिळ दिला.

"आंग आशी,जा एकटच आन खानाला मारायचं ते सवता मर." बहिर्जी हसले.

" गाड्यांनो,आधी सगळ्या वाटा,चोरवाटा हेरा. पक्की योजना बनवू आणि खानाला मारूनच परत येऊ. उचला बेलभंडार."

राजांनी तबक पुढे केले.

तिनही सरदार आणि त्यांचे विश्वासू मावळे पुढे झाले." बोला हरहर महादेव!" सर्वांनी गर्जना केली.



बहिर्जी नाईकांनी दिलेल्या सूचनेनुसार केशर,बिजली, गुणवंता आणि खंडोजी काम करत होते. पुढील मोहिमेसाठी त्यांनी काय पूर्वतयारी केली असेल?

वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all