Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बेलभंडार भाग 5

Read Later
बेलभंडार भाग 5
बेलभंडार भाग 5


मागील भागात आपण पाहिले की केशर आणि जिवाजी खबर घेऊन गडावर पोहोचले. जिवाजी जखमी झाले होते. बहिर्जी नाईक यांच्याकडून केशर कामगिरीवर पाठवायचा शब्द घेते. तर जिवाजीला आठ दिवस गडावर रहाणे भाग पडते. आता पाहूया पुढे.


शंकर आणि खंडोजीला बघून केशर गोड हसली.
"शंकरराव तुमच्या दोस्ताला म्हणावं आमासनी गड बघायचा हाय."
शंकर घायाळ होऊन खंडोजीकडे बघू लागला.

" अय शंकऱ्या चल. पोरीसनी गड दाखवायचं आमचं काम नव्हं." खंडोजी बोलला.

"व्हय का? मंग कशाला हित उभ हायसा. जावा की तुमच्या कामाला."

केशर रागाने म्हणाली आणि तिथून जाऊ लागली.

खंडोजी हसत निघून गेला.

तेवढ्यात एक बाई केशरकडे आली.
"तुमासनी नाईकांनी बोलावल हाय. चला माझ्यासंग."
त्या बाईने केशरला इशारा केला.

केशर तिच्याबरोबर चालू लागली. थोड्याच वेळात केशर गडावरील एका गुप्त ठिकाणी पोहोचली.

तिथे गेल्यावर तिला बहिर्जी दिसले नाहीत. फक्त त्यांचा एक निरोप होता. तिला ह्या बाई ज्यांचे नाव गुणवंता होते त्यांच्याकडून पुढे आठ दिवस शिकायचे होते."केशर,हिकड ये. तुला तयार करायची कामगिरी नाईकांनी माझ्याव सोपवली हाय. पयली गोष्ट मंजी बहुरूपी व्हायला पायजे. मंजी फकस्त कापड बदलून न्हाय,वागणं,बोलण समद जमायला पायजे."
गुणवंतां तिला समजावत होती.

केशर तिचे सगळे बोलणे टिपून घेत होती. आजवर जिवाजी काकांनी तिला हत्यारे चालवायला शिकवली होती. परंतु हेरगिरीतील बारकावे तिला आता शिकायला मिळणार होते.

तेवढ्यात दीड महिना लढल्यावर किल्ले संग्रामदुर्ग आणि फिरांगोजी धारातीर्थी पडल्याची खबर गडावर येऊन पोहोचली.

पुढील आठ दिवस केशरसाठी अत्यंत महत्वाचे होते. गुणवंता स्वतः एक युद्ध आणि हेरगिरी यात निपुण असलेली स्त्री होती.

बहिर्जी नाईकांच्या अनेक स्त्री हेरांना तिने प्रशिक्षण दिले होते. केशर जात्याच बुद्धिमान होती. ती अगदी दिवसभर सगळे मनापासून शिकत असे. बघता बघता गडावरील आठ दिवस संपले. जिवाजी काका आणि केशर घरी परत जायला निघाले.


बहिर्जी कामगिरीवर असल्याने भेट झाली नाही. गुणवंता कुठेही दिसत नसल्याने केशर मनात हुरहूर ठेवून परतीची वाट चालू लागली.शायिस्ताखान पुण्याला पोहोचला होता. तिथवर पोहोचताना त्याने अवघा मुलुख उजाड केला होता. एखाद्या सौंदर्यवती स्त्रीचे केस अस्ताव्यस्त कापून तिला फेकून द्यावे तशी उभी पिके दिसत होती.

अर्धवट जळालेली,अर्धवट जनावरांनी खाललेली.

गावातील देवळांचे कळस फुटले होते आणि मूर्तींचे तुकडे अस्ताव्यस्त फेकलेले होते.
तर गावातील लेकीबाळी त्यांचे हाल तर कोणाला पहावे वाटत नव्हते.

काहीजणी जनानखान्यात विकल्या गेल्या तर काही उसाचा रस काढून पाचट फेकावे तशा फेकल्या गेल्या होत्या.

आठ दिवसांपूर्वी साजिरा गोजिरा दिसणारा मुलुख आज पहावत नव्हता.

केशरला आता सगुणाकाकुची काळजी वाटू लागली होती. तिच्या डोळ्यांतून संतापाने उष्ण अश्रू वहात होते. जिवाजी काका एक शब्दही बोलत नव्हते.गावच्या वेशीवर काही मुंडकी टांगलेली होती. वेशीच्या आतले मारुती मंदिर शिल्लक राहिले नव्हते. केशरच्या मनात अशुभाचे सावध दाटून येत होते.

चंदीच्या घरासमोर एक अस्ताव्यस्त केस सोडलेली,ठिकठिकाणी लुगडे फाटलेली आणि अंग मातीने भरलेली बाई उदास नजर लावून बसलेली होती. केशर घोड्यावरून खाली उतरली.


हळूच त्या बाईजवळ जाताना तिला ओळखीच्या खुणा पटू लागल्या.
"चंदा!"

केशरच्या तोंडातून कशीबशी हाक फुटली.

त्यासरशी त्या बाईने मागे वळून पाहिले. त्या निस्तेज डोळ्यांत ओळखीची खूण दिसू लागली आणि अचानक चंदा उठली आणि केशरच्या गळ्यात पडली.

"केशर! केशर! समद संपलं ग!"

चंदाचा विलाप बघवत नव्हता.

"चंदा,सगुणाकाकू कुठ हाय?"
केशरच्या डोळ्यात आग पेटली होती.

चंदा काहीच बोलत नसलेली पाहून केशर घराकडे धावत सुटली. पाठोपाठ जिवाजी काका होते. सगुणाकाकू अंगणात उभी होती. तिच्यामागे आणखी एक व्यक्ती होती."शंकर तू? तू हित कसा?" केशर पुढे येत म्हणाली.

"त्या दिशी तुमाला गडावर थांबवले आणि नाईकांनी मला तुमच्या घरी निरोप द्याची कामगिरी दिली. तवर जेजुरी लुटून मुघल पुण्याकड निघालं व्हतं. मला मनात शंका वाटू लागली. गाव जवळ यायला लागलं आन म्या वळीखल. आता कायबी करून तुमच्या आईला वाचवायचं व्हतं. मागच्या अंगान आत घुसलो. तीन दिस ह्या घराच्या तळघरात व्हतो. बाहेर आलो तर समदा गाव उजाड झाला व्हता." शंकर गप्प झाला.


"शंकर,आजपासून ही केशर तुला कायम मोठ्या भावाचा मान देणार बग." केशरने पुढे होऊन त्याचे पाय धरले.जिवाजी हळूच पुढे आले."केशर,गावात वाचलेल्या समद्या लोकांना एकाजागी बोलिव. हित थांबलो तर परत हिच गत व्हणार. आपल्याला गाव सोडावं लागल."


जिवाजी केशरला समजावत होते. त्यासरशी केशर आणि शंकर गावात निघाले.

म्हातारे, बारकी पोर,सर्वस्व लुटलेल्या लेकी,लपून राहिल्याने वाचलेले युवक,युवती सगळ्यांना केशर एका ठिकाणी जायला सांगत होती.

फिरत फिरत गावाच्या शिवेजवळ येऊन थांबली. आई काळूबाईचे मंदिर दिसत होते. छप्पर उडालेले. गुरवाचे घर जळून गेले होते. केशरच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

"केशरताई! हिकड,हिकड बग. ह्या खड्ड्यात."

आवाजाच्या दिशेने केशर धावत सुटली.

हौसाई आणि जानकू गुरवाचा आठ वर्षांचा सयाजी आणि पाच वर्षांची चिमणी खड्ड्यात पाल्यात लपली होती.


"चिमणे,सयाजी तुमी ठीक हायसा ना?" केशर आत गेली.

त्यांना वर काढू लागली. पहाते तर काय लहानग्या चिमणीच्या आणि सायाजीच्या मध्ये पोरांनी आई काळूबाईची मूर्ती लपवली होती.

" ताई,माझ्या आई बान सांगितलं हित आईची मूर्ती घिऊन लपून रहा. त्यांनी मारून टाकल ग समद्यासनी. शरीफखान नाव व्हत बग."

चिमणी रडत सांगत होती.

इकडे केशरच्या मनात एक निर्धार पक्का होत होता. जो तिच्या डोळ्यात दिसत होता.


केशर आणि जिवाजी गावाला सावरतील का? शरिफखानाला शोधून केशर धडा शिकवू शकेल का?

वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//