बेलभंडार भाग 12

केशर कैदेत.



बेलभंडार भाग 12

मागील भागात आपण पाहिले राजांनी मोहिमेचा दिवस नक्की केला. बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी काम सुरू केले. इकडे राजांनी त्यांचे सवंगडी बोलावले. आता पाहूया पुढे.


केशर लग्नघर शोधत निघाली. तिथे गेल्यावर तिने लग्न घराला जवळ असणारी जागा शोधली आणि तिथे आपले पाल टाकले. सोबत बांगड्या, कुड्या असे साहित्य तिने मुद्दाम आणले होते.

"रखमे,तकड बग कासारीन आलीय. चल आपून बांगड्या बगू." यमी रखमाला खेचत घेऊन गेली.

"बया, यमे खरच किती बांगड्या हायेत. हिरव्यागार,लालभडक. चल आजीला घिऊन यिऊ."

दोन्ही पोरी पळत घरी गेल्या. थोड्या वेळाने एका म्हातारीला घेऊन पोरी बांगड्या भरायला आल्या. केशरने गप्पा मारता मारता वरात कधी निघणार,कुठून जाणार सगळी माहिती विचारली. वर म्हणाली की मी इथेच आहे पंधरा दिवस काही लागले तर या घ्यायला. केशरला मार्ग मिळाला होता.


छावणीच्या आत मुंगीसुद्धा तपासणी झाल्याशिवाय येऊ शकत नव्हती. हत्यारबंद मराठ्याला पुण्यात प्रवेश नव्हता. त्यामुळे आधी हत्यारे पोहोचवली पाहिजे. बहिर्जी विचार करत होते काय करावे? हत्यारे कशी पोहोचवता येतील? तेवढ्यात त्यांना कल्पना सुचली.

"जोत्याजी,केशर आणि बिजली दोघींना बोलावून आण." बहिर्जी असे म्हणताच जोत्याजी निरोप घेऊन निघाले.

केशर आणि बिजली दोघींना बहिर्जी नाईक यांनी भेटीला बोलावले.

"केसर,बिजली, मुहिम आता धा दिसावर आली हाय. हत्यार आत न्यायला लागत्याल. काही हत्यार लपवून आणू पर मोठी हत्यार आदी न्यायला लागत्याल."

नाईकांनी कामगिरी सांगितली.

"नाईक,एक युगत हाय." बिजलीने सुचवले.

"काय? तलवारी आन दांडपट्ट कसं नेणार?" केशर अजूनही साशंक होती.

"केशर,आता उन्हाळा दिस हाय. कोकणातून आंब घिऊन यापारी येत्याल." एवढे बोलून बिजली थांबली.

"बिजली,आंब्याच्या करंड्यात दांडपट्ट लपवून नेता येत्याल. पर तलवारी कशा न्यायच्या?"

नाईकांनी प्रश्न टाकला.

"नाईक,ते माज्यावर सोडा." केशर सूचक हसत म्हणाली.

" दोन दिसात हत्यार आत जायला पायजे. मंग ती लपवायची कुठं त्ये बगू."

बहिर्जी सगळे सांगून पुढील व्यवस्था करायला निघाले.


राजगडावर तान्हाजी मालुसरे,येसाजी कंक आणि त्यांचे निवडक धारकरी जमले होते.

"गेली दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शायिस्ताखान नावाचा नाग वारुळात लपून बसला आहे. आता त्याचा फणा ठेचायची वेळ आलीय गड्यांनो!"

महाराजांचे धीरगंभीर शब्द घुमले.

"राजं तुमी फकस्त सांगा. आता जाऊन डोस्क उडीवतो."

तान्हाजीने मिशीला पिळ दिला.

"अय तान्या,जरा सबुरीन. नाईकांचा सांगावा यिऊ दे."

येसाजी हसून म्हणाले.

"गड्यांनो आपण बेलभंडार उचलला आहे. आता माघार नाही." महाराजांच्या डोळ्यांत निर्धार स्पष्ट दिसत होता.


दोन दिवसांनी पौड फाट्यावर तीन चार बैलगाड्या येऊन थांबल्या.

"ठेहरो| क्या है अंदर?" कोतवाल ओरडला.

तशी आतून बिजली बाहेर आली. मुकादमाकडे कटाक्ष टाकून मधाळ हसली.

"सुभान,आर गाडीतून आंब्याची करंडी आण. सरदारांना माज्या हातानं खाऊ घालते."

सुभान एक करंडी घेऊन आला. बिजलीने बरोबर त्याला घोळात घेतला. बैलगाड्या आत आल्यावर पुढील काम सोपे झाले. पेरलेल्या माणसांनी करंड्या नेल्या.


"अय थांबा,कुठ चालला?" पहारेकरी ओरडला.

"आमी इरोबाला चाललो जी. धनगर हाये आमी. ढोल ताशे घिऊन चाललो सरकार."

खंडोजी हात जोडून म्हणाला.

"आस्स! ढोल हायेत काय?" असे म्हणून पहारेकऱ्याने एक ढोल फोडून पाहिला.

त्यानंतर तो जोरात ओरडला,"जाऊं द्या र ह्यासनी."

तीस चाळीस ढोल आणि त्याबरोबर माणसे आत पोहोचली.
आत पेरलेल्या माणसांना हत्यारे पोहोचवायची कामगिरी फत्ते झाली.


राजगडावर लगबग सुरू झाली. मोहिमेचा मुक्रर केलेला दिवस दोन दिवसांवर आला होता. निवडलेले सगळे धारकरी गडावर पोहचले होते.

केशर घाईने आंब्याची करंडी घ्यायला निघाली आणि अचानक तिला चार मुघल सैनिकांनी घेरले.

"पकडो इसको| ये बहिर्जी नाईक ने भेजी खबरी है|" एकजण ओरडला.

केशरने पळायचा अयशस्वी प्रयत्न केला. पण तिला कैद करून घेऊन गेले. लाल महालाच्या तळघरात तिला कैद केले.

"सच सांग! तुझे कोण कोण साथीदार आहेत.
सच बता ये शरिफखान तेरी जान बक्ष देगा|
दो दिन है तेरे पास |
दो दिन बाद तुझे निलाम करके बेच दुंगा या बदसुरत करके छोड देंगे|"

शरीफखान क्रूर हसत निघून गेला.

आपला थकवा मिटवायला तो जनानखान्यात आला. त्याने दोन सुंदर महिला निवडल्या. गुणवंता तिथे मद्य भरायचे काम करत होती.

"आज एक काफिर लडकी पकडी है| बहोत खूबसुरत है साली|"

खान बडबडत होता आणि इकडे नाईकांची वाघीण केशरला सोडवायची योजना बनवू लागली होती.


मोहिमेचा थरार शायिस्ताखानाची बोट छाटली जाणार. केशर वाचेल का? बिजली आणि गुणवंता वाचतील? खंडोजी केशरला शोधू शकेल?

वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all