Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बेलभंडार भाग 10

Read Later
बेलभंडार भाग 10

बेलभंडार भाग 10

मागील भागात आपण पाहिले की महाराजांनी बहिर्जी नाईकांना आपली योजना सांगितली. आता बहिर्जींची माणसे कामाला लागली. खानाच्या छावणीच्या फटी,चोरवाटा शोधायला. चला मग केशर, गुणवंता आणि बिजली ह्या आपल्या वाघिणी यात कशी मदत करत आहेत पाहूया."केशर,दिवाणजी टिपण लिवतात त्यात समद आसल बग. तिथून कायतरी घावल." खंडोजी सुचवले.

"व्हय,आन तकड महालात गुणवंता चोरवाटा धुंडाळत हाय. महाराजासनी समद्या वाटा माहीत हायेत म्हणून कायकाय वाटा आन दरवाजे बदलल्यात." केशरने उत्तर दिले.

आजच दिवाणजीच्या घरातून टिपण हस्तगत करायची तिने ठरवले. केशर तिथे काम करताना तिथल्या एका पहारेकऱ्याची नजर नेहमी तिच्यावर रोखलेली असे. आज त्याचा उपयोग केशर करणार होती.

दुसरीकडे बिजलीने आपल्या अदाकारीने राघोजीला पुरते वेडे केले होते. छावणीच्या आतल्या भागात जायला आवश्यक असणारी मुद्रा तिला राघोजीकडून हवी होती. आज संध्याकाळी खास बैठक होती. बिजलीने आजवर स्वतः ला वाचवले होते. पण आज मात्र राघोजीने तिला अंतिम इशारा दिला होता. त्यामुळे बिजली अस्वस्थ होती. तिला काहीही करून राघोजीला धडा शिकवायचा होता.


बिजली अस्वस्थ येरझाऱ्या घालत होती.

"माई! भिक्षा वाढ माई!" बाहेरून आलेल्या हाकेने तिच्या विचाराच्या तंद्रितून ती बाहेर आली.

"बाबा, त्वा तोंड भरून माई म्हणलास त्यातच समद आल. काय पायजे तुला?"
बिजली नमस्कार करून म्हणाली.

"माई,तुझी चिंता त्याला कळते. भिक्षा वाढ." साधूने आदेश दिला.

बिजलीने त्याला भिक्षा वाढली. साधूने रिकाम्या सुपात काहीतरी ठेवले तसे बिजली सावध झाली. ती झटकन आत निघून गेली आणि साधू पुढच्या कामगिरीवर निघाला.शंकर आणि खंडोजीला आज खानाच्या छावणीत काही वस्तू घेऊन जायचे काम दिले होते.

"हे बघ खंडोजी,यात शरिफखान सरदारांचे महत्वाचे दस्तऐवज आहेत. ते नीट पोहोचवून ये."
शंकर आणि खंडोजी मान डोलावून निघाले.

तेवढ्यात वाटेत एक साधू आडवा आला.

" बाळा,जरा मदत करतो का रे?" साधूने आवाज दिला.

"साधू महाराज,काय काम हाय?"खंडोजी पुढे झाला.

" मला म्हाताऱ्याला चालवत नाही. तर जरा हात देतोस का?" साधूने शंकरकडे पाहिले.

शंकर पुढे झाला आणि त्याने साधूला आधार दिला.

साधूने शंकरच्या कमरेत हात घातला आणि कानात हळूच म्हणाला,

"एक मैना इमानी
सापडली पिंजऱ्यात बिचारी.
आज वैरी साधील डाव,
जाऊन कनादीला आग तू लाव."


"कडाडे बिजली आभाळात,
घेरली तिज तमाने आज.
जाऊन आज तू काप,
तिच्या पायात बेडीचा साज."


पलीकडे जाताच साधू निघून गेला. शंकर मात्र साधूच्या कवनाचा विचार करत होता. तेवढ्यात त्याला बिजली हे नाव आठवले आणि शंकर मनात हसला. आपण पुन्हा नाईकांना ओळखण्यात चुकलो याची त्याला जाणीव झाली.केशर कामावर आली. केसांचा आंबडा,कमरेला खोचलेला पदर,कपाळावर लालभडक कुंकू आणि ओठांवर हसू. तिने कामाला सुरुवात केली तसा पहाऱ्यावर असणारा दौलती तिच्याजवळ आला.

"केसर आज लयी खुशीत? काय भानगड हाय?" लागट हसत त्याने विचारले.

केशर थांबली. डोरल्याशी चाळा करत म्हणाली,"काय न्हाय व दौलतराव त्ये आपल आसचं."

तिने दौलतराव म्हणताच दौलती पुरता पागल झाला. केशर आत पाणी घ्यायला गेली. जाताना तिने मागे वळून एक छान मुरका मारला. त्यासरशी दौलती तिच्या मागून आत गेला. केशर सावध होती. तो आत येताच तिने बटव्यात आणलेली पावडर फुंकली. काही क्षणात दौलती शुद्ध हरपून खाली पडला.


केशरने आत अंदाज घेतला आणि पटकन दिवाणजीचे टिपण उचलले. त्याचे छाप आपल्याकडच्या विशिष्ट लेप दिलेल्या कागदावर घेऊन तिने परत सगळे पहिल्यासारखे ठेवले आणि ती दौलती शुद्धीवर यायच्या आतच बाहेर पडली.बिजली शृंगार करून तयार झाली. तिने आजवर अनेक कठीण कामगिऱ्या बजावल्या होत्या. परंतु आता संपूर्ण छावणी आजूबाजूने असताना तिला पिंजऱ्यात अडकल्यासरखे वाटत होते. बैठकीच्या तंबूत बिजली आणि सुभान आला. अत्तराचा फाया सुभानने सगळ्यांच्या मनगटावर चोळला.

"आर,तू कशाला आलास? बाईला पाठीव."एकजण मांडीवर हात चोळत म्हणाला.

"तस मला तूबी चालशील. दुधाची तान ताकाव." एकाने सुभानला मागून मिठीत घेतले.

सुभानने स्वतः ला कसेबसे सोडवले. लावणीचा ठसका सुरू झाला. मद्याचा अंमल चढू लागला. सगळीकडून तंबू घेरलेला होता. राघोजी आणि त्याचे साथीदार अंगचटीला येऊ लागले. पदर ओढणे सुरू झाले. अखेरीस राघोजीने बिजलीला आणि दुसऱ्या एकाने सुभानला पकडले. आता सगळे संपले असे बिजलीला वाटले.

इकडे शंकर आणि खंडोजी झाडीत लपले होते.

"शंकऱ्या,हित कशाला लपला हायीस? आर चल लवकर. कुणी बगितल तर?" खंडोजी हळूच म्हणाला.

एवढ्यात शंकरने झाडावर चढायचा इशारा दिला.

"कुहू कुहू!" आवाज ऐकला आणि बिजली हसली.


नाईकांनी मदत पाठवली होती. कोकीळ रात्री ओरडली होती. अचानक तंबुवर दोन मशाली पडल्या. तंबू पेटला. बाहेरचे पहारेकरी पळू लागले. आत विवस्त्र असलेला राघोजी आणि त्याचे साथीदार कपडे शोधू लागले.


इतक्यात बिजली आणि सुभान दोघांनी खंजीर काढले. मद्य प्यायलेल्या त्या चौघांचे गळे चिरणे फार अवघड गेले नाही. चारही जणांच्या खाशा मुद्रा बोटातून खेचल्या आणि ते दोघे तंबुतून बाहेर पडले. झाडामागे लपलेल्या शंकर आणि खंडोजी दोघांनी घोडे त्यांच्या हवाली केले.

"जरा जपून." शंकर बिजलीला म्हणाला.

बिजलीने दोन मुद्रा शंकरच्या हवाली केल्या आणि म्हणाली,"महाराजांनी आशीर्वाद दिलाय."

बिजली नजरेआड झाली.


जनानखान्यात निजानीज झाली तरी एक दासी टक्क जागी होती. रात्रीच्या अंधारात सगळा वाडा फिरायचा सराव गेले आठ महिने ती करत होती. आज ती स्वतः ला आजमावून ह्या लाल महालातून बाहेर जाऊन आत येणार होती.


गुणवंता यशस्वी होईल का? केशरने मिळवळेल्या टिपणात काय असेल? राजांची योजना कशी तडीस जाईल?

वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//