बेलभंडार अंतिम भाग

जीवाचा बेलभंडार करून लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला कथा समर्पित

बेलभंडार अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले महाराज आणि त्यांचे सवंगडी लाल महालात शिरले. इकडे बिजली आणि सुभान जनानखान्यात दबा धरून बसले. केशरला विद्रूप करायचा हुकूम देऊन शरिफखान निघून गेला. आता पाहूया पुढे.


खानाच्या जनानखान्यात महाराज आणि त्यांचे सवंगडी शिरले. कोणत्याही महिलेला हात लावला जात नव्हता. एक पुरुष धावत निघालेला पाहून राजांनी वार केला. खान मेला असे वाटून राजे परत फिरणार होते.

"राजं,हे सापाच पिल्लू मेल हाय. साप तकड पलिकड हाय."
बहिर्जी राजांना म्हणाले.

तोवर महालात गडबड सुरू झाली. एक जनानी मशाल लावायला उठली आणि तिच्या हातावर बिजलीने कट्यारीचा वार केला.

"नाईक म्या हाय हित." बिजलीने आवाज दिला.

राजांनी तोवर खानाच्या दालनाकडे झेप घेतली. बिजलीने सगळ्या बायकांना एका कोपऱ्यात जमा केले.

" बाहेरून कडी घालते. पर आवाज केला तर आग लावीन."
बिजली आणि सुभान सगळ्या स्त्रियांना कोंडून बाहेर पडले.


"उठो,मराठे आ गये|" महालात गडबड सुरू झाली.

खान झोपेतून जागा झाला.

"मरहट्टे? या खुदा! शैतान इधर भी पहुच गये|"

तेवढ्यात पहारेकरी कापत राजे आत शिरले. पाठोपाठ तान्हाजी आणि येसाजी होतेच. खान घाबरून पळू लागला.महाराजांनी समशेर घेऊन खानावर झेप घेतली.


शंकर दरवाजाजवळ उभा होता. बाहेर पडायला दरवाजा ताब्यात असणे आवश्यक होते. तेवढ्यात आठ दहा मुघल सैनिकांनी त्याला घेरले. चकमक सुरू झाली शंकर त्वेषाने लढत होता. अचानक शंकरवर वार झाला. दुसरा वार त्याच्या मानेवर होणार इतक्यात तो वार तलवारीने अडवला गेला.

बिजली आणि सुभान पोहोचले होते. त्यांनी मुघल सैनिकांचा फडशा पाडला. शंकरच्या मांडितून रक्त वहात होते.

"सुभान,पाय धरुन ठीव त्यांचा." बिजलिने भरजरी दुपट्टा काढला आणि जखम करकचून बांधली.


" सुभान ह्यासनी घिवून बाहिर पड." बिजलीने सांगितले.

"न्हाय, राजं आता येत्याल. म्या न्हाई जाणार." शंकरने नकार दिला.


" माज्यावर इस्वास ठीवा. ही बिजली हित उभी हाय. जीवाचा भंडारा करून. म्या राजं येई पतवर हित उभी राहीन."

बिजलीच्या डोळ्यात पाहून शंकरने जायला परवानगी दिली.

इकडे तळघरात केशर आता पूर्ण तयार झाली होती.मृत्यू आला तरी हरकत नाही.

"इतनी खुबसुरत लडकी है, पेहले जरा चख तो ले|" असे म्हणून पहारेकरी पुढे सरसावला.

"खबरदार,तिला हात लावशील तर डोस्क उडवीन तुझ." गुणवंता गरजली.


त्यासरशी सैनिक मागे वळला. त्याने तलवार काढली आणि गुणवंताच्या अंगावर झेप घेतली.

" खंडोजी, केशरला सोडीव." गुणवंता ओरडली.

तोवर आवाज ऐकून दहा पंधरा सैनिक धावून आले. जोरदार चकमक सुरू झाली.


इकडे पळणाऱ्या खानवर राजांनी झेप घेतली. समशेरीच्या पहिल्या वारात खानाचा अंगरखा फाटला. राजे मागून त्वेषाने चालून येत होते. खानाचे अंगरक्षक आणि राजे यांच्या मध्ये तान्हाजी आणि येसाजी उभे होते. राजांनी परत एकदा वार केला. खानाने वार चुकवला आणि कठड्यावरून बाहेर उडी मारू लागला. तेवढ्यात राजांनी बाहेर झेप घेऊन वार केला. सपकन वार झाला आणि रक्ताची चिळकांडी उडाली.


"या खुदा!" खान ओरडत कोसळला आणि राजे माघारी फिरले.

"सिवा आया! भागो!"

बहिर्जी नाईक आणि साथीदारांनी ओरडायला सुरुवात केली.

महालात सगळीकडे पळापळ चालू झाली.
अंधारात महाराज बाहेर पडायच्या दिशेने निघाले.


केशर,खंडोजी आणि गुणवंता तळघरातून बाहेर आले. केशरच्या अंगावर तलवारीची जखम होती. वाऱ्याच्या वेगाने सगळे बाहेर पडायला निघाले. दरवाजा जवळ बिजली उभी होती. राजे बाहेर पडले पाठोपाठ सगळे मावळे बाहेर निघाले.

"बिजली,चल लवकर." बहिर्जी ओरडले.

"नाईक, तुमी फूड व्हा. म्या आलेच."
बिजलीने आवाज दिला.

नाईक बाहेर पडले. तेवढ्यात केशर, गुणवंता आणि खंडोजी आले.

"चला लवकर बाहिर." बिजली ओरडली.

तेवढ्यात शरिफखान आठ दहा सैनिक घेऊन धावत येत होता.

"पकडो,सिवाके जासुस है|"

त्याने सैनिकांना आवाज दिला. केशरने खंडोजीला खुणावले. खंडोजी खाली बसला आणि त्याने खंजीर खानाच्या पायावर फेकला. खान ओरडला आणि वर पहायच्या आतच केशरने खानाचे मुंडके उडवले होते.

"केशर,मुंडके घिऊ नग राजांची परवानगी न्हाई."
बिजली ओरडली.


सगळे घाईने बाहेर पडू लागले. इतक्यात एका सैनिकाने फेकलेला खंजीर खंडोजीच्या पाठीत घुसला. खंडोजी बाहेर कोसळला आणि बिजलीने दरवाजा बंद केला. तिघेही वेगाने बाहेर पडले.



महाराज गडाकडे मार्गस्थ झाले. बहिर्जी मात्र थांबून होते. अजून त्यांचे साथीदार परतले नव्हते. शंकर जखमी होता. तेवढ्यात लांबून तिघेजण येताना दिसले. सुभान धावत पुढे गेला. नाईकांनी इशारा केला. सगळ्यांना घोड्यावर घेऊन घोड्यांनी वेग घेतला. खंडोजीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता.


तोंडावर ऊन येऊ लागले तसे खंडोजी डोळे चोळत उठला. त्याची पाठ प्रचंड दुखत होती. समोर स्त्रीवेशात अत्यंत सुंदर अशी केशर उभी होती. तिकडे शंकर दुसऱ्या बाजेवर पडून होता आणि त्याच्या पायाशी बिजली उभी होती.

"नाईक आलं!"
पहारेकरी वर्दी घेऊन आला.

"काय र पोरांनु बर हाईसा नव्हं?"
नाईक हसून म्हणाले.

खंडोजी मान डोलावली.

"काय ग पोरी,आता करणार का न्हाई लगीन?"
नाईक केशरला विचारत होते.

केशर लाजून होकारार्थी मान हलवत होती.

"आस्स,मंग जिवाजीला सांगतो की खंडोजीच्या घरला जायची तयारी करा."

नाईक विचारपूस करून निघून गेले. बिजली जायला उठली.

"बिजली, भंडाऱ्याचा रंग कंचा?"
शंकर उठून म्हणाला.
"एकच तुमच्या आन माज्या इमानाचा."
बिजली खाली मान घालून म्हणाली.

"आस्स,केशर, बिजली हिकड या. ह्यो बेलभंडारा. दोघींनी उचला आन आम्हा दोघा मैतरांना साथ द्याच वचन द्या."

शंकर वाट अडवून म्हणाला.

"देईन पर एक अट हाय आमची!"
केशर बोलली.

"अट आणि हायेच का? काय पायजे नुसतं सांगा. सोननाण, भरजरी लुगडी, दागदागिन."
शंकर म्हणाला.

"त्ये कायबी नग, फक्त एकदा राजांना बघायचं हाय आन फूडबी कामगिरीवर आमाला न्याच."

दोघींनी एकसुरात म्हंटले आणि चौघांनी होकराचा बेलभंडारा उचलला.


सदर कथा संपूर्ण काल्पनिक आहे. परंतु खरच शिवरायांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा विरांची आणि विरांगनांची कितीतरी साहसे सह्याद्रीने पाहिली असतील. गडकिल्ले फिरताना अनेकदा मला सह्याद्री ह्या कानगोष्टी सांगत असल्याचा भास होतो आणि मग अशा काही कथा सुचत जातात.

कथा संपूर्ण वाचल्यावर अभिप्राय नक्की नोंदवा.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all