बेलभंडार भाग 1

स्वराज्यावर प्राण ओवाळून टाकणाऱ्या एका वाघिणीची गोष्ट


बेलभंडार भाग 1

कथा इतिहासावर आधारित असली तरी पूर्णपणे काल्पनिक आहे. यात कोणतेही ऐतिहासिक सत्य सांगायचा दावा नाही.


गडावरची तोफ वाजली आणि दरवाजे बंद झाले. मशाली पेटू लागल्या. त्याच वेळी राजगडाच्या एका अरुंद चोरवाटेवर हालचाल सुरू झाली. जिथून जायला विषारी जनावरसुद्धा तयार होणार नाही अशा वाटेवरून गड उतार होऊन खाली आलेला माणूस घोड्यावर स्वार झाला.

नुकताच अंधार पडू लागला होता. इतक्यात समोरून आवाज आला,"मालक,जरा थांबा. आमासनी मदत पायजे."

जनानी आवाज ऐकून तो क्षणभर थबकला. डोक्यावर पदर आणि पदराखाली बाळ असलेली एक बाई वाटेवर उभी होती. त्याला खरेतर खबर द्यायला जायचे होते. पन्हाळा मोहीम फत्ते झाल्यावर राजांनी जुन्नर आणि अहमदनगर ही ठाणी जिंकायची मोहीम आखली होती. तीच खबर घेऊन तो निघाला होता.

"मालक, आव करताय ना आमासनी मदत?" स्वार भानावर आला.

तेवढ्यात वाऱ्याने तिच्या डोक्यावरचा पदर उडाला. केतकीच्या पानासारखे स्वर्गीय सौंदर्य पाहून तो मुघल गुप्तहेर थबकला.

" इतक्या रातीच एकलीच कुठ निघाली बाई?" त्याने शंकेने विचारले.

" नशीबच फुटक दादा. आर सासू आन नवरा लई छळ करत्यात. उपाशी ठिवत्यात. म्या माह्यारला चालली बग."
डोळ्यात पाणी आणून ती सांगत होती.

तसा त्याने बिनघोर होऊन तिला घोड्यावर बसायचा इशारा दिला. लुगड्यात गुंडाळलेले बाळ तिने पाठीशी बांधले आणि घोड्यावर चढली.


त्याने घोड्याचा लगाम हाती घेतला आणि टाच मारली. चालताना हळूच धक्का लागत होता तसे ती अंग चोरत होती. ते पाहून त्याला आणखी चेव चढला. त्याने मागे सरकायचा बहाणा केला आणि आणखी स्पर्श करू लागला.


"फूड जरा वाट नीट न्हाय तर घट धरून ठीवा." तो हसून म्हणाला.

त्यासरशी तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घोड्याने वेग घेतला. ती शांत बसून होती. घोडा गडापासून पुरेसा दूर आला होता. अचानक तिचा दुसरा हात त्याच्या कंबरेला लागला आणि त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.


तिने खांद्यावरचा हात बाजूला घेतला. कमरेवर असणारी पकड घट्ट केली. सरकन त्याच्या गळ्यावरून खंजीर फिरला आणि रक्ताची चिळकांडी उडाली. त्याच्या घशातून शब्दही फुटला नाही.


घोड्याचा लगाम तिने खेचला आणि इशाऱ्याचा रुमाल वर केला.


"शाबास पोरी,शाबास!" सयाजी पुढे येऊन म्हणाला.


तशी तिने घोड्यावरून खाली उडी मारली. पाठीवर बांधलेले गाठोडे सोडले आणि त्या स्वराच्या कंबरेला बांधलेला खलीता काढला.

"काका,ह्ये घ्या. आन नाईकांना द्या. म्या जाते घरला न्हायतर तिकड काकू माज्या नावानं शिमगा करत बसल."

तिने तोच घोडा घेतला आणि टाच मारली तसा घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू लागला.


सयाजी तिला पाठमोरी पाहून डोळे पुसत होता. वीस वर्षांपूर्वी खंडोबाच्या दर्शनाला जाताना घडलेली घटना त्याला आजही लख्ख आठवत होती.


लग्न होऊन आठ वर्षे झाली तरी मूलबाळ नसल्याने सयाजी आणि त्याची बायको खंडोबाला नवस बोलून परत येत होते. गाडी एका लयीत चालत होती. अंधारून आले होते. अचानक समोरून एक बाई पळत येताना दिसली. एकंदर पोशाख पाहून बाई तमासगीर असल्याचे दिसत होते.


गाडीजवळ येताच बाई ओरडली,"दादा, माज्या बाळाला वाचीव र!"


सयाजीने पटकन बायकोला इशारा केला. तिने बाळाला गाडीत घेतले आणि तेवढ्यात मागून तिचा पाठलाग करणारे सैनिक येऊ लागले.


"दादा,ह्या बाळाला घिऊन जा. माजी मदत कर." तिने हात जोडले.


त्यासरशी सयाजीने बैलांचा कासरा ताणला आणि बैल वाऱ्याच्या वेगाने उधळले. तीच ही तान्ही पोरगी. सयाजी सगळे मनात परत परत आठवत नाईकांना भेटायला निघाला.


इकडे घोडा भरघाव वेगाने गावात शिरला आणि सगळी बारकीचिरकी पोरे घोड्याच्या मागे लागली. तेवढ्यात तिने लगाम खेचला आणि घोडा थांबला.


"अय पोरांनो,घोड पायल न्हाय व्हय कदी?" ती डाफरली.

"घोड मस पाहिलं असत्याल त्यांनी पर तुज्यासरखी उंडगी पोर पाहीली नसल."

आतून आवाज आला तशी सगळी पोरे पळून गेली.


"केशर,आग किती येळा सांगू तुला. आस बापय माणसावानी घोडा फेकायचा, पट्टा फिरवायचा,हत्यार चालवायचं बंद कर.
लोक म्हणत्यात सगुणीची पोटची पोर आसती तर आस वागू दिलं आसत का?"

सगुणाच्या डोळ्यात पाणी होते.

केशरने पदराचा काचा सोडला. हळूच पुढे आली.

"काके,जग किसनदेवाची आय यशोदेला म्हणत. आन त्वा मला सांग आस समद्यानी घरात बसून चाललं व्हय. महाराजांच्या कामगिरीवर जीव गेला तर जीवाच सोन व्हईल बग."


केशर असे बोलली तसा तिच्या तोंडावर हात ठेवून सगुणा तिला आत घेऊन गेली.


केशरला कामगिरी मिळेल का? बहिर्जी नाईक केशरवर विश्वास ठेवतील का? केशरच्या आयुष्यात पुढे काय वळणे येतील.

वाचत रहा.
बेल भंडार.
©®प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all