बेलभंडार भाग 13

केशर वाचेल का? खानाला धडा शिकवून सगळे सुखरूप बाहेर पडतील का?



बेलभंडार भाग 13

मागील भागात आपण पाहिले की आतल्या लोकांना केशर आणि बिजलीच्या युक्तीने हत्यारे पोहोचली. राजगडावर मोहिमेची तयारी पूर्ण झाली होती. तिकडे केशरला शरीफखानाने पकडले. आता पाहूया पुढे.


"शंकर आर आजुन कशी न्हाय आली केशर? चल आपून बघून यिऊ."
खंडोजीला काळजी वाटू लागली.

खरे तर शंकरही मनातून चिंतेत होता. दोघेही केशरने लावलेल्या पालावर पोहोचले. राणी आणि तिची भावंडे केशरची वाट पहात होती. खंडोजी दिसताच राणीला हायसे वाटले.

"दादा,केशर आजुन आली न्हाय र! मला लयी भ्या वाटतय."

राणी घाबरली होती.

तसेही उद्या मोहीम संपणार होती.

"राणी,तू आमच्या माणसासंग हितन जा. माझ्या घरला थांब. दोन दिसानी तथ भेट व्हईल."
खंडोजीने तिला समजावले.

ढोल घेऊन आलेल्यापैकी एकाला त्याने राणीची जबाबदारी दिली. राणीला पाठवून दिले आणि खंडोजी आणि शंकर निघाले. त्यांना आज दिवसभर टेहेळणी करायची होती. रात्र होताच आत शिरून दोन खिडक्या खोलायच्या होत्या. ठरल्याप्रमाणे दोघेही डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ लागले. दिवस मावळतीला जाऊ लागला.


गडावरून महाराज आणि त्यांचे साथीदार बाहेर दबा धरून बसले होते. मिळेल त्या मार्गाने वरातीत सामील होऊन पुढे जायचे होते.

" आव सरदार,थोडी घेणार काय?" एका रुबाबदार माणसाने कोतवालाला आवाज दिला.
"छ्या, पहारा करतानी नग. पर कशापायी व?" त्याने विचारले.

"पोराचं लगीन हाय. तुमी वरात काडू दिली. तुमाला बक्षीस समजा की." त्याने परत विचारले.


"आस्स,पर आता नग. पहारा चालू हाय नव्हं." कोतवाल पुन्हा म्हणाला.

"सरदार,एवढी लाखाची फौज हाय आजूबाजूला. इथ शिरायची हिंमत कोण करणार न्हाय." त्याने स्तुती केली.

"आस म्हणता,आणा मग थोडीशी." त्याने होकार देताच पुढचे काम सोपे झाले.


बहिर्जी नाईकांनी आतल्या सगळ्या लोकांना एकत्र केले.

"समद्यांनी इखरून थांबा. वरात यील तस हळूहळू सामील व्हायचं. महालाजवळ वरात आली की मंग बाजूला व्हायचं."

नाईकांनी योजना समजावून सांगितली.

सजवलेले घोडे,बैलगाड्या,डोक्यावर दिवाबत्ती घेतलेले लोक,ढोल ताशांचे खेळ,सोंगाचे नाचणे अशी वरातीची लगबग सुरू झाली.


दबा धरून बसलेले खंडोजी आणि शंकर मुघल सरदारांचा वेष धारण करून निघाले. राघोजीच्या हातातून मिळवलेल्या मुद्रांचा वापर करून त्यांनी सहज आत प्रवेश मिळवला.

"शंकर,ह्या अंगान वरात फूड जाईल. एकदा खुणेची शीळ आली की चोर दरवाजा उघडायचा."
खंडोजीने शंकरला सांगितले.

दोघे पुढे जात असताना दोन पहारेकरी बोलू लागले.


"कल एक काफिर जासुस पकडी गयी| आज उसकी कूछ खैर नही|"

हे ऐकताच खंडोजी आणि शंकर जागेवर थांबले.

"खंडू, त्वा केशरला वाचीव दरवाजा म्या उघडतो."

त्याप्रमाणे खंडोजी निघाला. परंतु तळघर शोधणे आवश्यक होते.


बिजलीने आज यवनी नृत्यांगना करतात तसा शृंगार केला. खंजीर आणि बिचवा लपवला. डोळ्यात सुरमा भरला. तोंडात पान ठेवले आणि सुभानला निघायचा इशारा केला.

"कहा जाना है|" तिला अडवताच तिने स्वतः जवळ असलेली मुद्रा दाखवली.

सुभान आणि बिजली आत आले.

त्यासरशी बिजली म्हणाली,"सुभान,जनानखान्यात लपून रहायचय आपल्याला चल."

गुणवंताने पुरुषी वेष धारण केला. काहीही करून शरीफखानाने ज्या कोणाला पकडले असेल त्याला वाचवायला हवे. ती लगबगीने तळघराची वाट चालू लागली. तेवढ्यात इथे तिथे घुटमळत असणारा खंडोजी तिला दिसला. त्याने डोळ्यात सुरमा घातलेला नव्हता.

"भंडाऱ्याचा रंग कंचा?" तिने जवळ जाऊन विचारले.

"तुमच्या माज्या इमानाचा." समोरून उत्तर आले.

त्यासरशी गुणवंताने आपली ओळख सांगितली.

"केशर शरीफखानाच्या ताब्यात हाय." खंडोजी म्हणाला. दोघेही केशरकडे धावले.


वरातीला रंग चढू लागला. महाराजांनी इशारा दिला. एकेक करून सगळेजण वरातीत सामील होऊ लागले. पहारेकरी मद्याच्या अंमलाखाली होते. त्यामुळे काम सोपे झाले होते. हळूहळू वरात पुढे सरकू लागली. एकेक धारकरी अंधारात बाजूला होऊ लागला. शंकर आत दबा धरून बसला होता. रात्र गडद होऊ लागली. महालातील मशाली विझु लागल्या. लाल महालात शांतता पसरू लागली. शंकर चोर दरवाजाकडे सरकू लागला. बाहेर टिटवी ओरडली. शंकर हळूच दरवाजाजवळ गेला.

त्याने आतून विचारले,"भंडाऱ्याचा रंग कंचा?"

बाहेरून उत्तर आले,"तुमच्या आन माज्या इमानाचा."


त्याबरोबर शंकरने दरवाजा उघडला आणि लाल महालाच्या भिंतीजवळ दबा धरून बसलेले धारकरी आत प्रवेश करू लागले. केशरने पाठवलेल्या टिपणात खान कोणत्या दालनात असेल याचे उल्लेख होते. महाराजांचे बालपण लाल महालात गेले असल्याने महाराज पुढे झाले आणि एकेक पहारेकरी धारातीर्थी पडू लागला.


"इसके बाल काट डालो उसके बाद ये खुबसुरत चेहरा बिगाडकर फेक दो बाहर|"

शरीफखान गरजला आणि त्याबरोबर तो बाहेर पडला. केशर अजिबात घाबरली नव्हती.

"राजं एकदा तुमासनी एकदा डोळ भरून बघायचं व्हत. पर आता हितूनच अखेरचा मुजरा करते."

केशरने मनातच महाराजांना मुजरा केला आणि सज्ज झाली जीवाचा बेलभंडार करायला .


दुसरीकडे महाराज आणि मावळे आत घुसले. सगळीकडे तलवारी चालू लागल्या. महाराज चित्त्याच्या वेगाने शायिस्ताखानाच्या दालनाकडे झेपावू लागले.


केशर वाचेल का? शरीफखानाचे काय होईल? बिजली आणि गुणवंता सुखरूप बाहेर पडतील का? पाहूया कथेच्या अंतिम भागात.
वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all