बेलभंडार भाग 7

कामगिरीचा थरार सुरू.

बेलभंडार भाग 7

मागील भागात आपण पाहिले की बहीर्जी नाईकांनी कामगिरीवर जाण्यासाठी त्याचे खास हेर बोलवायचे ठरवले. त्याबरोबर केशरलाही बोलावणे आले. आता पाहूया पुढे.


जोत्याजी कानद खोऱ्यातील मावळ्यांना घेऊन निघाले. तिकडे गुणवंता आणि केशर बिजलीला शोधत निघाल्या. दूरवरून ढोलकीचा कडकडाट ऐकू येऊ लागला. तमाशाची कनाद दिसू लागली. फडाजवळ येताच गुणवंता थांबली.

"बिजलीला वर्दी द्या. भंडाऱ्याच बलावण आल."

बाहेर थांबलेला गडी आत वर्दी घेऊन गेला. केशर आणि गुणवंता पुरुष वेश धारण करून आल्या होत्या. तरीही हे सगळे वातावरण केशरला अस्वस्थ करत होते. तिला राहून राहून तिच्या आईची जिवाजीकाकांनी सांगितलेली आठवण समोर येत होती.


तेवढ्यात समोर मूर्तीमंत सौंदर्य उभे राहिले. माशाच्या आकाराचे डोळे,सुंदर कमनीय शरीर,नृत्याच्या अंगात भिनलेल्या अदा आणि त्यावर कडी करणारा मधाळ आवाज.


"यावं, गुणवंताबाई यावं." बिजलीने हसून दोघींचे स्वागत केले.

केशर फक्त पहात होती.

" बहिर्जी! त्यांच्या संगतीन जिण सोन्याचं झालं बगा.
त्यासनी शबुद दिला हाय. जवा त्यासनी गरज लागलं तवा ही बिजली हाजिर असल. काय हुकूम हाय सांगा?"
बिजलीचे डोळे अभिमानाने भरलेले होते.

"बिजली, बेलभंडार उचल. कामगिरी लई अवघड हाय." गुणवंता म्हणाली.

" गुणवंताबाई, आव आमचं जगणं मंजी भंडाऱ्यासारखच की वाऱ्याव उधाळलेल. तरीबी,ह्ये घ्या उचलला भंडारा. आजपासून ह्यो जीव स्वराज्याचा झाला." बिजली निर्धाराने म्हणाली.



बहिर्जीनी सांगितलेल्या गुप्त ठिकाणावर सगळेजण येऊन पोहोचले.

"शायिस्ताखान नावाचं आजगर स्वराज्य गिळायला एक वरीस झालं घात लावून बसल हाय." बहिर्जी त्वेषाने बोलत होते.

"त्या अजगराच्या पोटात शिरून त्येला आतून फाडायच." जोत्याजी पुढे येऊन म्हणाले.

"व्हय पर आस जोशात यिवून न्हाय चालायचं जोत्याजी." बहिर्जी शांतपणे म्हणाले.

" व्हय,त्यासाठीच समद्याना हित बोलिवल हाय. गुणवंता,तू खानाच्या जनानखान्यात दासी बनून जायचं. बिजली आजपासून तू पुण्याचा आसपास खेळ करायचं. खानाच्या सैन्यातील वतनदारांच्या मदतीनं तू आत छावणीत जायचं."

बहिर्जी योजना समजावत होते.

"केशर,तू आणि खंडोजी तुमी गवळी बनून तिथं छावणीत राहायचं. शंकर तुमच्या बरोबर आसल."

नाईकांनी सगळी योजना समजवली. पुन्हा एकदा बेलभंडाऱ्याचे तबक आणले.

"हा,बहिर्जी आज बेल भंडारा उचलून आन घेतो कामगिरी फत्ते करील."

सगळ्यांनी बेलभंडारा उचलून शपथ घेतली. एका अवघड परंतु खास कामगिरीसाठी सज्ज झाले होते.


केशर आणि खंडोजी बाहेर पडले. बहिर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळी व्यवस्था आधीच केलेली होती.

"शंकर,नाईकांनी कामगिरी दिली खरी. पर आता गायी म्हशी सांभाळता यायला पायजे नव्हं?"
खंडोजी मिश्किल हसून म्हणाला.

"शंकरदादा, कुणब्या घरी वाढलेली पोर हाय म्या. समद येतय मला." केशरने ठसक्यात उत्तर दिले.

" हा, सबुरीन. तुमी फकस्त कामगिरी पुरत दादला आणि बाईल हायसा. धेनात ठीवा मंजी झालं."

शंकर हसू दाबायचा प्रयत्न करत होता.

"व्हय, तसबी केशरसाठी लई जन मुंडावळ्या बांधून बसल हायेत." केशरने वेणी उडवली.

बरोबर गायी आणि म्हशी,शेळ्या असा बारदाना घेऊन खंडोजी पुण्याची वाट चालू लागला. खानाची छावणी पुण्याच्या चारही बाजूंना पसरलेली होती. सगळीकडे मुघल सैन्य दिसत होते. छावणीजवळ एक छोटे गाव बघून तिघेही थांबले. इथून सहज आत जाता येणार होते.


गुणवंता आणि बिजली दोघीही आपापल्या कामगिरीत वाकबगार होत्या. बिजलीने फड पुण्याच्या जवळ एका मोठ्या गावात लावला.


तिथे खानाच्या सैन्यातील अनेक सरदार,वतनदार यातील एखादा मासा गळाला लावणे सहज शक्य होते. एकदा अशी एखादी फट सापडली की आतल्या बातम्या काढणे सहज शक्य होते. बिजलीने फड लावला. संध्याकाळच्या खेळाची तयारी सुरू केली.

"बाई हायेत का?" बाहेरून खर्जातला आवाज ऐकू आला.

बिजली बाहेर आली.

"बोला सरकार,काय खिदमत करू आपल" तिने मधाळ आवाजात जाळे टाकले.

"आज रातीच्या खेळाला सरदार राघोजी आन त्यांचे खासे येणार हायेत." त्याने मग्रुरीने उत्तर दिले.

"आता? आव अशा लयी स्वाऱ्या येतात खेळाला. म्हणणं तरी काय हाय तुमच?" बिजली लाडिक स्वरात म्हणाली.

" खास स्वारी हाय, तवा खास सेवा मिळाली पायजे." त्याने उत्तर दिले.

"आदी यिऊ तर द्यां त्यासनी." बिजलीने त्याला वाटेला लावले.


इकडे केशर आजूबाजूला चौकशी करू लागली.

" आव मावशी,आमी पार लांबन आलोया. दुध दुभात्याचा धंदा हाय आमचा."

तिने एका म्हातारीला हाक मारली.

"आस व्हय. मंग उद्या चल आमच्या संग तू. पुण्याच्या बाजारात समद खपतय बघ."
म्हातारीने सांगितले.

पुण्यात सगळ्यात आधी शरीफखानाचा शोध घ्यायचा केशरने पण केला.



राघोजी बिजलीला आतील खबर काढायला उपयोगी ठरेल का? केशरला शरीफखान सापडेल का? गुणवंता जनानखान्यात पोहोचेल का?

वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all