बेलभंडार भाग 6

अखेर केशर कामगिरीवर निघाली.



बेलभंडार भाग 6

मागील भागात आपण पाहिले खान पुण्यात पोहोचला. आजूबाजूचा मुलुख लुटायला सुरुवात झाली. रयतेचे हाल सुरू झाले. केशरच्या गावाची अवस्था हृदयद्रावक झाली होती. आता पाहूया पुढे.


दोन्ही मुलांना आणि देवीच्या मूर्तीला घेऊन केशर बाहेर आली.
"चला पोरांनो,आता हित थांबायचं न्हाय." केशर निर्धाराने चालत होती.

वाचलेला गाव जिवाजी काकाच्या घरासमोर गोळा झाला.

"आपल्याला हित थांबता याच न्हाय. वाचलेली पोरसोर,म्हातारे समद घिऊन रानात आसरा घिऊ. गावाबाहिर देवराई हाय. तिकड रहावू."

जिवाजी काकांनी सांगितलेले सर्वांनी मान्य केले. उरला सुरला संसार, जनावरे सगळे घेऊन सगळा गाव देवराई आश्रयाला निघाला. देवराईत महादेवाचे मंदिर होते. आजूबाजूला भरपूर पाणी होते. सगळ्यांनी तिथे मिळेल त्या जागा धरून तात्पुरती घर उभी करायला सुरुवात केली.

केशर आई काळूबाईची मूर्ती घेऊन आली. तिने मूर्ती उन्हात उघड्यावर ठेवली.

"शरीफखानाचं मुंडक उडवील आन तुला गावात घिऊन जाईल तरच नावाची केशर."

केशरने प्रतिज्ञा केली. जिवाजी दूर उभे राहून आपल्या लेकिकडे बघत होते.


राजगडावर महाराज प्रचंड संतापले होते.

"आम्ही आता खानावर चालून जाणार. सैन्य तयार करा." महाराजांनी आज्ञा केली.

"महाराज,ऐकावं. आता आपल्या सबुरीची परीक्षा आहे." निराजी अदबीने सांगू लागले.

" निराजी,रयत भुके कंगाल भटकते आहे. लेकीबाळी लुटल्या जात आहेत. आता कसली सबुरी."

महाराजांचे तेजस्वी डोळे संतापाने आणि स्वराज्यातील लेकिंच्या विटंबनेने भरून आले होते.


तेवढ्यात वर्दी आली."महाराज योक गोंधळी आलाय. तुमासनी भेटायला आडून बसलाय बगा."

इकडे गडाच्या दारावर गोंधळ चालु होता.

"उदे ग आंबे उदे!"

संबळ वाजवत गोंधळी नाचत होते.
महाराज तातडीने मुख्य दरवाजाकडे निघाले.


"आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी.
आई धावून ये सत्वरी बघ राकुस माजलं.
लेकीबाळी त्या नासल्या,गाव सार ग लुटलं.
कसा सांभाळू संसार आल संकट लई भारी."


"अविचारी अभिमन्यू कसा चक्रात फसला.
जाणून घ्यावं राज जरा हाय पुराणात दाखला.
चक्र सार भेदायला जरा युगत हवी काडायला.
मंग शिरून त्या चक्रात,उडवू राकुसाच्या मानला."
उदे ग आंबे उदे! उदे ग आंबे उदे!


गोंधळी थांबले आणि राजे पुढे झाले.
"यावे बहिर्जी यावे!"महाराजांनी बहिर्जीला अचूक ओळखले.

गुप्त दालनात बैठक सुरू झाली.

"बहिर्जी एक साल संपत आले. खान हलायचे नाव घेत नाही. त्याला धडा शिकवायला हवा." राजे संतापले होते.

"राज,अविचार नग. इस्वास ठीवा. लवकरच खानाचा बिमोड तुमी म्हणता तसा करू. तुमी योजना बनवा. तवर खानाची सगळी अंडी पिल्ली म्हाईत करून येतो."

राजांना मुजरा करून बहिर्जी बाहेर पडले.


बहिर्जी बाहेर पडले.

"जोत्याजी, तिकड कानद खोऱ्यात जा. म्या सांगतो ती पोरं बोलवा. समद्यासनी बेलभंडार उचलायला लावा."

बहिर्जी अंगात वारे भरल्यासारखे सूचना देत होते.

"गुणवंता,केशर ध्यानात हाय ना? आन बिजलीसुदिक. दोघीसनी बोलाव."

नाईकांना आता समोर दिसत होता फक्त आणि फक्त शायिस्ताखान.

इकडे जवळपास वर्ष होत आले तरी अवघा मुलुख भिऊन जगत होता.
"केशरताई आपल्यालाबी आस पळवून नेत्याल व्हय? का जाळून मारत्याल?"

चिमणी केशरला भरल्या डोळ्यांनी विचारत होती.

दोन दिवसांपूर्वी रानात गेलेल्या दोन पोरींना असेच उचलून घेऊन गेले होते.

"चिमणाबाई,ही केशर हाय तवर तुझ्या केसाला कुणी धक्का लावणार न्हाय बग."

केशर तिला जवळ घेऊन समजावत होती.

"पर आस लपून किती दिस राहणार आन का?"

केशरने आवाजाकडे चमकून पाहिले.

"गुणवंता,म्हंजी नाईकांनी शबुद पाळला." केसरच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी आनंद दिसत होता.


"उचल बेलभंडार आन चल." गुणवंताने भंडाऱ्याचे ताट आणले.

"ही केशर बेल आन भंडारा उचलून आण घेती. जीवाचा भंडारा आज स्वराज्यासाठी उधळला."

केशरने भंडारा कपाळाला लावला.

सगुणाकाकू डोळ्यात पाणी आणून लेकिकडे बघत होती.

"आये,आस जगण काय कामाचं? आय काळूबाईला तिचं दिवुळ भेटल आन तुला तुझी लेक."

केशर सगुणाला मिठी मारत म्हणाली.

आज केशरने तिला आई अशी हाक मारली होती. जिवाजी काकाने तिला लहानपणी सगळे सांगितले होते. त्यामुळे केशर मनात येऊनही आई म्हणत नसे. आज मात्र तिने आईला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. गुणवंता आणि केशर बाहेर पडल्या. आता बिजलीला गाठायचे होते.


"अय पोरा,आर हित उमाजी पाटलांचा वाडा कुठ हाय?"
जोत्याजी मोठ्याने ओरडला तसे ते बारके पोरगे थांबले.


"आता वाडा कुठला, त्ये तकड रानात हायेत समदे." तो पोरगा घाबरून म्हणाला.

खंडोजी आणि त्याचे साथीदार हत्यारांचा सराव करत होते. गावावर होणारे हल्ले त्यांनी आजवर परतवले होते. लांबूनच जोत्याजीला त्यांनी ओळखले.

"मुजरा घ्यावा जोत्याजी. गडावर काय हालचाल?"
खंडोजी पुढे येऊन म्हणाला.

"गड आजुन तरी सुरक्षित हाय. पर लांडग माजल्यात. त्यासनी हुडकून माराय पायजे."

असे म्हणून जोत्याजीने बेलभंडारा समोर ठेवला.

खंडोजी आणि शंकर त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातली मोजकी पोरे घेऊन जोत्याजी परत निघाले.


केशर आणि बिजली कामगिरीवर काय करतील? शरीफखान केशरला सापडेल का? खंडोजी आणि केशरची भेट होईल का?


वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all