पुरुषासारखा पुरुष असून! (भाग -४)

struggle of a man.

(पुरुषवादी स्पर्धा)


पुरुषासारखा पुरुष असून. . . !

लेखिका - ©® स्वाती  बालूरकर, सखी


कथा पुढे-


(भाग -४)

दार उघडलं तर कामवाल्या मावशी होत्या .

आल्या आल्या शोभितला पाहून खुश झाल्या व विचारलं की" काय दादा , विसरले आम्हाला. किती दिवसांनी आले इकडे? वहिनी बाय बरी का ?"
"सगळं मजेत मावशी. बस थोडा बिझि झालो."

" बरं बरं चालू द्या मग तुमच्या गप्पा!"

मावशी कामाला लागल्या. शोभित व दिलीप शांतच झाले. हॉलमधे टेबल जवळ खुर्चीवर बसले.

"एक सांगतो शोभित तुला, हा फ्लॅट ,हे घर केव्हाही तुझंच आहे असं समज. मेसचा डबा लावलेला आहे. घरात सगळ्या वस्तु आहेत अगदी वाशिंग मशिन पासून टी.वी . पर्यंत . . . तूच तर जमा केलं होतंस सगळं. जाताना ने म्हटलं तर नेलं नाहीस. त्यामुळे आम्हाला परकं करू नकोस. या मावशी तर भांडे व लादीसाठी येतात. तुला कधीही २ दिवस चार दिवस चेंज म्हणून यावं वाटलं तर नक्की ये! निवांत रहा. पण या सगळ्या टेंशन मधे कामावर व तब्येतीवर परिणाम करून घेवू नकोस. "

दिलीपच्या या वाक्यांनी व हात मिळवल्याने शोभितला चार हत्तींचं बळ मिळालं.

इतक्यात माधव एकदम खुशीत आत आला.
नाश्ता टेबलावर ठेवला व शोभितला एकदमच मिठी मारली.

दोघांच्या जुजबी गप्पा झाल्या व ख्याली खुशाली झाली.

माधवने शोभितची आवडती मिसळ आणली होती. बाकी गरम भजी , वडापाव वगैरे होताच.
भरगच्च नाश्ता झाला. कितीतरी दिवसांनी पोटभर खाल्लय असं वाटत होतं त्याला.

मित्रांचं प्रेम व आपुलकी पाहून शोभितला खूप भरून आलं. आपली मायेची माणसं आहेत मग का असं निराश व्हावं असंही क्षणभर वाटून गेलं.

कामवाल्या मावशी निरोप घेवून गेल्या.

माधव दार लावत होता तेव्हा शोभित म्हणाला, "असू दे मी निघतोच आता."

"बस ना यार !"असं म्हणून दिलीपने आग्रह केला.

शोभित निघण्याच्या विचारात होता इतक्यात माधवने विचारलं, " काय रे शोभ्या, बायको माहेरी गेली की काय ? नाही म्हंजी सुट्टीच्या दिवशी आम्हाला दर्शन दिलं ब्वॉ!"

आता हे प्रेमाने की व्यंग ते देखील कळालं नाही शोभितला.

"तस नाही रे माध्या, पण ती मैत्रिणीकडे गेलीय सुट्टीचं ,म्हणून वाटलं आपण पण मित्रांकडे जाऊ या तर हा दिल्या बघ ९ वाजेपर्यंत पालथा पडलेला. मी येवून उठवलं."

पुन्हा माधवचा सूर थोडासा सीरियस (गंभीरच) लागला.

" बरोबर आहे बाबा, आम्ही काय संस्कारी नाय ना तुझ्यासारखे! पाहायला का दिल्या सकाळी उठून अंघोळ करून, पूजा करून आलाय आपला पठ्ठ्या! गंध पण लावलंय की कपाळाला अन आम्ही अजून अंथरुणातच !" माधव त्याला निरखून बघत म्हणाला.

"ते मी अगोदर पासूनच करतो ना. . . तुला काय नवीन आहे का माधव?"

" नाई बे ! बॅचलर लाइफ आहे बाबा आमची अजूनही! तू तर् मार्गी लागला ."
माधवच्या त्या वेगळ्या सुर काढण्याचं शोभितला हसू आलं व त्याने गंभीरतेने विचारलं -

"आता मी निघू की थांबू ?"

"थांब ना यार, किती दिवसांनी भेटला!" पटकन दिलीप म्हणाला " ए माध्या ऐक रे त्याला उगाच परेशान करु नको."

" मी कशाला परेशान करू ? तो झाला परेशान, तो दिसतोयच टेंशनमधे म्हणूनच मी त्याला हसवतोय , रिलॅक्स करतो आहे."

" थांबना शोभ्या चल आत बसू!" दिलीपने त्यसला टेबलजवळून उठवलं.

" बरं घाई करु नको जायची, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे."
आता तर माधवचा हा स्वर खूप विचारणीय असून थोडासा गंभीरच लागला असं वाटलं त्यामुळे शोभितने थांबायचं ठरवलं.

असही तो घरी जाऊन एकटाच तर होता , काय करायचं आहे जावून .

" चल मग दिलीप, मस्त एखादा काहीतरी प्रोग्राम प्लॅन करू, शुभ्या इतके दिवसांनतर आलाय." माधव म्हणाला.

"चल मग एखादा सिनेमा बघु, दुपारी बाहेर जेवू व रात्री थोडं बसू . खूप दिवसांनंतर तिघे सोबत!"

" खूप छान प्लान आहे पण रात्रीचं ते सगळं नको, उद्या पुन्हा ऑफिस आहे . सकाळ सगळी खराब होऊन जाते. बापरे ! मला आवडतंच नाही. "

" कधीकाळी थोडी कंपनी द्यायचाना तू आम्हांला , ती पण बंद केली की काय ?"

"काय पण . . . तसं नाही मला मुळी आवडतच नाही ड्रिंक्स , उगीच तुम्हा लोकांना कधीतरी थोडीशी कंपनी द्यायचो, पण मी रमत नाही."

"बरं राहीलं. पण ऐक ना शोभित, एक सांग तुझ्या बायकोचं नाव शर्वरी ना? आणि ती त्या एसपी आयटी सोल्युशन मध्ये काम करते."

" हो !"

"अच्छा म्हणजे एच आर आहे ना रे? राइट!"

आता मात्र शोभित चौकस झाला.

"का रे काय झालं ?"

"इतकं काहीं नाही ,एक गोष्ट मनात आहे कितीतरी दिवसांपासून पण तुझ्याशी कसं बोलायचं ते कळत नव्हतं. पण सांगतोच यार आज ! आपली दोस्ती तर कॉलेजपासून आहे शोभ्या त्यामुळे हे कळाल्यापासून तुला भेटायच होतं."

शोभित गप्प व दिलीप मात्र विचारात पडला की आता हे संभाषण कुठपर्यंत जाईल? नेमकी काय गोष्ट आहे जी माधव त्याच्याजवळ बोलणार होता.

शोभित आधीच तणावात आहेत ते त्याला माहीत होतं ,अशी पुन्हा एखादी तणावपूर्ण गोष्ट असेल तर कशाला?

म्हणून दिलीप म्हणाला" अरे माधव अर्जंट नसेल तर राहू दे णं एवढं काय? पुन्हा कधी बोलू."

" पुन्हा कधी बोलायचं ? की बोलायचेच नाही ते माझ्या मनावर आहे, पण वाईट वाटलं तरी चालेल पण शोभित  आपला यार आहे , त्याला सांगितल्याशिवाय मला राहावलं जात नाही!"

मग शोभित दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, " माध्या सांग काय ते, मोकळेपणाने!"


क्रमशः 

©® स्वाती बालूरकर

दिनांक -१४. ११ .२२

🎭 Series Post

View all