आले स्वावलंबीत्व

A short story of a woman who was completely dependant and how she find a way and becomes Independent.

कथेचे नाव - आले स्वावलंबीत्व!

विषय - स्त्री आणि परावलंबित्व 

फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

आश्वी एक 10-12 वर्षांची निरागस, रंगाने सावळी असली तरी सुंदर दिसायची, हसल्यावर शुभ्र दंतपंक्ती एका मागोमाग रचून ठेवल्यासारखे दिसत असत. बाबांची लाडकी कन्या. नाही म्हणायला तिला मोठा भाऊ सुद्धा होता पण बाबांसाठी आश्वी जीव की प्राण. त्यांच्याकडे हिने काही मागावे आणि ते मिळू नये असे कधी झाले नाही. तसे पाहता परिस्थिती बेताचीच तरीही ते मुलीची इच्छा पूर्ण करायचे. आश्वी होती समजूतदार. तिनेही कधी आवाक्याबाहेर असेल अश्या कोणत्याच गोष्टीची मागणी कधीच केली नाही. म्हणतात ना मुली जन्मतःच समजूतदार असतात. 

एका आजाराचे निमित्त झाले आणि आश्वी चे बाबा स्वर्गवासी झाले. बाबा गेल्यावर हसरी आश्वी अगदीच शांत झाली. आई पेक्षा जास्त बाबांसोबतच तिचे भावनिक नाते घट्ट होते. ती आई कडे कुठलाच हट्ट करत नसे कारण ज्या प्रकारे ती बोले ते नकोच असा विचार करून शांतच राहणे पसंत करायची. दिवसामागून दिवस जात होते. आश्वी लग्नाच्या वयाची झाली तशी तिच्या घरातल्यांची लग्नासाठी वर शोधायची लगबग सुरू झाली. 

' काय झाले आशु? अशी उदास का आहेस? तू कॉलेज मध्ये आल्यापासून बघत आहे. अगदीच तोंड पाडून बसलीयेस.' लावण्याने तिच्या खांद्यावर हात टाकून विचारले. 

' घरचे लग्न करणार आहेत 12वीची परीक्षा झाल्यावर लगेच. ' आश्वी उदासपणे बोलली. 

' काऽऽऽय? अग पदवी पर्यंत तरी शिक्षण पूर्ण कर गं. म्हणजे जॉब साठी भविष्यात अडचणी नाही येणार. ऐक माझे राणी.' 

' कोणीच ऐकणार नाही. बाबा असले असते तर कोणीच बोलले नसते. अग ही लोक बाबा गेल्याच्या एक वर्षाच्या आतच लग्न करून टाकायला धडपडत होते. असल्या कसल्या प्रथा आहेत गं ह्या? कोणी घरातले स्वर्गीय झाल्यावर लग्नासाठी वय असलेल्यांचे लगेच लग्न उरकून टाकायचे? मन नावाचा प्रकार नाहीच का? डोके नाहिये ते तर दिसून येतेय.' आश्वी चा राग डोकावत होता हळूहळू दुःखी चेहर्‍यावर. 

'मग बोल ना तू. घे शिक्षण. रहा उभी पायावर. तोडून टाक हे '' स्त्री आणि परावलंबित्व '' आज जाऊदे करून लग्न करशील मग ते, आगीतून फुफाट्यात असे होईल.' लावण्या तिला शांतपणे समजवून सांगताना उठून उभी राहिली तसे तिचा हात खेचून आश्वी ने तिला खाली बसवले. 

'आजीची इच्छा आहे अग. तिला माझे लग्न पहायचे आहे. नातवंडांचे तोंड पहायचे आहे. तसेही कोणीच ऐकणार नाही मी कितीही बोलले तरीही.' आश्वी ला लावण्या कडे बघायची हिम्मतच होत नव्हती. कारण ती जाणून होती ह्या गोष्टींची प्रचंड चीड आहे तिला. 

'सॉरी टू से आशु, तुझी आजी अशी किती अजून जगणारे वाटतेय तुला? आणि चल आजी अजून 10 वर्षे किंवा त्याहूनही जास्त वर्षे राहिल्या तरी तू त्यांना काही दुःख सांगणार नाहीस. का तर त्यांना दुःख होईल. त्यांच्या आयुष्या बद्दल बोलतेय ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचे मरण वैगरे म्हणतेय. तरीही तुला स्वतःसाठी विचार नाही करावासा वाटत का? आणि तुझी अवस्था आगीतून फुफाट्यात झाली नाही म्हणजे मिळवलं.' काळजीने लावण्या बोलत होती. 

' जाऊदे गं. मोठ्या काकाने कुठले तरी स्थळ आणलंय. मला तर झटका लागला. हा कधी पासून माझी काळजी करायला लागला? छोटा काका असून नसल्या सारखाच आहे. राहिली गोष्ट आईची ,तिच्या फटकळ स्वभावामुळे कोणी घरी येत नाही. दादा मोठा असून काही मनातले सांगायचा कामाचा नाही. तो मोठा आहे म्हणून दादागिरी करतो ते वेगळे. आईला त्याची काळजी. म्हातारपणी सांभाळणार आहे म्हणून...." 

''तरीही तू विचार करावास. मुलगा पाहण्याचा कार्यक्रम कधी आहे? आणि श्यामल ला सांगितलेस का हे सगळे? नाहीतर भांडत बसेल. मला तुम्ही दोघी बाजूला करता. एकमेकींशी बोलत राहता. माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही आणि काय काय बोलेल बाई. आज बयेने दांडी मारली. चल तिच्या घरी जाऊ. भेटलेच घरी.'' बोलत दोघी श्यामल च्या घरी निघाल्या. 

श्यामलने सगळे ऐकून स्पष्टच प्रतिक्रिया दिली, ''हे बघ आश्वी, तू सगळ्यांसाठी करते ते ठीक पण ते सगळे तुझ्या घरचे तुझ्यावर अपेक्षा ठेवून आहेत कारण तू त्यांना संधी दिलीस. आत्ताच तू नाही म्हण नाहीतर लावण्या म्हणते तशी 'आगीतून फुफाट्यात' असे नको व्हायला. आम्ही दोघीही येऊ तुझ्या बघण्याच्या कार्यक्रमाला. काळजी नको करूस काही गोंधळ नाही घालणार. 

यथावकाश बघण्याचा कार्यक्रम उरकून आश्वी चे लग्नही झाले. नंतर 2 मुलांच्या संगोपनात गुंतून गेली. आधीच आलेले परावलंबित्व अजूनच बळकट झाले. 

एकदा ठरवून ही तिकडी भेटली 7-8 वर्षांनी. आपआपल्या मुलांना घेऊनच. श्यामल आता सौ. झाली होती तिलाही एक लहान मुलगी. लावण्या एकटीच लग्नाची राहिली होती. मुलांना दृष्टीस राहतील अशाप्रकारे खेळण्याच्या भागात सोडून सुरू झालेल्या गप्पांना उधाण आले नसते तर नवलच. त्यातल्या त्यात श्यामल आणि लावण्या अधून मधून भेटायच्या पण आश्वीची भेट म्हणजे अशक्यच. दोघीही तिची विचारपूस करू लागल्या होत्या.  

" ह्हम्मं! लग्न, संसार आणि तेच रांधा, वाढा अन् उष्टी काढा. नवर्‍याने कधी पन्नास रुपये सुद्धा हाती दिले नाही घरातील गरजेच्या गोष्टी आणायला. शंभर रुपये मागितले तर वीस रुपये देऊन वर हिशोब सुद्धा मागतो. का तर? मी घरातच असते मला कशाला हवेत पैसे. त्याने मला पोटुशी असताना एक समोसा खावसा वाटला गं, तेव्हा त्याने ऐपत असताना सुद्धा नाही घेतला. जीव नुसता तळमळत होता माझा. फक्त एक समोसा तर मागितला होता. नाहीच दिला आणून. खूप तळमळत होता जीव माझा पोटातल्या बाळासाठी. खूप वाटते की कुठेतरी जॉब करावा पण मुलं लहान आहेत अजून " इति आश्वी. 

ह्यावर श्यामल म्हणाली," अगं मग शोध ना एखादा छोटासा पगाराचा जॉब. कमी पैसे असतील पण येतील हाती. तुलाच खूप छान वाटेल. हो की नाही लावण्या?"

'"शंभर टक्के बरोबर बोललीस. तू खरंच छोटा मोठा का होईना जॉब करू लाग. घरी बसुन फुकट खातेय असाच बोलतोय ना तुझा नवरा? त्याला सुद्धा कळू दे तू काय आहेस ते. तोडून टाक व्याख्या एखाद्या स्त्रीने कोणावरही अवलंबून राहणे. तुही करू शकते. राहिला प्रश्न मुलं लहान आहेत चा, त्यांना आधीपासूनच बर्‍याच गोष्टींची सवय करून टाक. समजते आहे ना मला काय म्हणायचेय ते? " लावण्या अगदी डोळे रोखून बघत म्हणाली. 

"हं हो. पण बघ ना काकाने चौकशी न करता फसवून लग्न करून टाकले. नवऱ्याला दारू प्यायची सवय आहे. आयुष्यात कधीच दारू, अंडी न बघितलेल्या मला तर सहनच होत नाही ते सगळे वास. त्रास होतो पण जाणार कुठे ना? काकाने पोटची मुलगी असती तर असे केले असते का? बहुतेक केले असते आणि म्हणूनच देवाने त्याला दोन्ही मुलगेच दिलेत. पण, सगळ्या प्रथा, रुढी अन् परंपरा स्त्रीयांनाच का लागु होतात? त्याला पुरुष का अपवाद आहेत? का म्हणून प्रत्येक वेळी मुलींनीच परीक्षा द्यावी? स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे पण पुरुष एका स्त्री इतके कधीच करू शकत नाहीच. मुळातच स्त्री मल्टीटास्किंग असते. हो ना?" अगतिक होऊन आश्वी विचारत होती.  

थोडा वेळ आश्वी ला सावरण्यासाठी गेला तसा मुलांचा आवाज आला. आइस्क्रीम साठी गोंधळ सुरू होता. आधी सगळ्या पिल्लांना हवे ते घेऊन देऊन खेळायला पिटाळले. तोपर्यंत आश्वी बर्‍यापैकी सावरली. 

"हे बघ आशु ", असे म्हणताच आश्वी डोळे मोठे करून काय दाखवणार आहे करून भुवया उडवत बघू लागली, तशी तिच्या डोक्यात श्यामलने टपली मारली. 

'"अगं म्हणजे ऐक. तू असे का तसे का ह्याचा आता जास्त विचार करू नकोस. जे झाले ते झाले. शेवटी तू आगीतून फुफाट्यात पडली आहेस तर ह्यातून बाहेर पडायचा प्रयत्न कर. कोणीतरी देवदूत येईल माझी सुटका करेल वैगेरे अशी आशा करू नकोस. ती देवदूत तू स्वतः आहेस स्वतः साठी. तुला जमेल तो जॉब कर. नवर्‍याच्या नाकावर टिच्चून स्वतःला सिद्ध करून दाखव. आम्हाला सुद्धा अभिमान वाटेल असे काहीतरी कर जरा. मंद डोक्याची. हा हा हा"' वाकुल्या दाखवत चिडवणे सुरू केले होते लावण्याने. 

श्यामल आणि आश्वी दोघी मिळून लावण्याला मारू लागल्या . ह्यांची ही भेट आश्वी च्या मनामध्ये काहीतरी करायची उमेद निर्माण करून गेली. अशाप्रकारे एकमेकींना पुन्हा लवकरच भेटायचे सांगून आपल्या घरट्याकडे परतल्या. 

आश्वी ने घरी आल्यावर सगळी कामे उरकून माहिती शोधायला सुरू केली , असे प्रशिक्षण जे आवाक्यात आहे. लवकरच तिला मनासारखे सापडले. नशिबाने ह्यावेळी तिला साथ दिली. तिच्या सासऱ्यांनी तिला आर्थिक सहाय्य करून स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली. ह्या सगळ्याचा परिणाम ती आर्थिक रित्या स्वावलंबी झाली. तिच्यातला आत्मविश्वास जागा झाला त्याचाच परिणाम ती कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढून पुढे जायचेच ही जिद्द मनाशी ठेवून होती. काम छोटे मोठे कुठलेही असो आणि त्याचा येणारा मोबदला जास्त नसला तरीही स्वकष्टाने आलेला पैसा तिला आंतरिक अनुभुती देत होता. फक्त एका समोसा साठीच नाही तर कुठलाही पदार्थ खायची इच्छा झाल्यावर तिला आता ताटकळत राहावे लागत नव्हते. ती स्वतः एकटी जाऊन आवडणार्‍या पदार्थांचा आस्वाद घेत होती. पैशांसाठी तिला नवर्‍या पुढे हात पसरावे लागत नव्हते. तिचे परावलंबित्व संपून स्वावलंबी झाली होती. 

हाच बदल श्यामल आणि लग्न करून परदेशी स्थायिक झालेल्या लावण्याला प्रचंड सुखावून गेला. 

समाप्त.

©पुजा आडेप.

जिल्हा - पुणे.

वाचकहो तुम्हाला माझी ही लघुकथा कशी वाटली नक्की कमेन्ट मध्ये प्रतिक्रिया देऊन कळवा. लाईक करायला विसरू नका हं.