बीट रूट रायता

आरोग्यदायी रेसिपी

नमस्कार मैत्रिणींनो,

आज आपण पाहणार आहोत बीट रूट रायता. बीट रूट हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेमंद असते. शरीरात रक्त कमी असल्यास रक्त वाढवण्यासाठी बीटरूट खूपच फायदेमंद आहे. बीट रुटाचे सेवन केल्यास आपली पाचन क्रिया ही व्यवस्थित होते.तसेच रक्त शुद्धी साठी सुद्धा बीट रुट खूप उपयोगी आहे.

बरेच लोक बीटरूट खायचा कंटाळा करतात. म्हणूनच अशा लोकांसाठी आजची ही रेसिपी.अशा पद्धतीने जर तुम्ही आहारामध्ये बीट रूट समाविष्ट केले तर,लहान मुले तसेच मोठ्यांनाही बीटरूट खायचा कंटाळा येणार नाही. चला तर मग पाहूया आजची रेसिपी.

साहित्य:-

दोन मध्यम आकाराचे बीट, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पाने, तीन चमचे दही, ओल्या खोबऱ्याचे काप व सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती:-

प्रथम बीट स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर मोठ्या किसणीने किसून घ्यावे. दह्यामध्ये साखर घालून फेटून दही एकसारखे करून घ्यावे. मिरच्या ठेचून घ्याव्या.त्यानंतर बीट,हिरव्या मिरचीचा ठेचा, खोबऱ्याचे काप, मीठ घालून एकत्र करून घ्यावे.दोन चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मोहरी घालावी. मोहरी चांगली फुलू द्यावी. त्यानंतर जिरे घालून जिरे ही चांगले फुल द्यावे कढीपत्त्याची पाने घालून तयार फोडणी तयार मिश्रणावर घालावी वरतून कोथिंबीर घालून सजवावे.

धन्यवाद.