बेडी प्रेमाची की विश्वासाची? अंतिम भाग

कथा प्रेमात पडलेल्या एकीची
बेडी प्रेमाची की विश्वासाची? भाग ३


मागील भागात आपण पाहिले की अवनी सार्थकसाठी आपले घर सोडते. आता बघू पुढे काय होते ते..


" कुठे जायचे आता?" अवनीने विचारले.

" कुठे म्हणजे? माझ्या घरी." सार्थक बेफिकीर होता. तो तिला घेऊन त्याच्या घरी आला. त्याचे घर म्हणजे एक लहानशी खोली होती.

" घरात कोणीच नाही?" अवनीने प्रश्न विचारला. तेव्हा तिच्या लक्षात आले की याच्या घरची आपल्याला काहीच माहिती नाही.

" नाही.. आईबाबा गावाला असतात. मी एकटाच इथे राहतो."

" आपण लग्न कधी करायचे?" अवनीने आशेने विचारले.

" करू लवकरच.." सार्थक हसत बोलला. लग्न म्हणजे एक नाटकच होते. मंदिरात जाऊन घातलेले मंगळसूत्र ते ही खोटं. अवनीला नंतर एकेक गोष्ट समजत गेली. सार्थक काहीच कमवत नव्हता. त्याच्या स्वभावाला कंटाळून त्याच्या आईबाबांनी त्याला घराबाहेर काढले होते. इथेतिथे काहीतरी करून तो पोट भरत होता. कामधंदा करायचा कंटाळा. अवनीने नोकरी शोधायचा प्रयत्न केला. पण अपुऱ्या शिक्षणामुळे काहीच करता येत नव्हते. आईबाबांशी केलेले भांडण लक्षात होते त्यामुळे घरी परतही जाता येत नव्हते. हरल्यासारखे वाटत होते. त्यातच तिला दिवस गेले. तिने सार्थकला ही बातमी सांगितली. तिला वाटले कदाचित हे समजून तरी तो नीट वागेल. पण नाही तो बदलला नाही. उलट त्याने तिच्यावरच नको नको ते आळ घेतले. त्याला कंटाळून अवनीने जीव घ्यायचा निर्णय घेतला. ती नदीवर गेली. तिने देवाची प्रार्थना केली. आईबाबांची माफी मागितली आणि नदीत उडी मारली.


" अवनी......." बाबा जोरात ओरडले.

" बाबा, मी इथेच आहे. तुम्ही बरे आहात का?" अवनी विचारत होती. सतिशने इथेतिथे बघितले. समोरच सार्थक बसला होता. सतिशला काय खरे काय खोटे समजेना.

" बाबा, नका ना चिडू.. तुमचे बीपी वाढले की तुम्हाला चक्कर येते." अवनी रडत होती.

" हो, सतिश.. किती चिडचिड करशील?"
आई म्हणाली.

" तू घर सोडून गेली होतीस?" बाबांनी विचारले. अवनीने मान खाली घातली.

" ती बाहेर जाणार तोच तू चक्कर येऊन पडलास. तशीच आत आली ती." आई सांगत होती.

" बाबा, सॉरी ना." अवनी परत परत माफी मागत होती. बाबांचा राग आता बराच शांत झाला होता.

" सार्थक, इथे ये. माझी परवानगी आहे तुमच्या नात्याला. पण अवनीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काहीच नाही. चालेल का?" समोरून होकार आल्यावर सार्थक काहीच बोलू शकला नाही. अवनीचा आईबाबांवर असलेला विश्वास त्यामुळे अजूनच वाढला.

अवनी जसजशी सार्थकच्या सान्निध्यात येऊ लागली तसतसा तिला त्याचा स्वभाव समजू लागला. बाबांच्या सांगण्यावरून ती एकदा त्याच्या घरीही जाऊन आली. ते वातावरण बघून तिला कसंतरी झाले. तिचे अभ्यासावरून भरकटलेले मन परत तिथे वळू लागले. पदवी पूर्ण होताच तिला परदेशात पुढील शिक्षणासाठी जायची संधी मिळाली. सार्थक मात्र जिथे होता तिथेच राहिला. त्यांचे नाते कधी संपले हे तिलाच समजले नाही. परदेशातले शिक्षण पूर्ण करून आल्यावर येताच तिने बाबांचे पाय धरले.


" बाबा, खूप खूप थँक यू.."

" कशासाठी? तू जे मिळवलेस ते तुझ्या हुशारीने."

"मी याबद्दल नाही म्हणत.. माझ्या हातून सार्थकसोबत जी चूक होणार होती त्याबद्दल बोलत होते. मी तेव्हा त्या प्रेमाच्या धुंदीत घराबाहेर पडले असते तर माझे काय झाले असते देव जाणे. तुम्ही सांभाळून घेतले म्हणून मी आता इथे आहे."

बाबांनी तिला थोपटले.

" तेव्हा मी खरंच खूप चिडलो होतो. पण तेव्हा जाणीव झाली की तुझी ही प्रेमाची बेगडी बेडी तोडायची असेल तर माझ्या विश्वासाची भक्कम बेडी तुझ्या हातात घातली पाहिजे. पण त्याचा फायदा झाला बरे.."

वृंदाताई समाधानाने बापलेकीकडे बघत होत्या.



सध्या चालू असलेले श्रद्धा प्रकरण असो वा गुजरातच्या आयेशाचे.. खरेतर मुलगा असो वा मुलगी एक वय असते प्रेमात पडायचे. अशावेळेस त्यांना मानसिक आधार हवा असतो. तो जर त्यांच्या पालकांनी दिला तर अशा कितीतरी मुलींचे जीव वाचू शकतात. गरज आहे फक्त आपल्या मुलींशी मोकळेपणाने बोलायची. त्या जर कोणाच्या प्रेमात पडल्या असतील तर आकांडतांडव न करता परिस्थिती समजून घेण्याची. जर दोघांचे प्रेम खरे असेल तर नक्कीच मदत करा. नसेल तर आपल्याच पोटच्या गोळ्याला दलदलीत फसण्यापासून नक्कीच वाचवू शकतो. कारण आकर्षण हे कालांतराने नाहिसे होते. अर्थातच प्रत्येक गोष्ट ही सारखी नसतेच. हा होता माझ्याकडून अशा घटनेवर काढलेला उपाय. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all