मागील भागात आपण पाहिले की अवनीच्या आईबाबा तिला आणि सार्थकला एकत्र बघतात. आता बघू पुढे काय होते ते.
" काय चालू आहे हे अवनी? आपल्या घरात हे असं?" अवनीची आई वृंदा रागात होती.
" आई, समजून घे ना. मला तो आवडतो." अवनी धाडस करत बोलली.
" लाज नाही वाटत हे बोलायला? कॉलेजला हे धंदे करायला जातेस का? " तिचे बाबा, सतिश खूप चिडले होते.
" बाबा, असं नाही.. माझं खरंच प्रेम आहे याच्यावर." अवनी बाबा आणि सार्थक दोघांनाही घाबरत होती. तिला सार्थकला गमवायचे नव्हते.
" प्रेम म्हणे? कमवायची अक्कल नाही आणि प्रेम करते आहे. हे सगळं बंद करायचं आणि गुपचूप अभ्यासाला लागायचे."
" बाबा, मी नाही सोडू शकत याला. आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. मी कायद्याने सज्ञान आहे." अवनी बोलतच होती.
" मग असं असेल तर निघून जा माझ्या घरातून.. तोंडही दाखवू नकोस मला."
" सतिश, असं आतताईपणे वागू नकोस.. शांत हो. आपण समजावू तिला." वृंदाताई नवर्याला शांत करायचा प्रयत्न करत होत्या.
" मग तेच तर सांगतो आहे ना तिला. सगळं सोडून अभ्यासाकडे लक्ष दे."
" मी निघतो. तुमचं चालू दे." या सगळ्याशी काहीच संबंध नसल्यासारखे सार्थक बोलला. ते ऐकून तर अवनी जास्तच घाबरली. तिला तिच्या बाबांच्या रागाची भिती वाटू लागली.
" सार्थक, नको ना जाऊस. थांब ना."
" अवनी, आपल्या घरच्या गोष्टीत बाहेरच्यांना घेऊ नकोस." आई बोलली.
" आई, अग तो खूप जवळचा आहे."
" बघितलेस.. ऐकते आहे का? अवनी आत जा. मी याच्याशी बोलतो."
" बाबा.. नको ना. तुम्ही जर याला काही बोललात तर मला नाही चालणार."
"ए.. तू.. उद्यापासून अवनीच्या वाऱ्यालाही उभे रहायचे नाही. समजले?" बाबा सार्थकशी बोलले.
" बाबा.. प्लीज मला लग्न करायचे आहे त्याच्यासोबत."
" अवनी, आता काही बोलू नकोस." आई रागाने बोलली.
" अवनी निर्णय तुला घ्यायचा आहे. मी निघतो." सार्थक निघाला.
" नको ना जाऊस.." अवनी रडत होती.
" उद्यापासून हिचे सगळे लाड बंद. घरात राहिली ना तर अक्कल येईल." बाबा बोलतच होते.
" बाबा, असं नका ना करू.."
" हे बघ.. इथे रहायचे असेल तर माझ्या अटीवर रहायचे नाहीतर निघायचे."
" बाबा.."
" हो.. ही असली थेरं मला नाही चालणार."
" सतिश आता काही बोलू नकोस.. आणि अवनी तू पण शांत हो. ए मुला.. तू निघ आता, आपण नंतर बोलू."
" आई, आता काहीच बोलायचे नाही. मी घर सोडते आहे.."
" अवनी.."
" हो.. मी घर सोडते आहे. मी याच्याशी लग्न करून सुखी होऊन दाखवीन."
" अवनी.." आई ओरडली.
" जाऊ दे तिला. बाहेरचे जग समजले ना की आईबापाची किंमत समजेल." बाबा रागाने वेडेपिसे झाले होते. बाबांचा राग बघून अवनीने काहीच न बोलता घर सोडले. आधी रागाने वेडे झालेले बाबा आपल्या मुलीने खरंच घर सोडले हे दुःख सहन नाही करू शकले..
पुढचा भाग वाचायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा