Login

बेडी प्रेमाची की विश्वासाची?

कथा प्रेमात पडलेल्या एकीची


बेडी प्रेमाची की विश्वासाची?


" हाय बेबी.. ऐक ना.. आईबाबा आत्ताच बाहेर गेले आहेत. तास दोन तास तरी येणार नाहीत. भेटायचे का?" अवनीने सार्थकला विचारले.

" बाहेर कशाला? मी घरीच येतो ना तुझ्या."

" घरी नको. सोसायटीमध्ये तुला कोणी बघितले तर प्रॉब्लेम होईल."

" असं काय करतेस? बाहेर भेटायचे म्हटले तरी इथे नाही भेटायचे, तिथे नाही भेटायचे. मला समजत नाही तुला माझ्याशी रिलेशन ठेवायचे आहे की नाही." सार्थकचा आवाज थोडा चढला होता. तो ऐकून अवनी थोडी घाबरली.

" असं नाही रे. मला भिती वाटते आईबाबांची."

" मग नको राहूस माझ्यासोबत. मी पाठी लागलो काय तुझ्या? हे पण काय रिलेशन आहे का? हे नाही करायचे, ते नाही करायचे. सोडून दे. आपण ब्रेकअप करूयात." सार्थकने ठेवणीतले अस्त्र काढले.

" नको ना असं बोलूस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. ये तू घरी." अवनीने त्याच्यासमोर हार पत्करली.

" मी येतोच लगेच." सार्थकने विजयी वीराच्या आविर्भावात फोन ठेवला. आणि लवकरात लवकर अवनीच्या घरी जायला निघाला.

अवनी.. कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी. अतिशय हुशार आणि सुंदरही. मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून कॉलेजच्या कार्यक्रमात भाग घेतला. तिथेच तिची ओळख सार्थकशी झाली. तो कॉलेजचा माजी विद्यार्थी. जुन्या ओळखीवर तिथे आला होता. सतत गाड्या उडवत असायचा. नवीन कपडे घालून कॉलेजमध्ये फिरत असायचा. त्यासाठी कुठून पैसे आणायचा हे कोडेच होते. साधी भोळी अवनी त्याच्या रफटफ लुकवर भाळली. त्याने ही तिच्याभोवती आपले जाळे टाकले. अवनी त्याच्या प्रेमात वेडी झाली. दोघे कॉलेजमध्ये भेटायचे. हळूहळू सार्थकच्या तिच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या. मध्यमवर्गीय संस्कार असलेली अवनी मात्र अजून अशा गोष्टींना तयार नव्हती. त्यामुळे त्याची चिडचिड व्हायला लागली होती. अवनी मात्र तो हातातून जाऊ नये यासाठी धडपडत होती. त्याचवेळेस घरी काही समजू नये यासाठीही तिची धडपड सुरू होती. आता सार्थक घरी येणार म्हणजे तिला थोडं टेन्शन आलं होतं. आईबाबांना ही गोष्ट मान्य होणार नाही हे तिला माहीत होतं तरिही तारुण्यसुलभ भावना तिला खुणावत होत्या.

दरवाजाची बेल वाजली. अवनी दचकली. सार्थकच आला असेल. ती धडपडून उठली. दरवाजात खरंच सार्थक होता. आज तो भलताच खुश दिसत होता. त्याला आत घेऊन तिने पटकन दरवाजा लावला. तो काहीतरी चघळत होता. त्याने तिला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला.

" हे.. आज चान्स मिळालाच. " तो हसत म्हणाला. अवनी थोडी घाबरली. ती थोडीशी उत्सुकही होती.

" सार्थक नको ना.." तिने त्याला ढकलायचा लटका प्रयत्न केला. त्यातला विफलपणा जाणवून त्याने तिला अजून जवळ घेतले. तो तिच्या ओठांपाशी पोहोचणार तोच दरवाजा उघडला. दरवाजात अवनीचे आईबाबा होते. त्या दोघांना बघून अवनी घाबरली.

" आईबाबा तुम्ही? तुम्ही तर उशीरा येणार होता ना?"

" तुला मुद्दाम सांगितले होते. तुझे बदललेले वागणे जाणवत होतेच. खात्री करून घेण्यासाठी तसे सांगितले. आणि आता तर खात्री पटली.." बाबा खूप चिडले होते.



अवनीला एका मुलासोबत बघून काय करतील आईबाबा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all