बेडी परावलंबनाची...

अस्तित्वाच्या शोधत निघालेल्या तीची कथा
कथेेच नाव : बेडी परावलंबनाची
विषय : स्त्री आणि परावलंबित्व
फेरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

"सगळ्यांशी गप्पाटप्पा करायच्या सोडून काय लिहितेस गं एवढं,  कसली आकडेमोड चालू आहे ?" चार दिवसांसाठी माहेरी आलेल्या आपल्या, बहिणीचं सुलेखाचं वागणं सीमाला चांगलेच खटकले म्हणून तीने जरा तीला जरा रागातच विचारले.

"हिशोब लिहून ठेवते आहे " शांतपणे सुलेखा उत्तरली.

"घरी गेल्यावर लिहीला तर चालणार नाही का ? मी नाही कधी हिशोब लिहायच्या भानगडीत पडत, मुलांना सुट्टया आहेत, बाहेर जाणं येणं होतयं, पैसे खर्च होणारच ना !! जे राहतात ते आपले."

"झालं ग, आले पाच मिनिटांतच, तू हो पुढे" म्हणत सुलेखा परत विचारत गढली.

आपल्या बहिणीला आता आपल्याशी बोलायचे नाही हे लक्षात येताच सीमा बाहेर आली.

आधीच हिशोब लागत नव्हता त्यात बहिणीची बडबड, सुलेखाचे डोके भणभणू लागले. मानत विचारचक्र सुरु झाले.

हिला काय जातं बोलायला, नोकरी करत असलेल्यांचं बरं असतं, स्वतःच्या हातात पैसा खुळखुळतो, हवा तेव्हा हवा तसा खर्च करता येतो. पण माझं असं थोडी आहे ? नवरा देईल ते पैसे गपगुमान घ्यावे लागतात, पै न पै चा हिशोब दयावा लागतो. काही कमी जास्त झाल तर कमवायची अक्कल नाही, वेंधळी, बेजबाबदार असं ऐकून घ्यावं लागत त्यापेक्षा रोज टिपून ठेवलेलं बरं, म्हणत परत लिहीत बसली.

खर तर शेंडेफळ असलेली सुलेखा तिन्ही भावंडात हुशार, शिकलेली, लग्नाआधी काय लग्नानंतरही बरेच महिने नोकरी करत होती, मग अताच अस काय झालं ? गोंधळल्यासारखी वागत असते, छोट्या छोट्या गोष्टी करताना डळमळते, कुठे गेला तीचा आत्मविश्वास ? या विचाराने सीमा अस्वस्थ होत होती. कोणी काही बोलतं नसल तरी सगळ्यांना सुलेखातला हा बदल नेहमीच लक्षात येत होता, प्रकर्षाने जाणवत होता, पण कधी कारणा निमित्ताने घाईगडबडीत भेट व्हायची तर कधी दोघींचे नवरे सोबत, त्यांच्यासमोर विषय काढणं प्रशस्त वाटायचं नाही आणि बोलणं राहून जायचं. पण ह्यावेळेस सगळं जुळून आलं होत म्हणूनच सीमाने वेळ न दवडता तिच्याशी बोलायचे ठरवले.

पण म्हणावी तशी संधी मिळत नव्हती, माहेरी आलेल्या लेकिंना सारखं कोणीतरी भेटायला येत होतं अथवा त्यांच बाहेर जाण होत होतं. आणि म्हणूनच सीमाने आज आईने स्वयंपाक घरात फिरकायच नाही, आम्ही दोघी मिळून करू स्वयंपाक, आजीआजोबांनी सगळ्या नातवंडांना बागेत फिरायला घेवून जायचं, आईस्क्रीम खावून यायचं अशी टुम काढली. बच्चे कंपनीला कल्पना फारच आवडली व सगळी मंडळी उत्साहात फिरायला गेली.

जास्त वेळ न दवडता, कामं हातावेगळी करता करता सीमा सुलेखाशी बोलू लागली. तस ताई आपल्याला काहीतरी विचारणार अशी कुणकुण सुलेखाला लागली होतीचं म्हणा.

आपलेच दात आणि आपलेच ओठ काय सांगणार ताईला, सुलेखा शब्दांची जुळवाजुळव करत बोलली, "अग मी तुझ्यासारखी नोकरी करत नाही"...

"ते मी समजू शकते सुलू, आर्थिकदृष्ट्या ठीक आहे, पण हल्ली छोटयात छोट्या गोष्टींसाठी तू कोणावर तरी अवलंबून राहू लागली आहेस, कालचीच गोष्ट घे ना, साधा रस्ता क्रॉस करता येईना तुला, मी तुझा हात धरल्यावर धीर आला तुला. खरेदीच्या बाबतीत पण तसंच, एकमेकांची आवड जपावी ग, पण आपल्या जोडीदाराची आवड जपताना आपल्याला काय आवडतंय ह्याचा विसर पडू नये आणि एखादी गोष्ट घेतली आपल्या आवडीची तर बिघडलं कुठे...साधा ड्रेस घेताना ह्यांना आवडेल ना ? इतका डार्क रंग घेतला तर काही बोलणार नाहीत ना ? किती प्रश्न पडले तुला, किती वेळा ते हो नाही...मागेपुढे होणं. शेवटी आईला नाईलाजाने म्हणावं लागलं, मी आपली पैसे देते, तू घे नंतर तुझ्या नवऱ्याबरोबर जाऊन, त्याच्या पसंतीने."

"तुला ह्यांचा स्वभाव ठाउक आहे ना ! ताई, मी पूर्वी काही खरेदी केली की, हे लगेच बोलायचे, तुला काही कळत नाही, काडीची अक्कल नाही, किती महाग पडली वस्तू क्वालिटीच्या मनाने, बघ एका धुण्यात रंग गेला...सारखं घालून पाडून बोलणं, सगळ्यांसमोर उद्धार करण, मग सोडूनच दिलं, एकटीने काही करायचं, म्हणून साधं महिन्याचं सामान भरायला डीमार्टला पण नवऱ्याबरोबरच जाते, नको उगाचंच डोक्याला ताप."

"स्वयंपाकाच्या बाबतीत पण हेच करते, प्रचंड नखरे ग ह्या माणसाचे हीच भाजी का केली ? अशीच का केली ? एक ना दोन... म्हणून हल्ली सगळं सासूबाईंना विचारून करते, चिडचिड केली तर सरळ सांगते, तुमच्या आईला विचारा, त्यांनी सांगितलं म्हणून केलं."

"फार वर्षापूर्वी एटीएम मधून पैसे काढायला गेले असता, कसं काय जाणे पण कार्ड अडकलं, ह्यांना बँकेशी पत्रव्यवहार करावा लागला, सगळे सोपस्कार करावे लागले, मग तेव्हा पासून सुरू झालं, जमेल ना तुला ? नसेल जमत तर सरळ नाही म्हणं, पण माझं काम वाढवू नको."

"खूप हौशीने करायचे मी सगळ, पण कसही वागलं तरी ह्यांना पटणार नाही लक्षात येऊ लागल मग ठरवलं नुसतं हो ला हो करायचं, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, आपण नुसतं मम म्हणायच".

"पण ह्याने काय साध्य झालं ? काहीच नाही. उलट तुझा आत्मविश्वास कमी झाला, अवलंबून रहाणं जास्तच वाढलं, बावळटपणाच लेबल लागलं." सीमा म्हणाली.

हल्ली मुलेपण आईला काय विचारायचं बाबा घरी आले की त्यानांच विचारू असे म्हणू लागली होती. मुलांची काहीच चूक नव्हती, कारण आईच म्हणायची, बाबांना विचारून करू किंवा मला नाही बाई काही कळत, तुम्हाला योग्य वाटेल ते करा असे संवाद मुलांसमोर सतत बोलले जायचे, मुलं अनुकरण प्रिय असतात, जे बघतात, ऐकतात त्याचप्रमाणे वागतात, सुलेखाला सगळे आठवू लागले, नकळतच डोळे पाझरू लागले.

तीला असं रडताना पाहून सीमा म्हणाली, "तुला दुखवायचा हेतू नव्हता, त्रास होतो ग तुला असं पाहून, तू यातून बाहेर पडावीस असं मनापासून वाटतं."

ह्यातून बाहेर पड म्हणजे म्हणायचं तरी काय आहे ताईला ? संसार मोडू माझा ? कसं शक्य आहे ते...इतक्या वर्षांचा संसार...कसा ही असला तरी नवरा आहे माझा तो, त्याला सोडू, लाख दोष असतील पण म्हणून गुण नाकारता येत नाहीत ना ? माझ्यावर, मुलांवर प्रेम आहे त्यांचं.

सुलेखाला गप्प झालेली पाहून, तिच्या डोळ्यातील पाणी पाहून सीमाला वाटले उगाचच विषय काढला. आधीच आपली बहीण टेन्शनमध्ये असते, अजून तिच्या विवंचनेत भर घातली या विचाराने तिला हळहळ वाटू लागली. तशी बाहेर गेलेली मंडळी पण यायची वेळ झाली होतीच म्हणून मग तिने विषय आवरता घेतला.

बहिणीशी बोलणं झाल्यापासून मुळातच शांत असलेली सुलेखा अजूनच गप्पगप्प राहू लागली, सीमाताईच म्हणणं पटत होत, पण कुठून, कशी सुरुवात करावी हे उमगतं नव्हत. सगळं काही कळत होत, पण वळतं नव्हत अशी तिची अवस्था झाली होती.

नवऱ्याने आपल्यावर परावलंबित्व लादलं हे जरी खरं असलं, तरी ते आपणही ते हसत हसत स्वीकारलं, कधी बंड करायचा प्रयत्न केलाच नाही, हे तिला उमगू लागल.  सुरवातीला हे गुंतवणुकीबाबत, भविष्याच्या तरतुदीबद्दल सांगायचे, विचारायचे...पण त्यावेळी आपण अखंड कामात, मुलांच्या संगोपनात, मग वैतागत म्हणायचो तुम्हाला योग्य वाटेल ते करा, मग हळूहळू त्यांनी हिला काय कळतयं ? म्हणत सोडूनच दिले सांगणे. म्हणजे कुठेतरी नवऱ्याच्या या वागण्याला मीच खतपाणी घातले हे पटू लागले. आता पुढे काय ? ह्या विचारात असलेल्या सुलेखाची तंद्री नवऱ्याचा फोन आल्याने भंग पावली.

"मला यायला जमणार नाही, सुट्टी मिळत नाही,  रिझर्व्हेशन कॅन्सल करू का ?" समोरून अहो विचारत होते तीला.

खरं तरं अजून काही दिवस माहेरी रहा अस नवरा स्वतःहून म्हणतोय म्हंटल्यावर ती मनोमन सुखावली खरी, पण दुसऱ्याच क्षणी "नको मी येईन एकटी मुलांना घेवून म्हणाली."

तिच्याकडून हे उत्तर अपेक्षित नसलेला तो ही आश्चर्यचकित झाला, "पण माझं येणं वाचलं, काळजी घे, नीट ये, ओके म्हणत त्याने फोन ठेवला."

त्याने फोन ठेवल्यानंतर आपण इतकं ठामपणे कसं बोललो या विचाराने तीही अचंबित झाली खरी, पण यापुढे छोट्या छोट्या बाबतीत कोणावर अवलंबून नाही राहणार, स्वतःचे निर्णय स्वतःच घेणार म्हणत बॅगा भरायला लागली.

लेक, नातवंडं काही दिवस अजून राहिलेली सगळ्यांनाच आवडलं असतं, पण आता तीला नाही म्हटलं तर ती बिथरेल म्हणत प्रत्येकानी तिच्या निर्णयाचं, स्वागतच केलं.

तीला जवळ घेत, पूर्वीची सुलेखा परत मिळाली म्हणत सीमाने कडाकडा बोट मोडली, शितिजाला गवसणी घालत, नव्या उमेदीने आपल्या अस्तित्वाच्या शोधात सासरी निघालेल्या तिची हसतमुखाने पाठवणी केली.

आईवडिलांचा आशीर्वाद घेत, बहिणीला कडकडून मिठी मारत, मुल अजून थोडी मोठी, सुटसुटीत झाल्यावर नक्की नोकरीचं बघेन, आर्थिकदृष्टया सुद्धा स्वावलंबी व्ह्ययचा प्रयत्न करेन असं आश्वासन देत परावलंबनाची बेडी झिडकारत सुलेखा परतीच्या प्रवासाला सज्ज झाली.

समाप्त.

©️®️मृणाल महेश शिंपी.
02.08.2022

जिल्हा : ठाणे‌ विभाग.