संस्कार सौंदर्य

Importance Of The Sacrament
संस्कार सौंदर्य!!

शीर्षक-मना घडवी संस्कार!

जीवन रुपी सतत खळखळ वाहणाऱ्या नदीच्या पात्राला दिशा देण्याचा सामर्थ्य संस्कारात असतं.
संस्कारातूनच सुसंस्कृत माणसं जन्माला येतात, वाढतात. आपलं कर्तव्य कर्म पूर्ण करून आपली जीवन यात्रा संपवितात. मात्र त्यांनी केलेले, आचरणात आणलेले संस्कार मात्र त्रिकाल बाधित असतात. ते कधीच नष्ट होऊ शकत नाहीत. त्यावर कितीही वादळ आलीत, संकट आलीत तरी व्यक्तींवर असलेले चांगले संस्कार डळमळूशकत नाहीत. ते कधीच वाया जात नाहीत.

चांगल्या संस्कारांचं आदान प्रदान लहानपणापासूनच मनावर झाल्यामुळे ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरत जातात. आणि सुसंस्कृत समाज निर्माण होतो.
असा सुसंस्कृत समाज निर्माण होणे ही सध्या काळाची खूप मोठी गरज आहे.

एका कंपनीत नोकर भरतीसाठी उमेदवार आलेले होते. कंपनीने प्रवेशद्वारापासूनच सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते.
एका उमेदवाराने प्रवेशद्वारावर अस्ताव्यस्त ठेवलेली पायपुसणी नीटनेटकी करून ठेवली.नंतरच कंपनीच्या आतपाय ठेवला. त्याच निकषावर उमेदवाराची निवड झाली.
कंपनीतील मुलाखत घेणाऱ्यांनी सांगितले की आम्ही मुद्दामच तीअस्ताव्यस्त ठेवलेली होती.
जो बारकाईने निरीक्षण करून आपलं काम नीटनेटकं करतो, तोच यशस्वी होतो.

अशा सूक्ष्म गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं हा सुद्धा एक संस्कार आहे.

आपल्या वाट्याला येणारे आई-वडील, शिक्षक, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे संस्कार घडत असतात. त्यातून मानवी मन तयार होतं.

आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्यातून चांगलं किंवा वाईट कोणतं वेचायचं हे आपण आपल्या संस्कार प्रेरणेने ठरवत असतो.
लहान मुलांवर सुसंस्कार होणे अतिशय आवश्यक आहे. कारण तेच उद्याच्या देशाचं भविष्य असतं.
त्यासाठी पालकांनी पाल्यांच्या बाबतीत सजग राहणं अपेक्षित आहे.
मुलांना, तू कोण होणार? असं कधीच विचारू नये. जे त्यांना करता येईल ते करू द्यावे. फक्त तो आपले तत्व सोडणार नाही, सत्व विकणार नाही, असे संस्कार मात्र जरूर करावेत. मुलांना स्वतःचे पंख असतात. त्यांना स्वतःचं असं आकाश असतं. त्यात त्यांना स्वतंत्र विहरू द्यावं. त्यामुळे त्यांच्या त आत्मविश्वास येतो. जबाबदारीने वागण्याची हिंमत येते. मन तकलादू होत नाही.

ज्याप्रमाणे मातीला आकार देताना कुंभार एकचित्त असतो. त्याचंसंपूर्ण लक्ष त्या मातीच्या गोळ्यावर असतं, त्याप्रमाणे शिक्षकांनी सुद्धा बालकांवर मूल्यांची रुजवण करत त्यांना व्यवहारिक जगात उडण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याचं महत्त्वाचं कार्य करणं गरजेचं असतं.

व्यक्तीचा स्वतःचा खरा विवेक जागा होणं, हिंसा, क्रौर्य, घात यांना स्वतःच्या जीवनापासून दूर ठेवून स्वतःच्या मनात सेवाभाव, इतरांविषयी प्रेम जागृत करणे, अशा सर्व बाबी व्यक्तींच्या संस्कारातूनच घडत जातात.

संस्काराने मनाच्या आणि शरीराच्या शक्ती जागृत होतात.
उजव्या हाताने आपण लिहू शकतो कारण त्यावर लिहिण्याचा संस्कार झालेला असतो. डाव्या हातावर जर तसाच संस्कार झाला तर तोही लिहिता होऊ शकेल! नाही का!
83 टक्के ज्ञान आपल्याला डोळ्यांनी मिळते. ते ज्ञान कशाप्रकारे आणि कशा प्रकारचं असावं हे बालपणातच संस्काराने सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
सातत्याने मनावर होणाऱ्या संस्काराचं तेज काही वेगळंच असतं.

आजचं जग संपूर्ण भौतिक सुविधांनी संपन्न आहे. परंतु दुर्दैवाने मनावर संस्कार करण्याची सुविधा मात्र सापडत नाही हीच मोठी शोकांतिका आहे!!!!


छाया राऊत