सुंदर नातं भाग ८

Story of beautiful relationship

मागील भागात बघितल्याप्रमाणे, रोहित व निशाचे लग्न घरच्यांच्या संमतीने ठरते. रोहित व निशा दोघे सोबतच पुण्याला येतात.निकिता व राहुलला surprise देण्याचा प्लॅन करतात .

आता दररोज निशाच्या दिवसाची सुरुवात रोहितच्या Good Morning ने तर रात्र Good Night ने व्हायची. निशा व रोहित मधले प्रेम हळूहळू फुलू लागले होते. दोघे तासंतास एकमेकांशी फोनवर बोलायचे. दोघांमध्ये खूप छान मैत्रीही झाली होती. निशा रोहितच्या आई बाबांना फोन करून चौकशी करायची तर इकडे रोहित निशाच्या घरी फोन करून चौकशी करायचा. दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली असते. लग्नाची बातमी राहुल व निकिता पासून लपवून ठेवणे निशाला व रोहितला खूप कठीण जात होते. येत्या रविवारी निशा व रोहित राहुल व निकिताला लग्नाची बातमी देणार होते.

अखेर रविवार चा दिवस उजाडला, आधीच ठरविल्याप्रमाणे निशाने निकिताला फोन करुन कॉफी शॉपमध्ये येण्यास सांगितले तर दुसरीकडे रोहितने राहुलला फोन करून कॉफी शॉपमध्ये भेटायला सांगितले. हे तेच कॉफी शॉप होते जिथे निशा व रोहितची पहिली भेट झाली होती. ठरल्याप्रमाणे राहुल कॉफी शॉपमध्ये पोहचला तर बघतो रोहित अजून आलेलाच नसतो. राहुल रोहितची वाट बघत एका टेबल जवळ जाऊन बसतो. रविवार असल्याने कॉफी शॉपमध्ये बरीच गर्दी असते. तेवढ्यात निकिता कॉफी शॉपमध्ये पोहचते.

राहुल--- हाय निकिता, तु इकडे कशी काय?

निकिता--- हाय राहुल, निशाने भेटायला बोलावलं आहे, तिला काही तरी सांगायचे आहे. तु कुणाला भेटायला आला आहेस?

राहुल--- रोहित येणार आहे. तु उभी का बस ना खुर्चीवर, तसाही दुसरा टेबल रिकामा नाहीये.

थोड्याच वेळात रोहित तिथे पोहोचतो. 

रोहित--- हाय राहुल, सॉरी यार थोडी ट्रॅफिक लागली. निकिता तु इकडे काय करत आहेस.

निकिता--- निशाला भेटायला आली आहे. बघ ना किती वेळ झाला तरी बाईसाहेब येत नाहीयेत.

तितक्यात निशा तिथे येते.

निशा--- सॉरी निकिता, अगं रिक्षाच लवकर भेटली नाही. राहुल, रोहित तुम्ही काय नेहमी इथेच असतात का?

निकिता--- योगायोग म्हणावा लागेल. पण आपल्याला एकच टेबल शेअर करावा लागेल. गर्दी बघ किती आहे, मी बोलली होती तुला दुसरीकडे जाऊ पण आपण तर माझं काही ऐकायलाच तयार नव्हत्या. 

निशा--- टेबल शेअर करायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. चल काही तरी ऑर्डर करुया. आजची ट्रिट माझ्याकडून.

निकिता--- अरे वा, मॅडम खूपच खुश दिसतायेत.

राहुल --- ट्रिट फक्त निकितालाच की आम्हाला पण.

निशा--- हो तुम्हाला पण, जे मागवाचय ते मागवा, बिलाची चिंता करु नका.

राहुल--- ट्रिट द्यायचे कारण समजेल का?

निकिता--- ते पण सांग आणि मला सांग तु मला इथे भेटायला का बोलावले?

निशा--- हो सांगते. Finally its happened निकिता.

 राहुल--- नोकरीत प्रमोशन भेटले वाटतं

निकिता--- राहुल तु गप रे, तीच बोलणं तर पूर्ण होऊ दे. निशा तसा मला तुझ्या चेहऱ्यावरुन अंदाज येतोय. पण न लांबवता सांग पटकन.

निशा--- निकिता माझं लग्न ठरलयं. अखेर मला माझ्या स्वप्नातला राजकुमार भेटला. निकिता लगेच उठून निशाला मिठी मारते. राहुल व रोहित त्यांच्या कडे बघतच राहतात.

निकिता--- अभिनंदन निशा, who is the lucky guy? कधी जमलं, फोनवर का नाही सांगितले, फोटो तरी दाखवना.

निशा--- अगं किती प्रश्न विचारशील, फोनवर नाही सांगितलं कारण मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. फोटो च काय घेऊन बसलीस प्रत्यक्षातच भेटवते.

निकिता--- काय, जिजू इथे येणार आहे. I am very happy for you.

निशा--- हो येणार आहे, साखरपुड्याची खरेदी करायची आहे.

राहुल--- अभिनंदन निशा. रोहित साहेब आपला कांदेपोहे कार्यक्रम कसा झाला? पुढे काय झाले?

निकिता--- अरे वा. रोहित पण लग्नाच्या शर्यतीत आहे वाटतं

रोहित--- राहुल तेच तर सांगायला बोलावलंय तुला. निकिता लग्नाच्या शर्यतीत होतो अस म्हणावे लागेल. कारण मला माझी राजकुमारी भेटली आहे. माझंही लग्न जमले आहे.

राहुल खुर्चीतून उठून मिठी मारतो.

राहुल--- अभिनंदन भावा, लग्नाचा गड जिंकलास. आमच्या वहिनी साहेबांचा परिचय कधी करून देताय. कमीत कमी फोटो तर दाखव.

रोहित--- हो फोटो दाखवतो व ओळखही करुन देईल.

निकिता--- अभिनंदन रोहित.आता तर डबल ट्रिट झाली पाहिजे.

रोहित खिशातून मोबाईल काढतो, कॅमेरा चालू करतो, त्याच्या समोरच्याच खुर्चीवर निशा बसलेली असते,रोहित फोन निशासमोर धरतो आणि राहुलला फोन मध्ये बघायला सांगतो.

राहुल--- अरे रोहित मी तुला वाहिनीचा फोटो दाखवायला सांगितला आणि तू तर कॅमेरा चालू करून त्यात निशाचा फोटो दाखवतोय.

रोहित--- राहुल निशाच तुझी होणारी वहिनी आहे.

रोहित अतिशय शांततेत सांगतो. निशाला वगळता दोघांपैकी कुणालाच रोहितचे बोलणे पटकन कळत नाही.

निकिता--- काय म्हणालास रोहित? निशा हीच राहुलची वहिनी म्हणजे तुमच्या दोघांचं एकमेकांशी लग्न जमलंय.

निशा--- हो निकिता, तु बरोबर ऐकलय, रोहित हाच माझा होणारा नवरा आहे.

राहुल व निकिता या दोघांनाही जबरदस्त सुखद धक्का बसतो.

राहुल--- अरेपण हे सगळं कसं झालं? मला तर काहीच समजत नाहीये.

रोहित--- ह्या सगळ्याच श्रेय तुम्हा दोघांना जातं

निकिता--- आम्ही काय केलंय?

निशा--- तुमच्या दोघांमुळेच आमची पहिली भेट कॉफी शॉपमध्ये झाली. नंतर योगायोगाने आमची भेट बसमध्ये झाली, आमच्यात खूप छान गप्पा झाल्या. आणि त्या नंतरचा सुंदर योगायोग म्हणजे मला बघायला आलेला मुलगा हा रोहितच होता.

रोहित--- आमची पहिली भेट झाली असल्याने आम्हाला निर्णय घ्यायला सोपे झाले. हे सगळं याच कॉफी शॉपमुळे झालं.

निशा--- म्हणूनच मी आणि रोहितने ठरवूनच तुम्हाला दोघांना इथे बोलावलं. आम्हाला दोघांनाही लग्नाची बातमी तुमच्या पासून लपवायला खूप जड जात होते. पण काय करणारं मला तुम्हाला surprise द्यायचे होते.

निकिता--- आपण किती सारख्या आहोत ना. तिकडे तु मला surprise द्यायचा प्लॅन करत होती आणि इकडे मी तुला surprise द्यायचा प्लॅन करत होती.

निकिता निशाला कोणते surprise देणार असते बघूया पुढील भागात

Copyright © Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all