सुंदर नातं भाग ७

Story of beautiful relationship

आपण मागील भागात बघितलंय, निशा व रोहित एकमेकांची पसंती घरच्यांना सांगतात. रोहित व निशाच्या घरच्यांची लग्नाला संमती असते.

निशाचे काका--- आम्हाला आमच्या निशासाठी रोहित पसंत आहे. मला खात्री आहे की रोहित निशाला सुखात ठेवेल. दोघेही एकमेकांना साजेसे आहेत. आता आपण मानपानाचं आणि देण्या- घेण्याबद्दल बोलून घेऊया.तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या मनमोकळेपणाने सांगा.

रोहितचे बाबा---- मानपानाबद्दल, देण्या- घेण्याबद्दल बोलून आम्हाला लाजवत आहात का, तुम्ही तुमची लाडाकोडात वाढवलेली, गुणी मुलगी आमच्या मुलाला देत आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे. कन्यादान करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये.अजून एक गोष्ट, साखरपुडा व लग्नासाठी लागणारा सर्व खर्च आपण मिळून करायचा आहे. निशा इतके दिवस फक्त तुमची जबाबदारी होती, आता इथून पुढे ती आमची पण जबाबदारी आहे.तेव्हा तुम्ही लग्नाच्या खर्चाचे दडपण घेऊ नका. निशाच्या आईच्या डोळ्यात पाणी येते.

निशाची आई---- मी व माझ्या मुलीने नक्कीच मागच्या जन्मात काही तरी पुण्य केलेले असेल, म्हणूनच ह्या जन्मात माझ्या मुलीसाठी तुमच्या सारखे समजदार सासर भेटले. जगात जर प्रत्येक मुलाच्या वडिलांनी तुमच्या सारखा विचार केला तर कुठल्याही मुलीच्या वडिलांना त्यांची मुलगी ओझं नाही वाटणार.

रोहितची आई--- निशाच्या आई तुम्ही काहीच काळजी करु नका. निशा जरी ह्या घरात सून म्हणून येईल पण ती कायम मुलगी म्हणूनच राहील.रोहित व निशाच्या साखरपुड्याची तारीख ठरवतात, साखरपुड्यासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी रोहित व निशाने सोबत पुण्यात करण्यात यावी असे ठरते.लग्नाची सर्व बोलणी झाल्यावर निशा व तिच्या घरचे रोहितच्या आई बाबांचा निरोप घेतात.दोघांच्याही घरचे खूप आनंदी असतात. निशा व रोहितला तर हे सगळं स्वप्नवतच वाटत असते.

"स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंग रंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो का मला? "

रोहित व निशाची सुट्टी संपल्याने दोघांनाही पुण्याला परत जावे लागणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसतो. यावेळी रोहित व निशाने आधीपासूनच एकत्र पुण्याला जायचे ठरवलेले असते.सिन्नर केव्हा येईल असे रोहितला झाले होते. थोड्याच वेळात बस सिन्नर बस स्थानकावर येऊन थांबते. निशा बसमध्ये चढते आणि रोहित जवळ येऊन बसते.रोहित निशाला त्याने आणलेली कॅडबरी देतो. निशाच्या चेहऱ्यावर गोड smile येतं, कारण रोहितने तीची आवडती कॅडबरी आणलेली असते. निशा कॅडबरी घेते आणि तिचा एक फोटो काढते नंतर अर्धी कॅडबरी रोहितला देते व अर्धी ती खाते. रोहित--- कॅडबरी तर मी तुझ्यासाठी आणली होती, मला का देतेस?

निशा---- share केल्याने प्रेम वाढतं. 

रोहित--- तू कॅडबरीचा फोटो का काढलास?

निशा--- तू दिलेली पहिली कॅडबरी आहे ही, मला आठवणी जपून ठेवायला खूप आवडतात. मला आपला प्रत्येक क्षण जपून ठेवायचा आहे.

रोहित--- मला कधीच वाटले नव्हते की मी कुणाची तरी एवढी वाट पाहीन.

निशा--- आपल्या माणसाच्या भेटीची ओढ लागणे यालाच प्रेम म्हणत असतील.

रोहित---सगळं किती पटकन बदलत ना, आता आपलंच बघ ना मागच्या बस प्रवासात आपण अनोळखी होतो, आपल्यात कुठलेचं नातं नव्हते, आणि आता मात्र आपल्यात खास असे नाते निर्माण झाले आहे.

निशा---- हो ना, पण आपल्यात जे नातं निर्माण झाले आहे त्याचे श्रेय राहुल व निकितालाही द्यावे लागेल ना. त्या दोघांनाही आपल्या लग्नाची गुड न्यूज द्यायची राहून गेली आहे.

रोहित--- हो ना, सगळं एवढ्या घाईत झालंय की त्यांना सांगायचं राहूनचं गेले. कधी सांगायचं? पार्टी पण द्यावी लागेल. 

निशा---- आपण दोघांना छानपैकी surprise देऊया, तोपर्यंत राहुलला काहीच सांगू नकोस.

रोहित---- हो मस्तपैकी प्लॅन करूया, दोघांनाही सुखद धक्का बसेल, शेवटी जे काही झाले आहे त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.

अशाच रीतीने रोहित व निशाच्या पूर्ण प्रवासात गप्पा सुरू राहतात. त्यांना आता आयुष्याचा प्रवासही सोबतच करायचा असतो.राहुल व निकिताला surprise देण्यासाठी छान प्लॅन तयार केला.

निशा व रोहितच्या लग्नाची बातमी कळल्यावर राहुल व निकिताची काय प्रतिक्रिया असेल बघूया पुढच्या भागात.

©® Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all