मुक्त हो...!

स्वभावाने तू नेहमीच चिडखोर होतास. पण मुलांशी नेहमी प्रेमानं वागायचास. माझ्याशी कसाही वागलास, ?

अहो,

      प्रिय नाही म्हणू वाटत. कधी वाटलाच नाहीस. आदरही नाही वाटला कधी. जो वाटला तो फक्त भीतीयुक्त आदर.
आज दोन महिने झाले तुला जाऊन. अजूनही सावरले नाहीये! अजूनही सतत तू आजूबाजूला असल्यासारखं वाटतं. घरात तुझा वावर असल्यासारखं वाटतं.

        स्वभावाने तू नेहमीच चिडखोर होतास. पण मुलांशी नेहमी प्रेमानं वागायचास. माझ्याशी कसाही वागलास, तरी आमचा आधार होतास रे! तुला जेव्हा कॅन्सरचं निदान झालं ना! तेव्हा तर पार खचूनच गेले होते! पण मुलांकडे पाहून तुझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. कारण तू असलास ना! तरी मला दहा हत्तीचं बळ पाठीशी असल्यासारखं वाटायचं.

        तुला शिकता नाही आलं, म्हणून मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी धडपडत होतास. मग का रे असा अर्ध्यावर डाव सोडून गेलास? ते गाणं सारखं वाजतंय कानात,

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी |
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी |

        माझी कहाणी तर पूर्ण नाही होऊ शकली. पण माझी अधुरी स्वप्नं मुलांच्या रूपानं मी नक्की पूर्ण करेन. मुलांना चांगलं आणि उच्च शिक्षण मिळावं हि तुझी इच्छा, नक्कीच पूर्ण करेन.

        कमी वयात कंपनीची नोकरी धरलीस. राबराब राबलास. रात्री दमून घरी यायचास. कदाचित कामामुळे किंवा गावाकडच्या जमिनीच्या वाटणीच्या वादामुळे म्हणा! तू नेहमी चिडलेलाच असायचास. त्यामुळे तुझ्यासमोर मी नेहमी शांत राहिले. तुझ्यासाठी, घरासाठी माझ्यापरीने जे जे शक्य होतं, ते करत राहिले. कारण तुझं कष्ट पाहत होते मी. मुलं झाल्यावर तरी तुझ्या स्वभावात बदल होईल असं वाटलं होतं. वर्षांमागून वर्षे उलटली. पण, तू कधीच बदललाच नाहीस.

        तू मला किती त्रास दिलास किंवा तुझ्यामुळे किती त्रास झाला? हे मला उगाच कुणापुढे नाही उगाळत बसायचं! पण हां! हे सर्व तुला कळायला हवं, असं वाटायचं रे! कधी प्रेमानं वागला नाहीस. बोलला नाहीस. फक्त गरजेपुरतं जवळ घ्यायचास. माझ्या इच्छा, मला काय हवंय, नकोय कधी विचारच नाही केलास. तरीही तुझा संसार नेटानं चालू ठेवला. बापाचं घर, नाव आणि स्वतःची संपूर्ण ओळख बदलून तुझ्या लग्नाची बायको झाले. पण तू कधी माझा होऊच शकला नाहीस! मी तुला सर्वस्व बहाल केलं. पण तू मात्र, तुला हवं तेव्हा तुझ्या गरजा भागवल्यास. माझी इच्छा असो वा नसो! माझ्या मनाचा विचार कधी केलाच नाहीस रे तू! कधीही भरभरून मन मोकळेपणाने बोलला नाहीस. असं काय होतं रे तुझ्या मनात जे तुला तुझ्या बायकोलाही नाही सांगू वाटलं? असं कोणतं दुःख होतं? कोणतं टेन्शन होतं रे, कि जे तू माझ्याशी कधीच शेयर करू शकत नव्हतास?

     खरंच! असं वाटायचं कि, तुझ्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. पण मुलांकडे पाहिलं कि, हा विचार कुठच्या कुठं पळून जायचा. आज असा अर्ध्यावर डाव सोडून गेलास! मला आणि मुलांना वाऱ्यावर सोडून. आता खरंच असं वाटतं, तुझ्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. स्वतः सुटलास पण मला अडकवून गेलास.

       खूप शिकायचं होत रे मला. शाळेत नेहमी पहिल्या दुसऱ्या नंबरने पास व्हायचे. नुकतंच कुठं कॉलेजला जायला लागले होते. ते मनरंगी दिवस कसे फुलपाखरासारखे हवेत तरंगत होते. तोच आमच्या नात्यातल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं. पळून जाऊन लग्न करणे किंवा प्रेमविवाह करणे म्हणजे घराची अब्रू वेशीवर टांगण्यासारखं! असा काळ होता तो. आपल्या मुलीनेही असं काही करू नये म्हणून वडिलांनी नकळत्या वयात माझ्यापेक्षा दुप्पट वय असणाऱ्या तुझ्याशी लग्न लावून दिलं. काहीच माहिती नव्हतं रे तेव्हा! कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलेलं कॉलेज लाईफ जगायचं होतं. कुणाच्या तरी प्रेमात पडायचं होतं. तो अनुभव घ्यायचा होता. पण नकळत्या वयात लग्न झालं, नि अकाली प्रौढत्व माझ्या माथी मारलं गेलं. नशीबच म्हणतात ना ते! देवानंच माझ्या कपाळावर लिहिलं होतं.

       असो! माझ्या नशिबात जर हेच लिहिलेलं असेल, तर मी हि देवाला दाखवून देईन. जन्मापासून लढत आले. अजूनही लढते आहे. आणि शेवटपर्यंत लढत राहीन.

नसेल लाभली तुझी साथ, पण मोडणार नाही मी |
मग कितीही येवोत संकटे, तरी झुकणार नाही मी |

        या चार सहा महिन्यात जे भोगायचं ते भोगलंस. कायमचा सुटलास तू. आता माझ्या वाट्याला आलेले भोग मलाच भोगायचेत. आता तुझ्याकडे एकच मागणं मागते, पुढच्या जन्मी तू पुन्हा पुरुष म्हणून जन्म नको घेऊस. कारण माझ्या वाट्याला आलेले भोग कोणत्याही स्त्रीच्या वाट्याला नकोत रे. आणि मिळालाच जन्म, तर चांगला माणूस म्हणून ये. मी सदैव तुझ्या स्वागतासाठी तयार असेल!

         जाता जाता एक शेवटचं! जर काही माझ्याकडून चुकलं असेल तर माफ कर मला. मी कधीच तुझी नाही होऊ शकले. कारण, जिथं तू कधीच मला तुझं नाही समजलास, तिथं मी तरी तुझी कशी होणार होते?

आता जीव अडकवू नकोस कशात. शांत हो! मुक्त हो!

- तुझी बायको.