Jan 24, 2021
नारीवादी

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र हो बाई!

Read Later
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र हो बाई!

आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र हो बाई!

सरु आज बऱ्याच दिवसांनी तिच्या जिवलग मैत्रिणीकडे,जयाकडे गेली. जयाची मुलगी नेहा लग्नानंतर प्रथमच माहेरी रहावयास आली होती. तिलाही भेटायचं होतं.

सरुने गौरीशंकर मिठाईवाल्याकडे नेहासाठी पाव किलो काजुकतली व जयासाठी बाकरवडी घेतली. सरुला पहाताच जया तिला बिलगली. नेहाही सरुमावशीला भेटली. सरुने नेहाच्या गालांवरून मायेने हात फिरवला.

जयाने सरुसाठी वांगीभात,मेधीचे ठेपले,सीताफळ रबडी,डाळींब्यांची उसळ असा सुग्रास बेत केला होता. तिघीही गप्पा मारत जेवल्या व दुपारी हॉलमधे पसरल्या. नेहा सरुमावशीच्या कुशीत आली. 

"मावशी उल्हासचं कॉलेज कसं चालू आहे गं?"

"छान चाललय. असतो कुठे घरात उल्हास. सकाळी सातला जातो ते रात्री आठेक वाजता येतो घरी."

"काका ऑफिसला गेल्यावर तू एकटीच कंटाळत असशील नं!"

"हो अगं,सासूबाई होत्या तोवर सोबत होती त्यांची मला. एकटेपणा खायला उठतो आतासा मग फिरते कुठेकुठे."

"माझ्याघरी येशील का रहायला चार दिवस?"

"छे गं बाई. कितीही फिरलं तरी संध्याकाळी बाईमाणूस घरी हवंच असतं,या लोकांना. स्वातंत्र्य वगैरे ते बोलाची कढी नि बोलाचा भात ग. खरं काही नसतं त्यात."

"मी माझंच सांगत बसले बघ. नेहा,तू करतेस का गं तिकडे नोकरी?"

"नाही ग मावशी. आधीची नोकरी सोडली मी. मला निरज म्हणाला की माझं एवढं पेकेज आहे,तुला नोकरी करण्याची काय गरज! घरातलच आवरत जा. बरं घरातही धुणी,भांडी,लादी,पोळ्या यांसाठी बाया आहेत. नेहमीचा स्वैंपाक काय तो बनवते मी."

नेहा पुढे म्हणाली,"मावशी तसंही माझ्या लहानपणी आई ऑफिसला जायची. दाराचं कुलुप उघडल्यावर एकटंएकटं कसंतरी वाटायचं मला. थंडगार वरणभात चिवडायचे. अभ्यास झाला की खिडकीकडे तोंड लावून आईबाबांची वाट बघत बसायचे.

 आजी असेपर्यंत ठीक होतं सगळं पण तेव्हा आईची व आजीची होणारी भांडणं आठवतात मला. आईला जरा उशीर झाला तर ती चोरासारखी यायची. आजी दबा धरुन बसलेलीच असायची.  उशीर झाला म्हणून रागे भरायची.

 कधी माझं अंग तापाने फणफणत असलं तरी इअरएंड असला की आईला मला तसंच ठेवून जावं लागायचं. आजी मग म्हणायची,'जवान होतो तेव्हा आमची पोरं सांभाळली. आता कुठे शांततेत दिवस घालवू म्हणलं तर यांची मुलं सांभाळायची.: माझी आत्याही तिच्या मुलाला आजीकडेच सोडून जायची. आम्ही दोघं मिळून आजीच्या नाकी नऊ आणायचो. 

आजीचे टोमणे ऐकून आई कधीकधी उपाशीपोटीच निजायची. बाबा तिला साधं 'जेव गं' असंही म्हणायचे नाहीत. एवढी मोठी ऑफिसर आई घरात मात्र अपराध्यासारखी रहायची. पगार जरी घेत असली तरी सगळा खर्च बाबांच्या परवानगीनेच व्हायचा. तिचं असं स्वतंत्र अस्तित्व नव्हतच तिला. 

ती सदा आजीच्या नजरेखाली दबलेली असायची. म्हणून मीही ठरवलं की नाहीतरी एवढं मरमर मरायचं,पैसे कमवायचे नि गुलामीचं जीणं जगायचं या अशा आयुष्यापेक्षा ती नोकरीच नको. काहीतरी वैगळं करण्याचं मन आहे पण अजून तसं विशेष ठरलं नाही.

जया लेकीचं म्हणणं डोळे मिटून ऐकत होती. इतर कुणी नाही पण लेकीला तरी तिच्या कष्टांची जाण आहे हे पाहून तिचं मन सुखावलं.

सरु मात्र तिच्या भुतकाळात गेली. ती नेहाला म्हणाली,"नेहा तुझी आई नोकरी करायची त्यामुळे तिची व्यथा तू जाणलीस पण बाई नोकरी करणारी असो वा ग्रुहिणी तिच्या मागचे व्याप सुटत नाहीत. तुला तर माहितीच आहे की उल्हास पाळणाघरात रहायला मागेना. नेहमी तिथल्या मुलांच्या खोड्या काढायचा. दोनतीन पाळणाघरं बदलली नंतर म्हंटलं जाऊदे नोकरी त्यापेक्षा घरी बसून लेकराला सांभाळू. 

चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं नि घरी बसले. सासुसासरे गावी रहायचे. तरी अधनंमधनं यायचे. त्यांची व इतर पाहुण्यासोयऱ्यांची सरबराई करायचे. 

अगदी मोक्याच्या ठिकाणी घर असल्याने गावावरून कोणी आलं की आधी आमच्याकडे उतरे. त्याचं चहापाणी,जेवणखाण शिवाय कोणी आजारी असलं तर इथल्या इस्पितळात उपचारासाठी येई. त्यांच्यासोबत आलेली माणसं आमच्याकडे मुक्कामाला असत. त्यांची सरबराई करावी लागे शिवाय इस्पितळात नेण्यासाठी डबा द्यावा लागे. 

यांच्या बहिणी मुलांना सुट्टी पडली की त्यांना माझ्याकडे आणून सोडायच्या कारण त्या नोकरी करायच्या नि मी घरात रिकामटेकडीच होते त्यांच्या मते. बरं कितीही बडदास्त ठेवली तरी काहीतरी बोल लावून जायच्याच.

 दिरही शिक्षणासाठी म्हणून येऊन राहिला आमच्याकडे. त्याचं लग्न करुन दिलं. त्यानंतर त्याने लगेच वेगळं बिर्हाड थाटलं. 

मी नोकरी करत नसल्याने मला काही घ्यायचं असलं तर यांच्याकडेच हात पसरावा लागे. सुट्टीत माहेरी जायला मिळत नसे. कधी रक्षाबंधन,भाऊबीजेला गेले तरी घटकाभरासाठीच. माहेरच्यांना काही द्यायचं म्हंटल की यांच्या डोक्याला सतरा आठ्या पडत..अजुनही तशाच पडतात. 

कधी यांच मन मोडून वागले,भांडण झालं की यांच एकच पालुपद..हे घर माझं आहे. तू आत्ताच्या आत्ता इथून चालायला लाग. कोणाला खरं वाटणार नाही कारण पुरुषांच्या आवाजाचा पीच कमी असल्याने ते बोलतात ते कोणाला ऐकू येत नाही फक्त माझ्या काळजाला घरं पाडतात त्यांचे विखारी शब्द.

 आता सेवानिवृत्त झाल्यावर थोडे नरम आले आहेत. परवा म्हणाले सुद्धा,'सरु मी तुझ्याशी फारच कडक वागलो' पण आता बोलून काय उपयोग.

 हे माझ्याशी फटकून वागायचे तेच वळण उल्हासला लागलं. त्यालाही मी घरात बसून फुकटचे तुकडे मोडते असं वाटतं. बरं हे माहेरी सांगावं म्हणजे आपल्याच वयोवृध्द आईवडिलांच्या चिंतांत वाढ करणं. आपली सरु सुखात आहे. जावई तिची व्यवस्थित काळजी घेतो याचा कोण अभिमान त्या दोघांना. मग मीही म्हंटलं,जे काय वाट्याला आहे ते भोगत रहायचं.

 उल्हास कालच म्हणत होता,"आई,तू घरातच राहिलीस त्यामुळे मी परावलंबी झालो." याच्या कानीकपाळी ओरडायचे..निदान स्वतःची कामं तरी स्वतः कर पण मुळीच ऐकला नाही. अजुनही ऐकत नाही. 

आता त्याची बायको आली की मलाच बोल लावेल की आईने आयतोबा केला याचा. 

शेवटी काय नोकरी करणारी असो वा ग्रुहिणी दोघींच्याही वाटेचे भोग संपत नाहीत. बरेच पुरुष समंजस असतात पण बरेच पुरुष असमंजसही असतात. पुरुष हा नारळासारखा असतो. नारळ कसा फोडल्याशिवाय आत कसा आहे ते कळत नाही तसंच पुरुषासोबत संसार केल्यावरच त्या बाईला कळतं की आपला नवरा कसा आहे. कसाही असला तरी शेवटपर्यंत लग्न निभवावं लागतं,कधी पोटच्या मुलांकरता तर कधी लोकलज्जेस्तव. 

नेहा,माझं म्हणणं एवढंच की तू नोकरी कर किंवा इतर काही पण बाई आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र हो. उद्या सकाळी तुला असं नवऱ्याने घरातून निघ म्हंटलं तर तू तुझ्या घरात जाऊन राहू शकतेस. 'सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी असं म्हणण्याची वेळ' तुझ्यावर तरी येऊ नये.

 मी उल्हासचं लग्न झालं की माझ्या सुनेलाही हेच सांगणार,तिलाच काय जेवढ्या मुली संपर्कात येतात त्यांना हाच डोस देते की संसार करताना स्वतःच्या आरोग्याची शिळंपाकं खाऊन हेळसांड करु नका व अगदी पापड लाटलात तरी चालेल. कोणतही काम खालच्या दर्जाचं नसतं तेव्हा चार पैसे स्वतः कमवायला शिका."

नेहा सरुमावशीचं बोलणं कान देऊन ऐकत होती. तिच्या बोलण्याचा चांगलाच प्रभाव नेहाच्या मनावर पडला. नेहाने ठरवलं काहीही करुन स्वतःच्या पायावर उभं रहायचं. 

तिने सरुमावशीला मिठी मारली व म्हणाली मावशी तू मला एक योग्य वाट दाखवलीस बघ. खूप छान गीफ्ट दिलंस तू मला. थँक्यू मावशी.

------सौ.गीता गजानन गरुड.