बायकोचा वाढदिवस

कथा एका नवर्‍याची ज्याने बायकोला सरप्राईज द्यायचे ठरवले पण झाले वेगळेच


वाढदिवस..


आज सकाळपासून? अंहं.. रात्री बारा वाजल्यापासून सुमेधाचा फोन वाजायला सुरुवात झाली होती.. तिच्या मैत्रिणींनी , बहिण भावांनी इतकेच काय पण तिच्या ऑफिसच्या ऑफिशियल ग्रुपवर पण वाढदिवसाचे अभिष्ट चिंतनाचे मेसेजेस येत होते.. पण तिचा नवरा मात्र कुंभकर्णासारखा घोरत पडला होता.. तिने त्याच्याकडे बघत एक सुस्कारा सोडला आणि परत सगळ्यांना थँक यू चा मॅसेज करायला सुरुवात केली.. सगळ्यांना मॅसेज करेपर्यंत रात्रीचा एक वाजला.. दिवसभरच्या दगदगीने पटकन झोप लागली.. त्यामुळे सकाळी उठायला उशीरच झाला.. आज तिने मुद्दाम सुट्टी काढली होती. विचार केला होता त्यानेही सरप्राईज म्हणून सुट्टी घेतली असेल.
आज सकाळी तरी तो विश करेल म्हणून उत्साहाने ती उठली तर घरी नवर्‍याचा काहीच पत्ता नव्हता.. कुठे गेला म्हणून फोन करायला गेली.. तर नवर्‍याचा मॅसेज दिसत होता.. काहीतरी सरप्राईज असेल म्हणून मनाशी हसत तिने मॅसेज ओपन केला. "आज दिवसभर खूप महत्त्वाच्या मिटींग्स आहेत. म्हणून लवकर ऑफिसला जातो आहे. तू खूप दमल्यासारखी वाटलीस म्हणून तुला उठवले नाही.. रात्रीचा स्वयंपाक करू नकोस.. मिटिंगमध्ये उशीर होईल.. तुझाच नवरा.."
ती हिरमुसली.. आधी तिला वाटले हि नेहमीप्रमाणेच मस्करी करतो आहे तो. म्हणून तिने ऑफिसमध्ये त्याच्या सेक्रेटरीला फोन लावला.. "तिनेही सर मिटिंगमध्ये आहेत असे सांगितले.." आता अख्खा दिवस तिच्या अंगावर आला.. मुले परदेशात शिकायला.. सगळे जवळचे नातेवाईक दुसर्‍या शहरात.. मैत्रिणी होत्या.. पण कोणाला सोबत या असे म्हणायची तिची इच्छाच मरून गेली.. तसेच उठून तिने चहा करून घेतला.. सगळ्यांचे फोन येत होते.. तिही उसन्या उत्साहाने सगळ्यांशी बोलत होती.. पण आतून तिला खूप जोरजोरात रडावेसे वाटत होते.. आपला एकटेपणा कोणासोबत तरी शेअर करावासा वाटत होता.. पण तो कोणीतरी त्याच्या ऑफिसमध्ये बिझी होता.. मरगळलेल्या मनाने तिने स्वतःचे आवरले. इतर कोणी सोबत नाहीतर नाही.. तो देव तर आहे.. आज आपण त्याच्यासोबत दिवस घालवू.. तिने खास वाढदिवसासाठी घेतलेला ड्रेस घातला.. अगदी माफक मेकअप केला.. आणि ती निघाली.. आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले. तिथेच रस्त्यावर मनसोक्त खाल्ले.. परदेशातून मुलांचे फोन आले. त्यांच्याशी बोलली.. घरी आली..
आज कधी नव्हे ते नवर्‍याचा "जेवलीस का" हा मॅसेज आला होता. तिने ठरवून दुर्लक्ष केले. सगळ्या ग्रुपवर जे काही मेसेजेस येत होते त्यांना रिप्लाय दिला..

रणजीत, सुमेधाचा नवरा मात्र खुश होता.. त्याने ठरवल्याप्रमाणे सगळे होत होते.. त्याने मुद्दाम सेक्रेटरीला दिवसभर मिटिंग आहेत असे सांगितले होते.. उतरलेला सुमेधाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता.. आणि त्याला अजूनच हसायला येत होते. त्याने पाच वाजेपर्यंत सगळ्या मिटिंग संपवल्या. ऑफिसमधून निघताना त्याने सुमेधासाठी विकत आणलेली साडी आठवणीने घेतली. बुक केलेला केक ऑन द वे घेतला, त्याच्या शेजारी एक गजरेवाला होता.. त्याच्याकडून भरपूर गजरे घेतले. मोबाईलवर संध्याकाळच्या शोची पिक्चरची तिकिटे परत चेक केली.. उत्साहाने तो घरी निघाला.. गाडी चालवत असताना त्याला सुमेधाचा एक मॅसेज आला.. त्याने मुद्दाम बघितला नाही.. रणजीत घरी आला.. घरात अंधार होता.. असे कसे झाले? सुमेधा तर आतापर्यंत घरी यायला पाहिजे होती. त्याने हातातले सामान टीपॉयवर ठेवले. धडधडत्या ह्रदयाने तो बेडरूममध्ये गेला. तिथे सुमेधा बेडवर झोपली होती. त्याच्या मनात अशुभ विचार यायला लागले. रणजीत सुमेधाच्या जवळ गेला.. तिचे अंग थंड पडले होते.. रणजीतला रडायला यायला लागले.. त्याने सुमेधाला जवळ घेतले.. तिथे त्याच्या हाताला एक चिठ्ठी लागली.. "प्रिय रणजीत, जेव्हा तुझ्या हातात हि चिठ्ठी असेल तेव्हा बहुतेक मी या जगात नसेन.. मी तुला मॅसेज केला होता.. पण तू रिप्लाय दिला नाहीस.. असो.. मला माहित आहे तुला माझा वाढदिवस लक्षात आहे. पण तुला मला सरप्राईज द्यायचे आहे. खरे सांगू.. मला ना आताशा या सरप्राईजचा कंटाळा यायला लागला आहे.. माझ्या चेहर्‍यावरचा तो सो कॉल्ड रुसवा पाहण्यासाठी तू हे सगळे करतोस.. तुला मजा येते.. पण तोपर्यंत माझा सगळाच दिवस वाया जातो त्याचे काय? म्हणजे बघ हा आपल्याला कुठे बाहेर जायचे असेल तर तू तिकिट काढून ठेवणार पण मला सांगणार नाहीस.. माझी झालेली तगमग बघायला तुला आनंद होतो म्हणे.. असेल ही. पण मग मला ना इथे ती लहानपणी वाचलेली बेडकांची गोष्ट आठवते.. काही मुले बेडकांना दगड मारत असतात.. त्यात ते बेडूक मरत असतात. शेवटी धीर करून बेडकांचा म्होरक्या त्या मुलांना विचारतो, तुम्ही का असे दगड मारता आम्हाला? त्यावर ती मुले उत्तर देतात.. हा आमचा खेळ आहे.. त्यावर ते बेडूक म्हणतात.. तुमचा खेळ होतो.. पण आमचा जीव जातो.. तुला खरे सांगू, माझेही आता तसेच झाले आहे.. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे.. पण प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी ते तडफडणे आता नाही सहन होत. आताही मला माहीत आहे तू केक आणला असशील , काहीतरी डिनर प्लॅन केले असशील.. पण त्याने माझा वाईट गेलेला दिवस तर परत येणार नाही ना.. सॉरी.. मला आता हे असह्य होते आहे.. मी जाते आहे.. तुझ्या आयुष्यातून कायमची.. बाय फॉरएव्हर.. तुझीच सुमेधा.."
" सुमेधा" रणजीतने जोरात हंबरडा फोडला.. त्याला आठवले मुले सांगत होती आईची मस्करी करू नका.. पण त्याने नाही ऐकले. आणि आता मस्करीची कुस्करी झाली होती.. त्याने सुमेधाला घट्ट मिठी मारली.. आणि जोरात रडायला लागला..

" हळू ओरड ना.. किती जोरात ओरडलास कानात..कानठळ्या बसल्या.." सुमेधा हळूच बोलली..
" सुमेधा.. तू???? मग ती चिठ्ठी? तू बरी आहेस..देवा..."
" कसे वाटले माझे सरप्राईज?"
" हे असे? हार्टफेल होता होता वाचले.. परत अशी मस्करी नको.."
" का? आला अनुभव आता,मला कसे नेहमी वाटते याचा?"
" हो पुरेपूर.. आता यापुढे नो सरप्राईज.. जे काही असेल ते सरळ सांगणार.."
" किती गोड ग माझा नवरा.. आता रात्री काय?"
" काही नाही? घरीच जेवू.."
सुमेधा तोंड वेंगाडून किचनमध्ये गेली.. तिचा मोबाईल वाजला.. रणजीतचा मॅसेज होता.. पिक्चरची तिकिटे पाठवली होती..
सुमेधाने रिप्लाय केला.. " कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडी..."

कथा कशी वाटली.. सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई