बायकोचा सिगारेट स्वॅग

Story of smoking married man and woman.

     
      सौमित्र ला बैठकीत  सोफ्यावर  झोपलेला  पाहून विनायक राव हळूच दबक्या पावलांनी स्वयंपाक घरात आले .रसिका मुलींसाठी डबे तयार करत  होती .
     रात्री चांगलीच खडाजंगी झालेली दिसतेय सुनबाई? कशावरून वाजलं ?

     पोळी करता करताच रसिकाने विनायकरावांकडे पाहत म्हटले ...काही नाही हो बाबा...... नेहमीचच.. जेव्हापासून त्यांच्या आयुष्यात तीे आलीय ना तेव्हापासून आमच्यातल्या नात्याचं वाटोळ झालंय .त्यांना चांगलं माहिती आहे मला अशा गोष्टींची किती चीड आहे पण त्यांचं लपूनछपून चालूच असतं.पण माझ्यापासुन काही लपुन रहात नाही मग काय दोघांमध्ये धर्मयुद्ध ठरलेलंच... 
        बापरे !डायरेक्ट धर्मयुद्ध...? आश्चर्यचकित चेहरा करून विनायकराव बोलले . म्हणून ....म्हणूनच सौमित्रची रवानगी बैठकीतल्या सोप्यावर होय ..बरं मला एक अद्रक  वाली कडक चहा मिळेल का?

   " हा काय तुमचा चहा तयारच आहे "

      चहाचा कप हातात घेऊन विनायकराव बोलले पेपर वाचायला बाहेर ओट्यावरच बसतो कारण बैठकीत वीर योद्धा झोपलेला आहे .

      तेवढ्यात अवनी ,आरोही शाळेची तयारी करून डायनिंग टेबलवर आल्या. नाष्टा करत करत दोघींचा चिवचिवाट सुरू झाला हे मम्मी आज तुम्हा दोघांना आमच्या शाळेत यायचे आहे कारण आज वेगवेगळ्या स्पर्धा आहेत ,पालकांनाही बोलावलेले आहे .मी वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दिले होते आणि माझी तयारीही झालेली आहे.... अवनी ला पुढचे बोलू न देता आरोही म्हणाली" हो हो मी पण चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे "आणि माझं चित्रही मी तयार केल आहे .

      अरे वा माझ्या चिमण्या मोठ्या झाल्या तर... आता त्यांना आईची गरज लागत नाही स्पर्धेच्या तयारीसाठी.               तिघींच्या आवाजाने सोप्यावर झोपलेला सौमित्र जागी झाला अरे वा.. आज चिमण्या एवढ्या लवकर तयार पण झाल्या?

      " लवकर नाही हो पप्पा तुम्हीच उशिरा उठले आहात. आम्ही तर निघालोय शाळेत जायला आणि आज तुम्हाला शाळेत यायचंय बर का". आरोही पप्पांचे गाल ओढत  म्हणाली..

      रसिकाने  सौमित्र कडे दुर्लक्ष केलं .रात्रीच्या वादाचा संताप अजुनही  धगधगत होता .

      सौमित्र ने घरातून निघताना नेहमीप्रमाणे सांगितले की मला शाळेत यायला जमणार नाही, कामाचा लोड आहे तू जाऊन ये .

        घरातले सारे आवरून रसिका शाळेत पोहोचली. चित्रकला स्पर्धेच्या चित्रांचे प्रदर्शन मांडलेले होते.रसिका एकेक चित्र पाहत पुढे सरकू लागली आणि एक चित्र पाहून जागेवरच  हबकली .चित्र काढणाऱ्या स्पर्धकाचे नाव डोळे विस्फारतात पाहतच राहिलीे. ते चित्र आरोही ने काढलेले होते .पुढचे चित्र पाहण्याचे इच्छाच उरली नाही.

     थोड्याच वेळात वक्तृत्वस्पर्धा ही सुरू झाल्या .एकेक विद्यार्थी आपले वक्तृत्व मांडत होता.पुढील स्पर्धक अवनी सौमित्र शिंदे नाव पुकारले गेले आणि मधुरा कानात प्राण आणुन बसली.
   अवनी ने आत्मविश्वासाने वक्तृत्वास सुरुवात केली .बारा वर्षांची आवनी तिचे मुद्दे ठासून, परखड ,खुबीने मांडत होती. प्रत्येक मुद्द्यावर टाळ्या पडत होत्या पण रसिका मात्र भाषण ऐकून गार गार पडली होती. तिची काया थरथरत होती. शाळेतले कार्यक्रम   आटोपून ,काहीस मनाशी ठरवून निर्धारी आवेशात घरी आली .

      विनायकराव बैठकीतच पुस्तक वाचत बसले होते. बाबा मला काही वस्तू हव्या आहेत त्या कॉर्नरच्या टपरीतून आणून देता का ?
     अग पण तू येताना घेऊन येऊ शकत होती ना ?बर बर सांग .काय काय वाण सामान हवे आहे? यादी बनवून दे .

       रसिकाने  लिहिलेला छोटासा कागद विनायक रावांच्या हातात दिला .कागद पाहताच रसिका कडे अचंबित नजरेने पाहिले .... खरच हे हवय तुला ?     पण का? कशासाठी ?
        बाबा त्याचे उत्तर नाही देऊ शकत मी . तुम्ही आणून देताय की मी जाऊ?
      नको ..नको मीच आणून देतो . तो दुकानदार काय म्हणेल ?..


     अवनी ,आरोही शाळेतून स्पर्धेच्या बक्षीस घेऊन आल्या रसिकाने जवळच राहत असलेल्या त्यांच्या मामाकडे सोडले कारण मुलींसमोर तिला कुठलेही पाऊल उचलायचे  नव्हते.

       फ्रेश होऊन छान बारीक जांभळ्या काठ्यांची साडी त्यावर कॉन्ट्रास्ट लाल ब्लाऊज घातले,  छोटेसे झुमके हातात कडे, हलकीशी लिपस्टीक लावून तयार झाली.                       बैठकीत सगळी तयारी करुन ठेवली. नवर्‍याची वाट पाहत सोफ्यावर बसली .

        सौमित्र पार्किंगमध्ये गाडी लावत असतानाच विनायकरावांनी हळूच त्याच्या कानात टपरीवरुन आणलेल्या गोष्टीची कल्पना दिली आणि हळूच आपल्या खोलीचे दार बंद करून आत गेले .त्यांचे बोलणे ऐकून सौमित्र चपापला .काय वाढून ठेवलय पुढे कोण जाणे.. नुसत्या विचारानेच गोंधळला ..

     दरवाजातच  रसिकाने त्याच्या हातून बॅग घेतली. फ्रेश होऊन या .तुमच्यासाठी सप्राईज आहे .सौमित्र तिच्याकडे पहातच राहीला सकाळी तर ज्वालामुखी धगधगत होता आणि आता चक्क डोक्यावर हिमालय ...त्या विचारात त्याने बॅग अनावधानाने रसिकाकडे सोपावली . 
           आज चक्क  साहेबांनी  बॅग  स्वतःहून  हाती दिली .नाहीतर  त्यांच्या  बॅगला कधी हात लावू देत नाहीत.बरे असो बॅगेतून जेवणाचा डबा तरी काढून घेऊ या ..म्हणून रसिकाने बॅग उघडली आतली वस्तू पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. आधीच काय एक कमी होती आता ही दुसरी पण का?  मनातल्या मनात बडबडत टीपॉयवर मांडून ठेवलेल्या गोष्टीत त्या वस्तूची ही  भर घातली . 

     सौमित्र फ्रेश होऊन बैठकीच्या खोलीत आला .टीपॉय वरील गोष्टी पाहून अचंबित झाला .हे काय आहे रसिका? काय चालवलंय तू ?हा कसला बावळट पणा ?

    अहो असे चिडताय काय ?अजून तर सुरुवात पण नाही केली .आज हे सगळं मी करणार आहे .बघाच तुम्ही एकदा तुमच्या बायकोचा सिगरेट स्वॅग ..बोलता बोलताच टीपॉय वरील पाकिटातून एक सिगरेट काढली.  सौमित्र ने बॅगमध्ये लपवलेले लाईटर घेतले आणि पेटवली. 
      लाईटर, सिगरेट पाहून सौमित्र भांबावला म्हणजे हिला बॅग मधील वाईन पण दिसली  असेल ?विचारातच टिपॉयवर नजर मारली. वाईन च्या  बाटली सोबत  ग्लास  मांडून  ठेवलेले  होते ..पुढे काय होईल या नुसत्या कल्पनेनेच  सौमित्र चे डोके जड झाले.

    रसिका ने कसंनुसं तोंड करत सिगरेट तोंडाला लावली, श्वासा सोबत जहरी निकोटिन चा धुर आत ओढला गेला आणि  धुरा सोबत जोरात खोकलाही सुटला .जिवाच्या आकांताने खो खो खोकलत  होती ,डोळ्यातून पाणी येत होतं .
        रसिका हे काय करतेय? फेक ती हातातली सिगरेट तुला नाही जमणार ?
     असं कसं म्हणता तुम्ही.? डोळे उघडे ठेवून बघा की बायकोचा सिगरेट स्वँग .घ्या तुम्ही पण घ्या आपण  रोज दोघी बसून घेत जाऊ . धुराची मैफिल सजवू. तुम्ही करतात तशी. मस्त मौजमजा करू. बाकी जग गेलं खड्ड्यात .

      आज तुमच्यासमोर तुमची ती नवीन ...पिऊन दाखवते लपवून आणली ना? कितीही लपवलं तरी कळत हो मला लग्नाची बायकोय तुमची .
   वाईनचा एक पेग भरला आणि सौमित्रला दाखवत म्हणाली. कंपनी देताय ना ?कंपनी नाही दिली तर तुमची प्रतिष्ठा खराब होईल बर का. 
       डोळे गच्च बंद करत रसिकाने पहिला घोट घेतला .तीला  पुन्हा खोकल्याची उबळ आली.

        अगं रसिका थांब .काय वेडेपणा लावला आहे हा?  बंद कर आधी हे  सगळ? 
       सौमित्र कडे लक्ष न देता वाकडे तिकडे तोंड करत रसिकाने एका दमात पेग संपवला.आणि पुन्हा सिगरेटच्या पॉकेट कडे हात वळवला .सौमित्रने चपळाईने तिचा हात पकडला .बस बंद कर. तब्येत खराब होईल. आपल्या मुलींचा तरी विचार कर .

         हेच ..हेच.. मी सांगते हो तुम्हाला कधीपासून..पण तुम्ही... सकाळी सिगरेटची तलप असते म्हणून घरातून तुम्ही लवकर निघता ,संध्याकाळी घरी येताना तोंडाचा वास येऊ नये म्हणून अस्मंतारा मुखवास खात खात घरी येतात, घरी आल्यावर थोडावेळ तोंड घट्ट मिटून ठेवतात, कोणाशी बोलत नाही, सुट्टीच्या दिवशी काहीतरी निमित्त करून जीव घेणारा धूर उडायला घराबाहेर पडतात ,नाहीतर दरवाजाबाहेर तलप  भागवत असतात. सगळं  सगळं  कळतं हो  आम्हाला .

     रसिका संतापाने ओरडून बोलायला लागली होती. आपल्या दहा वर्षाच्या आरोही ने हे सारं  चित्रात  चितारल आहे.आम्ही सगळे हॉल मध्ये बसलेलो आणि तिचे पप्पा दरवाजाबाहेर सिगरेट पीत आहे .तिला जे दिसलं ते रेखाटलय बालमनाने आणि अवनीने आज तर धूम्रपान माणसा माणसाला लागलेली कीड असा विषय वक्तृत्वासाठी निवडला .पोटतिडकीने बोलत होती हो. म्हणाली मी मोठी झाल्यावर देशाची पंतप्रधान होईल आणि या अशा उत्पादनांवर आयात निर्यातीवर कडक बंदी आणेल.असे  उत्पादन बंद करायला लावेल .तुम्ही काय करता ?सगळं कळतं हो मुलींना .

    मुलींविषयी ऐकलं आणि सौमित्र च काळीज कापू लागलं . 

      वाईनचा नशा  हळूहळू  चढू लागला होता . तिचा तोल जाऊ लागला तशी रसिका  अजूनच बरळायला लागली. कसली काळजी  ,कसला गुंता आहे ? मला सांगा ना. समोरासमोर बसून दोघं मिळून सोडवूया आपण. ती तीन इंचाची  सिगरेट  काय  सोडवणार ?
     स्वतःला बघा जरा कसे झाले आहात खोकून खोकून गालाच चिपाड झालंय, डोळे खोल गेले ,दात काळे पडलेय जेवण कमी झालंय ,दिवसेंदिवस तब्येत खालावतेय, तरुणपणातच म्हातारे झाले आहात ,वरतून बीपीचा त्रास सुरू झाला तो वेगळाच. सगळं सगळं त्या सिगरेटच्या धुरात वाहून चाललय .एक काय कमी होती काय ?आज आणली  दुसरी पण .

      कसलं हे तुमचे स्टेटस ?कसलं हे जीवघेणा कल्चर? वेळेच्या आधी मरण देणार .कसला तो अँटीट्युड? कशाला हवी ती विनाकामाची प्रतिष्ठा. म्हणे आम्ही गोल्ड फ्लँक ,सिल्वर फ्लँक , ब्रिस्टॉल, पार्लमेंट   आणि  अजून काय ते ?.. गोल्ड फ्लॅककिंग ची सिगरेट पीतो. असले कसले किंग हो तुम्ही? हातात ३ इंचाच थोटक धरणारे. राजे व्हायचंच तर छत्रपती शिवाजी महाराजान सारखे व्हा. आपल्या माणसांना सांभाळणारे. काहीतरी चांगले नवीन निर्माण करणारे.
    सिगारेट धरून हवेत धुराची रिंग ओढणारे तुम्ही ..एक दिवस येईल ना तोच धुर वेळेच्या आधी  मरणाच्या रिंगणात उभ करायला. आपण गेल्यावर आपल्या लेकरा माणसांचं काय होईल ?याचा विचार तरी येतो का हो  झुरके घेताना? देशात वर्षाकाठी दहा लाख माणसं मरतात सिगरेटने.तरी  कसली मजा वाटते हो  ?  

       टेन्शन असते म्हणून घेता ना सिगरेट तुम्ही.? मग आम्हा बायकांना ही असतात की टेन्शन .म्हणून आम्ही काही असल काही जीव घेण जवळ करुन आधार शोधत बसत नाही. आम्ही मार्ग काढतो. आणि बोलता-बोलता रसिका उभे रहायचा प्रयत्न करत होती, पण तोल जात होता ,धडपडत होती, हळूहळू तीचे भान हरपत चालले होते.  सोप्यावर वरच अस्ताव्यस्त पडून होती.

   सौमित्र  स्तब्ध नजरेने तिचा असा अवतार पाहतच राहिला.. थोड्यावेळाने रसिकाला उलटी झाली एकामागून एक रात्रभर उलट्या करून रसिका मलुल झाली  होती.तिची अशी अवस्था पाहून सौमित्र नखशिखांत हादरला ... गेली एक -दोन वर्षापासून बंद असलेले त्याचे डोळे आज खाडकन उघडले होते, त्याला स्वतःची चूक उमगली होती. रसिकाच्या उशाशी डोके ठेवून तो अक्षरशहः ओक्साबोक्शी रडू लागला . केव्हाचं दाटून आलेलं आभाळ अश्रू धारांनी मोकळं होतं होते.
     एकदाची ती काळोखी रात्र संपली होती आणि नवीन पहाट उगवली होती .भावी आयुष्यातले आभाळ निरभ्र झालं होत.

  अंगात त्राण नसल्याने रसिका दोन दिवस जागेवरून उठून शकलीे नाही .सौमित्र मनापासून तिची काळजी घेत होता.


    आयुष्य आनंदाने नवीन जोमाने सुरू झालं होत. तीन इंचाच्या सिगरेट च्या तुकड्या पेक्षा पाच फुटाची सदविवेकी बायकोच्या आधाराने आयुष्यातले गुंते अलगद सुटत होते.


*****
भेटगाठ
     सस्नेह वाचक,
    तुम्हाला वाटलं असेल रसिकाने एकदम टोकाची भूमिका घेतली पण रवेदार साजुक तुप होण्यासाठी मऊ लोण्यालाहीे प्रखर अग्नीवर तापावे लागतेच ना! 
सिधी उंगली से घी ना निकले तो उंगली तेढी करनीही पडती है ।बरोबर ना ? 
      कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर रुसू नका माफ करा.ब्लॉग आवडला असेल तर लाईक ,कमेंट ,शेअर करा .
     छान छान वाचत राहा आणि आनंदी राहा .।
भेटू पुन्हा........