लंच ब्रेक चालू होता. पंकज चं जेवण आटोपलं होतं. तो खुर्चीवर येऊन बसला. त्याने मोबाईल हातात घेतला व गूगल वर टाईप केलं, 'गोल्ड नेकलेस '. त्याच्या मोबाईल मध्ये त्याला छान बारीक घडणावळीचे नेकलेस दिसू लागले. जवळच त्याची कलीग वर्षा उभी होती. दुरूनच तिची नजर त्याच्या मोबाईल वर पडली. ती मनात बोलली.
"लग्न झालेलं असतांना मिस्टर शिंदे मुलींचे फोटो बघताय! अफेअर वगैरे तर नसेल ना चालू यांचं? वहिनींच्या कानावर घालावं लागेल."
ती जवळ गेली.
"गोल्ड नेकलेस. अच्छा, म्हणजे तुम्ही नेकलेस बघताय का वहिनींसाठी! ( मी उगाच यांना वाईट समजत होते. हे मुलींना नाही तर मुलींनी घातलेल्या नेकलेस ला बघत होते. हे किती प्रेम करतात ना वहिनींवर ) वाह भारीच. खुप प्रेम करता वाटतं वहिनींवर. आमच्या ह्यांनी तर कधी द्यावं मला नेकलेस!"
तिने नाक मुरडलं.
"नेकलेस घेण्याचं कारण प्रेम नाही हो, भिती आहे."
तिने बहुधा ऐकलं नसावं.
"छान. चांगलं महागाचं घ्या बरं . दिवाळी येत आहे. वहिनी खुप खुश होतील."
किंमती बघून पंकज स्वतःलाच बोलला.
"या दिवाळीला दिवाळं निघणार नक्की."
तो संध्याकाळी ऑफिस मधून घरी परतत होता. चालतांना त्याची नजर एका बुकस्टॉल वर पडली. त्याची वेगाने चालणारी पाऊले थांबली. तो थोडा जवळ गेला. एका पुस्तकावर त्याची नजर स्थिर होती. त्याचं शीर्षक होतं, 'बायकोला हॅन्डल करायचे एकशे एक उपाय '. त्याच्या मनात लाडू फुटला. तो खुप खुश झाला. तो स्वतःला म्हणाला.
"वाह वाह वाह वाह, याचीच तर गरज होती मला!"
त्याने ते पुस्तक विकत घेतलं व तो घरी परतला. तो खुर्चीवर बसलेला होता. तेच रश्मी धावत त्याच्या जवळ आली. तिच्या हातात बेलणं बघून त्याची पाठ एकदम ताठ झाली.
"रविवारी नक्की जातोय ना आपण. तुम्हाला काही काम तर नाहीये ना. नाहीतर तुमचे बॉस रविवारी देखील तुमची आठवण काढतात. यावेळेस कुठलंच कारण मी ऐकून घेणार नाही बरं. आधीच सांगून ठेवते."
ती बोलतांना अनावधानाने डोळे मोठे करून त्याला बेलणं दाखवत होती.
"हो जातोय."
तो दबक्या आवाजात बोलला. ती किचनमध्ये निघून गेली. त्याने सुटकेचा श्वास सोडला व छातीवर हात ठेवला. तिच्या हातात बेलणं बघून तो घाबरलाच होता. त्याने फ्रेश झाल्यावर पुस्तक उघडलं. त्यात लिहिलेलं होतं, 'उपाय क्र. एक - सर्व बायकांना स्तुती खुप प्रिय असते' व त्याखाली त्या उपयाबद्दल सविस्तर माहिती होती. त्याने पुस्तक लपवलं व उपाय अंमलात आणण्यासाठी तो सज्ज झाला. जेवण आटोपल्यावर तो तिला बोलला.
"रश्मी, तू खुप सुंदर दिसतेस गं. तुला काय गरज आहे नेकलेस ची?"
"इश्श, काहीही!"
तो खुश झाला व मनात म्हणाला.
"चला, खुप मोठा खर्च वाचला. त्याने मनातच पुस्तक लिहिणाऱ्याला नमस्कार केला."
"बरोबर आहे तुमचं. मी खुप छान दिसते...... ( थोडं थांबून ) पण नेकलेस घातल्यावर अजून छान दिसेल. त्यामुळे नेकलेस तर मला हवाच आहे."
त्याच्या कानात एकच शब्द गुंजू लागला, 'पोपट '. ती झोपी गेली. तो निराश झाला.
"काही हरकत नाही. पहिला उपाय फेल गेला. अजून शंभर उपाय बाकी आहेत. बघुयात. हिंमत हारनेका नहीं."
नंतर त्याने पुढील उपायही आजमावून बघितले. तो तिच्यासाठी गजरा घेऊन आला. तिला जेवायला देखील घेऊन गेला. तिच्यासाठी एक साडी देखील आणली. पण तिचं नेकलेस पुराण काही संपलं नाही.
"हम्म्म्म, काय तर म्हणे बायकोला हॅन्डल करायचे एकशे एक उपाय. कशाचं काय? नुस्ता फालतूपणा. मी पण किती वेडा आहे. या असल्या पुस्तकांवर भरवसा करून बसलो. उगाच काहीही कल्पना रंगवत बसलो. नेकलेस चा खर्च तर वाचला नाही वरून इतर खर्च वाढवून घेतले. पुस्तकाचे पन्नास रुपये, गजऱ्याचे वीस, जेवणाचे सहाशे आणि साडीचे दीड हजार. खरंच म्हणतात ना की 'औरत को कोई नहीं समज सकता '. हा लेखक काय समजू शकणार आहे? आता कळलं की लेखकाचं नाव का नाहीये पुस्तकावर."
त्याने ते पुस्तक पलंगावर फेकलं व तो फ्रेश होण्यासाठी गेला. त्याच्या कानांवर पुढील शब्द पडले.
"बायकोला हॅन्डल करायचे एकशे एक उपाय. अच्छा, मला हॅन्डल करणार हा तुम्ही. इतकी वाईट आहे का मी की तुम्हाला अशी पुस्तकं वाचावी लागताय. फक्त एक नेकलेस तर मागितला होता. ते पण जास्त वाटत आहे का तुम्हाला? थांबा मी आज स्वयंपाकच नाही करत. नाही नाही आजच कशाला माझ्या गळ्यात नेकलेस पडेपर्यंत मी स्वयंपाक करणार नाही. तुम्ही पटकन बाहेर या. थोडी चर्चा करायची आहे तुमच्याशी."
तिने तिच्या बांगड्या थोड्या वर केल्या व तिचे दोन्ही हात कमरेवर ठेवले. ती बाथरूम च्या दरवाज्याकडे रोखून बघत होती. पंकज दुविधेत होता की बाहेर जावं की बाथरूम मध्येच थांबावं!
त्याने हळूच दरवाजा उघडून बघितलं. ती अजून तशीच उभी होती. तिच्या डोळ्यांत असलेल्या रागाचा त्याला जोऱ्यात चटकाच बसला. त्याने झटकन दार लावून घेतलं.
"ही काही हलत नाही वाटतं. मला बाहेर जावंच लागेल बहुतेक. या कुठल्या विळख्यात अडकलो मी? कुठून सुचली मला हे पुस्तक विकत घेण्याची कल्पना?"
"तुम्ही येत आहात की नाही बाहेर?"
तिच्या आवाजाने तो गडबडला. गडबडीने त्याच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. त्याने हळूच दरवाजा उघडला व तो मान खाली घालून चालू लागला. त्याने नजर वर करून बघितलं तर ती त्याला एका भयानक राक्षसासारखी दिसली व तिच्या हातातील बेलणं त्याला मोठ्या धारदार तलवारीसारखं दिसलं. त्याने झटकन नजर खाली केली. तो मनात म्हणाला.
"आज आपलं काही खरं नाही."
तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.
"मी इतका त्रास देते का तुम्हाला?"
ती हळू आवाजात अतिशय प्रेमाने बोलली. त्याने नकारार्थी मान हलवली.
"फक्त मान नका हलवू, तोंडाने सांगा की मी त्रास देते की नाही तुम्हाला."
डोळे विस्तारून व मोठा आवाज करून ती बोलली. त्याचे डोळे तिच्या वाढलेल्या आवाजाने गच्च बंद होऊन गेले.
"नाही देत. तू तर खुप चांगली बायको आहेस."
"मंग काय प्रॉब्लेम आहे?"
"काही नाही."
"नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही अचानक माझी स्तुती करत आहात , गजरा आणत आहात, जेवायलाही घेऊन गेलात, साडी पण आणली. वरतून हे पुस्तक, नक्कीच काहीतरी गडबड आहे."
"काही नाही गं."
"सांगा ना, प्लिज."
"अगं, आपण इकडे शिफ्ट झालो ना मागे, तर त्यामध्ये खुप खर्च झाला. या घराचं एक वर्षाचं डिपॉसिट भरावं लागलं वरतून माझी बाईक व ईतर गोष्टींमध्ये बराच खर्च झाला. त्यामुळे माझ्या मते तुझा नेकलेस जर आपण नंतर घेतला असता तर..... म्हणजे..."
ती थोडा वेळ शांत होती. नंतर ती हळू आवाजात बोलली.
"त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं? त्यासाठी एवढा आटापिटा करायची काय गरज आहे? ठीक आहे. जाऊद्या, नको मला नेकलेस."
"पुढच्या दिवाळीला नक्की घेऊ."
"नाही, नकोच मला नेकलेस."
"अगं, घेऊ ना पुढच्या दिवाळीला."
"नाही म्हणाले ना मी. नाही म्हणजे नाही."
तिचे वटारलेले डोळे बघून त्याला शांत राहणंच योग्य वाटलं.
"तुम्हाला टेन्शन देऊन मला शृंगार करायचा नाहीये. तसंही तुम्हीच तर म्हणाले होते की मी खुप सुंदर आहे. मला काय गरज आहे नेकलेस ची?"
त्याच्या डोळ्यांत पाणीच आलं. त्याला थोडं नवल वाटू लागलं. हे स्वप्न तर नाहीये ना याची खात्री करण्यासाठी त्याने स्वतःचाच चिमटा घेतला. त्याच्या तोंडातून किंकाळी निघाली. ती वळली.
"काय झालं?"
त्याला काय बोलावं सुचेना. तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं.
"अहो, ठेच कशीकाय लागली?"
ती मलम घेऊन आली व त्याच्या पायाला लावू लागली.
कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
ईराब्लॉगिंग वर माझ्या सर्व कथा मिळून दोन लाख views पुर्ण झाले आहेत. सर्व वाचकांचे मनापासून आभार. असंच प्रेम राहूद्या ????
आवडल्यास शेअर नक्की करा
©Akash Gadhave