बायको माझी नवसाची.. भाग २

कथा एका धांदरट बायकोची


बायको माझी नवसाची.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की मेघनाला बघायला छप्पनावे स्थळ आलेले असते.. आता एवढी स्थळे का आली होती, याचे कारण समजते का बघू या भागात..


" आणि हा आमचा आकाश.." आकाशची आई , सुधाताई ओळख करून देत म्हणाल्या. मेघनाने त्याच्याकडे बघितले आणि बघतच राहिली. अगदी तिच्या स्वप्नातला राजकुमारच जणू.. तो ही तिच्याकडे टक लावून बघत होता. ती लाजली. ते बघून तर त्याची नजरच हटेना. शेवटी पार्थ मध्ये बोलला,

" पोहे थंड झाल्यावर वातड होतात. मग चावायला त्रास होतो. त्यापेक्षा गरमागरम खाल्ले ना की चव कशीही असली तरी समजत नाही.. गार झाले की त्याची चव बिघडते मग तुम्ही म्हणणार आम्हाला पोहेच करता येत नाही.." तो अजून खूप काही बोलणार इतक्यात आईने पोहे द्यायला सुरुवात केली.

" असो, मेघनाला देऊ द्या ना.." सुधाताईंनी सुचवले. ते ऐकून मेघनाच्या आईच्या म्हणजे स्मिताताईंच्या पोटात गोळा आला. मागे लग्न जवळपास ठरत आले होते. चहाची दुसरी फेरी होती. मेघना चहा द्यायला म्हणून गेली. आणि नेमकी तिला शिंक आली.. पुढचा प्रसंग आठवून त्यांना हसायलाही येत होते आणि वाईटही वाटत होते. गरम चहा त्या मुलाच्या आईच्या साडीवर सांडला आणि मग त्यांनी जी बडबड केली.. बापरे बाप.. नकळत स्मिताताईंनी मान हलवली.

" अहो, कशाला नाही म्हणताय?"

" नाही.. म्हणजे आपलं मी दिले काय आणि तिने दिले काय? मेघना तू बस बाळ इथे.." मेघना नेमकी आकाशच्या समोरच बसली. त्याच्या नजरेने खरेतर ती कासावीस झाली होती.. पण उठायची सोय नव्हती. जुजबी प्रश्नोत्तरे झाल्यावर सुधाताईंनी सुचवले,

"मुलांना जर एकमेकांशी बोलायचे असेल तर बाहेर जाऊ दे का?" स्मिताताई आणि मधुकररावांनी एकमेकांकडे बघितले.

" तुम्हाला पटत नसेल तर राहू दे.. " श्रीधरराव म्हणाले.

" नाही.. तसं काही नाही. मेघना, जा ना यांना आपली बाग दाखवून ये.." स्मिताताई बोलल्या. मेघना आणि आकाश उठले. मेघना आकाशला घेऊन बागेत आली. त्याला काय बोलायचे पटकन सुचेना.


" तुमचे बाबा जरा कडक आहेत का?" त्याने विचारले. तिने पटकन त्याच्याकडे बघितले..

" नाही म्हणजे ते खूपच असे नको करूस, तसे नको करू म्हणत होते ना.." आकाशने सावरून घेतले.

" ते ना.. ते कडक नाहीत काही.. त्यांना ना माझे टेन्शन येते." मेघना हळूहळू मूडमध्ये येत होती.

" टेन्शन.. कसले टेन्शन?"

" ते मी ना, खूप धडपडते ना.. मग कधी तरी मला लागते.. मग त्यांना वाईट वाटतं. म्हणून ते काळजी घेतात." मेघना निरागसपणे बोलत होती. आकाशला तिचे फक्त हलणारे ओठ दिसत होते. ते शब्द मात्र त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते.

" तुमचे हे पहिलेच स्थळ आहे का?" मेघनाने विचारले.

" आं..." आकाशला समजलेच नाही.

" मी म्हटलं तुमचे पहिलेच स्थळ आहे का?" याला ऐकू येते का, हा विचार मेघनाच्या डोक्यात पिंगा घालू लागला.

" हो.. मी पहिल्यांदाच मुलगी बघायला आलो आहे.."

" तरीच.."

" तरीच काय?" आकाशने आश्चर्याने विचारले.

" एवढे घाबरले आहात.. मी बघा."

" हे तुमचे कितवे स्थळ आहे?" आकाशला तिच्याशी बोलायला मजा येत होती.

" मी मोजत नाही.. आईबाबा मोजतात. तुम्ही छप्पनावे."

" बापरे... एवढी स्थळं?? पण का? तुम्हाला कोणी आवडत नव्हते का?" आकाशला थोडा न्यूनगंड आला होता.

" माझे असे काही नाही.. मलाच नकार यायचा.."

" पण का? तुम्ही एवढ्या सुंदर, शिकलेल्या.. तरिही.. तुमचे काही..." आकाशने वाक्य अर्धवट सोडले.

" माझे काही काय?"

" प्रेम वगैरे?" आकाश अडखळत होता.

" प्रेम आणि माझे?" मेघना रडवेली झाली होती.. " माझ्यावर ना कोणीच प्रेम नाही करत. सगळे मला चिडवतात.. त्यांना वाटते, मी धांदरट आहे. थोडी वेंधळी आहे. माहितीये, माझ्या सगळ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड होते मी सोडून.." हे वाक्य ऐकून आकाशने सुटकेचा श्वास टाकला. पण मेघना मात्र बोलत होती.. आवेशात बोलता बोलता तिचा पाय घसरला. ती पडणार तोच आकाशने तिला सावरले.

" मी आहे ना तुझ्यावर प्रेम करायला. मेघना मला तू आवडलीस.. मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. तुला चालेल का?" मेघनाने पापण्यांची उघडझाप करून आपला होकार दिला.


नवरानवरीची पसंती तर झाली. पण आकाशला जमणार आहे का मेघनाला सांभाळणे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all