रुपाली जरी मामाची मुलगी असली तरी सनी तिला लहानपणासून बहिणीसारखाच जपत होता. किंचितही त्याच्या मनात तिच्याविषयी कधी वेगळी भावना नव्हती. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्याच विचार तर खुपच दूरची गोष्ट. तरीही राधाने सनीला रुपालीशी लग्न करण्यासाठी गळ घातली.
राधा सांगत होती की, "अरे सनी मामाने तुला लहानपणापासून सांभाळलेय, त्याचे तुझ्यावर खुप उपकार आहेत. तू लग्नाला नकार दिलास तर मामाला वाईट वाटेल, मामाचे मन दुखावेल."
राधा म्हणाली,"तू लग्नाला हो म्हण रे बाळा!". असा सर्वांना निराश करु नकोस. रुपाली चांगली मुलगी आहे. शिवाय तुझ्या मामाची मुलगी आहे.
खुप खुप समजावून सांगितल्यावर आईचे व मामाचे मन राखण्यासाठी नाइलाज म्हणून सनीने लग्नाला होकार दिला.
सनी मनापासुन यासाठी तयार नव्हता. त्याच्या मामाच्या उपकाराचे ओझे त्याच्या डोक्यावर असल्याचे राधाने त्याला पटवुन दिले तेव्हा कुठे तो या लग्नाला तयार झालेला,पण पुढं काय? सनीला काहीच सुचत नव्हतं.परिस्थितीपुढं तो हतबल झालेला, कारण आता आपण नकार दिला तर आपल्या आईचं व मामाचं मन दुखावेल. म्हणुन मग त्यानं स्वताच्याच मनाची समजूत काढली अन घरच्यांच्यासाठी लग्नाला तयार झाला. पण आपण काहीतरी चुक करतोय ही सल त्याच्या मनात सारखी टोचत होती. त्यामुळे सनी आतून खुप खचत चाललेला. अशा परिस्थितीतच त्याचं लग्न रूपालीशी लावून दिलं.
लग्नानंतर तर मग सनीच्या जीवाची घालमेल इतकी होऊ लागली की तो खुप एकटा एकटा राहू लागला. सतत काहीतरी विचार मनात घोळत ठेऊन वावरु लागला. त्याला मामाच्या घरी राहणं नकोसं वाटलं.
मग त्यानं आपल्या मामचं घर सोडून दुसरीकडं राहायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तो दुसरीकडे निवारा शोधून तिकडे एकटाच राहायलाही गेला. त्याने रूपालीला मामाजवळच ठेवले. कारण लग्नापुर्वी सनी रुपालीशी ज्या आपुलकीने मनमोकळे बोलायचा तो मनमोकळेपणाच आता राहिला नव्हता.
सनी तसा कष्टाळु व होतकरु माणूस. त्यामुळे त्याला कुणालाही त्रास द्यायला आवडतं नसे. आपला कुणालाच त्रास होऊ नये म्हणून तो एकटा राहून स्वत:ची कामे स्वत:च करु लागला. पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून एका कंपनीत कामाला जावू लागला.
तो कामधंदा करत होता एकाकी जगण्याचा प्रयत्नही करत होता, पण त्याच्या मनाने जो ध्यास घेतलेला तो त्याला सारखाच सतावत होता. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. त्याला सारखी हीच खंत वाटत होती की आपण जिल मनापासून बहिण मानले तिच्याशीच लग्न करुन बहिण-भावाच्या नात्याची फसवणुक केलीय.
हे खरं असतं की एखादं नात, आपण मनापासून स्विकारलं तर त्यात दुरावा होणे किंवा बदल होणे म्हणजे जीवाला लागलेली सलच असते. कोणतेही नाते कुणावरही लादू नये कारण लादलेली नाती ही कधी टिकत नाहीत याउलट मनापासून स्विकारलेली नाती ही जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.
सनी स्वत:लाच गुन्हेगार समजत होता. उपकाराची जाण म्हणा किंवा नाईलाज म्हणा पण आपण नात्याची फसवणुकच केलीय ही टोचणी त्याला स्वस्त बसू देत नव्हती. तो पुर्णणे खचून गेला होता. इतका खचला इतका खचला की सतत तोच तो विचार करुन त्याला अचानक त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याला वेड्याचे झटके येवू लागले
तो लहर येईल तसं वागू लागला. कधी कधी एकटाच उदास होऊन बसायचा त्याच्याच लहरीत राहायचा. जेव्हा त्या तंद्रीतून बाहेर येईल तेव्हा सर्वांशी व्यवस्थित बोलायचा. पण तरीही त्याच्या मनाने रुपालीला कधीच पत्नी म्हणून स्विकारले नव्हते.
हळूहळू सनीचा वेडेपणाचा आजार बळावतच गेला. काही केलं तरी आता रुपाली त्याची कायद्याने पत्नी होती आणि आपल्या नवऱ्याला त्याच्या सुख दु:खात साथ देणे हे भारतीय संस्कृतीत स्त्रीयांचे कर्तव्य किंवा धार्मिक परंपरा मानले जाते. त्यानुसार रुपाली एक बायको म्हणून सनीला साथ देऊ लागली.
सनीचा आजार जास्त वाढला तेव्हा रुपाली त्याला आपल्या वडिलांच्या घरी घेवून आली. ती त्याच्या आजारावर उपचार करत होती. ती एका पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडत होती पण तरीही सनी तिच्याकडे बायकोच्या नात्याने कधीच पाहात नव्हता.
राधा व रमेशने हे समजून यांच्या लग्नाचा घाट घातला की लग्नांनंतर ती दोघे आत्ता जरी नकार देत असतील तरी एकमेकांना पती पत्नी म्हणून स्विकारतील. सगळं सुरळीत होईल. पण तसं झालंच नाही. राधा व रमेशच्या नकळत झालेल्या चुकीची शिक्षा आता सनी व रुपाली भोगत होते.
जबरदस्तीच्या नात्याला काही अर्थच नसतो, मनाने जुळलेलं नातं आयुष्यभर टिकतं कारण ते जीवापाड जपलं जातं हेच त्यांच्या लक्षात आले नाही.
सनीने बहिणीचं नातं अगदी मनापासून जोडलेलं मग तो त्या नात्याला बायकोच्या नात्याशी कसं काय जुळवून घेईल?
मात्र रुपालीने लग्नानंतर सनीला नवऱ्याचा दर्जा दिला होता. जग रितीनुसार ती त्याला नवरा मानून बायकोची सर्व कर्तव्ये करत होती. तिने सनीला अनेकदा काकुळतीला येवून समजावून सांगितले की "हे बघा आता आपलं लग्न झालंय आपण नवरा बायको आहोत" .
पण सनीने ते कधीच स्विकारले नाही. उलट तोच तिला म्हणाला की" अग रुपाली मी तुला मनापासून माझी बहिण मानतो ना ग, मग तूच सांग आता 'बायको कसं म्हणू तुला मी'. तू तरी माझ्या मनाचा विचार कर ना!"
यावर रुपाली निरुत्तर व निराश होऊन शांत बसायची.
सनीला खुप वेळा शॉक ट्रिटमेंटही दिली पण तरीही त्याचा आजार काही आटोक्यात आलाच नाही. दिवसेंदिवस वेड्याचे झटके वाढतच गेले. अन् एक दिवस त्यातच तो रुपालीला आणि या जगाला सोडून कायमचाच निघून गेला. या जगाचा त्याने शेवटचा निरोप घेतला पण जाताना त्याच्या चेहऱ्यावर या नको असलेल्या व जबरदस्तीने लादलेल्या नात्यापासून कायमची सुटका मिळाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
समाप्त
सौ.वनिता गणेश शिंदे©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा