बायको कसं म्हणू तुला मी- भाग- १

बायको कसं म्हणू तुला मी


*बायको कसं म्हणू तुला मी* भाग - १

       स्वभावे शांत अन् कष्टाळू अशी ही जोडी म्हणजे राधा आणि किसनची. हे दोघे एका छोट्याशा गावात राहून, मोलमजूरी करुन आपला उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपुर्वी नुकतच लग्न झालेलं हे नवं जोडपं. ते एकमेकांशी खुप प्रेमाने वागत होते. तसे ते अनोळखीच, पण त्यांच्याकडे पाहिले की त्यांच जणू जन्म जन्मांतरीचे नाते असल्यासारखे वाटायचे. तसं पाहिलं तर त्यांच्या दृष्टीने त्यांचं जीवन खुप सुखाचं आणि आनंदाचंच होतं. इतर नवरा बायको सारखे तेही आपल्या संसाराचा गाडा चालवत होते आणि त्यात ते सुखी व समाधानी होते.

       कालांतराने काही वर्षातच राधाला दिवस गेले, तिने ही बातमी किसनला सांगितली. राधा गरोदर असल्याचे कळताच किसनच्या आनंदाला पाराच उरला नाही. आपण बाप होणार या कल्पनेनेच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो खुप खुश होता. आता आपल्या बायकोला चांगलं जपायचं तिची नीट काळजी घ्यायची असं त्याने ठरविलं. मनोमन त्याने अनेक स्वप्ने रंगविली होती.

       पण बहुतेक नियतीलाच ते मान्य नव्हते, म्हणूनच की काय काळाने त्याच्यावर झडप टाकली. राधा पोटुशी असताना एके दिवशी अचानक किसनला हृदय विकाराचा झटका आला त्यात तो मरण पावला आणि त्याची सारी स्वप्ने त्याच्यासोबतच निघून गेली. त्या दोघांच्या सुखी संसाराला जणू कुणाची तरी दृष्टच लागली. राधाला अशा अवस्थेत तो एकटीला अर्ध्यावरच सोडून गेला.

       राधा खुप एकटी पडलेली. धायमोकलून रडत होती. पण नियतीपुढं कुणाचेच काही चालत नाही. आता किसनच्या आठवणीत फक्त झुरत बसणे इतकंच तिच्या हाती राहिलेलं. किसनच्या मृत्युनंतर राधाचा भाऊ रमेश हा तिला आपल्या घरी म्हणजे राधाच्या माहेरी घेवून गेला. ती पोटुशी होती त्यामुळे तिला एकटीला सोडने योग्य नव्हते.

        अशा अवस्थेत कुणातच्यी तरी आधाराची खुप गरज असते. तेव्हा रमेश हाच तिचा खंबीर आधार बनला. नवऱ्याच्या दु:खातून सावरणे तिला खुप कठीण जात होते. पण होणाऱ्या बाळासाठी अन् किसनची शेवटी आठवण तिच्या पोटात वाढत होती त्यासाठी जीवन जगणे तिला गरजेचेच होते.

         काही महिन्यातच राधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगा होता तो. राधाने त्याचे नाव सनी ठेवले. कारण किसनला हे नाव खुप आवडायचे व त्याचा आठवण म्हणून तिने ते नाव ठेवले. मनातील दु:ख विसरून आता राधा सनीमध्ये रमुन गेली. तिने आपलं सगळं आयुष्य त्याच्यासाठीच जगायचं असही ठरवलं. अशीच काही वर्षे लोटली. पण राधाच्या आयुष्यात वेगळच काही तरी घडणार होतं.

        राधा जवान होती, तिच्यापुढे तिचे संपुर्ण जीवन पडलेलं. अशात तिने एकटीने ते व्यथित करायचे म्हणजे खुप अवघड काम. एके दिवशी रमेशजवळ (राधाचा भाऊ) कुणीतरी व्यक्तीने राधासाठी दुसरे स्थळ सुचविले. त्या व्यक्तीने सर्व समजावून सांगितले की राधाने लग्नास होकार दिला तर ती पुढचे आयुष्य खुप सुखात जगेल. तिलाही कुणीतरी हक्काचे माणूस मिळेल. अशी एकाकी जीवन कुठंवर जगणार ती बिचारी. तिलाही कुणीतरी हवचं की. रमेशने यावर फार विचार केला मग त्यालाही ते पटलं. तेव्हा त्याने राधाला दुसरं लग्न करायला तयार करायचा निर्णय घेतला.

            रमेशने राधाची खुप खुप समजूत काढली, ती सुरुवातीला दुसरे लग्न करायला अजिबातच तयार नव्हती. ती किसनला विसरु शकत नव्हती पण रमेशच्या शब्दापुढे तिचे काही चालले नाही. रमेशने विनवण्या करुन तिला दुसऱ्या लग्नासठी तयार केलेच. नाइलाजाने का होईना पण आता राधाही तयार झाली, तिने दुसऱ्या लग्नाला होकार दिला व तिचे लग्नही झाले.

क्रमश:

सौ.वनिता गणेश शिंदे©️®️

🎭 Series Post

View all