Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

बायको आली म्हणून आई रिटायर्ड होत नाही..

Read Later
बायको आली म्हणून आई रिटायर्ड होत नाही..


"अगं प्रेरणा झाला का ग डबा रेडी..? आवर पटकन् किती वेळ अजून?"

ऑफिसची तयारी करता करता प्रशांतचा प्रेरणा, प्रेरणा असा जप सुरुच होता.

"झालं रे, दोनच मिनीट."... प्रेरणाही धावतपळत का होईना पण वेळेतच सगळ्या गोष्टी प्रशांतच्या हातात देत होती.

"प्रेरणा दे मी भरते डबा, तू आवर बाकीचं."
प्रेरणाची धावपळ पाहून सवयीप्रमाणे सासूबाई बोलल्या.

"अहो नका आई, हे काय झालंच की."

"अगं प्रेरणा आवर पटकन्,खूप उशीर झालाय मला."
तिकडे प्रशांतचा आरडाओरडा सुरूच होता.

"अरे सावकाश, हे घे." म्हणत प्रेरणाने प्रशांतच्या हातात डबा दिला. प्रेमाने त्याला बाय केलं आणि "दमले ग बाई" म्हणत वर्तमान पत्र उघडून वाचत बसली.

तिकडे वसुधा काकूंनी तोपर्यंत किचन कट्टा घासून पुसून लख्ख केला. मोठ्या कढईतील भाजी छोट्या पातेल्यात काढून ठेवली. सगळं कसं अगदी सवयीप्रमाणे त्यांनी जागच्या जागच्या ठेवलं. कामाची सवय त्यामुळे त्यांना शांत काही बसवत नव्हतं. पण प्रेरणा घरात आल्यापासून त्यांची अर्धी जबाबदारी कमी झाली होती.

पण आज का कोण जाणे त्यांचे मन त्यांना खात होते.
"निदान आज तरी प्रशांतच्या हातात डबा देण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले असते तर... निदान आज तरी \"आई येतो ग\" हे शब्द कानी पडले असते. पण आजकाल ठरवून पण वसुधा काकूंच्या मनासारखे काहीच घडत नव्हते .

घरात इन मीन चार माणसे. सुधाकर काका, वसुधा काकू, त्यांचा मुलगा प्रशांत आणि सून प्रेरणा.

सहा महिन्यांपूर्वी प्रशांत आणि प्रेरणाचे लग्न झाले होते. प्रेरणा घरात आली तेव्हा पासून प्रशांत जणू "आई" म्हणने हळूहळू विसरत चालला होता.

पुन्हा एकदा आजची वसुधा काकूंची धडपड फुकट गेली. नेहमीप्रमाणे काका बाहेरून फिरुन आले. वसुधा काकू किचन मधेच घुटमळत होत्या. इकडची तिकडची धूळ साफ करत होत्या. सून प्रेरणा सवयीप्रमाणे वर्तमान पत्र वाचत बसली होती.

"प्रेरणा जरा पाणी आणतेस का ग?" बाबा म्हणाले

"हो बाबा.."

"आई..जरा पाणी देता का ओ बाबांना?"

बाकी काहीही न बोलता वसुधा काकूंनी पाण्याचा ग्लास काकांच्या हातात दिला नि पुन्हा त्या आत निघून गेल्या.

सुधाकर काकांना सारं काही दिसत होतं. पण कोणाला आणि काय बोलणार ना?
"शेवटी आपलेच दात नि आपलेच ओठ."
असे म्हणत ते सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले होते आता. आणि वसुधाने देखील ते लवकरच शिकून घ्यावं. अशी त्यांची अपेक्षा होती.

पण लेका सुनेच्या बाबतीत मित्रांचे अनुभव पाहता ते थोडे घाबरूनच राहत होते. घरात वाद होणार नाहीत याची ते पुरेपूर काळजी घेत होते.

लग्न झालं नि प्रशांत अचानक बदलला, याची जाणीव काका काकू दोघांनाही होत होती.

"हे बघ सुधा, आपलं वय झालं आता. मीही रिटायर्ड झालो नोकरीतून. आता तुझी पाळी आहे, संसारातून रिटायर्ड होण्याची. उगीच वाजवी अपेक्षा ठेवू नकोस मुलाकडून."

"अहो पण संसारातून रिटायर्ड होणं सोप्पं आहे हो,अवघड आहे ते म्हणजे "आई" या पदावरून रिटायर्ड होणं. मला एक सांगा, आई कधी रिटायर्ड होत असते का ओ..?"

"नाही ग. आई ही पदवी तिला सहजासहजी नाही मिळत. नऊ महिने आणि नऊ दिवसांची ती कठोर तपश्चर्या असते तिची."

"हो ना तुम्हालाही पटतंय ना हे? मग मला एक सांगा, बाळ जन्माला आल्यावर त्याच्या तोंडून "आई" ही पहिली हाक ऐकण्यासाठी प्रत्येक आई जशी आतुर झालेली असते, अगदी तसेच मी आजही मोठया आशेने वाट पाहत असते प्रशांतच्या तोंडून "आई" हा शब्द ऐकायला. पण आजकाल तो दुर्मिळ होत चाललाय ओ. माझी अजिबात तक्रार नाही त्याबाबतीत. मुलांनाही त्यांचे स्वतंत्र आयुष्य जगण्याची मुभा ही हवीच. पण ह्या वेड्या मनाचे काय? त्याला कसे समजावू तेच कळत नाही मला. आजकाल प्रशांतचे विश्र्वच बदललंय असं वाटत राहतं नेहमी. "

वसुधा काकूंच्या डोळ्यासमोर, त्यांचा आईपासून ते सासू पर्यंतचा हा प्रवास झरझर तरळला.

पूर्वी "आई" नावाचा सुरू असलेला जप जेव्हा अचानक बंद होतो तेव्हा आई अचानक निवृत्त होते असेच फील प्रत्येक आईला येत असणार, यात मुळीच शंका नाही.

मनाशीच विचार करत बसलेल्या वसुधा काकू सायंकाळी आशेने लेकाच्या येण्याची वाट पाहत होत्या.

बेल वाजली, उठू की नको? ह्या विचारात असतानाच, किचनमधून प्रेरणाचा आवाज आला, "आई जरा दार उघडता का ओ? माझे हात भरलेत पीठाने."

वसुधा काकूंच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

दमून भागून प्रशांत घरी आला. लेकाला पाहून आईला वेगळाच आनंद झाला.

हातातील बॅग टेबलवर भिरकावत सोफ्यावर टेकता टेकता प्रशांत बोलला, "प्रेरणा पाणी आण ग. खूप दमलोय ग आज."

"आई देता का हो पाणी?" प्रेरणाने सासूला आवाज दिला

आईने मग प्रशांतला पाणी दिले.

"आई , आज तुझ्या हातचा आल्याचा गरमा गरम चहा करतेस का ग? रोज बनवायची तसा.

"हो आई तुम्ही चहा ठेवा, मी खाली जावून पटकन् पारले बिस्कीट घेवून येते."

आज तर वसुधा काकूंचा आनंद गगनात मावत नव्हता. आई हा शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेले त्यांचे कान आज तृप्त झाले होते. प्रेरणा आणि प्रशांत दोघांचेही वागणे अनपेक्षीत होते आई बाबांसाठी.

प्रेरणा मग बिस्कीट घेवून आली. साऱ्या घरभर आल्याच्या चहाचा सुगंध दरवळत होता.

"अहाहा...आई आण ग लवकर, कंट्रोल होत नाही आता. कित्ती दिवसांनी आज तुझ्या हातचा स्पेशल चहा मिळणार आहे."

वसुधा काकूंनी मग गरमागरम चहा कपात ओतला. तोपर्यंत प्रेरणाने पारले बिस्कीट ट्रे मध्ये काढून ठेवले. आज खूप दिवसांनी एकत्रितपणे चहा बिस्कीटचा बेत रंगला होता.

वसुधा काकू मग प्रेरणाला प्रशांतच्या लहानपणीच्या आठवणी सांगण्यात मग्न झाल्या.

"ये आई, ह्या पारले बिस्कीटमुळे साऱ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ग. पण आता मीही ठरवलंय, रोज ऑफीसमधून आल्यावर आई तूच बनवायचास ग यावेळचा चहा."

"ये बाबा, पण आता रोज रोज नाही हा असा स्पेशल चहा तुला मिळणार." बाबा मधेच बोलले.

"नाही मिळणार म्हणजे..?? काय बोलताय हे बाबा.??

"हो म्हणजे तुझी आई तिच्या संसारातून रिटायर्ड व्हायचं म्हणतीये. दुपारीच बोलली ती मला तसं."
हलकेच वसुधाकडे पाहून बाबांनी डोळा मिचकावला.

"आता मी नाही का रिटायर्ड झालो माझ्या कामातून, मग तिने तरी का तिची ड्युटी करत राहायचं ना? रिटायर्डमेंट काय फक्त पुरुषांनाच लागू असते का?
आणि तसंही एकदा का मुलांचा संसार सुरू झाला की मग आई वडिलांनी निवृत्ती घेतलेलीच बरी असते रे बाबा."

"नाही आ बाबा, हे अजिबात नाही चालणार. आईंशिवाय मी नाही एकटी हा संसाराचा गाडा ओढू शकत.".. प्रेरणा

"पण मग रोज फक्त "आई" हा शब्द ऐकण्यासाठी तिला एवढी मोठी गुंतवणूक करावी लागणार असेल तर मग तसं पाहिलं तर ती खूपच लॉसमध्ये आहे, असं मला तरी वाटतं. म्हणून मग तिने रिटायर्डमेंट घेतलेलीच बरी"... बाबा

"पण बाबा त्याबदल्यात जर मला आईंकडून रोज असे नवनवीन किस्से ऐकायला मिळणार असतील आणि पारले बिस्किटचा हा गोडवा जर रोजच आपल्या या घराला नवी ऊर्जा देणार असेल तर मग आईंनी केलेली ही गुंतवणूक माझ्या दृष्टीने तरी फायद्याची आहे बरं का.".. प्रेरणा

"अगदी बरोबर आहे तुझं प्रेरणा, पण हीच गुंतवणूक घरातील प्रत्येकाच्या अगदी समान पद्धतीने कामी यावी एवढीच अपेक्षा आहे माझी. या गुंतवणुकीच्या बदल्यात योग्य नफाही मिळणे तितकेच गरजेचे नाही का?"

आई बाबांचा रोष प्रशांतला समजला होता. बाबांनी देखील त्याच्याच भाषेत त्याला तो समजावला होता.

"आई बाबा, चुकलं ओ माझं. पुन्हा अशा क्षुल्लक चुका नाही होणार माझ्या हातून, याची काळजी मी नक्कीच घेईल."...प्रशांत

"आणि आई बाबा मीही नक्कीच प्रयत्न करेल त्यासाठी. पण एका अटीवर..." प्रेरणा

"अट...ती आणि कोणती.?"...बाबा

"यापुढे चुकूनही तुम्ही म्हणायचं नाही... "आई रिटायर्ड होतेय" म्हणून. तसा विचारही करायचा नाही. चुकलेच जर काही आमचे तर हक्काने कान ओढायचे. तो तुमचा अधिकारच आहे. आणि माझ्या समोर तुम्ही प्रशांतचेही कान ओढायला मागे पुढे पहायचे नाही."

"तसं आजच्या पुरतं तुमचं काम प्रेरणाने केलंय म्हणा. पण उद्या पासून तुमचं तुम्ही करा.".. प्रशांत

"म्हणजे....??" आई बाबा आश्चर्यचकित होवून बोलले.

"म्हणजे तुमची दुपारची आईच्या रिटायर्डमेंट बद्दलची चर्चा तिच्या कानी पडली आणि तिने लगेचच मला फोन करून माझे कान ओढले ओ."...प्रशांत

"आई मला माफ कर ग. नाही लक्षात येत काही गोष्टी आमच्या. प्रत्येक आईची छोटीशी अपेक्षा असते. पण तीही मुलगा म्हणून मी नाही पूर्ण करू शकलो. पण यापुढे मात्र नक्की काळजी घेईल मी."

"आई माझेही चुकलेच ओ. नवीन आहे ना अजून संसारात. थोडं समजून घ्या. तुमच्या अनुभवांची शिदोरी मला माझ्या रिटायर्डमेंट पुरवायची आहे बरं का."

प्रेरणाचे हे वाक्य ऐकून सगळेच हसायला लागले. त्या दिवसानंतर मात्र प्रशांतने झालेल्या चुका पुन्हा कधीच केल्या नाहीत. प्रेरणा बरोबरच आईचेही मन तो आनंदाने जपू लागला. या कामात प्रेरणाने देखील त्याला उत्तम साथ दिली बरं का.

आता मात्र वसुधा काकूंना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस व्याजही मिळत होते आणि मिळणारा हा नफा फक्त लेकाकडूनच नाही तर सुनेकडून देखील भरभरुन मिळत होता. प्रेमाच्या ह्याच जमापुंजीवर आजही वसुधा काकू समाधानी आयुष्य जगत होत्या. रिटायर्ड होण्याचा विचार तर आता त्यांच्या मनालाही शिवत नव्हता.

हे सर्व तेव्हाच शक्य झाले जेव्हा सासू सुनेच्या नात्यात पारदर्शकपणा आला.

थोडक्यात,

नवरा हा फक्त एकट्या बायकोचा नसतो..
त्याआधी तो मुलगा असतो त्याच्या आईचा..
बायको आल्यावर मग आई मागे पडते..
आईशिवाय आधी कधी त्याचे पानच हलत नव्हते..
पण बायको आल्यावर मात्र,
आई म्हणायलाही त्याच्याकडे फुरसत नसते..
"मग लग्नानंतर मुलगा बदलला",
असे म्हटले तर थोडीच ना वावगे ठरते.
हळूहळू मग आई रिटायर्ड होत जाते मुलाच्या डिक्शनरीतून.
पण रिटायर्ड होत नाही ती त्याच्या मनातून..
व्याकुळ असते ती नेहमी फक्त "आई" या एका हाकेसाठी..
दिवस रात्र झटते ती मुलाच्या आनंदासाठी..
बायको आणि आई यांच्या मध्ये मरण होत असते नेहमी मुलाचे..
आईचे मन जपले तर बायको नाराज होता कामा नये आणि
बायकोचे मन राखले तर आईने नाराज होवू नये..
संसाराची सुरू झालेली ही कहाणी
सासूनंतर सुनेने जपावी..
पण एकमेकींच्या भावनांची कदरही एकमेकींनीच ठेवावी..
हक्क दोघींचाही समान असे त्याच्यावरती,
मग माझा माझा करत त्याला न जखडावे बंधनाच्या बेडीत..
घराचा आनंद असतो नेहमी आई आणि बायकोच्या हाती..
एकमेकींना समजून घेतच ओढायची असते संसाराची ही गाडी..
बायको आली म्हणून आई कधी रिटायर्ड होत नाही,
मायेच्या दोन अक्षरांनीच तिला नेहमी बढती द्यावी..
सासूच्या अनुभवांची शिदोरी सुनेच्याही कामी यावी..
आनंदाने वाढवावी सुखी संसाराची गोडी..

धन्यवाद...

©® कविता वायकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//