बायकोचं पत्र

baykoche patra

बायकोचं पत्र # कथालेखन

प्रिय अमेय ,
          खरं तर आजच्या या सोशल मिडियाच्या जमान्यात मी हे पत्र लिहीले आहे  हे जरा  वेगळेच आहे पण पत्र लिहायची आणि वाचायची मजा काही औरच.आपल्या मनात बरेच काही बोलायचं किंवा सांगायचं असतं जे की आपण समोरासमोर व्यक्त करू शकत नाही त्यासाठी पत्र हा ऊतम मार्ग आहे. 
     एका सैनीकाची पत्नी म्हणुन मला तुमचा सार्थ अभिमान आहे.लोक,समाज मला जेव्हा सैनीकाची पत्नी म्हणुन हाक मारतात तेव्हा मला खुप भरून आल्यासारखं होते. 
                 पत्राची सुरुवात कुठून करू मलाच कळणांस झालंय. जेव्हा माझ्या घरी माझ्या लग्नाची चर्चा होती तेव्हा मी लग्नाबद्दल, भावी नवरयाबद्दल खुप स्वप्ने रंगविली होती. मला वाटत होते की जसे आजुबाजुला माझ्या मैत्रीणींसारखं माझे पण एखाद्या शिक्षक,इंजिनिअर किंवा एखाद्या खाजगी नोकरदाराशी माझे लग्न होईल असे स्वप्न वाटले होते. 
                     एके दिवशी आमच्या जवळच्या नातलगाने तुमचं स्थळ आणलं.आई-बाबांनी प्रथम थोडा विरोधच केला, मला पण जरा वेगळेच वाटले होते पण मग मीच तयार झाले. मग तुम्ही मला बघायला आमच्या घरी पहिल्यांदा आले तेव्हा मी आणि माझी मैत्रीण तुम्हाला खिडकीतून लपून बघत होते.तुम्हाला बघून मी गालातल्या गालात हसले होते, तुमचं ते राजबिंडं व्यक्तीमत्व मला खुपच भावलं होते. नंतर आपण एकमेकांना पाहिले, पसंती आली,सर्व मंडळी भेटली आणि एक दिवस तुम्ही मला अचानक भेटायला बोलावले.आपण माझ्या बहिणीच्या घरी भेटलो तर तिथे तुम्ही मला चक्क नकार दिला.मला काही कळतंच नव्हते पण जेंव्हा तुम्ही मला तुमच्या धोक्याच्या नोकरीमुळे नकार देत आहात असे समजावत होते तेव्हा माझा तुमच्याप्रती असलेला आदर,विश्वास अधिकच वाढला.
     नंतर आपले लग्न धुमधडाक्याने  झाले,सगळ्या पंचक्रोशीत आपल्या लग्नाचीच हवा होती. आपण देव देवतेला फिरलो, तुमच्या सोबतचे ते सुखी क्षण आजही एक रोमांच आणतात. तुम्हाला जास्त दिवस रजा नसल्यामुळे तुम्ही काही दिवसांनी परत कामावर रुजू झाले. तुम्ही जाताना मी जरा हिरमुसले होते पण नंतर मला तुमची देशसेवेची निष्ठा कळाली आणि मी हसतमुखानं तुम्हाला निरोप दिला.
        तुम्ही गेल्यानंतर मी कामात मन गुंतवू लागले. तुम्ही मला नेहमी म्हणता की तु एखाद्या दुसर्याशी लग्न केले असते तो तुझ्या जवळ राहिला असता, त्याने तुला राणीसारखं ठेवलं असतं पण तुम्हाला सांगु का मी आजही राणीच आहे, एका देशभक्त राजाची राणी !
                    तुम्हाला इकडची काळजी वाटत असेल पण तुम्ही इकडची अजिबात काळजी करू नका. आईंना ( माझे आणि सासुबाईंचे नाते आत्ता सासु-सुनेचे न राहता माय-लेकीचे झाले आहे. ) तुमची खुप काळजी वाटते . बाबांना पण तुमची आठवण आली की डोळ्यात पाणी येते पण ते जाणवु देत नाहीत पण तुम्ही इकडची काळजी नका करू आणि हो तुम्हाला एका गोड बातमी सांगायची आहे बरं, तुम्ही लवकरच बाबा होणार आहात. इकडे माझे आता खुप लाड होत आहेत.मागच्याच आठवड्यात माझे आई-बाबा येऊन गेलेत.दादा पण आला होता.सगळे तुमचं कौतुक करत होते.
       बरं ठीक आहे, काळजी घ्या, जेवण वेळेवर करायला विसरू नका, नाहीतर कामाच्या गडबडीत तुम्हाला जेवणाची सुध्दा आठवण रहात नाही. 
मी इकडे घर सांभाळते,आपला संसार सांभाळते,तुम्ही तिकडे देश सांभाळा. 

                                             तुमचीच लाडकी ,
                                                     मंजिरी