Jan 19, 2022
नारीवादी

बायकोचे पत्र

Read Later
बायकोचे पत्र

शितल ठोंबरे...(हळवा कोपरा)

बायकोचे पत्र...

#कथालेखन
.....

पत्रास कारण की,
तुझ्या पासून दूर जाण्याला आज दहा वर्ष
लोटली...या मधल्या काळात माझ्या कडून किंवा तुझ्या कडूनही...कोणत्याही प्रकारच्या संपर्काचा प्रयत्न झाला 
नाही...

भेटिगाठीचा प्रयत्न झाला नाही ते ही बरे...उगाच भावनिक गुंतवणूक नकोच होती मला...त्या दिवशी मी घरातून कायमची बाहेर पडले...तू मला थांबविण्याचा निष्फळ प्रयत्नही केला नाही...मी ही तशी अपेक्षा ठेवली नाही...

जे झालं ते चांगलच झालं ...जे होईल ते ही चांगलच होईल असाच विचार करून तुझं घर सोडण्याचा निर्णय घेतला मी...खूप विचारांती...फार अवघड होतं..पण अशक्य नव्हतं...

आज मी तुला हे पत्र लिहिते आहे ...त्याच कारण तुझे धन्यवाद  मानायचे आहेत..

काल महिला दिनानिमीत्त महाराष्ट्र शासना तर्फे आदर्श समाज सेविकेचा पुरस्कार मिळाला...तो स्विकारताना तुझी आठवण तीव्रतेने झाली...कारण हा पुरस्कार केवळ तुझ्यामुळेच मला प्राप्त झाला आहे...

तुला प्रश्न पडला असेल ना? या दहावर्षात काहीही संपर्क नसताना तुझ्या मुळे मला पुरस्कार कसा मिळाला...

तेच सांगतेय तुला...तू नसतास तर कदाचित माझ्यातील समाजसेविका कधी जागीच झाली नसती...

मला घडविण्याची प्रक्रिया तू अगदी आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच केली...

तू पहिल्यांदा जेव्हा मला पहायला आमच्या घरी आलास ...तुझा रुबाबदारपणा पाहूणच मी तुझ्या प्रेमात पडले...पण म्हणतात न दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ..अन मीही फसले..अगदी माझे कुटुंबही...तुझ्या गोड गोड बोलण्याने भुलले...

फारसं जाणूनही घेता नाही आलं तुला...एक महिन्याच्या अंतरावरच आपल्यावर अक्षता पडल्या...अन मी गोखले वरून मोहिते झाले...

अन इथूनच सुरु झाला तो जीवघेणा प्रवास सुरु...लग्नानंतर आपण फिरायला महाबळेश्वर ला गेलो..तिथेच पहिल्यांदा तुझं खरं रूप समजलं...तुला आठवत असेल कदाचित...आपल्या सारखच आणखी एक कपल आपल्या हॉटेल मध्ये उतरल्ं होतं..अगदी बाजूच्याच खोलीत...माझा फोन चुकून रुम मधे राहिला...तो आणण्यासाठी मी वर गेले..पण मला लॉक ओपन होईना शेजारच्या खोलीतील तो माणूस त्याचवेळी बाहेर पडला..मी त्याच्या कडून मदत घेतली व लॉक उघडले ...तुला जेव्हा हे समजले..तुझं माझं पहिलं भांडण तेव्हाच झालं

तुझ्यामते मी जाणून बुजून परपुरूषाशी बोलण्याचा प्रयत्न करते...तुझा संशयी स्वभाव तेव्हाच माझ्या लक्षात आला..पण गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता...

त्यानंतर तुझी एक एक रूपं माझ्यासमोर उलगडत गेली...मला नोकरी करायची होती...पण तुझा संशयी स्वभाव आड येत होता...मी बाहेर जाईन ...लोकांत मिसळेन...कामानिमित्त पुरूषांशी संबंध येईल...आणि तेच तुला नको होतं...

घरात कामाला बाई नाही...मदतिला कोणी नाही...सगळ्यांच मलाच करावं लागत होतं...तुझ्या कडे कधी तक्रार केली तर उलट मलाच ऐकवायचास...जेवण बनवतेस म्हणजे उपकार नाही करत आमच्यावर...तुझं ते कामच आहे...आणि तसही तुला आणली आहे कशासाठी...

तुझं माझ्याप्रती काही कर्तव्य आहे याची तुला जाणीवच नव्हती...तुझं कुटुंब ही तुला सामिल...त्यांची तक्रार ऐकून तू माझ्याशी वाद घालायचास...पण माझी बाजू कधी ऐकूनच घ्यायचा नाहीस...

लग्नाला चार वर्ष झाली तरी पाळणा हलला नाही...दोष कोणातच नव्हता ...तुला ही ते चांगल माहित होतं...डॉक्टर म्हणाले होते...मूल होईल पण कधी ते सांगता येणार नाही...

तुझ्या घरच्यांना नातवंड पहायची घाई झालेली..त्यांनी तुझ्यासमोर दुसरया लग्नाचा प्रस्ताव ठेवला...तू क्षणाचाही विलंब न लावता होकार दिलास...एकदाही माझा विचार नाही आला तुझ्या मनात...

इतके दिवस मी सारं सहन केलं...पण माझी जागा कोणी दूसरं घेणार तो विचार सहनच नाही झाला मला...तू ज्या दिवशी मुलगी पहायला गेलास..त्याच दिवशी मी घरातून बाहेर पडले...

आईवडिलांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता...कारण इथून पुढे मला माझ्या साठी जगायचं होतं..

म्हणूनच माझ्या एका मैत्रीणीच्या ओळखीने मी एका अनाथाश्रमात कामाला लागले...तिथे माझी राहण्याची ,खाण्याची सोय तर झालीच पण मला आई हाक मारणारी शेकडो मुले भेटली मला...

त्यांच्यात राहून अश्या अनाथ मुलांच्या विकासासाठी मी काम सुरु केले...आज माझी ओळख अनाथांची आई म्हणूनच आहे...

या मुलांच शिक्षण ते लग्न सगळं मी पाहते...या मुलांनी ही मला लळा लावला...तळागाळातील मुलांना शोधून त्यांची इथे योग्य सोय केली जाते...आज कित्येक वर्ष मी हे काम अव्याहतपणे करत आहे...

अन त्याच साठी शासनाने हा पुरस्कार जाहीर केला...

या पुरस्काराचा खरा मानकरी तू आहेस...तुझा संशय,सततचा होणारा अपमान मला अधिकाधिक खंबीर करत गेला...मला घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यायला तूच धीट बनवलसं...

तुझ्याकडून मला जर प्रेम मिळाल असतं तर कदाचित मला हे शक्य झालं नसतं...कुटुंबालाच सर्वस्व मानंत आयुष्य काढलं असतं...

त्यामुळे तुझे शतशः आभार मला कणखर,खंबीर बनवून माझं आयुष्य घडविल्याबद्दल....अन समाजाला एक समाजसेविका दिल्याबद्दल मी तुझी अत्यंत ऋणी आहे...

धन्यवाद....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shital Prafful Thombare

Teacher

आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते