बावळट तुम्ही !

तमाम नवरे मंडळींना नाही. तुम्हाला उद्देशून म्हणते मी. माझं ऐकत जा जरा. रोजचा पेपर वाचत चला. कोण क?

हे वाक्य नितीनच्या बायकोने त्याला उद्देशून म्हटले. ” असा काय नवा बावळटपणा मी केला, सांग ना ? ” अजय देवगणसारखा निर्विकार चेहरा  ठेवून नितीनने सुलभाला विचारले.  

” तुम्ही एवढे सरकारी नोकर, पंचवीस वर्षे सर्व्हिस झाली तुमची, आणि कोणत्याच स्कॅममध्ये तुमचं नाव नाही ? “

” मग हे चांगलं की वाईट ? ” 

” केव्हाही वाईट. आणि नुसतं वाईट नाही, तर याला बावळटपणा म्हणेन मी. जगात चांगलं काय, वाईट काय, हेच मुळी समजत  नाही तुम्हाला. हा बावळटपणा नाही तर काय ? “

” चांगलं काय, वाईट काय हे कळत असतं तर लग्नच तुझ्याशी कसं केलं असतं ? “ -नितीन

” सारखेसारखे तेच फालतू जोक्स  करू नका.” -सुलभा

” यात काय फालतूपणा ? ही   फॅक्ट नाही का सुलू ? ” 

” स्कॅमबद्दल बोलत होते मी. जग कुठे चाललंय, तुम्ही कुठे आहात. ही फॅक्टपण जरा लक्षात घ्या.”

” स्कॅममध्ये नाव असणं चांगलं ? काय म्हणतेस काय सुले ? “

” अहो, आमच्या मंडळातली ती नकटी जोगळेकर, ती तिचं नकट नाक उंचावत ठेसात फिरत असते.”

” आजकाल काय  बाबा, लॉटरी बिटरी लागली की काय ? “

” नाही हो, मिस्टर जोगळेकरांचं नाव आजकाल आदर्श सोसायटीच्या  घोटाळ्यात गोवलं जातंय.”

” घोटाळ्यात नव-याचं नाव आहे, म्हणून ती ठेसात फिरते ? ” 

” आमच्या सेक्रेटरीणबाई आणि व्हाईस चेअरमनसुद्धा आजकाल त्या जोगळेकरणीला खूप मानायला लागलेत, आणि मानणारच. “

” काय बोलतेस काय ? आदर्श सोसायटीच्या घोटाळ्यात अशोक जोगळेकरचं नाव ? आणि ती  जोगळेकरीण भाव खात फिरते तुमच्या मंडळात ?  “

” तेच तर म्हणतेय मघापासनं, तुमच्याबद्दल असं छाती पुढे काढून मला सांगता येत नाही. माझं नशीबच फुटकं ! “

” नशीब फुटकं ? का ? असा प्रामाणिक नवरा मिळाला म्हणून ? “

” तो तुमचा प्रामाणिकपणा का चुलीत घालायचा आहे ? पंचवीस वर्षं गव्हर्न्मेंट जॉबमध्ये काढलीत आणि…”

” सुलू, वेड लागलंय का तुला ? स्कॅममध्ये नाव असणं ही काय अभिमानानं मिरवायची गोष्ट आहे ? काय येडचापसारखं बोलतेस ? “

” आहेच तशी ती ? गट्स लागतात म्हटलं  गट्स. येरा गबाळ्याचे काम नोहे ! “

” म्हणजे माझ्यात गट्स नाहीत, म्हणून मी असले उद्योग करत नाही, असं तुला म्हणायचंय काय ? “

” आता कसं म्हणालात ? असाच स्मार्टपणा दाखवत जा जरा.”

” म्हणजे करप्शन करा ? काय पण संदेश आहे तुम्हा बायकांचा आम्हा तमाम नवरे मंडळींना? “

” तमाम नवरे मंडळींना नाही. तुम्हाला उद्देशून म्हणते मी. माझं ऐकत जा जरा. रोजचा पेपर वाचत चला. कोण कोणाची नावं झळकताहेत. पहिल्या पानावर वाचा. किती मोठमोठे साहेब आहेत त्यात.”

” अगं, म्हणतेस काय सुलू ? घोटाळ्यात येण्यासाठी मी करप्शन करू ? “

” ते कसलं जमतंय तुमच्यासारख्या बावळटाला ? आयुष्यभर नुसतं नाकासमोर चालत रहाणार तुम्ही आणि सदानकदा टिमकी मिरवणार, की तीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये एक पैसा खाल्ला नाही कोणाकडून म्हणून. “

” तू मला बावळट म्हण की आणखी काही. पण मी काही असले उद्योग आयुष्यात कधी केले नाहीत आणि करणारही नाही. सांगून ठेवतो, सुले.”

” स्कॅममध्ये नाव येण्यासाठी प्रत्यक्ष करप्शन करण्याची गरज नाही. फक्त प्रतिष्ठीत व्यक्तींमध्ये तुमचं नाव येईल, हे  पाहायचं . नंतर सगळे निर्दोष सुटतात हो. मग तुम्हाला चिंता कसली ? अहो, सी.बी आय.च्या चौकशीत कधी कुणाला शिक्षा झालीय ? नाव स्कॅममध्ये झळकल्याशी कारण . “

” स्कॅममध्ये नाव आलं की काय सिद्ध होतं ? आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा ?  “

” काही पायावर धोंडे पाडत नाही आपल्या. धोंडे लोकांच्या डोक्यावर पडत असतात. आपल्या पायावर लोक डोकी ठेवतात. निर्दोष सुटलात, की पुन्हा जबाबदार प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात उजळ माथ्यानं वावरायला मोकळे. ”  

” बाई गं,  ही प्रतिष्ठा की कुप्रतिष्ठा ? ही प्रसिद्धी की कुप्रसिद्धी ? “

” असेच शब्दांची कीस पाडत बसा. मघापासनं बोंबलतेय, जग कुठे चाललं आहे. तुम्ही कसली प्रतिष्ठेची जपमाळ ओढत बसलाहात. तो तुमच्या वर्गातला

ऑर्डीनरी माणूस, माने. पण हिंदुत्वाची जपमाळ घेऊन राजकीय पक्षात घुसला आणि बघा आता कसा चमकतो आहे. परवा त्याच्या वाढदिवसाला पोस्टर लागली होती नाक्यानाक्यावर!

त्याचं अभिष्टचिंतन करायला.”

” बरं झालं, मला सांगितलंस. पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे. देतो आताच ऑर्डर  माझ्या  पोस्टरची. फोटो कुणाचा लावू शेजारी ? तुझा की साहेबांचा ? ”  

” पोस्टरची ऑर्डर आपण नसते द्यायची. लीडर लोकांचे फॉलोअर देतात ती. “

” फॉलोअर म्हणजे कोण ? जय शिवाजी, जय भीम म्हटल्यावर आपापल्या मागे येतात ते ? “

” मस्क-या बस्स झाल्या. काही तरी मनावर घ्या म्हणतेय मी. तुम्हीच परवा सांगत होता. तुमचा तो प्यून सावंत. स्विस बँकेत ज्यांचा अकौंट आहे,  अशांची   नावं आली आहेत नेटवर.  त्यात  त्या दत्ता सावंतचं नाव आहे म्हणे. “

” अगं, त्या स्विस बँकेतल्या खात्याला काही अर्थ आहे का ? आमचे पपा  म्हणायचे,  बँक  नेहमी  आपल्या घराजवळ असावी.  आणि तू स्विस बँकेच्या गोष्टी करतेस. स्विस बँकेतून हजार रुपये काढायचे असतील, तर तिथे पोचायसाठी आपल्याला नुसते विमानप्रवासासाठी सत्तर ऐंशी हजार लागतील. कळतं  का सुले तुला यातलं ? पुन्हा एअरपोर्टवरून रिक्षा करायचे पैसे वेगळे…”

” पण नुसते दीडदोन हजार टाकून अकाउंट  उघडायला काय जातं ?” 

” तुला झालंय काय सुलू ?  काल परवापर्यंत बरी होतीस. घरातले पेपरच आता बंद करून टाकतो. आणि ते न्यूज च्यानेल बघायचं कमी कर जरा. “

” हो, त्या न्यूज च्यानेलवरनं आठवलं. गेल्या महिन्यात त्या बोरवणकरांच्या घरावर इन्कम ट्याक्सवाल्यांनी सरप्राईज रेड टाकली. च्यानेलवरनं दाखवलं सगळं ते. “

” हे तुमचे इन्कम ट्याक्सवाले च्यानेलवाल्यांना सोबत  घेऊन सरप्राईज रेड घालतात की काय ? ” 

” टारगटपणा करू नका.”

” वा, मज्जा आहे. पण मग सुलू, त्या बोरवणकरांची मिसेसपण फिरत असेल आता ठेसात ? “

” ठेसात म्हणजे काय ? तिचं प्रेस्टीज एवढं वाढलंय…”

” मग मिस्टर बोरवणकर सध्या तुरुंगात आहेत की फरार आहेत ? “

” धाड पडली म्हणून कुणी काही तुरुंगात जात नाही. तुम्हाला मी बावळट म्हणते ना,  ते उगीच नाही. बोरवणकरांच्या त्या धाडीत त्या लोकांना काहीही मिळालं नाही. “

” खरंच, अगदीच कसा बावळट मी. लवासात माझं घर नाही.

” कमाल आहे. मग काय उपयोग ? “

” पण मी म्हणते धाडीत काही मिळायला कशाला पाहिजे ? धाड पडली हे महत्वाचं.  तेवढ्याने   किती भाव वाढला तिचा. “

” मग माझा भाव वाढवण्यासाठी मी काय निमंत्रण देऊ इन्कम ट्याक्सवाल्यांना धाड घालण्याचं  ? कोणाला भेटावं लागेल ते सांग तर ? की फोनवरच बोलावून घेऊ ? टी.व्ही.वाल्यांना पण आपणच बोलवावं लागत का गं  ? तुमच्या त्या बोरवणकरबाईन्ना विचारून सांग. “

” मघापासनं सांगतेय उगाच जोक मारू नका फालतू. सिरीयसली विचार करा. धाड पडायला आधी ते पैसे तसे कमवावे लागतात. लुंग्यासुंग्याच्या घरावर रेड टाकायला वेड नाही लागलं ट्याक्सवाल्यांना. तुमचा बेसिक काय आणि कसल्या गप्पा करताय रेड टाकायच्या ? “

” बेसिक कितीही असला तरी परवा तीन एफ.डी. म्याच्युअर झाल्या आहेत, सुले आपल्या. त्याचे पैसे आले आहेत ना आपल्याकडे. लवासात घर घेता येईल आता आपल्याला. खिडकीतून मस्त तळ्यातलं बोटिंग बघत बसायचं.”

” तुमच्या एफ.डी.चे पैसे ? जोक करताय की काय ? त्या पैशातून  लवासाच्या घराची बाल्कनी  पण घेता येणार नाही आपल्याला. अगदीच कसे हो बावळट तुम्ही ? “

” खरंच, अगदीच कसा बावळट मी. लवासात माझं घर नाही. कोणत्याच स्कॅममध्ये माझं नाव नाही. पेपरातही माझं नाव येत नाही की वितभर फोटो नाही. माझ्या  घरावर इन्कम ट्याक्सची धाड पडत नाही…. माझ्या वाढदिवसाला आमच्या गल्लीत एकदेखील पोस्टर लागत नाही माझं… अगदीच कसा बावळट मी…-इति नितीन