बरसो ना मेघा

पत्रलेखन


प्रिय पाऊस,

तुझ्या आगमनाची चाहूल लागताच मयूर स्वतःचे पंख फुलवून थुई थुई नाचू लागतो, चातक पक्षी तुझ्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो तर शेतकरी तुझ्या वाटेकडे आस लावून बसलेले असतात. असा तू बरसू लागलास की, तुझ्याकडे पाहताना असंख्य आठवणी एखाद्या चित्रपटासारखे नजरे समोरून जात असतात. त्यातील एक एक आठवण उराशी बाळगून तुझ्याकडे पाहत बसावेसे वाटते.

तुझ्याकडे पाहता पाहता तुला कवेत घ्यावेसे वाटते पण तुला कवेत घेण्यास आले की तू हातातून निसटून जातोस, मग तनासोबत मनही चिंब चिंब न्हावून निघते. तुझ्यावर असंख्य कथा आणि कविताही लिहिल्या जातात. तू रोमँटिक जगतातला एक अवलिया आहेस. अनेक चित्रपटातही तुला दाखवले जाते असा तू पाऊस अगदी लहानग्यानपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहेस. तू ज्याला आवडणार नाहीस तो विरळाच.

इतरांप्रमाणे मलासुद्धा तू खूप आवडतोस. तू बरसू लागलास की मन प्रसन्न होते, शिणलेल्या मनाला उभारी मिळते. तुझ्या त्या श्रावणातल्या सरी पाहून तर मन प्रफुल्लित होते. तुझ्याविना या पृथ्वीतलावरील सर्वांचे जीवन व्यर्थ आहे. तुझी सर्वांना किंमत आहे. तुझ्यामुळेच तर ही जीवसृष्टी आहे.

पण पावसा तुला जितके महत्त्व आहे तितकेच तू अवेळी पडलास की लोकं तुझा तिरस्कार करतात. जसा एखादा पाहुणा जास्त दिवस ठिय्या मारून बसला की घरातले जसे वैतागून जातात ना? तसाच तू सुद्धा जास्त दिवस बरसलास तर लोकांना तुझा कंटाळा येतो. गणपती बाप्पा कसा थोड्या अवधीसाठी येतो आणि नंतर निघून जातो तसाच तू सुद्धा तुझ्या कालावधीमध्ये ये आणि निघून जा म्हणजे तुझ्या पुन्हा अवतरण्याची लोक वाट पाहत बसतील. तू असा अवेळी किंवा जास्त बरसू लागलास तर लोकं तुला कंटाळातील रे. शिवाय यामध्ये लोकांचं नुकसान खूप होतं. आता शेतामध्ये डोलणारे पीक तू अवेळी आलास म्हणून भुईसपाट झाले तेव्हा तुझी कृपा झाली असे कसे म्हणता येईल? खरंतर यामध्ये चूक आमचीच आहे. वृक्षतोडही आम्हीच करत आहोत त्यामुळे तू लोकांना धडा शिकवण्यासाठी अवेळी पडत आहेस. पण एक सांगू तू असा अवेळी आणि सारखा सारखा पडत राहिलास तर एक दिवस आम्हाला खायला अन्न मिळणार नाही. सगळी पृथ्वी जलमय होऊन जाईल. शिवाय सर्व लोकांना तू नकोसा होशील म्हणून तुला एकच विनंती आहे की तुझ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल इतका तू बरसू नकोस.

तुला वाईट वाटेल. या पृथ्वीतलावरचे लोक इतके स्वार्थी कसे झाले? असेही वाटेल पण तुला सांगू चूक आमचीही आहे. आम्ही वृक्षतोड केली त्यामुळे तू आम्हाला धडा शिकवत आहेस. आमची चूक आम्ही सुधारतो. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून जगवावे असे आम्ही अंमलात आणतो. मग तू सुद्धा आम्हाला वचन दे की नुकसान होईल इतका पाऊस तू पडणार नाहीस. तेव्हा पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही तुझी वाट नक्की पाहत राहू.
कळावे.