बार्गेनिंग

This story about our farmers and their struggles

बार्गेनिंग

'आई काय ग अशी तू? आज पण तोंडली घेतलीस? तू पण ना यार! काहीही भाज्या सिलेक्ट करतेस.'- सतरा वर्षाचा विजय तोंड वाकडं करत बोलत होता. 

'काय झालं रे रेड्या? सकाळ सकाळ रेकायला?'- बेडरूममधून बाहेर डोकावत त्याच्या ताईने त्याला डिवचले.

'ताई, पहिली गोष्ट म्हणजे जर मी रेडा असेन तर माझी बहिण म्हणून तू पण म्हस होशील एवढं लक्षात असू दे. आणि दुसरं म्हणजे आता अकरा वाजलेत म्हणजे हि काही सकाळ नव्हें.'- विजय त्याच्या वकिली अभ्यासाचे पुरेपूर प्रात्यक्षिक मांडत होता.

'का मी रेड्याला राखी नाही बांधू शकत का? त्यासाठी मला म्हस बनायची काय गरज?'- शर्वरीने प्रतिप्रश्न टाकत विजयची विकेट घेण्याचा प्रयत्न केला.

'तू जा ग! आई हिच लवकर लग्न लावून दे. हि ब्याद गेली तर माझं डोकं तरी शांत राहील. एकतर आज ती भंगार तोंडलीची भाजी खायचीय आणि त्यात हि अजून डोकं पिकवतेय.'- विजयच्या स्वरातील चिडचिडेपणा वाढत होता.

'ए शहाण्या, माझ्या लग्नाचं मी काय ते बघून घेईन. कळलं न? मला हवं तेव्हाच मी लग्न करेन! आला मोठा शहाणा. आणि भाजी कसली? तोंडली ss? काय ग मॉम तू पण न? तुला म्हटलं होतं न की आज पनीर घेऊन ये म्हणून?'- मोठी शर्वरीही आता भावासोबत तोंडलीच्या विरोधात उभी ठाकली होती.

'ज्याला कोणाला आपल्या आवडीचीच भाजी हवी असेल त्यांनी बाजारात जाऊन खुशाल घेऊन यावी. मी देईन बनवून.'- इतका वेळ शांत असलेल्या सारंगीने आपल्या दोन्हीं मुलांना तितक्याच सयंतपणे सुचवलं.

'तू सुचवतेय काय? थेट सांगत जा त्यांना. एss तुम्हीं दोघे उद्या बाजारात जाऊन भाजी घेऊन यायची. तुमचं बजेट असेल शंभर रुपये. कळलं? फक्त शंभर रुपये!'- पेपर वाचून होताच सारंगने लढाईत उडी घेतली होती.

'काय फक्त शंभर रुपये? त्यात फक्त पनीरचे तीन- चार पीसच येतील.'- शर्वरी पटकन बोलून गेली.

'आणि हा अजून एक! भाजी दिवसभर पुरायला हवी.भेटू उद्या.'- सारंग शांतपणे उत्तरला आणि बेडरूममध्ये जाण्यासाठी वळला.

--#--

' आईss, ये आईss; बाबा कुठे आहेत ग?'- विजय आणि शर्वरी दरवाज्यातूनच आरोळी देत आत येत होते.

'काय झालं? एवढे खुश? काय स्पेशल?'- मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नकळतपणे सारंगी सुखावली होती.

'बोला. कोणती लढाई जिंकून आलात? आणि तीही इतक्या रात्री?'- सारंग बेडरूमबाहेर येत म्हणाला.

'रात्र? ओ कम ऑन बाबा! इट्स जस्ट साडे दहा.'- शर्वरी आंग्लमिश्रित मराठीत पुटपुटली.

'बरं. सांगा काय खबर.'- सारंग दोघांच्या उत्तराची वाट पाहत सोफ्यावर बसला.

'बाबा, बघा! आम्हीं तुमचं चॅलेंज पुर्ण केलं आहे. आम्हीं या मेथीच्या फ्रेश जुड्या आणि त्याही पाच! किती? पाच! आणि कितीला? फक्त पन्नास रुपयाला. तुम्हीं शंभर रुपयात एका दिवसाची भाजी आणायला बोलला होतात नं? आम्हीं तर दोन दिवसांची भाजी आणली आहे आणि तीही अर्ध्या किंमतीत.'- विजयला बोलताना धाप लागत असली तरी अनामिक विजयी भावनेतून त्याचे डोळे लकाकत होते. सारं अंग हर्षोल्लासाने थरथरत होते.


शर्वरीचीही अवस्था काही वेगळी नव्हती.

'एवढ्या जुड्या? आणि त्याही इतक्या स्वस्तात? जुड्या तर अगदी ताज्या आहेत! मस्तच रे लेकरांनों!'- सारंगीने दोघांना कौतुकाची थाप दिली.

'अग काही नाही ग! आम्हीं आईस्क्रिम खायला बाहेर गेलो होतो ना; तर तिकडे नाक्यावर एक जोडपं बसलं होतं. फुटपाथवरच भाज्या घेऊन बसले होते. आम्हीं सहजच त्यांना विचारलं तर तुला माहितेय त्या  महान माणसांनी आम्हांला काय किंमत सांगावी? एक जुडी पंचवीस रुपये! मग मी काय सोडते की? केली न मी बार्गेनिंग सुरू! जाम पकवत होते आम्हांला. काय तर म्हणे शेतात पिकवली आहे. लांबून विकायला आलोय. घरी जाण्यापुरतेही पैसे जमले नाहीत अँड ब्ला ब्ला!! पण मी कसली ऐकतेय! मी आणि विज्या दहा रुपयांवर अडून बसलो आणि शेवटी त्यांच्याकडून या जुड्या मिळवल्याच!'- शर्वरी अभिमानाने आपलं कर्तृत्व मांडत होती.

'हो न! आणि ताई ते! ते नाही सांगितलं? त्यांचा तो ड्रामा? भाजी देताना उगीच डोळ्यांत पाणी आणण्याची चाल. कसले ऍक्टर होते नं दोघे?'- विजय सगळं शब्दांपेक्षा हावभावातून जास्त सांगत होता.

दोघांचे बोलणे ऐकून सारंगीच्या पायाखालची जमीन सरकली होती. अज्ञात भीतीने थरथरत ती तिरप्या नजरेने सारंगकडे पाहत होती.शेतकरी कुटुंबातून वर आलेला सारंग सोफ्यातच डोळे मिटून शांतपणे बसला होता. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या; क्षणोक्षणी चेहऱ्यावरची गंभीरता गडद होत चालली होती. घरात आता अचानक शांतता पसरली होती. सारंगच्या स्ट्रगलची गन्धवार्ताही नसलेल्या शर्वरी आणि विजयला मात्र काही कळत नव्हतं. ते दोघे कधी एकमेकांकडे तर कधी सारंगी तर कधी डोळे मिटून बसलेल्या सारंगकडे पाहत होते. सारंगचा भूतकाळ जाणून असणारी सारंगी मनोमन देवाचा धावा करत होती.

'तुम्हां दोघांना साधारण दोन आठवड्याची सुट्टी घेता येईल का रे? आपल्या गावी जाऊन येऊ म्हणतो!'- सारंगने डोळे उघडत आपल्या दोन्हीं मुलांना विचारलं.

'अंम. असं अचानक? बघावं लागेल सुट्टीचं!'- दोघांनी एकत्रित उत्तर दिलं.

सारंगचा स्वभाव पुरेपूर ओळखून असणाऱ्या त्या साऱ्यांना वादळ येणार याची जाणिव झाली होती पण कशामुळे ते कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच होतं.

--#--

सर्वानुमते दोन दिवसांनी संपुर्ण कुटुंब कोकणातील आपल्या गावी निघाले होते. सारंग अजूनही शांत असल्याने बाकी साऱ्यांचे मूड गंभीरच होते. मुलांनी आईकडून बाबांचा प्लॅन जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न चालवला होता. मात्र स्वतः सारंगीही सारंगच्या प्लॅनपासून अनभिज्ञ होती.

गावी पोहचताच; सर्वांनी मिळून घराची साफ सफाई करून घेतली होती. सर्वांनी मिळून स्वयंपाक- धुणीभांडी करत काही वेळ आराम करून घेतला.

सायंकाळ झाली तसं सारंगने सर्वांना घरच्या पडवीत बोलावून घेतलं.

'शर्वरी, विजय! त्या दिवशी एक आव्हान तर पार पाडलात! अभिनंदन त्याबद्दल. आज एक नवं आव्हान. तुम्हांला रात्री तुमची आई भाताची बियाणी देईल. तुम्हांला दोन आठवड्यात आपली रोपं उगवून दाखवायची आहेत. आणि नुसती उगवायचीच नाहीत तर ती जगवून दाखवायची आहेत. पुर्ण तर ती वाढणार नाहीच पण जेवढी वाढतील तेवढी वाढतील. ज्याची रोप जोमदार तो विजेता! आणि विजेत्याला माझ्याकडून रोख दहा हजार रुपयांची बक्षिसी. बोला मंजूर?'- सारंगने दोघांवर नजर रोखत विचारलं.

'मंजूर!'- बक्षिसाची रक्कम ऐकूनच दोघे तात्काळ होकार देता झाले. 

'सारंगी यांना बियाणं दे ग! उद्या यांना आपली जमिन दाखवूया. चला आज आराम करून घेऊया!'- सारंग गालातल्या गालात स्मित करत बोलला.

त्या रात्री प्रवासाच्या थकव्याने सगळ्यांनाच लगेच झोप लागली. कोकणातल्या गारव्याने सर्वांचे डोळे पहाटेच उघडले. तिथल्या आल्हाददायक वातावरणामुळे सर्वांना अगदीच तरतरीत वाटत होतं.

सारंगीने आपल्या दोन्हीं मुलांना बियाणे समान वाटून दिले. सगळेजण आता आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीपाशी पोहचले. तिथे पोहचताच; सारंग-सारंगीने डोकं टेकवून जमिनीला नमस्कार केला. त्यांना तसं करताना पाहून दोन्हीं मुलांनी त्यांचं अनुकरण केलं.

सारंगने उभ्या उभ्याच दोन्हीं मुलांना भाताच्या पिकाविषयी आणि त्याच्या लागवडीसंबंधित जुजबी माहिती सांगितली तश्याच काही महत्वपुर्ण सूचनाही केल्या. दोघांनाही या पंधरा दिवसात इंटरनेटवरून शेतीविषयक मार्गदर्शन घेण्याची मुभा देण्यात आली होती. जमिनीचे दोन वाटे करून दोघांना आपापल्या हिस्स्यात मेहनत करण्याची सूचना देत दोन्हीं उभयता मागे फिरले होते.

'विज्या, पाणी कसं आणायचं रे? तळे किती लांब आहे बघितलं का रे? माझं तर कंबरडे मोडून जाईल'- शर्वरीने आजूबाजूला नजर फिरवत कपाळावर हात मारून घेतला होता.

'ताई, तू तुझं बघ! मी माझं करेन मॅनेज. तू बॅक आऊट हो. तुझ्यासारख्या नाजूक मुलींना शेती काही  झेपायची नाही!'- विजय मुद्दाम बहिणीला चिडवत होता.

'ओय!'- शर्वरी त्याच्या अंगावर धावून जाणार तोच बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही नजरा त्यांना जाणवल्या. 

डोक्यावर नांगराचे मोठे फाळ,  शेतीची औजारे आणि कडेवर पाणी पिण्यासाठीचा हंडा घेऊन उभ्या असलेल्या काही स्रिया त्या दोघांकडे पाहून आपापसांत कुजबुजत होत्या; अधूनमधून हसत होत्या.

'बघितलं? ये हैं असली वुमन पॉवर! त्या करू शकतात तर मी ही करेन. त्यांच्या एवढी एक्स्पर्ट नसले तरी काय झालं? मी लढणार बघ!'- शर्वरीच्या डोळ्यांत वेगळीच चमक होती.

कसल्याशा निश्चयाने ती त्या महिलांजवळ गेली. त्या बायांच्या कडेवरच्या लेकरांना स्वतः जवळची चॉकलेट देत; तिने अल्पावधीतच त्या सगळ्यांशी मैत्री जमवली. सुरुवातीला काहीश्या बुजून बोलणाऱ्या साऱ्या स्रिया आता तिच्याशी कौतुकाने बोलत होत्या. अधूनमधून त्या शेतातल्या तळ्याकडे बोट दाखवत शर्वरीला काहीतरी सांगत होत्या. विजय ते सारं पाहताना चांगलाच चाट पडला होता. काही वेळातच आपले बोलणे संपवून साऱ्या जणी आपापल्या मार्गाने गेल्या तशी शर्वरीही माघारी फिरली.

'व्वा! ताई, मानलं तुला! बरीच माहिती गोळा केलीस वाटतं.'- विजयने शर्वरी जवळ येताच विचारून टाकलं.

'त्यांनी आपल्याला त्या तळ्यापासून एक कालवा तयार करायला सांगितला आहे म्हणजे सुरुवातीला थोडा वेळ जाईल पण नंतर आपल्याला जास्त कष्ट पडणार नाहीत.शेतीला सहजपणे पाणी देता येईल.'- शर्वरी शांतपणे उत्तरली.

'ताई सॉरी ग, मघाशी मी तुला उर्मटपणे धुडकावून लावलं, तुझ्या स्त्री-पणाची टेर उडवली आणि तू मात्र? ताई!'- विजयने ओशाळून बहिणीला मिठी मारली.

'बहीण आहे रे तुझी. मी जिंकली काय अन तू जिंकलास काय? मी तर दोन्हीं मध्ये खुश.'- शर्वरीने विजयच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं.

'ताई, आपण दोघे मिळून शेती करू, आपल्या रोपांची एकत्रच मशागत करू! बक्षिस पण वाटुनच घेऊ. क्या बोलती तू?'- विजयने डोळे मिचकावत प्रस्ताव मांडला.

'मंजूर.'- शर्वरीनेही त्याला टाळी देत होकार दिला.

--#--
त्या दिवसापासून दोघांनी एकत्रितपणे शेतीच्या आव्हानाची सुरुवात केली होती. शेतातल्या तळ्यापासून छोटासा कालवा खोदत त्यांनी आपल्या तुकड्यापर्यंत पाणी आणले होते. त्यासाठी त्यांना  एक अखंड दिवस लागला होता आणि अंगमेहनतीची सवय नसल्याने शरीर मोडून निघालं ते वेगळंच.

त्या दिवशी घरी पोहचताच दोघे जेवणावर अधाश्यासारखे तुटून पडले होते आणि अंथरुणात पडल्या पडल्याच दोघे डाराडुर झोपी गेले होते.

सुरुवातीला काहीसे संथ असणारे दोघे आठवड्याच्या अखेरीस पेरलेल्या बियांणातून उगवलेले भाताचे अंकुर पाहून उत्साहित झाले होते. गावातल्या नव्या मैत्रिणींच्या सल्ल्याने शर्वरी आणि विजयने शेण अन पालापाचोळा गोळा करत खताची कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला होता.

रोपे काहीशी वाढताच दोघेही भल्या पहाटे उठून आपसूकच शेतावर जाऊ लागले होते. उगवलेल्या रोपांना आता ते पोटच्या मुलाप्रमाणे जपू लागले होते. दिवसातून दोनदा पाणी, एकदा खताचा हलकासा शिडकावा अश्या पद्धतीने ते आपल्या परीने रोपांची मशागत करू लागले होते. स्पर्धा तर कधीचीच त्यांच्या डोक्यातून बाहेर पडली होती. दिवसभर शेतावर फिरायचं, रोपांसोबत वाढू लागलेलं गवत हळुवार खुडून बाजूला करायचं, मरगळलेल्या एखाद्या रोपट्याला गोंजारत त्याला आधार द्यायचा, दुपारी शेतातच जेवण आणि हलकी वामकुक्षी, संध्याकाळी परत एक- दोन फेरफटका असं करता करता कधी दिवस संपू लागले ते कोणालाच कळलं नाही.

सारंगच्या सांगण्यावरून सारंगी गप्पच होती. श्रमाची सवय नसल्याने कोमेजून गेलेल्या आपल्या पिल्लांना ती माऊली धीराचे चार शब्द सांगून पुनः पुनः उत्साहाने भारून टाकत होती. सारंग तर बाप होता; समोरून दाखवत नसला तरी रात्री थकून झोपलेल्या आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना मात्र त्याची माया त्याला कधीच अडवू शकली नव्हती.

परीक्षेचा दिवस उजाडला होता. शर्वरी आणि विजय काहीसे हिरमुसले होते. आपण पेरलेल्या रोपांना मोठं होताना त्यांना पहायचं होतं पण आता सर्वांचीच सुट्टी संपत आली असल्याने आहे त्या अवस्थेत रोपांची पाहणी होणार होती. 

सारेजण झपाट्याने पाऊलं उचलत आपल्या शेतजमिनिकडे निघाले. शर्वरी अन विजय तर धावतच पुढे चालले होते. 

आपल्या शेतीजवळ पोहचताच; शर्वरी अन विजय मटकन खाली जमिनीवर बसले. शर्वरीच्या तर डोक्यातून पाणी कधी वाहू लागलं तेही तिला कळलं नव्हतं. समोरचं दृश्य पाहून दोघेही हादरले होते.

गावच्या जनावरांनीं रात्री शेतात घुसून;  नुकत्याच पालवी फुटलेल्या रोपांची संपुर्ण नासधूस केली होती. सारी रोपं मुळापासून उपटून निघून जमिनीवर निपचित पडली होती. हताशपणे समोरचं चित्र पाहत असलेल्या त्या दोघांच्या खांद्यावर सारंगचा हळुवार हात पडला तसे ते दोघेही त्याच्या कुशीत शिरून स्फुंदून रडू लागले.

'जाऊ दे रे. त्यात काय एवढं मनाला लावून घ्यायचं. काही मिळणार होतं का पिकांतून? सोडा. मी तुम्हां दोघांनाही विनर ठरवतोय. चिल! कशाला एवढा ड्रामा करताय?? भारी ऍक्टर आहात रे दोघे.'- सारंगने हसत दोघांचे कान हळूच पिळले.

'कम ऑन बाबा! आम्हीं नाटक नाही करत आहोत. आम्ही मेहनतीने जमीन कसली होती. जीव लावून ती रोप जगवली होती. पोटच्या पोराप्रमाणे त्यांची काळजी घेतली होती. तुम्हांला आमची मेहनत नौटंकी वाटतेय? इतके दिवस आम्हीं ज्या पद्धतीने शेतात राबलो, ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही तुम्हीं असं कसं बोलू शकता बाबा? आई, बघ ना बाबा कसे बोलत आहेत ग..'- शर्वरीला आता अधिकच रडू येत होतं.

सारंगीला आता कुठेशी सारंगची आयडीया लक्षात येऊ लागली होती त्यामुळे तिने शांत राहणेच पसंद केले होते.

'अजून जोम न धरलेल्या रोपांना जमिनदोस्त झालेलं पाहून तुम्हाला एवढं दुःख झालं तर जरा विचार करा की मेहनतीने पूर्णपणे वाढवलेल्या पिकाला; निसर्गाची अवकृपा अख्खं गिळंकृत करते तेव्हा त्याच्या धीराची काय म्हणून कसोटी लागत असेल? बरं त्या साऱ्यातून पिकं सावरलीच आणि जेव्हा बाजारात त्यांना अल्पभाव मिळतो तेव्हा शेतकऱ्यांची काय हालत होत असेल? घासाघीस करून मुजोरपणे त्याची किंमत पार धुळीला मिळवणाऱ्या गिऱ्हाईकाला पाहून त्याच काळीज पिळवटून निघत नसेल का? जेव्हा लागवडीचा खर्चही निघत नसेल तेव्हा घराकडे आशा लावून बसलेल्या मुलांना बापाने काय  उत्तर द्यावं? आयुष्यभर सुखात ठेवण्याचं वचन दिलेल्या बायकोला सणालाही साध्यातली साधी साडी घेऊ न शकणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमाची घुसमट कोणी लक्षात घ्यावी? शॉपिंग मॉलमधल्या किंमती जास्त असल्या तरी स्टेट्सच्या नावाखाली आहे त्या किंमतीत ती वस्तू खरेदी करणारी तुमची पिढी; दिवसभर राबूनपण त्याच अपेक्षित मोल न मिळवू शकलेल्या कुणब्याचा टाहो कधी ऐकू शकेल का? नाही रे. कधीच नाही! शेती काय असते, शेतकरी काय करतो हे तुमच्या डोळ्यांत उतरवण्यासाठी मी हा उठाठेव केलाय. दिवाळीला मला आणि बहिणीला नवे कपडे घेता नाही आले म्हणून फिनायलची बाटली ओठाला लावायला निघालेला बाप मी पाहिलाय. लेकरं उपाशी राहू नये म्हणून कंदमुळं खाऊन दिवस काढणारी मावशीच खपाटीला गेलेलं पोट आठवलं की फक्त आवडलं नाही म्हणून अर्ध ताट कचऱ्यात टाकायला निघालेल्या तुमच्यासारख्या करट्यांची किव येते. सगळेच ऍकटिंग करत नाहीत रे. मूठभर व्यापाऱ्यांमुळे कित्येक शेतकरी बदनाम झालेत. नका वागू रे त्यांच्याशी असं! नका वागू. मी तुमच्यासमोर हात जोडतो.'- इतका वेळ रागात भडभडून बोलत असलेला सारंग जुन्या दुःखाना आठवून  अचानकपणे खाली बसून रडू लागला. 

शेतावरचे सारेच वातावरण स्तब्ध झाले होते. आयुष्यभर साऱ्या दुःखाशी एकहाती लढलेल्या बापाला पहिल्यांदा असं हताश पाहताना दोन्हीं मुलाचे डोळे भरून आले होते. काहीच सुचत नसल्याने दोघेही जागीच थिजून गेले होते. सारंगी तेवढी सारंगला आधार देण्यासाठी पुढे सरसावली होती. काही वेळाने सारंगचा भावनावेग कमी होताच; त्याने एकट्यानेच घरची वाट धरली होती. काही वेळ शेतात सुन्नपणे बसून जाण्यात गेल्यावर सारंगी, विजय अन शर्वरीही माघारी फिरले होते.

--#--

आज गावावरून आल्यानंतरचा पाचवा दिवस होता. घरचे वातावरण अजूनही बोथट होते.

'आईss, ये आईss ; बघ या मेथीच्या जुड्या. आहेत की नाही ताज्या आणि लुसलुशीत??  बघून घे, थेट शेतातल्या आहेत.'- शर्वरीने कामावरून घरी येताच दिवाणखान्यातुनच आरोळी दिली.

'जुड्या तर छानच आहेत. अगदी त्या दिवशी सारख्याच. पण?'- सारंगी लेकीचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या सारंगला पाहून गप्प बसली.

'बाबा, भाजी घेताना खर्च अंमळ जास्तच झाला आहे बरं. प्लिज रागावू नका.दिवाळी दोन दिवसांवर आलीये नं. मी माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्याच जोडप्याकडून हि भाजी घेतलीय. आणि हो, प्रत्येक जुडीचे 25 रुपयेच दिले आहेत मी. कोणाशी बार्गेनिंग करायचं ते आता मला कळलंय. आता पुनः तुमच्या डोळ्यांत पाणी नाही येऊ देणार.'- एवढं बोलून शर्वरी नकळतपणे बाबाच्या कुशीत शिरली होती.

'गुड गर्ल!'- सारंग लेकीच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत करू लागला.

'तु आणि वांगी कशाला घेऊन आलास रे? काय गावजेवण घालू का एवढ्या भाज्या करून? मी सगळ्यांना कामाला लावेन हा!'-  गंभीर झालेल्या वातावरणाला हलकं करण्यासाठी सारंगी मुद्दाम लटक्या रागात बोलली.

'विज्या, अरे हि असलीच वांगी तर त्या दादाकडे?'- बोलता बोलता शर्वरी थांबली.

'मी पाहिलं तुला त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्याकडून भाजी घेताना. मग मलाही माझ्या चुकीचं परिमार्जन करायचंच होतं न? आता मला तर काही भाजी घेण्याचं कळत नाही. मग मी तिकडूनच काही चॉकलेट आणि फ्रुटस घेतले. त्यांना त्याच्या मुलांसाठी बळेच घ्यायला लावले. त्यांना सॉरी बोललो. पण त्यांनी मला बळजबरीने हि वांगी घ्यायला लावली. बाबा, मी खरंच घेत नव्हतो. पण ती बाई सॉरी ताई मागेच लागली की घ्याच म्हणून. त्या दोघांच्या डोळयांत आजही पाणी होतं पण बाबा, आज मला ते खोटं नाही वाटलं. मला नाटक नाही वाटलं. मी फक्त त्यांचा मान राखण्यासाठी हि वांगी घेतलीत.'- विजय मान खाली घालुन बोलला.

'अरे बाळा, उगीच शेतकरी राजा म्हणतात का रे? अरे तो स्वतःच्या मेहनतीचं कमवून खातो. तुझ्या प्रेमाचा स्वीकार करत त्याने तुला हि भेट दिली. त्याच्या प्रेमाच प्रतिक म्हणून. बरं झालं तू ती स्वीकारलीस. आज मला खरंच तुमच्या दोघांचं कौतुक करावंसं वाटतंय रे'- सारंगने आपल्या दोन्हीं मुलांना आपल्या छातीशी कवटाळून घेतले.

'आणि मी काय अशी , फक्त भाज्यांची पिशवी पकडूनच उभी राहू का?'- सारंगी मस्करीत बोलली.

'अग, हि दोघेही आत गेली की तुला एकटीला घेतो की मिठीत! त्यात काय एवढं?'- सारंगने बायकोला डोळा मारला तशी सारंगी लाजून आत गेली आणि इतके दिवस कोमेजून गेलेल्या घराला हास्याच्या फवाऱ्याने नवजीवन मिळालं.

- समाप्त

प्रिय वाचक,
सदर लघुकथा हि कथेच्या अनुषंगानेच पहावी. मान्य आहे की पंधरा दिवसांत कोणतीही पिके उभी राहणे जवळपास अशक्य आहे त्यामुळे कथेची गरज म्हणून अंगिकारलेली काल्पनिकता तुम्हीं समजून घ्याल अशी आशा बाळगतो.

लवकरच भेटूया नव्या कथामालिकेत; तोपर्यंत वाचत रहा, कमेंट करत रहा! 

धन्यवाद!

फोटो क्रेडिट- गुगल