Login

बाप्पा सांग ना रे...!

लहान मुलीचे भावविश्व अधोरेखित करणारे एक पत्र.


स्नेहल पवार
मधुर कॉलनी
कोथरूड
पुणे ४११०★★

प्रिय देवबाप्पास,

बाप्पा सांग ना रे, कधी पाठवतोयस माझ्या बाबांना परत? ४ महिने झाले, त्यांना तुझ्याजवळ येऊन. मला खूप आठवण येते त्यांची. किती दिवस झाले, तरी तुमचं बोलणं संपत नाही? मला अजूनही आठवतय, किती खुश होते ते त्या दिवशी; जेंव्हा मी त्यांना शेवटचं बघितलं होतं! घाईघाईत ऑफिसला गेले.. आणि परत आलेच नाहीत.

काय माहित, मम्मी का रडत होती. मी विचारलं, तर मला मिठी मारून रडायला लागली. मला काही समजत नव्हतं. एरवी कधीही इतकी माणसे घरी आलेली मला आठवत नव्हती. काही रडत होती, काही दुर्मुखलेल्या चेहऱ्याने उभी होती. आज्जी, आबा सुद्धा पहिल्यांदाच इतके सॅड होते. माझ्याशी काही बोलतच नव्हते. कोणीच काही बोलत नव्हतं. सगळे सॅड सॅड होते.

मी आबांना विचारलं बाबांबद्दल, तर मला म्हणाले, बाबा एका काकांबरोबर लांबच्या प्रवासाला गेले आहेत. बाप्पा, हा लांबचा प्रवास एवढा लांब आहे का रे? की चार महिने झाले, आणि अजून चालूच आहे? तू लवकर पाठवून दे ना बाबांना परत! मला त्यांना विचारायचं आहे, त्यांनी काय काय आणलं माझ्यासाठी..! कुठे कुठे गेले.. काय काय मज्जा केली.. मला का घेऊन नाही गेले ते..

काल मम्मी संध्याकाळी परत रडत बसली होती. मला माहित आहे, तिला बाबांची आठवण आली, की ती रडते. आमच्यासमोर नाही.. एकटीच! बहुतेक आमच्यासमोर रडायला तिला आवडत नसावं. तिला वाटत असेल, की लहान असून मी, म्हणजे स्नेहल रडत नाही, आणि ती कशी रडते! मी जाऊन तिच्या जवळ बसले. नेहमीप्रमाणे तिने रडणं थांबवलं, आणि काहीतरी काम करायला लागली. मी बघितलं आहे, आम्ही बघितलं, की ती काम करायला लागते. त्या दिवशी आज्जी तिला सांगत होती.. थोडं मन दुसरीकडे गुंतव, म्हणजे रडू येणार नाही. पण बाबा असेपर्यंत तर तिला अस मन गुंतवायची गरज वाटली नव्हती. मग आता अस का होतंय? बहुतेक बाबा नाहीत म्हणून करमत नसेल. बाप्पा.. सांग ना रे, कधी परत येतील माझे बाबा?

मी तिला बाबांबद्दल विचारलं, तर तीच एकच उत्तर ठरलेलं असत, बाबा मोठ्या प्रवासाला गेले आहेत, त्यांना यायला खूप वेळ लागेल. मग त्या दिवशी मी सुद्धा चिडून म्हणाले, की आता मी सुद्धा बाबांसारखं मोठ्या प्रवासाला जाईन, बाप्पा बरोबर. तर केवढ्या मोठ्याने ओरडली मला! काय चुकलं रे माझं? तुझ्याबरोबर फिरण्याचा हक्क काय फक्त मोठ्या माणसांनाच असतो? मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही?

आता आबासुद्धा माझ्याबरोबर खेळत नाहीत. आधी बाबा आणि ते मिळून किती खेळायचे माझ्याबरोबर! आम्ही रोज फिरायला जायचो. रोज काहीतरी नवीन खायचो. किती मज्जा यायची. पण आता माझ्याबरोबर जास्त बोलतच नाहीत. शांत शांत असतात. त्या दिवशी आबांचे मित्र आले होते त्यांना बोलवायला. त्यांच्यापैकी प्रभाकर आजोबा माझे खुप लाड करतात. ते आबांना म्हणत होते, की \"आता सावर यातून.. चार महिने झाले दिनेशला जाऊन. सुनबाई आणि बायकोला सांभाळ. स्नेहल अजून लहान आहे, तिला काही माहीत नाही. तिला नीट समजावून सांग. झाले गेले विसरून जा.\" मी त्यांना विचारलं, की \"बाबा तर फक्त फिरायला गेले आहेत ना? मग त्यांना विसरून जायची काय गरज आहे?\" तर माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला म्हणाले, \"तुला नाही कळणार! तू अजून लहान आहेस!\" सगळे असच म्हणतात. बाप्पा, सांग ना रे, बाबांना कधी पाठवतोयस परत? ते आले ना, की ते मला नक्की समजावून सांगतील. ते अस नाही म्हणणार मला, की तू लहान आहेस म्हणून..!

आज्जी पण आता शांत शांत बसून असते, तिच्या नावाप्रमाणे. आधी आज्जी असं शांत बसली, की आबा किती चिडवायचे तिला, पण आता काहीच बोलत नाहीत. आता बघावं तेंव्हा आज्जी तुझ्या फोटोसमोर वाती वळत बसते. रोज तुला नव्यानव्या पुस्तकातून गोष्टी ऐकवत असते. आधी मला ती रोज गोष्टी सांगायची. पण आता जास्त सांगत नाही. फक्त तुलाच सांगते. बहुतेक तू बाबाला परत पाठवावस, म्हणून तुला लाडिगोडी लावत असेल. बाप्पा सांग ना रे, कधी पाठवतोस माझ्या बाबांना परत? मला पण गोष्टी ऐकायच्या आहेत. मी तुला प्रॉमिस करते, तू बाबांना परत पाठवलस ना, की मी पण तुला रोज गोष्टी सांगेन. मग तर पाठवशील ना रे त्यांना..?

काही दिवसांपूर्वी बाबा माझ्या स्वप्नात आले होते. मला म्हणत होते, की \"स्नेहू, आता मोठी हो. तुझ्या मम्मीला सांभाळ. आजी आबांना सावर. मला यायला किती वेळ लागेल, ते माहीत नाही. पण तू रडू नकोस. मी लवकरच परत येईन. आणि समजा नाही आलो, तरी काळजी करू नकोस. मी देव बाप्पाच्या घरी आहे. हे घर सुद्धा आपल्या घरासारखेच छान आहे. इथे तुझ्या आजी आबांसारखे खुप आजी आबा आहेत. तुझ्यासारखी खुप लहान मुले आहेत. मला इथे खुप मित्र मिळाले आहेत. मी खूप आनंदात आहे. आणि तुम्ही सगळे सुद्धा आनंदात राहावेत, अस मला वाटत. तुम्ही रडत राहिलात, तर माझं लक्ष कामात लागणार नाही. मग मी ज्या कामासाठी आलो आहे, ते काम होणार नाही. मग मला यायला अजून उशीर होईल.\" मी बाबांना सांगितलं आहे, की आम्ही कोणीही आता रडणार नाही. बाप्पा, सांग ना रे, कधी संपेल माझ्या बाबांचं काम? कधी येतील रे ते घरी?

बाबा घरी आले ना, की आता मी त्यांच्याकडे कोणताच हट्ट नाही करणार. मी कधीच त्यांच्याकडे रोज खाऊ नाही मागणार. रोज वेळेवर अभ्यास करेन. पण त्यासाठी त्यांना लवकर पाठव ना रे घरी. मला आता अजिबात करमत नाहीये. मी एकदा ऐकलं होतं, की तुझ्या घराला \"स्वर्ग\" म्हणतात. तिथे तुला आवडणारी सगळी माणसं असतात. पण बाप्पा, आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना बाबा खूप आवडतात. तू चार महिने घेतलंस ना रे त्यांना ठेवून.. आता पाठव ना रे परत. हवं तर तू पण ये त्यांच्या बरोबर इथे राहायला. सगळे बाबांबरोबर तुझे पण लाड करतील. आबा बाबांसारखं तुला पण डोक्याला तेल लावून देतील. आज्जी पण तुला रोज गोष्टी सांगेल. मी पण तुझ्याबरोबर गप्पा मारेन.

आत्ता पर्यंत मी तुला फक्त फोटोतच बघितलं आहे. मला कधीतरी तुला माझ्या समोर उभ बघायचं आहे. तुझ्याबरोबर खुप बोलायचं आहे. बाप्पा, बाबांना पाठवशील, तेंव्हा तू पण येशील ना रे त्यांच्याबरोबर इथे? पाठवशील ना रे त्यांना परत..?

तुझीच,
स्नेहू..

पत्ता:-
देवबाप्पाचे घर (स्वर्ग)
निळे आकाश
ब्रह्मांड..