बाप कुणा कळत नाही

Marathi katha

“ओ बाबा मला यावेळी एक कार हवी आहे. दरवेळी तुम्ही देता ते गिफ्ट मी घेतो. यावेळी मात्र मला कारच हवी आहे.”

“हो घेईन”
“नक्की”
“हो रे नक्की”
रोहन आईबाबांचा एकुलता एक मुलगा होता. तो लहानपणापासून खूप हुशार होता. अगदी पहिल्या नंबरने पास होत असे. मग त्याचे बाबा त्याला काही ना काही गिफ्ट देत असत. असे प्रत्येक वर्षी तो पहिल्या नंबरने पास होई आणि त्याचे बाबा त्याला गिफ्ट देत असत.

शाळा संपून तो आता काॅलेजला होता. तेथेही तो बाबांकडून बक्षीस मिळवत असे.

आता तो शेवटच्या वर्षी होता आणि त्याला आता एक कार हवी होती. त्याचा तो हट्टच होता आणि त्याचे बाबा पण त्याला घेऊन देतो म्हणाले. मग काय स्वारी खूश झाली. रोहन आता अभ्यास करायला लागला. तो खूप मेहनत घेऊ लागला. बघता बघता परीक्षा जवळ आल्या रोहन रात्रीचा दिवस करून अभ्यास करू लागला काही दिवसातच परीक्षा संपल्या सुद्धा. आता त्याला निकालाची प्रतीक्षा होती. त्याला माहीत होतं की त्याचाच पहिला नंबर येणार आहे.

आज निकालाचा दिवस होता. रोहन सकाळीच लवकर आवरून तयार होता. त्याला खूप उत्सुकता होती आणि गिफ्ट मिळणार याची आतुरता. तो निकाल घेऊन आला. नेहमीप्रमाणे त्याचा नंबर आला होता. तो घरापाशी आला तर त्याला दारात कार दिसली नाही. तो हिरमुसला. त्याला राग आला. रागातच तो आत गेला तर दारातच त्याचे बाबा एक छोटासा बॉक्स घेऊन उभे होते. ते पाहून रोहनचा राग आणखीनच वाढला. "यात काय एखादी सोन्याची वस्तू असेल दुसरं काही असणार आहे." असे तो मनातच म्हणाला.

त्या बॉक्सकडे बघून रागारागाने बाबांना म्हणाला "कार घ्यायची नव्हती तर आधीच नाही म्हणून म्हणायचे. एवढ्या आशेने तुमच्याकडे मागितलो तर तुम्ही काय दिले मला? मी आता या घरात राहणार नाही." असे म्हणून तो घर सोडून गेला.

तिकडे आई-बाबांना त्यांचं काय चुकलं? हेच समजेना. आई तर रोहन गेल्यापासून सारखे रडू लागली. बाबांनी रोहनला शोधण्याचा प्रयत्न केला पण रोहन कोठेही सापडला नाही. या विचारातच रोहनच्या बाबांचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला. ही गोष्ट रोहनला जेव्हा समजली तेव्हा त्याला खुप वाईट वाटले आणि तो घरी आला. आईचे सांत्वन करू लागला. मग तो तेथेच आईसोबत राहू लागला. एक दिवस अचानक त्याच्यासमोर तो बॉक्स होता. "निदान उघडून तर बघू याच्यामध्ये आहे तरी काय?" असे म्हणून त्याने तो बॉक्स उघडला. तर त्याच्यामध्ये कारची चावी होती. ते बघून त्याला खूप वाईट वाटले आणि तो रडू लागला.

बाबा हे असेच असतात. बोलून काही दाखवणार नाही, पण करून मात्र दाखवणार. आईची महती साऱ्यांनाच आहे, पण वडिलांची किंमत वडील गेल्यानंतर कळते.

ओरडण्या पलीकडील प्रेम
अन् काळजी समजतं नाही
का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही...

ठेच लागली की आठवते आई
बाप कधी दिसत नाही
का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही....

फणसासारखे आत मऊ
पण वरून तसा दिसत नाही
का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही..

सर्वांच्या इच्छा पूर्ती करता
वेळ त्याला मिळत नाही
का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही...

कठीण परिस्थितीत तो
कधी रडत बसत नाही
पण का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही..

कामाच्या गडबडीत त्याला
मुलांना वेळ देता येत नाही
का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही...

लेक सासरी जाताना होणारी
घालमेल तो दाखवत नाही
का कुणास ठाऊक
बाप कुणा कळत नाही..

प्रियांका अभिनंदन पाटील