आज मेघनाला बघायला पाहुणे आले होते. पाहुण्यांची पसंती आली की लगेच सुपारी फुटणार होती. सगळे खूप आनंदात होते, पण मेघनाच्या मनात वेगळीच काळजी होती. तिचे बाबा लहानपणीच त्यांना सोडून देवाघरी गेले होते आणि तिच्या आईने खूप कष्टातून त्यांचा सांभाळ केला होता. आता या लग्नाचा खर्च ती कसा करणार? या विचारात असतानाच मुलाचे बाबा म्हणाले, "तुम्ही फक्त सोन्यासारख्या मुलीला द्या, बाकी खर्च आम्ही बघतो." हे ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि बापाची खरी किंमत कळाली.
_____________________
अमेय डाॅक्टरेटच्या परिक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर त्याच्या बाबांनी त्याला फोर व्हीलर घेऊन देईन म्हणून प्राॅमिस केले होते, पण रिझल्ट घेऊन आल्यावर त्यांच्या हातात एक लहान बाॅक्स दिसला म्हणून रागाच्या भरात तो गेला ते बाबांच्या तेराव्यालाच आला. काही कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नकळत त्याने तो बाॅक्स उघडला तर त्यात कारची चावी होती ते पाहून त्याला भरून आले पण उपयोग काय? बाप कधी कळलाच नाही.
______________________
आईच्या मृत्यूनंतर रोहन आणि मोहन या दोघा सख्ख्या भावांनी संपत्तीची वाटणी केली. रोहनला थोडा कमी वाटा मिळाला आणि त्याच्या बाबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आली. एक दिवस त्याचा मित्र म्हणाला, "रोहन तुला संपत्तीचा वाटा कमी मिळूनही बाबांचा सांभाळ करावा लागत आहे." तेव्हा रोहन म्हणाला, "अरे, बाबा नावाचा खजिना सोबत असताना कशाला लागते आणखी संपत्ती?"
_______________________
अनुष्काचे बाबा खूप कडक होते. कायम तिच्यावर नजर ठेवून होते. तिला कधी मनासारखे वागायलाच मिळाले नाही. त्यांच्या धाकात वाढलेली अनु आज सासरी जाताना सर्वात जास्त तिचे बाबाच रडले. ते पाहून ती मनात म्हणाली, "खरंच हा बाप कधी कळलाच नाही."
_____________________
लहानपणापासून हालाखीच्या परिस्थितीत वाढलेली रखमा आपल्या बाबान साधा नवीन रूमाल सुध्दा घेतला नाही म्हणून आतल्या आत धुमसत होती, इतक्यात तिचा बाबा एका कॅरिबॅगमध्ये ड्रेस घेऊन आला. ते पाहून रखमाला खूप आनंद झाला. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, "रखमा, तुला मी काहीच घेऊ शकलो नाही, मला माफ कर. पण तुझ्या लग्नासाठी म्हणून मी आत्तापासूनच काही पैसे बाजूला ठेवत आहे. तेव्हा तुला जास्त खर्च करेन हं." हे ऐकून रखमाच्या डोळ्यातून पाणी आले. खरंच बाप कधी कळलाच नाही.
_____________________
अजयचा लॅपटॉप उघडून बघताना बाबा सारखे प्रश्न विचारत होते, ते ऐकून अजय वैतागून म्हणाला, "तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही." म्हणून लॅपटॉप घेऊन आत गेला. आज त्याचा मुलगा जेव्हा तेच म्हणाला तेव्हा अजयने बाबांच्या फोटोकडे पाहिले. खरंच बाप कधी कळलाच नाही.
___________________
"आई, आज शाळेत तूच मिटींगला ये ग. बाबा खूप साधे कपडे घालतात. माझे मित्र हसतात ग." रोहन आईला जेव्हा असे म्हणाला.
पण त्या दिवशी आईला काम असल्याने बाबाच शाळेत गेले, तेव्हा मुख्याध्यापकांनी बाबांना सर म्हणून बोलावल्यावर तो आवाक् होऊन पाहत राहिला. कारण त्याचे बाबा सरकारी अधिकारी होते, पण त्यांची राहणी साधी होती.
____________________
बाबा सफाई कामगार आहेत हे शाळेत सांगायला राजूला लाज वाटायची. याबाबत त्याने घरात वादही घातला होता, पण आज कोरोनाच्या काळात जेव्हा सफाई कामगारांचे महत्त्व समजून आले, तेव्हा त्याने बापाजवळ येऊन त्याला मिठी मारली.
____________________
लहानपणापासून वडीलांचे प्रेम, माया याला पोरकी झालेली मीरा आज लग्नानंतर जेव्हा नवरा सगळं प्रेमाने करताना पाहून तिला वडिलांची जाणीव झाली आणि नकळतच तिच्या डोळ्यांतून पाणी आले.
______________________
मेघाने घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला आणि पोलिस स्टेशनमध्ये बाबांमुळे धोका आहे असे सांगितले. हे ऐकून तिचे बाबा हतबल झाले, त्यांना खूप वाईट वाटले, कितीही समजावले तरी मुलगी ऐकेना म्हणून हताश होऊन ते घरी गेले. पण जेव्हा नव्याची नवलाई संपल्यावर परिस्थितीचे चटके बसू लागले तेव्हा तिला बाबांची खरी किंमत कळाली.
©®प्रियांका अभिनंदन पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा