Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग १)

Read Later
बंगला.. एक अव्यक्त रहस्य (भाग १)
अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी तिसरी (रहस्य कथा)

बंगला.. एक अव्यक्त रहस्य 

भाग १

-©®शुभांगी मस्के…

"अरे, झोप लवकर, उद्या घर बघायला जायचयं ना आपल्याला", नंतर लगेच गावाला ही निघायचयं. लवकर लवकर निघावं लागेल, नाहीतर गावी पोहचायला उशिर होतो आणि मग माईंच एक काम वाढत.

"रागावतात त्या खूप".

"मीठ मोहरी आणि काय काय दृष्ट काढायला?"..

शेजारी झोपलेल्या सृष्टीने तावातावात राघवच्या हातातला मोबाईल काढून घेतला..

"हो हो, एवढी काय एक्साईटमेंट, घरचं बघायला जायचंय ना". "जाऊ की मग!", आणि राघवने सृष्टीला आपल्याकडे ओढून घेतलं.

एकमेकांच्या कुशीत, दोघेही विसावले आणि गाढ झोपी गेले.

एक मोठा प्रशस्त बंगला, समोर मोठ गार्डन आणि अंगणात सोनचाफा बहरलेला. बंगल्याच गेट उघडलं तस, फाटकाचा कूर्र आवाज आणि राघवची झोप उघडली.

\"छा!! झोपेत ही घरचं दिसतंय ध्यानी मनी स्वप्नी, एकच! डोक्यात एक गोष्ट घुसली की, जात नाही लवकर, राघव स्वतःशीच पुटपुटला\"..

त्याने मोबाईलवर वेळ पाहिली, सकाळचे साडे सहा वाजले होते. उठायला तर हवं होतं. बाजूला सृष्टी निर्धास्त झोपली होती. चेहऱ्यावर मंद स्माईल अगदी छोटया बाळासारखं.

"ये उठ.. महाराणी! मोठी म्हणत होतीस, लवकर जायचयं घर बघायला वगैरे वगैरे"...

"आणि आता बघा कशी, घोडे विकून झोपलीय".

राघवने, स्वतःचे गाल सृष्टीच्या गालावर हळुवार फिरवले, तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागला.

"झोपू दे ना रे थोडं, छान स्वप्न बघतेय मी, बघ ना अंगणात सोनचाफा काय सुंदर बहरलाय!".

"तो आणायचा सोडून तू काय मला उठवत बसलायं"...

"महाराणी साहेबा, उठा!! नाहीतर, उशीर होईल उगाच"..

"आणि मग उगाच तुमची चिडचिड". एवढं बोलून, राघव लगेच उठला.

अंघोळ वगैरे आटोपून तयार झाला. दोघांसाठी त्याने चहा टाकला, सृष्टीने ही उठून पटापटा आवरून घेतलं..

ब्रोकरने घराचा पत्ता पाठवला होता. कारमध्ये सामान भरलं आणि दोघेही निघाले सुनिश्चित ठिकाणी.

"अरिहंत सोसायटी" च्या गेट मधून कार आत शिरली. सोसायटीमध्ये सगळे एकसारखे डूप्लेक्स बंगले,कसं ओळखायचं? आपल्याला कुठला बंगला बघायला जायचंय ते!..दोघेही जरा गोंधळले होते.

"अरे यार आत्ताच तर गेलो ना इथुन", आणि पुन्हा तिथेच पोहचलो...

"गोल गोल फिरतोय असं का वाटतंय मला".... राघव जरा चिडून बोलला.

"कसला हा बिल्डर.. कसले हे रस्ते छोटे छोटे, गुंतागुंत वाटतेय नुसती", राघव चिडला होता.

"अरे, एकसारखे बंगले आहेत, म्हणून वाटतय असं. विचारू या कुणाला?" बोलता बोलता सृष्टीने कारच्या खिडकीची काच खाली केली...

"हा मोबाईल वरचा जीपीएस काही आजच्या तारखेला घरापर्यंत पोहचवेल अस वाटत नाही".

"कोणाचं तरी डोकं खाव लागेल अस वाटतंय". सृष्टी पत्ता विचारण्यासाठी कुणाला तरी शोधू लागली.

सुट्टीचा दिवस, सकाळची वेळ असल्याने फार कुणी बाहेर नव्हतच ..

"यार सगळे निशाचर, आहेत की काय या जगात... रात्री जागून उशिरापर्यंत उठणारे"..

"कुणीच कसं नाही, दिसत रस्त्यावर!" सृष्टी पुटपुटली.

"अरे थांब थांब. थांबव कार!", त्या बंगल्यात बाहेर दिसतंय कुणीतरी, विचारते त्यांना".

"एक्सक्युज मी सर, हा पत्ता सांगू शकाल का प्लीज". सृष्टीने खाली उतरून बंगल्यातल्या त्या व्यक्तीला विचारलं.

"पलीकडे, तिसऱ्या गल्लीत"...
भांभावल्यागत त्यांनी घराचा पत्ता सांगितला आणि पटकन निघून गेले.

सृष्टीला जरा वेगळं वाटलं... पण पत्ता मिळाला होता.

पलीकडे एक छोटीशी गल्ली आणि कार एका मोठ्या प्रशस्त बंगल्यासमोर उभी झाली.

"अरे वाह!! मोठ आहे घरं, घर कसलं बंगला आहे छान!"

ब्रोकर कुठेच दिसला नाही, तेव्हा राघवने त्याला कॉल केला.

"हो हो येतोच आहे!", म्हणत त्याने फोन कट केला.

"आपल्या बजेटमध्ये आहे! मोठा आहे". आपल्याला सोईस्कर पडेल अस आहे. घरचे सगळे आले तरी, घर छोट पडणार नाही आणि गार्डन तर फारच सुंदर!" सृष्टी मनोमन पुटपुटली.


गेट उघडंच होतं. सृष्टी गेट खोलून आत गेली. बाहेरूनच बंगला बघुन बंगल्याच्या गोडकौतुकात, ती हुरळून गेली.

गेटचा करररर्र आवाज, तोच स्वप्नात ऐकल्या सारखा!! राघवला क्लिक झालं..

"गेटचा आवाज आणखी कसा असणार?" राघवने स्वतःची समजूत काढली.

बंगल्यासमोर खूप दिवसानंतर अशी कार उभी पाहून, एका दोघांनी, बंगल्याकडे निरखून पाहील.

सृष्टीला हे काही नवीन नव्हतं.
गावाकडे, कुणाकडे कोण आल गेलं तर शेजारपाजारचे असेच निरखून निरखून बघतात, तिला गावातले दिवस आठवले.

शहरातही, आणि एवढ्या मोठ्या कॉलनीत.. कोण काय करतय, तिला जरा वेगळं वाटलं.

ब्रोकर आल्यानंतर, ब्रोकरने बंगल्याचा दरवाजा उघडला.

राघव ब्रोकरच्या मागे मागे बंगल्यात शिरला. दरवाजा खोलता बरोबर, समोरच अवाढव्य, प्रशस्त मोठा हॉल...

घरात तस सामान नव्हतच, हॉल रिकामा असल्याने अजूनच मोठा वाटत होता.

"अमेरिकेला राहतात या बंगल्याचे ओनर, मोठी इनवेस्टमेंट आहे". "कॉलनीत जास्तीत जास्त, बंगले इनवेस्टमेंटच्या दृष्टीकोनातून घेऊन ठेवलेत बऱ्याच लोकांनी".

"तशी खूपच शांतता आहे, या सोसायटीमध्ये". राघवने विचारलं.

शहरात कोण कुणाच्या अध्येमध्ये ढवळाढवळ करतय, आपल्या कामाशी काम फक्त. ब्रोकर बोलला.

"आणि त्यात, या कोरोनाची भर", "स्थिरस्थावर होतेय हळुहळू, आता कॉलेज सुरू झाले की एक बंगला रिकामा सापडणार नाही बघा". ब्रोकर बोलत होता.

"साहेब, या सोसायटीत, कुणी कॅनडा,ऑस्ट्रेलिया, कुणी अमेरिका, स्वित्झर्लंड मध्ये राहतात", " काही घेणं देणं नसतं एनआरआईज लोकांना या प्रॉपर्टीच".

"एवढी मोठी करोडोची प्रॉपर्टी, आमच्या सारख्या एजंटवर सोपवून निश्चिंत राहातात. त्यांना त्यांचे भाड्याचे पैसे मिळतात आणि आम्हाला आमचं कमिशन".

"तुम्ही"... " कॉलेज मध्येच ना" ब्रोकरने विचारलं.

"हो, मेडिकल हॉस्पिटल". राघव उत्तारला.

"महामारी पूर्वी.. बरेच विद्यार्थी पीजी स्वरूपात राहायचे बंगल्यात. ब्रोकर बोलत होता.

"थोड जुनं सामान होतं बंगल्यात. विकवाक केलं, बंगल्याची थोडी डागडुजी केली आणि आता भाड्याने द्यायचं ठरवलंय ओनरने".ब्रोकरच ऐकून, राघवने मान डोलावली.

बंगला साफसुफ आहेच, उगाच जास्ती वेळ वाया जाणार नाही साफ सफाईवर, राघव मनातल्या मनात खूश झाला..

बंगल्याबाहेरच सौंदर्य.. मोठ गार्डन, बघण्यातच सृष्टी दंग होऊन गेली होती.

दरवाजासमोर सोनचाफा छान बहरला होता. मोठमोठी दोन चाफ्याची झाडं होती.

"अगं बंगला तर बघून घे, मग बघ ते गार्डन", राघवने सृष्टीला आवाज दिला.

"हो हो आली" म्हणत, सृष्टी बंगल्याची पायरी चढली..

"आई गं!!" ती जोरात किंचाळली..

काय झालं गं.. किंकाळी ऐकून, राघव धावत बाहेर आला.

मान खाली घालून, सृष्टी पायरीवर बसली होती. तिथे रक्त सांडल होतं.

"अगं काय झालं.. हे रक्त कसं!"...

"धडपडलीस, अरे यार! कशी गं तू धडपडतेस" ...

"कुठे बघत होतीस?"

"चालता ही येत नाही का नीट"... राघवचा स्वर उंचावला होता.

सृष्टीच्या पायाच्या नखातून भळ भळ रक्त वाहत होतं.

धावत जाऊन, कारमधून त्याने फस्टएड बॉक्स आणला. पाण्याची बॉटल होतीच सोबत, पाण्याने जखम धुवून घेतली. डेटॉलच्या पाण्याने पुसून घेतली. जखमेवर थोड ओइंटमेंट लावलं आणि त्यावर पट्टी बांधली.

"दुखतयं का खूप!" त्याने सृष्टीला विचारलं...

"हो ना, दुखतयं थोडं",

"चल, घर पाहून घेऊ".. त्याने तिला उठण्यासाठी मदत केली.

आणि गार वाऱ्याची झुळूक, अंगाला स्पर्शून गेली. कुणीतरी हळुवार फुंकर मारली होती जणू...

तिचे केस वाऱ्याच्या तालावर उडत होते. वसंत ऋतू तसाही भरात आलेला होता. वातावरण आल्हाददायक होत.

लंगडत लंगडतच, राघवचा हात पकडुन, सृष्टी राघवच्या पाठोपाठ बंगल्यात शिरली.

काय असेल या बंगल्याच अव्यक्त रहस्य… या स्वप्नांचा असेल का काही संबंध, जाणून घेण्यासाठी नक्की वाचा कथेचे पुढचे भाग. कथा आवडल्यास लाईक करा, तुमची प्रतिक्रिया लिखाणाचा हुरूप वाढवते. धन्यवाद.
-©शुभांगी मस्के…ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//