बंधू येईल माहेरी न्यायला..

भावाची वाट बघणाऱ्या बहिणीची कथा
बंधू येईल माहेरी न्यायला..

गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : रक्षाबंधन

" यापुढे आम्ही तुला मेलो आणि तू आम्हाला मेलीस.." सुधाकरराव रागाने बोलत होते.
" बाबा, नका ना असे बोलूस." सुचेता रडत होती.
" आई, बाबा, दादा हे शब्द त्या लफंग्याशी लग्न करताना नाही का आठवले? पळून जाऊन लग्न केलेस , मग आता आशीर्वादाची नाटके कशाला? परत इथे पाऊल टाकलंस तर याद राख. निघ इथून." सुधाताई रडत होत्या. सुचेताने मदतीसाठी भावाकडे सुमेधकडे बघितले. पण मदतीशिवाय त्याच्या नजरेत फक्त चीड दिसत होती. तिची वहिनी अपूर्वा निर्विकारपणे बघत होती. सुचेता आईकडे गेली. आई तिला मिठीत घेणार तोच सुधाकररावांचा आवाज आला,
" तिच्याशी संबंध ठेवायचे असतील तर तुम्हीसुद्धा घर सोडले तरी चालेल." सुचेता तशीच तिथून निघाली. तिचा नवरा रजत बाहेर वाट बघत होता.
" खूप चिडले का?" त्याने विचारले. ती काहीच बोलली नाही हे बघून तो ही गप्प झाला.


" सुमेध, अरे काय आपले सगळे प्रोजेक्ट्स रिजेक्ट होत आहेत."
" हो बाबा.. मी पण तोच विचार करतो आहे. ती कोणी एक नवीन बाई इथे बदली होऊन आली आहे. तीच करते आहे हे सगळे."
" मग तिला भेटून ये. आपली कामे झालीच पाहिजेत."
" हो बाबा.."

" मला मॅडमला भेटायचे आहे."
" मॅडम अपॉइंटमेंट शिवाय कोणालाच भेटत नाहीत. तुमची अपॉइंटमेंट आहे का?"
" नाही. मी खूप वेळा फोन केला. पण माझे नाव ऐकूनच फोन कट होतो. अपॉइंटमेंट घेणार तरी कशी?" सुमेध वैतागून बोलत होता.
" थांबा. मी विचारून येतो."
" जा. मॅडमने पाच मिनिटे दिली आहेत तुम्हाला." सुमेध आत गेला..
" तू?? आय मीन तुम्ही?" सुमेधने आई वासला होता.
" का ? आश्चर्य वाटले? बोला काय काम होते? का भेटायचे होते मला?"
" सुचेता.. पण इथे नाव तर वेगळेच आहे." सुमेधला बसलेला धक्का अजूनही कमी झाला नव्हता.
" त्याचा काय संबंध?"
" मला.. म्हणजे आमचे प्रोजेक्ट रिजेक्ट का होत आहेत, ते विचारायचे होते? आता समजले. तुम्ही आधीच्या गोष्टींचा राग काढता आहात."
" मी माझे खाजगी आयुष्य आणि सामाजिक आयुष्य कधीच एकमेकांत गुंतवत नाही. ते प्रोजेक्ट चुकीचे होते म्हणून रिजेक्ट झाले." सुमेधचा चेहरा पडला. त्याने पटकन विचारले..
" सुचेता रक्षाबंधन जवळ आले आहे. तू घरी येशील?" सुचेता हसली..
" येईन ना.. नक्की येईन." सुमेध हसत बाहेर पडला. सुचेता घरी आली की इमोशनली ब्लॅकमेल करून काम पूर्ण करून घ्यायचे असा त्याचा बेत होता. त्याने घरी येऊन ही बातमी सगळ्यांना सांगितली. सुचेता सुखरूप आहे हे ऐकून आईला आनंद झाला. बाबांनी नाराजी दर्शवली. पण सुमेधने त्यांची समजूत काढल्यावर त्यांनी होकार दिला कारण व्यवसाय हा व्यक्तिगत रागलोभापेक्षा जास्त मोठा होता.
रक्षाबंधनाच्या दिवशी सुचेता आली तीच एका मोठ्या गाडीतून. अंगावर भरजरी साडी, हिऱ्यांचे दागिने घालून. तिच्या स्वागतासाठी घर सजले होते. पंचपक्वान्नांचा सुवास दरवळत होता. वहिनी दारात औक्षणाचे ताट घेऊन उभी होती. दोन भाचरे उत्सुकतेने बघत होती. सुचेताने त्यांना जवळ बोलावले. त्यांच्या हातात आणलेले गिफ्ट्स ठेवले. ते बघून ते दोघे खुश झाले. सुचेताने पुढे होऊन वडिलांना नमस्कार केला. त्यांनी तोंडातल्या तोंडात पुटपुटत आशीर्वाद दिला. तिने आणलेली पैठणी वहिनीच्या हातात ठेवली. ती पाहून तिचे डोळे विस्फारले.
" आई कुठे?" सुचेताने विचारले. वहिनीने आतल्या खोलीच्या दिशेने खूण केली.
सुचेता आवेगाने आत गेली. आत आजारी आईला पाहून कळवळली..
" आई.."
" तुम्ही बसा त्यांच्यासोबत. मी आलेच." वहिनी तिथून निघाली. इतक्या वर्षांनंतर भेटलेल्या आईशी काय बोलावे हेच तिला सुचेना. कितीतरी वेळ ती फक्त तिचा हात हातात घेऊन बसली होती.
" जावई आणि नातवंडं नाही आली माझी?" शेवटी आईनेच विचारले.. खूप वर्षांनी ती आईशी बोलत होती. तिला अश्रु आवरत नव्हते.
" वाढायला घेऊ ना?" वहिनीने येऊन विचारले. सुचेताने आईकडे बघितले. आईने मान हलवली. आईला आधार देत तिने बाहेर आणले. बाहेर जेवणाची जय्यत तयारी झाली होती. चांदीची ताटे, वाट्या. ताटाभोवती रांगोळी. तिच्या आवडत्या उदबत्तीचा घमघमाट. वहिनीने तिला ताटावर बसवले.
" राखी जेवणानंतर बांधा." वहिनीने फर्मावले. भाऊ स्वतः वाढायला उभा राहिला. त्याकडे दुर्लक्ष करून सुचेताने आईला विचारले.
" आई तू मला लहानपणी एक गोष्ट सांगायचीस आठवते? एक गरीब बहिण आणि श्रीमंत भाऊ असतो. भाऊ गावजेवण घालतो. पण बहिणीला बोलावत नाही. बहिण तरिही मुलांना घेऊन जाते. पहिल्या दिवशी भाऊ ताकीद देऊन जेवू देतो. तरिही भुकेने कळवाणार्या लेकरांकडे बघून ती दुसर्‍या दिवशीही जाते. तेव्हा मात्र तो तिला हाताशी धरून हाकलतो. दिवस पालटतात. बहिण श्रीमंत होते. भाऊ तिला जेवायला बोलावतो. बहिण जाते खरी पण ती आपले सगळे दागिने पाटावर ठेवते आणि त्या दागिन्यांना जेवू घालते. भावाने विचारल्यावर ती सांगते माझे जेवण त्याच दिवशी झाले. आज या दागिन्यांचा मान आहे." सुचेताचे बोलणे ऐकून सुमेध आणि बाबांचा चेहरा पडला.
" असे काय बोलतेस तू सुचेता?"
ते न ऐकलेसे करून सुचेता बोलत राहिली. " तुला माहित आहे आई. लग्नानंतर प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी मी दादाची वाट बघायचे. त्याचा फोन येईल. मी तुला माहेरी न्यायला येतो म्हणून. पण तो नाही आला ग कधी. मला खूप रडायला यायचे. मग मी देवाला, चंद्राला राखी बांधायचे. दादाला नाही."
" आज बोलावले ना यांनी तुम्हाला? महाग ओवाळणीही घेऊन ठेवली आहे." सहन न होऊन वहिनी बोलली.
" आज मला बोलावले नाही. बोलावले आहे माझ्या पदाला. त्याने जर मला बोलावले असते ना तर मी हसत हसत आले असते. तुम्ही कोणीतरी माझी, माझ्या नवर्‍याची, मुलांची चौकशी केली ? त्यांची तर तुम्हाला कोणालाच आठवणही नाही. आज मी ज्या पदावर आहे त्या पदावर नसते तर दादाने मला ओळखही दाखवली नसती. मला घरी बोलावणे तर दूरच. बरोबर ना दादा?" सुमेधने मान खाली घातली.
" का हा राग बाबा माझ्यावर? तर मी मला आवडणार्‍या व्यक्तीशी लग्न केले म्हणून. पण दादानेही तेच केले, हे मात्र तुम्ही सोयीनुसार विसरलात. आणि वहिनी आज जशी मध्ये बोललीस तशी त्यादिवशी बोलली असतीस तर ग? तुसुद्धा विसरली होतीस ना त्यावेळेस तुमच्या लग्नासाठी मी केलेली मदत.."
" झाले गेले विसरून जा सुचा. जेवून घे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी वाद नकोत." आई म्हणाली.
" आई रक्षाबंधन म्हणजे ग काय? भावाने बहिणीच्या आणि बहिणीने भावाच्या अडचणीत त्याच्या पाठिशी उभे रहावे. मी राहिले ग त्याच्या पाठिशी पण त्यालाच नाही वाटले. असो.. मला फक्त तुम्हाला भेटायचे होते म्हणून मी इथे आले होते. आणि दादा तू जे प्रोजेक्ट सादर करत होता ते तुला कोणीतरी फसवत होते. प्रोजेक्ट सुरू झाले असते तर आज ना उद्या नक्कीच तू अडकला असतास म्हणून मी ते अप्रूव्ह करत नव्हते. पुढे तुझी इच्छा. निघते मी." कोणालाही काही समजायच्या आत रडत सुचेता तिथून निघून गेली.
" अशीच असते बहिणीची माया. भाऊ कसाही वागला तरिही त्याचे हितच चिंतणारी.." डोळे पुसत आई म्हणाली.


कथा कशी वाटली नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई