बंधन भाग 98

Social Love

भाग 98 

( गेल्या भागात अरुंधतीची धनंजयसोबत ओळख झाली आणि त्यानंतर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पाहुया त्यानंतर घरी काय काय घडतय)
 
          त्या रात्री विक्रम गंगाच्या कुशीत शांतपणे न रडता झोपी गेला. गंगाला बरं वाटलं. तिचं तर डोकच सुन्न झालं होतं. आपली वहिनी अशी कशी वागली. ती खोटं बोलत राहिली आणि आपण डोळे झाकून विश्वास ठेवला! आपण जरा शहाणपणा दाखवला असता तर कदाचित हे सगळं वेळीच उघडकीस आलं असतं या विचाराने तिला वाईट वाटत होतं. रणजीतला तर ते पत्र अजूनही खरं वाटत नव्हतं. आपली अरुंधती आपल्याला अशी कधी सोडून जाऊ शकेल याचा त्यांनी कधी विचारही आजवर केला नव्हता. तिची चीडचीड व्हायची, ती कधीतरी रागवायची पण हे अस काही पाऊल उचलण्याचा विचार करेल अस त्यांना वाटलं नव्हतं. ती रात्र त्यांनी तशीच खोलीत बसून काढली.
....................................................
              दुसरा दिवस उजाडला तोच त्यांच्यासाठी नवे प्रश्न घेऊन. आदल्या दिवशी दुपारी ती घरातून बाहेर पडली होती.  तेव्हापासून ते रात्रीपर्यंत विक्रमने आत्याला आणि रणजीतला काही त्रास दिला नव्हता. पण सकाळ झाली तशी आई कुठेच दिसेना. दररोज सकाळी आपल्याला उठवणारी, कडेवर घेऊन आपल्याला आंघोळीला घेऊन जाणारी, आपल्याला आंघोळ घालून मऊ मऊ टॉवेलने आपले हातपाय पुसणारी, आपल्याला खाऊ देणारी म्हणजे आई. सकाळची त्याची सगळी कामं अरुंधतीच करायची आणि आज मात्र आई कुठेच दिसेना तसा तो रडायला लागला तस गंगाला काही सुचेना. तिने त्याला आंघोळ घातली आणि नंतर खायला दिलं तसा तो थोडा शांत झाला. मग ती रणजीतसोबत बोलली. अरुंधती गेली पण नक्की कुठे? कोणाकडे? हे कोडं होतंच. रणजीत माधवला सोबत घेऊन गंगा म्हणाली त्याप्रमाणे आधी तिच्या घरी खासदारसाहेबांच्या बंगल्यावर गेले. तिथं मात्र नोकरमंडळींकडून त्यांना जे कळलं त्याने रणजीतच्या पायाखालची जमिनच सरकली. अरुंधती चिडून गेलीय म्हणजे कोणा नातेवाईंकांकडे गेली असेल असा समज होता त्यांचा. ती गेल्या चार - पाच महिन्यांपासून इथं एका माणसासोबत यायची. जो साधारणतः आपल्याच वयाचा होता याने तर त्यांना अजून धक्का बसला. नोकरमंडळींनी सांगितलेल्या वर्णनावरुन त्यांना अंदाज आला ती व्यक्ती कोण असेल याचा! घरी गेल्यानंतरही गंगाने धनंजयबद्दल सांगितलच. हे सगळं समजल्यावर त्यांच्या पायातलं बळच निघून गेलं. ही बातमी बाहेर समजली तर राजेशिर्केंची बदनामी होईलच शिवाय खासदारसाहेबांवरही लोक हसतील या विचाराने त्यांना अजून दडपण आलं. पण त्यांच्या सुदैवाने तेव्हा मिनिटा मिनिटाला सनसनाटी बातम्या देणार्‍या वृत्तवाहिन्या नव्हत्या. ना बातम्या व्हायरल करणारी समाजमाध्यमं होती. त्यामुळे या गोष्टींचा फार त्रास नव्हता. त्यांना आता स्वतःच्या परिस्थितीपेक्षाही विक्रमचं रडणं पाहवेना. त्याच्यासाठी तरी आपण खचून चालणार नाही या विचाराने ते शांत राहिले. या सगळ्यामुळे मात्र गंगाच्या मनात अरुंधतीची जी कर्त्या समजूतदार बाईची प्रतिमा होती ती मोडून पडली आणि तिने आता स्वतः पदर खोचून विक्रमची जबाबदारी घेतली.
........................................................
                 घरी हे अस सगळं झालं म्हटल्यावरती रणजीतचाही पाय घरातून निघेना. विक्रमला अस सोडून आपण बाहेर जाणं त्यांच्या जीवावरती आलं. त्यांनी ठरवलं आता जे होईल ते होईल कोणी काहीही बोलू दे पण विक्रमपेक्षा आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही. त्यांनी त्यांचे पुढचे सगळे दौरे रद्द केले. घरगुती अडचणींमुळे मी बाहेर जाऊ शकत नाही अस पक्षातल्या ज्येष्ठांना सांगून टाकलं तस पक्षात नाराजीचं वातावरण पसरलं. गेल्या निवडणुकीत नवीन असुनही ते बहुमताने निवडून आले होते त्यामुळे याहीवेळी त्यांच्याकडून पक्षाला बर्‍याच अपेक्षा होत्या आणि म्हणूनच पक्षाने स्वखुशीने या वेळी त्यांना उमेद्वारी दिली होती. त्यांचा चेहरा केवळ सांगलीपुरता नाही तर प.महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातल्या जनतेपर्यंत पोहचावा या दृष्टीने पक्षाने सगळं नियोजन केलं आणि त्यांनीच आता अस बोलल्यानंतर सगळेच नाराज झाले. पण त्यांना आता फक्त विक्रमला सांभाळणं महत्त्वाचं वाटत होतं. तो तर आई घरात कुठेच दिसत नाही म्हणून कावराबावरा झाला होता आणि त्याच रडणंही काही थांबेना. त्याला दिवसभर अरुंधती अवतीभवती असण्याची सवय झाली होती. रणजीत नसले तरी त्याला काही फार आठवण वगैरे यायची नाही. पण आता तीच कुठे दिसेना त्यामुळे त्याला खाणंपिणं, खेळणं काही करावस वाटेना. गंगाला आता घरातली कामं करावी की त्याला शांत बसवावं आणि कस शांत करावं काही सुचत नव्हतं. यातच दोन - तीन दिवस गेले मग रणजीतने विक्रमकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याला कडेवरती घेऊन झोपवण्याव्यतिरिक्तही त्याची बाकी कामं अरुंधतीप्रमाणेच करायला सुरुवात केली. त्याला सकाळी आंघोळ घालणं, अंग पुसणं, कपडे घालणं, त्याच्यासोबत बसून खेळणं सगळं ते करु लागले. तो थोड्या वेळासाठी का होईना पण खेळण्यांमध्ये रमला तरी त्यांना बरं वाटे. मग माधवही त्याला आपल्या अंगाखांद्यावरती खेळवायचा. घोडा घोडा करणं,लपाछपी अस काही ना काही त्याच्यासोबत खेळून माधव त्याचं मन रमवायचा प्रयत्न करे. पण मधूनच तो रडायला सुरुवात करे आणि मग मात्र सगळ्यांची तारांबळ उडायची. रणजीत त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळीच तो खाईल याकडे लक्ष द्यायचे. पण तो काही खायला तयार नसायचा. ते गोष्टी, गाणी सांगून त्याला भरवायचा प्रयत्न करायचे पण कधी खाल्ल तर खायचा नाही तर अजिबात नाही अश्याने तो आजारी पडला. त्याला सणसणून ताप आला तसे सगळे घाबरले. गंगा रात्रभर मिठाच्या घड्या त्याच्या कपाळावरती ठेवत जागी राहायची आणि रणजीत त्याच्या उशाशेजारी बसून असायचे. त्याची अवस्था बघून रणजीतला काही सुचायचं नाही. डॉक्टरही येऊन तपासून जायचे पण तो ठणठणीत बरा झाला नव्हता. त्याने वेळेवर खायला हवं आणि आई नाही म्हणून त्याला बावरल्यासारख वाटतय इतकच डॉक्टर सांगायचे. गंगा जितकं त्याच्याजवळ थांबता येईल तितकं थांबायची. तो दोन अडीच वर्षांचा झाला होता त्यामुळे आजूबाजूच्या वस्तूंबद्दल या वयाच्या मुलांना  कुतुहल असत मग कोणतीही वस्तू ते ओढतात, धरतात त्यातून काही इजा व्हायला नको म्हणून ती डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची तरी एक दिवस तो घरातच खेळता खेळता पायरीवरती अडखळून पडला आणि डोक्याला जखम झाली. डॉक्टर तातडीने घरी आले आणि त्यांनी मलमपट्टी केली.

" साहेब, त्याची तब्येत आधीच खराब आहे आणि त्यात हे अस व्हायला नको होतं " डॉक्टरांच्या शब्दांनी रणजीतला हतबल झाल्यासारखं वाटलं.

" पर आता काय कराव? डाक्टर सायेब तुमी सांगा काय करायचं "   आत्या त्याच्या बाजूलाच बसली होती.

" त्याला बरं वाटलं नाही तर दवाखान्यात अॅडमिट करावं लागेल. तापाचं फक्त निमित्त आहे हो. लहान मुलांची दुखणी काही वेळा मानसिकही असतात. तुम्ही म्हणाला होतात, वहिनी त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्यात. मला वाटतं, तुम्ही लगेच तार करुन बोलवून घ्या त्यांना. तोच एक उपाय आता कारण हे अस फार दिवस नाही चालू शकत " 

डॉक्टर म्हणाले तस गंगा रणजीतकडे पाहू लागली. त्यांच्या डोळ्यात हतबलता होती फक्त. दोघांनाही कळतं नव्हतं आता काय करावं. त्याची अवस्था पाहून रणजीतला वाटलं, अरुंधतीची गरज आम्हा दोघांनाही होती. त्याच्यासारखच आपणही पोरकं झाल्यासारखं त्यांना वाटायला लागलं.   
......................................................
                 

         विक्रमची अवस्था आता रणजीतला पाहवेना. दुसरीकडे त्यांची दोन - तीन स्नेहीमंडळी सोडली तर बाकी कोणालाही या सगळ्याची कल्पना नव्हती. ऐन निवडणुकांच्या तोंडावरती भाऊसाहेब असे घरी बसलेले बघून पक्षातले लोक त्यांच्यावर नाराज होते आणि त्यातच त्यांनी एक निर्णय घेतला.

" साहेब, आता काय करायचं पुढे ?"  माधवने विचारलं.

" काही नाही, शांत राहायचं. उद्या उमेद्वारी अर्ज मागे घ्यायची मुदत संपतेय " ते शांतपणे म्हणाले.

" मग ?"  

" मी अर्ज मागे घेणार! " 

" काय ? अहो साहेब याचे काय परिणाम होतील याचा विचार......"

" असो.....होऊ दे काय व्हायचं ते पण विक्रमपेक्षा काही महत्त्वाचं नाही. त्याला काही झालं तर तिला काय उत्तर देऊ मी !"  

" तुम्हाला वाटतं, वैनीसायेब येतील माघारी ?" माधव त्यांना समजावत म्हणाला.

" काय माहित! पण माझी जबाबदारी कशी झटकू मी आणि यात त्या एवढुश्या पोराचा काय दोष "  ते खुर्चीत शांतपणे बसले.

" हो सायेब तेही बरोबरचय. तुमी जे कराल ते योग्यच कराल. मी आहे तुमच्या सोबत "  माधव चिंताग्रस्त चेहर्‍यानं म्हणाला.

" हं, माधव तु आहेस म्हणून निदान मला बोलता तरी येत नाहीतर आमची ताई एक अशी.....तिचं चिडणही स्वाभाविक आहे म्हणा अरुंधतीवरती "  ते म्हणाले.

" सायेब, वैनी आल्याच नाहीत तर.....तर तुमी बाबु साठी दुसरं लग्न " 

" छे! माधवा काहीही काय, नाही रे मी आणि विक्रम आहोत की एकमेकासाठी नी तो मोठा होईलच की! शिवाय....शिवाय अस पहिलं प्रेम विसरणं सोप नसतं ना! " 

त्यांनी छताकडे पाहत एक दिर्घ श्वास घेतला. खुप बोलायचय, ढसाढसा रडून मोकळं व्हायचय पण ते करता येत नाही तेव्हा जशी अवस्था होते तशी झालेली त्यांची अवस्था बघून माधवलाही त्रास होत होता. तो आता घरीही जायचा नाही तसही निवडणुका होत्या त्यामुळे त्याच्या कामाला विश्रांती नाही याची त्याच्या घरी कल्पना होती. त्यामुळे तो रात्रीही भाऊसाहेबांकडेच थांबायचा न जाणो विक्रमची तब्येत बिघडली किंवा कुठे जायची वेळ आली तर ते एकटे काय करतील म्हणून तोही तिथच थांबायचा.
..................................................
                दुसर्‍या दिवशी दुपारी भाऊसाहेबांनी विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेद्वारी अर्ज मागे घेतल्याची बातमी आली तस त्यांच्या पक्षातले सगळेच हादरले. कोणत्याही ज्येष्ठांना विचारात न घेता, कसलीही चर्चा न करता, कोणतीही सल्लामसलत न करता ते एकतर्फी निर्णय घेऊन मोकळे झाले आणि तो अंमलात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. पक्षातले सगळेच आधीपासून त्यांच्यावर नाराज होते आणि या निर्णयामुळे तर पक्षश्रेष्ठींपासून सगळ्यांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. खासदार साहेब गेल्या निवडणुकीत रणजीतविषयी इतकं कौतुक करायचे आणि आताचं रणजीतचं वागणं पाहून खासदार साहेबांची निवडच चुकली अस पक्षातल्या ज्येष्ठांना आता वाटू लागलं होतं. पहिल्या फटक्यात मिळालेल्या यशाची हवा त्यांच्या डोक्यात गेली अशाही चर्चा बाकी पक्षांमध्ये सुरु झाल्या. त्यांनी वैयक्तीक अडचणींपुढे पक्षाचं अस्तित्व निवडणुकीत पणाला लावलं म्हणून पक्षातल्या नेतेमंडळींची बोलणीही ऐकली. या सगळ्या त्यांच्या वागण्याचा फायदा मात्र बापु धनावडेंनी उचलला. याही वेळी रणजीतच्या विरुद्ध बापू धनावडे उभे होते. रणजीतने आयत्या वेळी पक्षाला तोंडघशी पाडून उमेद्वारी अर्ज मागे घेतला याचा आनंद बापुला झालाच. बापुसाहेबांच्या पक्षाने अजून मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात केली आणि त्यात कळीचा मुद्दा असायचा रणजीतने निवडणुकीतून घेतलेली माघार. प्रत्येक सभेतून बापु धनावडे एकच आवाहन करायचे आणि हळूहळू त्यांचं बोलणंही लोकांना पटू लागलं आणि सभांना गर्दी वाढली.

" एखाद्या माणसाच्या पाठीवर थोरामोठ्याचा हात असतो तोपर्यंत ठिक असतं हो! बघा, खासदार साहेब दुर्दैवानं आता आपल्यात नाहीत पण त्यांच्यामागे त्यांचे हे वारसदार बघा...सांगलीतल्या जनतेला वार्‍यावर सोडण्याचं काम केलं ह्यांनी मग का जनतेनं पाठिशी राहावं ह्यांच्या... मी माझ्या तमाम मायबापांना हृदयापासून साद घालतो कि मला आपली सेवा करण्याची एक संधी द्या "  

बापुसाहेबांच्या या आवाहनासरशी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि ही गर्दी, हा जल्लोष मतांमध्ये परिवर्तित व्हायलाही वेळ लागला नाही. बाकी उरलेल्या दोन पक्षांनी नाममात्र उमेद्वार उभे केले आणि बापुला सशर्त छुपा पाठिंबा दिला. आधीच भाऊसाहेबांवर नाराज असलेल्या लोकांनी मतांचं दान बापुच्या पदरात टाकलं आणि बापुसाहेब बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मात्र कधीकाळी रणजीतचं कौतुक करणार्‍या वृत्तपत्रांनी रणजीतविरूद्ध बरंचस छापलं. रणजीतसोबतचं पक्षाचही नाव खराब होत होतं म्हणून अजून त्यांच्यावरती सगळे नाराज होते. ते मात्र सगळं शांतपणे पाहत होते. ऐकत होते.पण विक्रमकडे पाहिलं की त्यांना धीर यायचा. त्याला झोपवताना, त्याला गोष्ट सांगताना, त्याला खेळवताना त्यांना वाटायचं, आपण कुणीही नाही आहोत फक्त एका मुलाचे वडील आहोत बस!
......................................................
                  अरुंधती त्या दिवशी घरुन निघून धनंजयकडे आली. सांगलीत फार वेळ थांबणं धनंजयला नको होतं. तो थोड्याच दिवसांत दुबईला निघणार होता. तिथे एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी त्याला मिळाली होती. त्याने हे अरुंधतीला सांगितलं आणि मग दोघांनीही दुबईला जाऊया आणि छान नवीन आयुष्य सुरु करुया अस त्याने सुचवलं. राजेशिर्केंच्या चार खोल्यांच्या घरात गेली चार वर्ष संकटं झेलून आणि जवळच्या माणसांचं अंथरुणाला खिळून मरण बघून थकलेली ती या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तयार झाली. त्याप्रमाणे तिने घर सोडलं आणि ते दोघं दिल्लीला आले. काही दिवसात त्याचं पासपोर्ट व्हिसाचं काम होणार होतं. ते दिल्लीला त्याच्या ओळखीच्या एका ठिकाणी राहिले. घर छान होतं. सुसज्ज होतं. त्याने तिला हे आपलं इथलं घर अस सांगितलं. ते पाहून ती हुरळून गेली होती. पुढचे दहा - पंधरा दिवस छान मजेत गेले आणि धनंजयने तिला पासपोर्ट मिळाल्याचं सांगितलं. पासपोर्ट बघून तर तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण विदेशात जाणार आणि आता तिथेच राहणार या कल्पनेने ती आनंदीत झाली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी निघायचं होतं. या आनंदातच ती रात्री झोपली. 


क्रमशः 

🎭 Series Post

View all