बंधन भाग 96

Social, Love


भाग 96

( गेल्या भागात आपण थोडे मागे गेलो होतो. जिथे तरुणपणातले अरुंधती आणि भाऊसाहेब तुम्हाला भेटले. अरुंधतीचे आई वडील, रणजीतचे आई वडील आणि गंगा आत्या भेटले आणि त्यांचं आपसातील नातं कसं होतं हेसुद्धा कळलं पाहूया पुढे )

       निवडणुकांची रणधुमाळी संपत आली होती. प्रचाराच्या तोफाही थंडावल्या. बापु धनावडे आणि त्याच्या पक्षातल्या सर्वांनाच समोर रणजीतसारखा नवखा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात असणं हे काही फार मोठं वाटतं नव्हतं. बापू धनावडे विरोधी पक्षाचा आधी कार्यकर्ता होता मग बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून आला होता आणि यावेळी जिल्ह्यातल्याच काही नेत्यांच्या मदतीने आमदारकीचं तिकीटही पदरात पाडून घेतलं होतं पण रणजीतपेक्षा त्याला राजकारणाचा, निवडणुकीचा अनुभव होता त्या तुलनेत रणजीतची पाटी कोरी म्हणावी लागेल. पण उत्तमरावांना खात्री होती, जनतेला हा चेहरा आणि त्याचे शब्द नक्कीच आश्वासक वाटतील. या मुलावरती खरंच जर लोकांनी आता विश्वास दाखवला तर हा बरंच काही इथल्या जनतेसाठी करु शकेल. आपल्यानंतर आपल्या मागे इथल्या माणसांचं, आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व राज्याच्या राजकारणात करण्यासाठी हा मुलगा नक्कीच पात्र ठरेल. त्यांचा रणजीतवरती बराच विश्वास होता आणि यातच निवडणुकही सुरळीत पार पडली. गुरुजी, शारदाबाई, गंगा सगळ्यांना वाटत होतं, रणजीत निवडून यावा आणि त्याच्या हातून काहीतरी चांगलं घडावं. या सगळ्यांच्यात अरुंधती शांत असायची पण मनातून ती प्रार्थना करायची, रणजीत निवडून यावेत आणि त्यांना जे करायची इच्छा आहे ते करण्याची संधी लोकांकडून त्यांना मिळावी. सगळ्यांचा विश्वास म्हणा खासदार साहेबांची पारख म्हणा कि तिची प्रार्थना शेवटी निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळ्यांना अपेक्षित होतं तेच घडलं, रणजीत निवडून आले तेही बहुमताने बापु धनावडेंचा दणदणीत पराभव करुन! लोकांनी शेवटी या नवख्या चेहर्‍यालाच पसंती दर्शवली होती. उत्तमरावांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्यांना अस आनंदी बघून सुनंदाही खूश झाली. रणजीतच्या घरच्यांसाठी तर अभिमानाचा दिवस होता तो! तरीही त्याच दिवशी श्रीपादनी रणजीतला समोर बसवलं. शारदाबाईंनी त्याला ओवाळलं.

" भाऊ, सायेब झाला की लय भारी बग !" गंगाचा उत्साह ओसंडून वाहत होता अगदी.

" ए काहीही ताई "  रणजीतचा चेहरा ओशाळला.

" भाऊ, चांगलं कर काय ते. बघ माझी आणि गुरुजींची काही या राजकारणाच्या फंदात पडायची इच्छा नव्हती. पण खासदारसाहेबांनी आग्रह केला म्हणून आम्ही तयार झालो तेव्हा त्यांचा विश्वास जप "  शारदाबाई ओवाळताना म्हणाल्या.

" हो, आणि नेहमी लक्षात ठेव, आमदारकी मिरवायची गोष्ट नव्हे. पद येतं जातं, निवडणुका येणारच असतात पाच वर्षांनी मागे उरतं तुमचं चांगलं काम तेव्हा पदासाठी काही करु नकोस "  गुरुजी शांतपणे म्हणाले.

" हो, बाबा " रणजीतने दोघांना वाकून नमस्कार केला.
" खूप मोठा हो " दोघंही एका सुरात म्हणाले.
...........................................
रणजीतचं कौतुक सगळ्यांनाच होतं. उत्तमरावांचा अंदाज बरोबर निघाला म्हणून पक्षातले लोकही खूश होते. पक्षाच्या वतीने रणजीतचा मोठा सत्कार करण्यात आला. चेहरा कोणाचा का असेना आपल्या पक्षाचं वर्चस्व राहिलं हे महत्त्वाचं म्हणून ज्येष्ठ नेतेही निवडणुकीतले रुसवे - फुगवे विसरुन रणजीतचं कौतुक करायला लागले. या दरम्याने वर्तमानपत्रांमधूनही रणजीतवरती कौतुकाचा वर्षाव सुरु होता. कमी वयात, राजकारणाचा अनुभव नसताना झालेला आमदार म्हणून कौतुक होतं, राजेशिर्के समाजसेवेसाठी ओळखलं जाणारं कुटुंब ते राजकारण असा प्रवास याबद्दल ही छापून येत होतं. काही वृत्तपत्रांनी तर उत्तमरावांचा राजकीय वारसदार म्हणूनच रणजीतबद्दल छापायला सुरुवात केली तर काहींनी उगवतं नेतृत्व आणि भावी जबाबदार्‍या अस काही काही छापून कौतुक करताना सावध पवित्राही घेतला. अरुंधती मात्र सगळी वृत्तपत्र रोज वाचून काढायची अर्थात त्यातल्या बातम्यांपेक्षा रणजीतबद्दल जे कौतुक छापून यायचं ते वाचण्यात तिला रस असायचा. रणजीतच्या सत्कांराचे फोटो, आमदारकीच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो, त्यांच्याबद्दल छापून येणारे लेख सगळं ती पाहायची आणि कात्रणं कापून वहीत चिकटवायची जे रणजीत काय बाकीही कोणालाच माहित नव्हतं ना घरी ना तिच्या मैत्रीणींना! आपण का वागतो असे हे तिला स्वतःलाही माहित नव्हतं फक्त तिच्या मनाला नेहमी त्यांची ओढ असायची. 
............................................
                निवडणुक निकालानंतरचे काही दिवस रणजीतकरता घाईगडबडीचे होते. अरुंधतीला भेटणं, बोलणं यासाठी वेळच नव्हता. तिनेही स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आता परिक्षाही जवळ येत होती. पण मनात सारखं यायचं, गेले चार - पाच महिने वेगळेच होते नाही! निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचं घरी येणं, त्यानंतर आपल्याशी ओळख, आपल्याला अभ्यासात मदत करणं पण  आता हे सगळंच संपणार! आता ते आमदार बनले. आता त्यांना कामातून कुठे वेळ मिळणारय आपल्या घरी यायला! बाबा आणि त्यांच्या भेटीगाठी आता काही पहिल्यासारख्या घरी होणार नाहीत. आपलंही एम.ए. आता पुर्ण होणार मग त्यांना तरी काय म्हणून भेटायचं! असं बरंच काही तिच्या मनात सुरु असायचं. रणजीतचे सगळे कौतुक सोहळे संपले आणि एक दिवस अरुंधती त्यांना भेटायला घरी आली. घरी गुरुजी आणि बाई नव्हत्या. गंगा बाहेर गेलेली. रणजीत आमदार झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच भेट. तिने येताना पेढ्यांचा बॉक्स आणला होता.

" हे काय हातात !"  रणजीतने आश्चर्याने दारातच विचारलं.

" हो, आत येऊ का? पाहुण्यांना बाहेरच उभं करतात वाटतं तुमच्यात ?"   ती हसत म्हणाली.

" ये, बस "  ते दारातून बाजूला झाले. ती आत आली. तिला माहित होतं, साधारणतः दुपारच्या वेळी घरी कोणी नसतं. निवांत बोलता येईल म्हणून ती आली होती.

" काय म्हणतो अभ्यास ?" रणजीतने पाण्याचा तांब्या तिच्या हातात दिला.

" मस्त "  ती पाण्याचा घोट घेत बोलली.

" हे घ्या पेढे ! अभिनंदन तुमचं " तिने तांब्या- भांडं टेबलवरती ठेवलं आणि पेढ्यांचा बॉक्स उघडून त्यांच्यासमोर धरला.

" धन्यवाद! कशाला पण हे!" रणजीतने एक पेढा घेतला. ती हसली आणि बॉक्स बाजूला ठेवला.

" असच म्हटलं आमदार साहेबांचं अभिनंदन करु " 
" बरं, आभार मग "  ते हसले आणि लाकडी टेबल लगतची खुर्ची वळवून बसले. ती समोरच्या खुर्चीवरती बसली होती.

" काय मग आता पुढे ? " तिने सहजच बोलतेय अस दाखवत बोलायला सुरुवात केली.

" पुढे काही नाही! आता छान काम करायचं बस "
" बस इतकच!"  तिने म्हटलं.
" हो "  ते म्हणाले.
" मग आता बाईही थकल्या त्यांना विश्रांती द्या जरा नाहीतर नुसतं कामच करत बसाल "  ती म्हणाली.
" हो, बघुया तोच विचार आहे......."  रणजीत शांतपणे हातातल्या पेनाशी खेळत म्हणाले.
" कसला विचार ?"  तिने पटकन विचारलं.
" हेच......साहेबांच्या पाहण्यात एक मुलगी आहे बघु आता " 
" काय ?"  ती उठून उभीच राहिली. तिला धक्काच बसला हे ऐकून.
" हो, आणि छान आहे स्वभावाला स्वयंपाकात सुगरण आहे अगदी "  ते बोलत होते. तिला ऐकवेना ते.
" मग कधीचा मुहुर्त लग्नाचा ? "  ती बाहेर निघण्यासाठी वळली. ते खुर्चीवरतीच बसले होते.
" बघु, कळवेन तुम्हाला! " ते किचिंतसं हसले.
" बरं,  चांगलय. साहेबांचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती म्हटल्यावरती काहीही शक्य आहे आता!"  ती बाबांवरती मनातून चिडली होती. 
" हो ना "  ते म्हणाले.
" निघते मी. ताईंना सांगा येऊन गेले "  अस बोलून मागे वळून त्यांच्याकडे न पाहताच ती तिथून बाहेर पडली.
...........................................
       त्यानंतरचे पुढचे तीन - चार दिवस ती नेहमीसारखी कोणासोबत बोलली नाही. घरात ती असली कि घरभर फिरायची, सुनंदाच्या मागे मागे असायची, बाबांसोबत गप्पा मारायची पण दोन तीन दिवस ती शांत होती आणि खोलीतच अभ्यासाच्या नावाखाली बसून राहायची. मैत्रिणींसोबतही फारसं बोलायची नाही. तिला कळतच नव्हतं नेमकं कश्याचं वाईट वाटतय आपल्याला! रणजीतचं लग्न ठरणार या गोष्टीचं की आपण त्यांना आता भेटू शकणार नाही याचं आणि या प्रश्नांची तिच्यापुरती उत्तरं तिने शोधली होती ती म्हणजे दोन्ही! तिला दोन्ही गोष्टींबद्दल वाईट वाटतं होतं. रणजीतने त्या मुलीचं तोंडभरुन कौतुक केलं याचा राग आला होता आणि गेले चार - पाच महिने आपण वेड्यासारखं वागलो त्याबद्दल स्वतःचाही राग येत होता. तिने ती कात्रणं चिकटवलेली वही कपाटातून बाहेर काढली आणि वही उघडून खुर्चीत येऊन बसली. त्या कात्रणांवरुन हात फिरवला तसे डोळे भरुन आले. तिला वाटलं, का आणि कसल्या बळावरती आपण इतकं वेड्यासारखं वागत राहिलो! ते आपल्यासोबत फार कुठे बोलायचे आणि आपला हा वेडेपणा त्यांना समजला तर त्यांनाही धक्काच बसेल शिवाय बाबा, त्यांना अजिबात आवडणार नाही आपलं अस वागणं. तिला काय करावं, कोणाशी बोलावं काही सुचेना. इतक्यात खालून आईची हाक आली,

" अरु, रणजीत आलेत बघ " 

" मग, मी अभ्यास करतेय! तु बघ काय तो पाहुणचार कर "  तिने चिडून खोलीतून उत्तर दिलं. खाली दिवाणखान्यात बसलेल्या त्यांच्या कानावर ते पडलं. सुनंदाने पाण्याचा ग्लास त्यांच्या हाती दिला. ते थोडस पाणी प्यायले.

" ही असच वागते....कोणावरती चिडलीय इतकी काय माहित! आता हिच्या मैत्रीणींनाच विचारायला हवं. यांना सांगून काही उपयोग नाही. ते आपले निवांतच असतात "  सुनंदा बोलत होती.

" मी बोलून पाहू का? "  ते उठले तस ती बरं बघा म्हणाली.
....................................................
    " अरु "   त्यांनी आत येऊन तिला हाक मारली. तिने खुर्चीतून मागे वळूनही पाहिलं नाही. टेबलवरच्या पुस्तकात डोक खुपसून ती बसली होती.

" तुम्ही!  कसे बुवा फिरकलात इकडे आज! "  ती रागावून बोलली.

" असच "  ते किचिंतस हसले.

" हो का? मला वाटलं, साखरपुड्यासाठी निमंत्रण द्यायला आलात " 

" नाही ग, एवढ्या झटपट कुठे! आणि सगळं तयार आहे फक्त साहेबांनी एक घोळ घातला ! तिला विचारलच नाही, मी तिला आवडतो का ते!"  

" अच्छा, बरं. मग तुम्ही जाऊन विचारायचत!"  ती म्हणाली.

" हो, माझं त्याबद्दलच काम होतं तुझ्याकडे " 


" हे बघा, मी....मी काही तुमच्या साखरपुड्याला येणार नाही! नाहीतर म्हणाल, ताईच्या मदतीला ये, लग्नाला ये अक्षता टाकायला. मी कुठेही येणार नाही. मला अभ्यास आहे "

" बरं, अक्षता टाकायला नको येऊस! फक्त माझ्यासोबत मंडपात उभी राहा. लोक आहेतच अक्षता टाकायला!" ते म्हणाले तस ती पटकन उठली.

" काय! काय म्हणालात ?"  ती मागे वळली आणि त्यांच्यासमोर आली.

"तु ऐकलस तेच! बरं, निघतो हा आता " ते जायला वळले. तिला काय बोलाव सुचेना इतका आनंद झाला होता.

" आणि हो मी उगीच म्हटलं हा ती सुगरण आहे तस काही नाही हा! तिला फक्त बेसनाचे लाडूच बनवता येतात. बघु आयुष्यभर लाडुच खावे लागणार आता!" 

ते हसून तिथून बाहेर पडले. तिच्या चेहर्‍यावरती मणभर हसू पसरलं. बाबांनी आपल्यासाठी रणजीतला विचारलं आणि सगळं ठरवलंसुद्धा हा तिच्यासाठी सुखद धक्का होता. पण ती खूश होती.
.......................................................
       

रणजीत घरी येऊन गेल्यानंतर अरुंधती खूश होती. उत्तमरावांनी सुनंदालाही याविषयी सांगितलं तेव्हा तीही खूश झाली. रणजीतचा स्वभाव तिलाही एव्हाना परिचयाचा झाला होता. सुनंदा आणि अरुंधतीला सांगण्याआधीच उत्तमरावांनी याबद्दल श्रीपाद गुरुजी आणि शारदाबाईंकडे रणजीत बद्दल विचारणा केली होती. उत्तमराव इतके चांगले माणूस म्हणजे लेकही गुणी, सुस्वभावीच असणार याची गुरुजींनाही खात्री होती. गंगाला तर अरुंधती आवडायची त्यात निवडणुकीच्या काळात ती घरीही यायची त्यामुळे शारदासोबतही तिची ओळख झालेली. उत्तमरावांच्या सांगण्याप्रमाणे गुरुजींनी रणजीतकडे विषय काढला. आपण लहान माणसं आहोत. उगीच नसती स्वप्नं पाहू नयेत अस रणजीतने मनाशी ठरवलं होतं पण उत्तमराव बोलले तस नकळत रणजीतला आनंद झालाच. त्या क्षणी आपण खूप सुदैवी असल्यासारखं वाटलं! रणजीतला मनातून माहित होतं, आपल्याला अरुंधतीची सोबत आवडते आणि ती आयुष्यभर आपल्यासोबत असणार आता म्हटल्यावर त्या कल्पनेनच त्यांना आभाळ ठेंगणं झालं. त्यानंतर मात्र अरुंधतीची परिक्षा होईपर्यंत एक- दोन महिने थांबायचं सगळ्यांनी ठरवलं. उगीच लग्नाच्या गडबडीत तिच्या अभ्यासाचं नुकसान नको. रणजीतला वाटलं, साखरपुडाही नंतरच होऊ द्यावा. साखरपुडा झाला कि मुलीला जबाबदारी अंगावर पडल्याचं दडपण येतं. सासरी जायचं दडपण येतं त्यापेक्षा दोन तीन महिने थांबू, तिची परिक्षा आटोपली की पाहु पुढे साखरपुडा, लग्नाविषयी. या गोष्टीलाही घरचे तयार झाले. 

          हा मधला दोन - तीन महिन्यांचा लग्नाआधीचा काळ मात्र त्या दोघांसाठी अविस्मरणीय होता. ते कामातून वेळ मिळेल तसे घरी यायचे. तिला अभ्यासातही मदत करायचे अगदी तिच्यासाठी स्वतःच्या हाताने नोट्स सुद्धा लिहायचे मग तिला एकच काम ' रेडिमेड नोट्स ' वाचून काढणे आणि उजळणी करणे! तिच्या आईसोबत गप्पा मारायचे मग आईलाही बरं वाटे. कधी कधी अरुंधतीसाठी चाफ्याची ताजी फुलं आणायचे. तिला चाफ्याचा सुवास फार आवडायचा. मग अभ्यासाच्या टेबलवरती चाफ्याची फुलं ठेवून ती वाचत बसायची. तिची नेहमी तक्रार असायची, ' तुम्ही काहीतरी छान छान बोला ' पण रणजीतला ते काही जमायचं नाही. मग त्याने युक्ती शोधली. पत्रांमधून बोलायचं! त्या दरम्याने त्यांनी अरुंधतीला बरीच पत्रं लिहिली अगदी लांबलचक! ते घरी आले की निघताना तिच्या हातात लिफाफा द्यायचे मग ती रात्री झोपण्याआधी शांतपणे बिछान्यावरती बसून पत्र वाचायची. एकटीच, घरातली गडबड नाही, आजुबाजुचे आवाज नाही. ते बोलतायत आणि आपण ऐकतोय असच वाटायचं तिला मग तिही पत्राचं उत्तर लिहायची आणि त्यांना द्यायची. कधी तिच्याबद्दल कौतुक असायचं, कधी ' अरु, अभ्यास कर हा, तसा मी काही तुझ्यापेक्षा मोठा नाही पण सांगतो ' अस काहीतरी मिश्किल लिहिलेलं असायचं. कधी घरच्यांबद्दल काही असायचं पण बरंचस तिच्याविषयीच लिहिलेलं असायचं जे वाचताना ती हरखून जायची. 
.........................................
                   तिची परिक्षा आटोपली आणि साखरपुड्याची तयारी सुरु झाली आणि सगळे लग्नाच्या तयारीत गुंतले. पुढल्या महिन्याभरातच छानसा मुहुर्त पाहून छोटेखानी लग्नसोहळा पार पडला आणि अरुंधती राजेशिर्केंच्या घरी माप ओलांडून आली. रणजीतला हे सगळं स्वप्नातल्या सारखच वाटत होतं इतक्या वेगाने हे सगळं घडलं होतं. त्यांचं कसलाही विचार नसताना कार्यकर्ता होणं, पुढच्या दीड वर्षात विधानसभेला उभं राहणं, नवीन असुनही जनतेनं विश्वास ठेवून मतदान करणं आणि आमदार होणं हा आनंद पचवता येतो न येतो तोच अरुंधतीचं स्थळ त्यांच्यासाठी येणं आणि पुढच्या दोन - तीन महिन्यात लग्न होणं हे सगळंच आनंददायी होतं दोन्ही घरांसाठी. रणजीतने कधी विचारही केला नव्हता, आपण आमदार वगैरे होऊ याचा पण सगळं कल्पनेपेक्षाही सुंदर घडलं होतं.
..................................................
                 अरुंधतीच्या घरी येण्याने श्रीपाद गुरुजी, शारदाबाई, गंगा सगळेच खूश होते. अरुंधतीला घराशी जुळवून घ्यायला वेळ लागेल थोडा याची कल्पना त्यांना होती. लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली, ऐषोआरामात वाढलेली ती आणि रणजीतकडे स्वतःचं घर आणि घरात तीन माणसं यापलिकडे ना बंगला, ना गाडी, ना नोकरमंडळी, ना धनदौलत. एका स्वातंत्र्यसेनानीच्या घरात संस्कार आणि विचारांच्या धनापेक्षा वेगळं काय असणार तसच इथेही होतं पण अरुंधतीला रणजीतचं वागणं, त्याचा स्वभाव, अदबीने बोलणं, हळवेपणा सगळंच आवडायचं आणि नव्या नवलाईचे दिवस सगळ्यांनाच छान वाटतात तसच अरुंधतीच्या बाबतीतही होतंच. सगळं छान दृष्ट लागण्याजोगं!  
....................................
              त्यांच्या लग्नाला वर्ष पुर्ण होत आलं आणि अचानक अरुंधतीच्या आईला कसलीशी गाठ आली म्हणून काही तपासण्या केल्या आणि कँन्सरचं निदान झालं! कोणाला खरं वाटेना म्हणून पुन्हा तपासण्या केल्या पण दुर्दैवाने तेच खरं निघालं. हा उत्तमरावांसाठी धक्काच होता. त्यांनी ठरवलं, चांगल्यात चांगले उपचार करु पण सुनंदा बरी व्हायला हवी. त्यांनी अरुंधती आणि सगळ्यांनाच धीर दिला आणि लवकरात लवकर सुनंदावरती उपचार सुरु झाले. त्यानंतरचे काही महिने बरेच तणावाचे होते पण उत्तमरावांनी हार मानली नाही. आपलं काम आणि सुनंदाची काळजी दोन्हीकडेही त्यांनी लक्ष दिलं. ती बरी होईल हा विश्वास त्यांना होताच पण काही महिन्यातच तिची तब्येत खालावायला सुरुवात झाली आणि ज्याची भिती सगळ्यांना होती तेच झालं सुनंदाने शांतपणे डोळे मिटले उत्तमराव आणि तिचे लाडके जावईबापू शेवटपर्यंत तिच्या सोबत होते या समाधानानेच तिने प्राण सोडले. तिचं जाणं मात्र त्यांना पचवणं शक्य होईना. बायको नाही, लेकही सासरची आता एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणं त्यांना जीवावरती यायचं. नोकरमाणसांची काय ती सोबत आणि त्यांना भेटायला येणारी दररोजची माणसं, नेतेमंडळी हिच काय ती घरातली घाईगडबड! आता पुर्वीसारखा घरभर ऐकू येणारा सुनंदाचा आवाज नव्हता! ना घरी आल्यावरती वाट पाहत थांबलेलं कुणी असायचं. घरी असल्यावर सकाळी नाश्ता, जेवणं नेहमीप्रमाणे नोकरमंडळी पाहायची. घरही अगदी स्वच्छ, लख्ख असायचं पण तिचा हात त्या सगळ्यात कुठेच नसायचा. अरुंधतीला सारखं घरी बोलावणही त्यांना नकोसं वाटे.  तिला उगीच वाईट वाटेल, ती तिच्या घरी असलेलीच बरी या विचाराने ते फार तिला घरी बोलवायचे नाहीत. त्यानंतर मात्र त्यांनी कामाचा सपाटाच लावला. जिल्ह्यातले पुल,काही ग्रामीण रस्ते यांची कामं मार्गी लावली. बाजारपेठेतल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी हॉस्पिटलला निधी उपलब्ध करुन दिला. तिथे काही नव्या सुविधा सुरु केल्या. सततचे दौरे, पक्षाचं काम यात झोकून दिलं आणि पुढल्या वर्षभरातच सततच्या दगदगीने ते आजारी पडले. तेव्हा मात्र अरुंधतीला भिती वाटायला लागली. पण रणजीतने तिला धीर दिला. थोड्याच दिवसात उत्तमरावांना डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यावे लागतील अस सांगितलं तस सगळे घाबरले. ते मात्र निर्धास्त होते. 


त्यांना हॉस्पिटलला नेल्यानंतर रणजीत, अरुंधती त्यांना भेटायला जायचे. अरुंधतीला त्यांना अस बेडवरती झोपलेलं पाहणं नकोसं वाटे पण उत्तमराव भेटायला येणार्‍या सगळ्यांना धीर द्यायचे. ते पाहून रणजीतलाही बरं वाटायचं आणि त्यांची तब्येत हळूहळू सुधारायला लागली तसा सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. पण अचानक पुन्हा तब्येत बिघडली. रणजीत त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले.

" साहेब, तुम्ही बरे व्हा लवकर आता "  रणजीत त्यांच्या समोरचं बसले होते. 

" हो, बरीचशी कामं करायची आहेत अजून! पण उरली तरी काही चिंता नाही तुम्ही आहात की!"  ते रणजीतचा हात हातात घेऊन बोलायला लागले.

" अस का म्हणता? तुम्ही आहात म्हणून मी आज जो कोणी आहे तो...... "  रणजीत कृतज्ञतेने बोलले.

" नाही ओ, तुमच्याकडे नेतृत्वक्षमता आहे, काही चांगलं करण्याची इच्छाशक्ती आहे मी फक्त ती लोकांसमोर ठेवली इतकचं आणि मला खात्री आहे तुम्ही भविष्यात जे काही कराल ते योग्य कराल " 

" हो, तुमचा विश्वास तुटेल अस काही करणार नाही मी!" 

" अाणि अरुची काळजी घ्या. लहानपणापासून लाडात वाढलेली ती सांभाळून घ्या. अर्थात तुम्हाला काही समजावण्याची गरज नाही म्हणा!"  ते खोकत बोलत होते. सुनंदाच्या जाण्यानंतर त्यांनी केलेली धावपळ, दगदग त्यांना सहन झाली नव्हती आणि त्याचे परिणाम हे असे शरिरावरती झाले होते. 

" हो, तुम्ही नका काळजी करु. मी वचन देतो साहेब, अरुंधतींच्या डोळ्यातन पाणी येऊ देणार नाही मी आणि सोबत असेन त्यांच्या नेहमीच " रणजीत उत्तमरावांच्या हातावरती आश्वासकपणे थोपटत बोलले.

" हं, तशी माझी आणि हिची माणसाची पारख चुकायची नाही " 
" बरं, बरं आता जास्त बोलत बसू नका. आराम करा आणि लवकर बरे व्हा "  रणजीत त्यांना धीर देत म्हणाले तस उत्तमराव हसले. 
..........................................................
                  रणजीतला खात्री होती उत्तमराव पुन्हा ठणठणीत बरे होतील आणि आपल्याला म्हणतील, ' चला, आता कामाला लागायला हवं ' पण त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं. रणजीत उत्तमरावांना भेटून घरी परतले आणि दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली तीच खासदार साहेब गेल्याच्या बातमीने! रणजीतसाठी हा मोठा धक्का होता. अरुंधतीचं माहेरपण अनुभवण्याचं, आईकडून गोड कौतुक करुन घेण्याचं वय, लग्नाचे नवे नवे दिवस आणि यातच आईचं जाण आणि पुढल्या वर्षभरातच वडिलांचं आकस्मिक जाणं याने ती कोलमडून गेली. पण रणजीतने तिला शक्य होईल तितका आधार दिला. श्रीपादगुरुजी, शारदाबाई, गंगा सगळेचजण अरुंधतीला समजून घेत होते, धीर देत होते. शारदाबाईंनी तिला आईची उणीव भासणार नाही म्हणून जितकं करता येईल तितकं केलं. हळूहळू यातन ती सावरली. रणजीतसाठी मात्र उत्तमरावांना विसरणं सोप नव्हतं. कुठलीही सभा असो, दौरा असो, पक्षाच्या मिटींग असोत काहीही असलं तरी रणजीतच्या डोळ्यांसमोर उत्तमरावांचा चेहरा यायचा. पण पुढे वर्षभरात सगळं हळूहळू पुर्वपदावरती येऊ लागलं. गुरुजींनी गंगाचं लग्नही एक चांगला मुलगा पाहून ठरवलं. मुलगा रिक्षाचालक होता. थोडासा शिकलेला होता, स्वतःची भाड्याची खोली होती आणि सांगलीतलाच होता. त्याचेही आई - वडिल वारले होते. एका नातलगाकडे तो वाढलेला त्यामुळे गंगाच्या दुःखाची त्याला कल्पना होती. दोघही एकटे वाढलेले, मायेला पारखे असलेले जीव त्यामुळे पहिल्या भेटीतच दोघांनी एकमेकांना पसंत केलं. लवकरच गंगाचं साध्या पद्धतीने लग्नही पार पडलं. गुरुजींना वाटलं, आपण तिला वाढवलं आता कन्यादान झालं आपली जबाबदारी आपण पार पडली याचा आनंद त्यांना होता. गंगाही खूशीत तिच्या घरी गेली. सगळं छान पार पडलं म्हणून सगळे खूश होते. त्यानंतरचे काही महिने ठिक गेले आणि गुरुजींची तब्येत बिघडली तशी रणजीतला भिती वाटायला लागली. अरुंधतीने शारदाबाई, रणजीत दोघांनाही धीर दिला. बाबा गेल्यानंतर गुरुजीच तिला वडिलांच्या जागी होते. गुरुजींना काही होऊ द्यायचं नाही अस तिने ठरवलं. त्यांची सगळी सेवासुश्रुषा ती शारदाच्या सोबत करायची. त्यांचं जेवणखाणं, औषधपाणी सगळ्या गोष्टींकडे तिने लक्ष दिलं. फार फार पाच - सहा महिने यात गेले आणि गुरुजींचं निधन झालं. आयुष्य खाचखळग्यांनी भरलेलं आणि लोकांसाठी वाहिलेलं स्वतःची हौसमौज, खाणपिणं याकडे लक्ष द्यायला गुरुजींना कधी वेळच नसायचा. उतारवयात आता आधीच क्षीण झालेला देह थोडस आजाराचं निमित्त पुरेसं ठरलं. ते समाधानानं गेले पण शारदाबाई त्यांना गुरुजींचं जाणं सहन झालं नाही. गुरुजींच्या प्रत्येक निर्णयात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या असायच्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही गुरुजींना तुरुंगातही जाव लागलं पण शारदाबाई खचल्या नव्हत्या उलट त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. गुरुजींच्या तुटपुंजा पगारात घर चालवलं. रणजीतसोबत गंगाचा सांभाळ केला. गुरुजींनी शाळा घरातल्या दोन खोल्यांत भरवायची ठरवली आणि मुलींनाही शिकवायचं ठरवलं तेव्हा  स्वतः मुलांना शिकवण्याची जबाबदारी शारदाबाईंनी घेतली. त्याही निर्णयात त्या गुरुजींच्या बरोबर उभ्या राहिल्या. त्यांनी गुरुजींची साथ शेवटपर्यंत दिली पण गुरुजीच असे अर्ध्यावरन निघून गेले हा धक्का बाईंसाठी खूप होता. त्यांनी खाणपिणंच सोडलं. जगायची इच्छाच उरली नाही. मुलं घरी शिकवणीला आली कि गुरुजी आठवायचे. त्या एकट्याच कोणाशी न बोलता नुसत्या बसून राहायच्या. अश्यानं त्यांची तब्येत मात्र खालावत गेली आणि काही महिन्यांतच त्या अंथरुणाला खिळल्या. अरुंधतीला आता रडू यायचं. आपली सगळी माणसं एकेक करुन सोडून जायला लागली. रणजीत कशीबशी तिची समजूत घालायचे पण तेही हतबल होते. अरुंधतीने बाईंसाठी जितका करता येईल तितकं केलं. त्यांची आंघोळपाघोळ, जेवणखाणं, वेळेवरती औषध देणं सगळं मुलीसारखं केलं. तिच्या मदतीला गंगाही यायची. ज्या माऊलीनं आपल्याला आयुष्य दिलं तिचे असे हाल पाहणं गंगाला नको वाटायचं. पण दोघींनी शारदाबाईंसाठी खूप केलं. अरुंधती त्यांच्या हाकेसरशी त्यांच्याजवळ धावत जायची. शेवटच्या दिवसात तर त्यांना जेवण हाताने भरवण्यापासून ते त्यांची वेणीफणी करण्यापर्यंत सगळं अरुंधतीने केलं. शारदाबाईंना याचच समाधान होतं, आपल्या घरी चांगली सुनबाई आली जी रणजीतला शेवटपर्यंत साथ देईल नी या समाधानानेच त्यांनी एक दिवस डोळे मिटले. अरुंधती आणि रणजीत तुटुन गेले मनाने. इतक्या जबाबदार्‍या डोक्यावर घेण्याचं ते वयच नव्हतं आणि एकही वडिलधारं माणूस सोबतीला उरलं नव्हतं. आता फक्त ते दोघच उरले एकमेकांसाठी.

क्रमशः

तुमच्या शंकांचं निरसन याच भागात होणार होतं आणि पुढल्या भागापासून अनघा विक्रम दिसणार होते पण बराच मोठा भाग झाला आहे आणि लिहताही येईल पण सोमवारपर्यंतही भाग आला नसता म्हणून उर्वरित 97 मध्ये...गुरुवारच्या आधीच 97 येईल...लवकरच...अरुंधतीबद्दलच्या सगळ्या शंकांचं निरसन 97 मध्ये असेल आणि विक्रमचं बालपणसुद्धा!

🎭 Series Post

View all