बंधन भाग 95

Social Love

बंधन 95
( गेल्या भागात जितेंद्रने विक्रमचं ऐकून घेतलं आणि अनघासोबत बोलण्याचाही प्रयत्न केला पण ती अजूनही नाराज आहे. नताशा विक्रमला भेटून राजेशने तिला सांगितलेले प्लॅन्सही ती सांगते. पाहू पुढे......थोडस मागे...)

( 95 &96  अनघा - विक्रम दिसणार नाहीत..... )

     घरात सद्या जे काही सुरु होतं त्यामुळे भाऊसाहेब अस्वस्थ होते. घरातल्या एका माणसाच्या चुकीच्या वागण्याचे परिणाम सगळ्या घरावरती झाले होते. एकत्र असणारी, हसती- खेळती भावंडं दुरावली होती. घरात आलेली नवी सुनबाई अश्रू ढाळत उंबरठ्याबाहेर पडली होती. विक्रमच्या हातून जे घडलं होतं ते समजून त्याला माफ करण्याइतकीही ती क्षुल्लक गोष्ट नव्हती. सगळ्यांच्या नजरेत तो ' गुन्हेगार ' होता. नीतू , भाऊसाहेब, अनघा तर त्याच्याशी बोलतही नव्हते आणि दुसर्‍या बाजूला आत्या, जितेंद्र जे सगळं चाललय ते पटत नसुनही ठामपणे त्याची बाजूही घेऊ शकत नव्हते. हे सगळं पाहून अरुंधती अस्वस्थ झाली. विक्रमसाठी तिचं प्रेम अजुनही आधीसारखंच होतं. तिच्या नजरेत मात्र अजुनही तो तिचा ' लाडका लेक ' होता. पण अनघा घर सोडतेवेळी जे काही सगळ्यांसमोर भाऊसाहेब विक्रमला बोलले होते त्यानंतर मात्र अरुंधती थोडी दुःखी होती. त्यांचे शब्द तिच्या जिव्हारी लागले होते. त्या दिवसानंतर आता जवळपास पंधरा दिवस उलटले होते तरीही विक्रम आणि अनघावरुन भाऊसाहेबांमध्ये आणि अरुंधतीमध्ये बोलणं झालं नव्हतं किंबहुना अरुंधतीनेच भाऊसाहेबांपाशी हा विषय काढणं टाळलं होतं. विक्रमसोबत ती बोलली होती त्यानंतर मात्र तिला वाटायला लागलं कि एकदा भाऊसाहेबांशी बोलून पहावं, त्यांना सांगावं, तो चुकीचा वागला पण पुर्णपणे तो चूक नाहीय. त्याला उगीच अट्टल गुन्हेगार असल्यासारखं वागवू नका. तिने दोन तीन दिवस यावरती विचार केला आणि एका सकाळी ती चहा झाल्यानंतर खोलीत भाऊसाहेबांशी बोलायला आली.

" येऊ का ?"  तिने विचारलं तस हातात घड्याळ चढवीत ते मानेनच हो म्हणाले.

" जरा बोलायचं होतं. तुमची मिटींग आहे थोड्यावेळात तर " ती आढेवेढे घेत बोलायला लागली. तिचा अस्वस्थ चेहरा पाहून ते म्हणाले,

" हो, पण बोला आता येऊन माघारी का जाताय ?" त्यांनी म्हटलं तस हाताची मुठ बंद करुन शांतपणे तिने बोलायला सुरुवात केली.

" मला विक्रमबद्दल......" 

" मला वाटतं यावर घरात बरीच चर्चा सुरुय आणि त्यांची बाजू घेऊन कोणी माझ्यापाशी बोलायला येऊ नका " ते बोलले आणि निघण्यासाठी वळले. तिने आज बोलायच ठरवलच होतं.

" रणजीत, मला माझ्या पोराचे अश्रू पाहवत नाहीत म्हणून आले मी. मान्य आहे ना त्याची चूक झाली नव्हे गुन्हा झाला पण तो अट्टल गुन्हेगार, लफंगा असल्यासारखच तुम्ही सगळे वागवताय त्याला! मला सुनबाईचं दुःख समजतय. तिची फसवणूक झाली हेही मान्य पण.....पण "

" पण......पण काय अरु, आणि तुला नाही कळणार फसवणूक म्हणजे काय ते! ज्याच्या बाबतीत घडतं त्यालाच ते दुःख माहित असतं "  ते म्हणाले.

" हो, हे सुद्धा मान्य पण....पण सुनबाईने फक्त एकदा त्याच्याशी बोलावं " 

" अरु, त्या पोरीनं काय करायला हवं हे तू नकोच सांगूस. स्वतः विश्वासघात केलेल्यांनी तिला कसले सल्ले देऊ नयेत. अरु, तिचं विक्रमवरती प्रेम आहे. ती घराबाहेर पडली त्याला विक्रमचच वागणं जबाबदार होतं आणि त्यामुळे ती काही त्याला सोडून गेली असं मी मानणार नाही आणि तसही ज्यांना मुळात साथ सोडून जायची सवय आहे त्यांनी याबद्दल बोलू नये " त्यांचे ते धारदार शब्द ऐकून तिचे डोळे पाणावले.

" रणजीत, तुम्ही.....मी मी विक्रमच्या काळजीपोटी बोलले हो "  ती कसबस म्हणाली.

" अरु, त्याची काळजी मला आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त आहे " इतक बोलून मागे वळूनही न पाहता ते खोलीबाहेर पडले.

ते बाहेर गेले आणि ती हताश होऊन मटकन बेडवरती बसली. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं इतकं की त्या अश्रूत समोरच्या वस्तूही अंधूक दिसू लागल्या. हळूहळू मनाचे बंद दरवाजे उघडले. डोळ्यांत साठवलेला पंचवीस वर्षांचा काळ हळूहळू मागे सरकला आणि त्या अश्रूंच्या मागे हळूहळू एक प्रतिमा दिसू लागली. लख्ख, स्पष्ट अगदी काल परवा पाहिल्यासारखी.
..............................................................................
            
" माझ्या बंधुभगिनींना माझं एकच सांगणं आहे आपण या देशाचे, राज्याचे नागरिक आहोत आणि यापेक्षा महत्त्वाचं आपण जिथल्या मातीत जन्मतो, वाढतो त्या मातीची लेकरं असतो. याचा अर्थ आपला भाग, आपला गाव, आपला तालुका आणि आपला जिल्हा यांच्याशीच आपली बांधिलकी असा अर्थ नाही. बघा, आपण इथनं सांगलीतनं कोल्हापूरात गेलो की आपण तिथे आपली ओळख ' मी सांगलीचा ' इतकीच सांगतो, इथल्याच एखाद्या तालुक्याचा पाव्हणा दुसर्‍या तालुक्याला गेला की तो आपल्या गावाचा टेंभा मिरवतो आणि तेच जर समजा आपण महाराष्ट्राबाहेर गेलो की तिथे हे जिल्हा, तालुका या मर्यादा नाही राहत ओ तिथं आपण आपल्या राज्याचं नाव सांगतो त्यामुळे गाव, तालुका, जिल्हा सगळंच महत्त्वाचं आहे हो त्यामुळे प्रादेशिकतेच्या वादात, गावतंट्यांत न अडकता आपल्याला प्रगती करायची आहे. आधी आपला गाव सुधारायला हवा तरच जिल्ह्याचा विकास होईल "   

एक मध्यम शरिरयष्टीचा, उंच, सावळ्या वर्णाचा साधारणतः पंचवीशी - सव्वीशीचा एक मुलगा व्यासपिठावरुन जमलेल्या गर्दीसमोर माईकवरुन बोलत होता आणि निमित्त होतं चार- पाच महिन्यांवरती असलेल्या विधानसभा निवडणुकांचं. जमलेली गर्दी कान देऊन त्या मुलाचे शब्द ऐकत होती. व्यासपिठावरती बसलेली बडी नेते मंडळी अवाक होऊन त्या मुलाकडे बघत होती. त्या खुर्च्यांमध्ये आ वासून पाहणार्‍या जुन्या जाणत्या नेतेमंडळींमध्ये फक्त एकच चेहरा असा होता जो अभिमानाने त्या मुलाकडे पाहत होता आणि ते होते त्यावेळचे जिल्ह्याचे खासदार उत्तमराव जाधव! जिल्ह्यातलं एक खंबीर नेतृत्व.

             तो मुलगा बोलत होता बोलत होता आणि जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या सभेच्या ठिकाणी जवळच रस्ता होता आणि तिथे मघापासून एक साधारणतः तितक्याच वयाची मुलगी उभी होती. सुती पंजाबी ड्रेस, व्यवस्थित पिन लावून गळ्याभोवती लपेटलेली ओढणी, केसांची लांबसडक वेणी आणि पायात कोल्हापुरी चपला! तिच्या हातात काही पुस्तकं होती आणि ती भान हरपुन त्या व्यासपिठावरच्या मुलाचं बोलणं ऐकत होती.

" अरु, ए अरु अरुंधती "  शेजारी उभ्या असलेल्या मैत्रीणीने तिच्या खांद्यावरती हात ठेवला तशी ती भानावरती आली.

" अय्या,अरु काय ग इतकं आवडलं त्याचं बोलणं !" 

" ए, काहीही सविता "  अरुंधतीच्या चेहर्‍यावरती हसू पसरलं.

" आ.....अग किती हसतेस ग! काय ग अरु नक्की भाषणच आवडलं ना "  दुसर्‍या एका मैत्रिणीने तिला चिडवलं.

" गप ग मालती ए तुम्ही दोघी उगीच काहीही बोलता " अरुंधती लाजत म्हणाली.

" हो ना, आम्हीच काहीतरी बोलतो नाही का! मग रणजीतचं कौतुक कोण करत असतं ग ! रणजीत असे आहेत न तसे आहेत "  सविता हसत बोलली.

" अग, अस नाही काही! आता ते येतात न आमच्या घरी बाबांना भेटायला मग त्यांचं बोलणं कानावरती पडतं इतकच" अरुंधती पुस्तकांशी चाळा करत बोलली.

" हो ना, मग तू नाही बोलत त्यांच्याशी !"  सविताने हसून तिची थट्टा करत म्हटलं.

" नाही, म्हणजे ते नाही बोलत कोणाशी फार...." ती बोलली.

" होय काय ! पण खरच छान बोलतात ते " सविता हसली.

" अग बोलणारच. त्यांचे वडिल संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पण होते म्हणे आणि ते पेशानं ' गुरुजी ' म्हटल्यावर लेकसुद्धा हुशारच असणार " मालती म्हणाली.

" हो, त्यांनी म्हणे शाळा पण सुरु केलीय ना घरी! हा मुलं फार नसतात पण असो कोणीतरी काहीतरी चांगलं काम करतय हे महत्त्वाचं " सविता मालतीला दुजोरा देत म्हणाली.

" चला, अरुंधतीबाई कौतुक पुरे आता! निघूया का तास संपेल नाहीतर "  मालती अरुंधतीकडे पाहत म्हणाली तश्या तिघी पुन्हा चालू लागल्या.
...................................................


अरुंधती खासदार उत्तमराव जाधवांची एकुलती एक मुलगी! एक प्रामाणिक, सचोटीने काम करणारं नेतृत्व म्हणजे अरुंधतीचे वडील होते. एका सामाजिक उपक्रमाच्या उद्गघाटनावेळी त्यांची आणि रणजीतची ओळख झालेली. रणजीतला कॉलेजमध्ये असल्यापासुनच समाजोपयोगी कामांची आवड होती पण रणजीतचे वडील श्रीपाद राजेशिर्के त्यांची एक अट होती, जे काही काम करायचं असेल ते कर पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. लोकांसाठी काही खरंच करायचं असेल तर आधी आपण वैचारीकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे त्यासाठी शिक्षण हवच या मताचे रणजीतचे आई- वडील होते आणि घरातच श्रीपाद आणि शारदा दोघांना शिक्षणाची, समाजकार्याची आवड होती त्यामुळे रणजीतलाही शिक्षणाबद्दल आस होती. त्यांनी राज्यशास्त्रात एम. ए. पुर्ण केलं आणि त्याच दरम्याने खासदार साहेबांशी पुसटशी ओळख झाली. उत्तमरावांना मात्र पहिल्या भेटीतच रणजीतचा निःस्वार्थी, प्रामाणिक स्वभाव आवडला आणि त्यांनी त्याला आपल्या पक्षाच्या कामात सहभागी होण्याविषयी विचारलं. मी कोणाच्या मागे पुढे फिरणार नाही, पक्षाचं काम म्हणजे वरचा फायदा आपल्या खिश्यात घालण्याचं साधन नसेल माझ्यासाठी. तुम्ही मला काम द्या ज्यातून मला लोकांसोबत बोलता येईल, त्यांचं ऐकता येईल या अटीवरती रणजीतने खासदार साहेबांच्या बोलण्याला होकार दिला आणि रणजीत खासदार साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते बनले आणि पुढच्या वर्षा दीड वर्षात विधानसभा निवडणुका आल्या. उत्तमरावांनी ठरवलं होतं, या वेळी आपण रणजीतसाठी शब्द टाकायचा आणि त्याला उमेद्वारी मिळवून द्यायची कारण बापु धनावडे आमदारकीसाठी उभा होता. रणजीतच्या वयाचाच हा मुलगा कमी वेळात नगरसेवक बनला आणि आता पैश्यांच्या जोरावर आमदारकीलाही उभा राहिलेला. रणजीतचं काम आणि प्रामाणिकपणा पाहून उत्तमरावांना वाटायचं, या मुलाला संधी मिळाली तर नक्कीच तो काहीतरी चांगलं काम लोकांसाठी करेल आणि यातुनच त्यांनी पक्षश्रेष्ठींना याबद्दल गळ घातली आता इतका ज्येष्ठ नेता म्हणतोय मग एक संधी देऊ बघून या विचाराने पक्षाने रणजीतला तिकीट दिलं. हे सगळं म्हणजे रणजीतसाठी आश्चर्याचा धक्का होता पण समजावण्यात पटाईत असणार्‍या उत्तमरावांनी रणजीतला आणि श्रीपादगुरुजींना याही वेळी समजावलं आणि रणजीत बापु धनावडेच्या विरोधात निवडणुक लढवायला तयार झाले. 

           या निमित्ताने रणजीतचं खासदार साहेबांच्या घरी जाणं- येणं वाढलं. बाबा, आई आणि रणजीतचं बोलणं कधी कधी अरुंधतीच्या कानावरती पडायचं. कधी कधी रणजीत एकटेच खासदार साहेबांसोबत यायचे तर कधी पक्षातली मंडळी असायची कधी इतर कार्यकर्ते असायचे पण या सगळ्यात रणजीत मात्र अरुंधतीसोबत ती समोर आली तरी बोलायचे नाहीत. माणसाने आपली पायरी ओळखून वागाव असे संस्कार त्यांच्यावर होते. त्यातून अरुंधती खासदार साहेबांची लेक, लाडाकोडात वाढलेली त्यातून सुंदर आणि आपण...आपल्याकडे फक्त विचारांची श्रीमंती आणि स्वतःच्या मालकीचं घर याशिवाय काही नाही त्यामुळे अरुंधतीसोबत मैत्री वगैरे करण्याचा विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही पण घरी कितीही माणसं येवोत रणजीत नाही आले तर तिला मात्र चुकल्यासारखं व्हायचं. आजूबाजूच्या माणसांमध्ये तिची नजर मात्र रणजीतला शोधत राहायची पण त्याच्यासोबत बोलण्याची हिम्मत तिने कधी केली नव्हती. अश्यातच एक दिवस सभा आटोपून उत्तमरावांसोबत रणजीत घरी आले. 

" सुनंदा, गुळ पाणी घेऊन ये जरा "  उत्तमरावांनी अरुच्या आईला हाक मारली. 
सुनंदा स्वयंपाकघरात होती आणि तिथच अरुंधती सुद्धा होती.

" आई, मी नेऊ ? "  अरुने विचारलं तस हो ने की म्हणत सुनंदाने पाण्याचे ग्लास भरुन ट्रे तिच्या हातात दिला.
" घे, हळु हा सांडशील " आई म्हणाली.

" नाही ग आई "  ती हळुहळु  चालत ट्रे हातात घेऊन बाहेर दिवाणखान्यात आली. तिने पाण्याचा ग्लास समोर बसलेल्या रणजीतच्या हातात दिला.

" अरु तू आलीस होय !"  बाबा हसून म्हणाले.
" हो आई स्वयंपाकाचं पाहते ना!  "  ती बोलली. 
" हो, बरं तुझा अभ्यास आटोपला का ?"  बाबांनी विचारलं.
" हो, बाबा "  ती बाबांच्या हाती पाण्याचा ग्लास देत म्हणाली.
" बरं, रणजीत आमची अरु पण एम. ए. करतेय " बाबा रणजीतकडे लक्ष देत बोलले.

" हो का छान "  मघापासून रणजीतने पहिल्यांदा तिच्या चेहर्‍याकडे पाहिलं.

" हो, अग अरु रणजीत पण राज्यशास्त्रात एम.ए. झालेत तेसुद्धा चांगल्या गुणांनी. हुशार आहेत ते अभ्यासात. "  उत्तमराव रणजीतचं कौतुक करत म्हणाले.

" अस नाही काही साहेब "  रणजीत कसनुसं हसले. 

" बरं, बरं नाही कौतुक करत पण आमच्या अरुला सुद्धा अभ्यासात काही अडलं तर सांगा हा "  ते अस म्हणाले आणि अरुंधतीने मनातून आनंदाने उडीच मारली.

" हो....हो साहेब " रणजीत थोडस हसून म्हणाले तशी अरुंधती खूश झाली. पण त्या आनंदाचं कारण तिचं तिलाही कळलं नाही.
..............................................
त्या दिवसापासून मात्र हळूहळू दोघांमध्ये बोलणं व्हायला सुरुवात झाली. रणजीत एकटेच उत्तमरावांसोबत घरी आले कि ती ते निघताना मुद्दामहून बाहेर अंगणात काहीतरी कामं करत बसायची. ' निघालात ? ' ' काय म्हणतो तुमचा प्रचार ?', ' कशी झाली सभा ?' अस काहीबाही ती विचारायची आणि ते दोन तीन वाक्यांत बोलून निघायचे. कधी कधी ती ' मला ही व्याख्या सांगता का?', ' याचं उत्तर कस लिहायचं ?'  असही विचारायची मग ते सांगायचे. अभ्यासाचं काही तिने विचारलं कि अजिबात आखडता हात ठेवून बोलायचे नाहीत मग ती ऐकत राहायची त्यांचं बोलणं. कधी ते पक्षाच्या कार्यालयात थांबणार असतील आणि तिच्या घरी येणार नसतील तर दुपारी तिचं कॉलेज सुटल्यावरती टेकडीवरती ती थांबायची मग ते वेळ काढून तिच्या अभ्यासातल्या शंका सोडवायला यायचे. तिला मात्र मनातून मजा वाटायची, ते आपल्याला भेटायला असे येतात आपण त्यांची अशी वाट पाहत राहतो तिला एकदम कादंबरीतल्या सारखं वाटायचं सगळं! कादंबरीत नायिका नायकाची वाट पाहत असते तस. आता हळूहळू ते तिच्याशी बोलायला लागले होते अगदी अभ्यासाव्यतिरीक्तही ते बोलायचे पण तेही असच आपलं गाव, निवडणुक, गुरुजींची शाळा आणि तिच्या वडिलांचं कौतुक याशिवाय फार वैयक्तिक अस काही बोलणं नसायचं दोघांमध्ये आणि एक दिवस अरुंधती रणजीतच्या घरीच आली.


" कोन पायजे ?"  साधासा सलवार - कमीज, कामवाल्या बाया काम करताना कमरेला बांधतात तशी बांधलेली ओढणी, केसांची वेणी अश्या अवतारातच एक साधारणतः तिच्याच वयाची मुलगी दारात बांधलेल्या कुत्र्याला उंबर्‍यावरती बसून खायला देत होती.

" रणजीत आहेत का ?" अरुंधतीने चाचरत विचारलं.
" न्हाई, भाऊ घरात नाही. तुमी कोन म्हनायच्या ?"  त्या मुलीने आश्चर्याने विचारलं.

" मी अरुंधती....खासदार साहेबांची मुलगी " 

" व्हय काय बरं! तुमचा काय निरोप आसलं तर सांगा म्या सांगतो " ती मुलगी म्हणाली.

" नाही, नाही निरोप म्हणजे.....त्यांना सांगा मी टेकडीवरच्या देवळापाशी त्यांची वाट बघत होते "

" का! का बुवा "  त्या मुलीनं विचारलं.

" ते मला काही व्याख्या सांगणार होते आज सविस्तर. मी पण राज्यशास्त्र शिकते ना म्हणून मग अडलं तर विचारते त्यांना "  अरुंधती अंगणातच उभी होती.

" व्हय का! बरं पर त्यो सकाळच्याला गेला त्यो आला न्हाई अजून. तुमी बसता काय आत येऊन "  

" नको, नको निघते मी.....बरं " ती जायला वळली. पुन्हा तिने फाटकापाशी गेल्यावर मागे वळून पाहिलं.

" अय्या, तुमचं नावच नाही विचारलं मी !" ती म्हणाली तस ती उंबरठ्यावर ऐटीत बसलेली मुलगी अरुंधतीकडे पाहून छानसं हसली.

" म्या गंगा! भाऊ मला ' ताई ' म्हनतो " 

" हं, बरं येते ताई " म्हणून अरुंधती तिथून बाहेर पडली. ती गेली आणि गंगाला मात्र हसू आलं. 
............................................

गंगा सात आठ वर्षांची होती तेव्हा रणजीतच्या घरी सहजच गावातल्याच एका बाईसोबत आलेली. श्रीपादगुरुंजीकडे सल्ले मागायला येणार्‍यांची कमतरता नव्हती. एखादा अर्ज लिहून घेण्यापासून ते कायदेशीर सल्ले, कौटुंबिक सल्ले मागण्यापर्यंत कश्यासाठीही दारात लोकं यायचे आणि गुरुजी त्यांना जमेल तशी प्रत्येकाला मदतही करायचे. एकदा अशीच एक बाई गंगाला सोबत घेऊन त्यांच्याकडे काही कामासाठी आलेली. ती बाई गंगाची दुरची नातेवाईक होती. तिच्याकडून कळलं कि गंगाचे आई वडील तिच्या लहानपणीच वारले. शारदाबाईंना गंगाकडे पाहून दया आली आणि वाटलं तिची जबाबदारी घ्यावी आपण! बोलक्या स्वभावाची, मनमेळावू गंगा श्रीपादगुरुजींना आणि रणजीतलाही आवडली आणि ती त्यांच्याच घरी राहिली, लहानाची मोठी झाली. रणजीत तिला ' ताई ' म्हणायला लागले आणि ती रणजीतला ' भाऊ '. गुरुजींनी तिला अक्षरओळख करुन दिली आणि तिच्या शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न केले पण गंगाला काही त्यात रस नसायचा. तिला घरातली कामं, स्वयंपाकपाणी यातच जास्त रस होता मग ती कोणाला गरज असेल तर जेवणाचे डबे करुन द्यायची त्यातून तिला चार पैसे मिळायचे आणि आपण काहीतरी करतो याचं समाधानही! रणजीत मात्र तिला शिकण्याची जबरदस्ती करायचे नाहीत. ' माझी ताई अशिक्षित असली तरी विचारी आहे, तिला कधी कस वागावं, काय निर्णय घ्यावे ते कळतं तेच तिला आयुष्यात उपयोगी पडेल ' अस ते आईबाबांना सांगायचे मग
गंगा खूश व्हायची. श्रीपाद - शारदापेक्षा जास्त गंगाला रणजीतचा स्वभाव पाठ झाला होता. रणजीतनी न बोलताही तिला कळायचं ते आनंदी आहेत की दुःखी! तिला वाटायचं, एखादी चांगली मुलगी आपल्या 'भाऊच्या ' आयुष्यात यावी आणि अरुंधतीकडे पाहून नकळत तिचं मन त्या दोघांना एकत्र ' नवरा बायको ' म्हणूनच पाहू लागलं. तिने त्यावरुन रणजीतची थट्टा करायला सुरुवात केली आणि एकदा तर चक्क शारदा आणि श्रीपादसमोरच तिने विषय काढला.

" काय भाऊ, हल्ली शिकवन्या घेतोयास की काय ?" 
" नाही ग काहीही काय! कसली शिकवणी!" रणजीतने विचारलं.

" असच, परवाच्याला कुनीतरी शोधत आलेलं घरी ?" 
" कोण ग?" शारदाबाईंनी विचारलं.
" असच, ती.....आपल्या खासदार सायेबांची लेक ग " गंगाच्या तोंडून अरुंधतीचं नाव आलेल बघून रणजीतला काय बोलाव कळेना.
" हो का, अग साहेबांचा निरोप घेऊन आली असेल " गुरुजी बोलले.
" अग, तिला चहापाणी दिलंस की नाही ?" शारदाबाईंनी विचारलं तस गंगा रणजीतकडे पाहून हसली.
" नाय, तिला निघायची घाई व्हती. अासो येल की परत व्हय की नायी रं भाऊ !"  तिने तितक्यातही रणजीतला चिडवलं.
" काहीही काय ताई !"  रणजीतने म्हटलं तस तिने पाण्याचा रिकामा हंडा उचलला.

" आई, म्या तर भाऊच्या लेकरांंच्या लग्नात नऊवारी नेसून मिरवते का नायी बग " 

" आता हे काय ग मध्येच! आधी भाऊचं लग्न तरी होऊ दे मग त्याच्या मुलांचं बघु. काय ग बाई तू !"  शारदाबाई खो खो हसायला लागल्या तस रणजीतने मागून जाऊन गंगाची वेणीच ओढली.

" काय नसतं डोक्यात भरवतेस ग आईच्या " ते म्हणाले.

" ए सोड हा भाऊ. ए आई हा बघ काय म्हणतोय "

" काय रे ?" आतून शारदाबाईंनी विचारलं.

" काही नाही काही नाही " म्हणून त्याने तिची वेणी हातातून सोडली तशी ती त्याला ठेंगा दाखवून पळाली. रणजीतला वाटलं, काहीही असो पण आपण अरुंधतीच्याबद्दल फार विचार करता नये. हे अस कधीच होणार नाही. त्यांचं एम.ए.च वर्ष आता संपेल त्यानंतर त्यांना भेटायचं नाही.

क्रमशः
उर्वरीत 96 मध्ये

कथा आता शेवटाकडे चाललीय यानंतर मी नवी कथामालिका लिहीन का नाही Don't know कारण इथे बरेच नवे लेखक येतात जे रँण्डम काहीतरी लिहतात बर्‍याच अंशी ' लव्हस्टोरीज '. मागणी तसा पुरवठा या प्रमाणे लव्हस्टोरीज मुळे वाचकवर्ग प्रचंड खेजला जातो आणि कथा रँकीकला येते, लेखक दोन महिन्यात ' लेखक ' म्हणून प्रसिद्ध होतात, पटापट वर्षाच्याआतच ' ब्लॉगर अॉफ द विक ' होतात हे सगळ वाचकांचा प्रतिसाद, येणारे व्हीयुज यावरुन  ठरतं आणि त्यावरुनच चांगलं मानधनही त्यांना मिळतं तरीही व्याकरण, शुद्धलेखन, कथेचा दर्जा कसलाच विचार ना हे लेखक करत ना वाचक....असु देत व्याकरणाच्या चुका कथा छानय अश्या कमेंन्ट्स त्यांना मिळतात.....दुसरीकडे आमच्यासारखे दोन तीन लेखक जीव ओतून, नव काहीतरी तुम्हाला मिळावं म्हणून रिसर्च करुन दिवसाचे सहा सहा तास लिहून प्रत्येक भाग पोस्ट करतात पण ना कथेला रँक, ना वाचकांचा प्रतिसाद.....मला ' ब्लॉगर अॉफ द विक ' व्हायला दीड वर्ष लागलं.....कथा शेवटाला आली तरी वीस हजार वाचक एकाही भागाला पाहिले नाहीत....कथा आजवर कधीच पहिल्या रँकला आली नाही.....बाकी आर्थिकदृष्ट्या मी कधीच विचार केला नाही पण त्याबाबतीत नुकसान होतय हे दिसत असुनही तुमच्या साठी कथा सुरु राहिली.....या कथेमुळे ' ईराची वेबसाईट ' गुगलला जास्तीत जास्त सर्च झाली सो वेबसाईटला खूप फायदा झाला....पण इतका सात आठ महिन्यांचा वेळ घालून, नी नुकसान सहन करुन पुढे लिहिणं नॉट पॉसिबल....कारण प्रत्येकजण स्वतःचा फायदा पाहून  लिहत असतो. मला जितकं निःस्वार्थी राहता आलं तितक राहिले, आणि साईटच्या दर्जा चा विचार केला, वाचकांचा विचार केला पण यानंतर नाही शक्य.

Thank Youuuuu 

🎭 Series Post

View all