बंधन भाग 93

Social Love


  भाग 93
( गेल्या भागात विक्रमने नताशाला फोन करुन भेटायला बोलावलं. भाऊसाहेब त्याच्यावरती चिडल्यामुळे त्यांनी अनघाच्या घरी जाऊन तिला आपण तिच्या पाठीशी असल्याचं सांगितलं पण विक्रमचं काहीच तिच्या आईने ऐकून घेतलं नाही )

अनघाने पाच - सहा दिवसांची घेतलेली रजा अखेर संपली. आता फेब्रुवारी संपून मार्च सुरु झाला होता. कॉलेजमध्येही आता परिक्षांचे वेध लागले. सगळेजण आपापल्या विषयांचा उरलासुरला अभ्यासक्रम पुर्ण करण्याकडे लक्ष द्यायला लागले. आपल्या वैयक्तीक आयुष्यात चांगलं घडो अथवा वाईट आपल्या कामात हलगर्जीपणा करायचा नाही ही तिची पहिल्यापासुनची सवय. त्याप्रमाणेच याही वेळी रजा संपली आणि तिने फार विचार न करता पुन्हा कॉलेजला जायला सुरुवात करण्याचं ठरवलं. ती पुन्हा कॉलेजला जाणार म्हणजे विक्रम कसही करुन तिला भेटायचा, तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करणार, नाही म्हटलं तरी ते एकमेकांसमोर येणार या विचाराने श्रीधर - कुमुद अस्वस्थ झाले. पण आता त्याला इलाज नव्हता. अजून रजा वाढवून घेण परिक्षांच्या तोंडावर शक्य नव्हतं त्यात अाता सगळ्याचं कॉलेजांमध्ये परिक्षांचं वातावरण असताना तिला मध्येच नोकरी सोड, बघू दुसरीकडे अस तरी कस सुचवायचं हाही प्रश्न तिच्या आईवडिलांसमोर होताच आणि स्वतःच्या वैयक्तीक गोष्टींचा परिणाम तिला कॉलेजच्या शिकवण्यावरती नको होता त्यामुळे आपल्या बोलण्यावर ती अजिबात तडकाफडकी तिथून नोकरी सोडणार नाही याची त्यांनाही कल्पना होतीच. 
..............................
शेवटी एकदाची तिने कॉलेजला जायला सुरुवात केली. कॉलेजला रुजू झाल्यापासून ते आजतागायत गेल्या दोन अडीच वर्षात तिने फक्त दोनवेळाच अशी आठवड्याभराची रजा घेतली होती. पहिल्यांदा जेव्हा स्नेहसंमेलनाच्या रात्री तिच्याबाबतीत जे घडलं होतं त्या वेळेला आणि दुसर्‍यांदाही दुर्दैवाने कारण तेच फक्त फरक इतकाच त्या दिवशी रात्रीच्या त्या अंधारामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं होतं आणि आता अंधार दूर होऊन सगळंच सुर्यप्रकाशासारखं स्पष्ट, लख्ख दिसत होतं जे सहन न होण्यासारखं होतं. कधीकधी अज्ञानात सुख असतं तेच खरं पण आता जे समोर आलं होतं ते पाहाव तर लागणारच होतं. त्याकडे पाठ फिरवून जगणही सोप नव्हतं. तिने या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावरती आणि स्वतःवरती होऊ न द्यायचं ठरवलं. 
......................................
गेल्यावेळी ती जेव्हा रजा संपल्यानंतर कॉलेजला जायला लागली होती तेव्हा बदललेली अनघा सगळ्यांना पाहायला मिळाली. सुती साड्या, बिना मेकअपचा कोमेजून गेलेला चेहरा, गायब झालेलं चेहर्‍यावरचं हसू आणि भोवतालच्या माणसांबद्दल, स्वतःबद्दल कडवटपणा घेऊन वावरणारं मन. तिला अस पाहून कॉलेजमध्ये तेव्हा सगळ्यांनाच जरा विचित्र वाटलं होतं  पण कोणी सरळ सरळ काही विचारणं टाळलं होतं पण यावेळी मात्र जे तिच्याबाबतीत घडलं होतं ते पाहता विक्रमला मात्र ते जुने दिवस आठवले. त्या घटनेनंतर बदललेली ती कॉलेजमध्ये पाहताना त्यालाही तेव्हा तिच्यासोबत बोलावस वाटायचं. ती त्यावेळी जेव्हा जेव्हा समोर यायची तेव्हा त्याला तिला तस कोमेजल्या चेहर्‍याने पाहताना वाईट वाटायचं. पण यावेळी पाच सहा दिवसांची रजा संपल्यानंतर ती कॉलेजला आली. त्याला माहितही नव्हतं कि आज कॉलेजला गेल्यानंतर समोर ती दिसेल! त्याने नेहमीप्रमाणे कार पार्किंगस्लोटला पार्क केली आणि तो गाडीतून उतरला आणि चालत चालत आत आला. बाहेरच्या कट्ट्यावरती नेहमीप्रमाणे मुलं टाईमपास करत बसली होती. तो चालत पुढे निघाला होता इतक्यात अचानक समोरुन ती आली! ती खाली मानेन हातातली पुस्तकं सावरत चालत होती. त्याचं मात्र पटकन समोरुन येणार्‍या तिच्याकडे लक्ष गेलं. पिवळसर रंगाची सुती साडी, चेहर्‍याला हलकासा मेकअप, दोन्ही खांद्यांवरती पुढे आलेले तिचे मोकळे केस, गळ्यातलं मंगळसूत्र चिडून तिने त्याच्यासमोरचं काढून ठेवलं होतं.  मोत्याचा नेकलेस आणि साडीच्या रंगाला साजेसे कानातले होते. तो क्षणभर पाहतच राहिला. ती नेहमीसारखीच गोड दिसत होती. तिला पाहताच त्याच्या चेहर्‍यावरती हास्याची लकेर पसरली. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. पाच सहा दिवसांचा काळ त्याला महिन्याभरासारखा वाटायला लागला. तिच्या हायहिल्स सँडल्सच्या आवाजाने तो भानावर आला. ती त्याच्यासमोर दोन पावलांवरती होती आणि तिची नजर आता वरती वळली.  त्याला अस समोर पाहून तिला काय कराव सुचेना. तिने नुसत पाहिलं आणि काहीही न बोलता पुढे निघाली. दोन पावलं पुढे गेली तोच त्याने तिला थांबवलं.

" ऐका ना "  त्याच्या तोंडून शब्द निघालेच. वैयक्तिक गोष्टींवरती चर्चा करायची ही जागा नव्हे हे माहित असतानाही त्याने तिला नकळत थांबवलं.

" तुम्ही नका येऊ बोलायला माझ्याशी प्लिज " ती म्हणाली. 
" माझं एकदा ऐकू घ्याल का तुम्ही ? " त्याने पुन्हा म्हटलं. आजूबाजूला विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचार्‍यांची ये - जा सुरु होती. त्याच्यावरती तिथे आवाज चढवून बोलणं तिने टाळलं.

" विक्रम, आपण याबद्दल इथे बोलायला नको. सो तुम्ही..." 

" Yeah, I can understand तुम्ही कॉलेज सुटल्यावरती भेटाल का? I mean If you don't mind आपण दुपारी बाहेर कुठे भेटू शकलो तर बोलताही येईल "  तो शांतपणे म्हणाला.

" नाही, नको मला.....मला काम आहे आज आणि प्लिज तुम्ही पुन्हा इथे बाहेरच्या गोष्टींविषयी बोलायला येऊ नका. उगीच आपल्यातल्या प्रोब्लेम्सची चर्चा स्टाफमध्ये नको. I think तुम्हालाही हे पटेल अशी अपेक्षा "  ती मागे वळून न पाहताच कडक स्वरात आणि सौम्य शब्दात म्हणाली. त्यावर हं म्हणून त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून पुढे निघून गेला. तिने मागे वळून एकवार पाहिलं. आपण जे बोललो ते बरोबरच होतं असे भाव तिच्या नजरेत होते.
..........................................
दुपारी जितेंद्र कारखान्यावरुन नेहमीप्रमाणे जेवायला घरी आला. अनघा घरुन निघून गेल्यापासून त्याला दुपारचं घरी जेवायला यावसं वाटेना. बर्‍याचदा दुपारचं जेवण आत्याऐवजी अनघाच त्याला वाढायची. त्याच्यासोबत गप्पा मारत बसायची. कधी कधी विक्रम आणि ती एकत्रच कॉलेजवरुन घरी यायचे मग जितेंद्र येण्याआधीच ते जेवलेले असायचे. जितेंद्रची कामं संपणार तेव्हा तो दुपारी दोन अडीच ला यायचा मग तोपर्यंत अरुंधती त्याच्यासाठी जेवायची थांबायची. कधी कधी घरी येणं जमणार नसेल तर तो आत्याला जेवणाचा डबा कारखान्यात पाठवून द्यायला सांगायचा मग अरुंधतीला एकटीलाच जेवाव लागायचं. अनघा आणि जितेंद्रची गट्टी जमल्यापासून मग तीच जितेंद्रला वाढायची आणि गप्पाही मारायची. त्यामुळे जितेंद्रने अरुंधतीला लवकर वेळेत जेवत जा अस दटावून ठेवलं होतं. अनघा गेली आणि सगळं विस्कटलं. अरुंधती पुन्हा जितेंद्रसोबत जेवायला थांबू लागली. विक्रमसोबत तिचं बोलणं झालं होतं. तो अस्वस्थ आहे हे तिला जाणवलं पण मुलं मोठी झाली आता. सगळ्याच गोष्टी मोठ्या माणसांसोबत नाही बोलता येत याची तिला कल्पना होती त्यामुळे जितेंद्रने विक्रमसोबत बोलावं अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे दुपारी जेवताना अरुंधतीने जितेंद्रकडे विषय काढला. आत्या स्वयंपाकघरात होती आणि डायनिंगटेबलला हे दोघच होते.

" जितू , तुझं आणि विक्रमचं काही बोलणं झालं का ? म्हणजे हेच एकदंरीतच जे सगळं तो वागला आणि मग अनघा निघून गेली याविषयी काही "  अरुंधतीने अंदाज घेत म्हटलं.

" नाही.....नाही ग अजून. खरं सांगू मम्मा कोण चूक कोण बरोबर तेच ठरवणं कठीण जातय शेवटी तो काय किंवा वहिनी काय दोघही आपलेच "  त्याने साध्यासरळ शब्दात म्हटलं. अरुंधतीला वाटलं, कसा आहे न हा! विक्रमइतका हुशार आणि काय ते ' गुड लुकिंग ' नाहीय जितेंद्र पण किती समजुतदार, नाती जपणारा, प्रामाणिक, आयुष्याचा फार गुंता न करता स्वतःपुरती प्रश्नांची साधीसोपी उत्तरं शोधणारा, कोणावर फार चिडून, रागावून न राहणारा असा जितू. त्याच्याकडे पाहिलं की अरुंधतीला त्याच्या वयाचे होते तेव्हाचे भाऊसाहेब आठवायचे. 

" जितू ,  कसा आहेस रे तू असा! किती साधासोपा विचार करतोस न तू! तुला पाहिलं ना कि तुमचे ' साहेब ' आठवतात मला! हे तुझ्या वयाचे होते न तेव्हा असेच होते. अजूनही आहेत म्हणा......"  अरुंधती जुन्या आठवणीत रमली.

" काय ग मम्मा गरिबाची थट्टा करतेस! असच म्हणत असतेस तू! मी त्यांच्यासारखाच राहतो, दिसतो मग त्यांचा जीव डायरेक्टरसाहेबांमध्ये !" तो हसत म्हणाला.

" ए, अस काही नाही रे! आईबाबांना सगळी मुलं सारखीच. तुम्ही तिघजणही आमचं आयुष्य आहात रे. तो काय किंवा तू आणि नीतू तुम्ही सगळे आमच्या जवळचेच आहात "  ती म्हणाली तसा त्याने तिच्या हातावरती हात ठेवला आणि हसला.

" हो ग मम्मा, I know बरं तु म्हणतेस ना तर मी बोलतो त्याच्याशी तसही बोलाव तर लागेलच. मला ते अबोला धरुन नाही वागता येत नीतूभाईसारखं! "  तो हसत म्हणाला.

" हं, असु दे रे तिचं तरी काय चुकलं म्हणा! तिचा जीव आहे त्याच्यावरती आणि तिला धक्काही बसला असेलच ना. लहान आहे रे असु दे पण तू बोलून बघ विक्रमशी"  ती म्हणाली.

" हं......बोलेन मी त्याच्याशी "  तो थोडासा विचार करत म्हणाला.
.....................................
अनघा घरुन गेल्यापासून नीतूला चैन पडत नव्हती. अनघा तिची वहिनीच नव्हती जवळची मैत्रिणसुद्धा बनली होती. तिला काहीही सांगायचं असलं, रुसायचं असलं, कोणाचा राग आलेला असला, ती खूश असली अगदी काहीही असलं तरी तिला अनघासोबत बोलल्यानंतर मस्त वाटायचं. अनघा तिचं ऐकून घ्यायची. लहान लहान म्हणून थट्टा करुन तिच्याकडे दुर्लक्ष करायची नाही. त्यामुळे आत्यानंतर घरात सगळ्यात जवळचं कोणी असेल तर तिच्यासाठी तरी अनघा होती. तिची लाडकी वहिनी. विक्रम - अनघाच्या लग्नाचं पक्क झालं तेव्हा खरंतर पहिल्या भेटीतच तिला अनघा आवडली होती. नीतूला विक्रमच्या बुद्धिमत्तेचा, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा, शिक्षणाचा फार अभिमान होता. त्याचं वागणं बोलणं सगळंच तिला आवडायचं. आपला दादा म्हणजे भारी माणूस अशीच प्रतिमा होती लहानपणापासून तिच्या नजरेत त्याच्याबद्दल. तिला कधी वाटलं देखील नव्हतं की आपण बाहेर ज्या दुःखीकष्टी स्त्रियांसाठी काम करत असतो. ज्यांसाठी मोर्चे काढत असतो, आंदोलनं करत असतो तश्याच वेदनांमधून गेलेली एक व्यक्ती आपल्या घरात असेल! तिला वाटलं, इतके महिने आपण एकत्र होतो तिच्यासोबत पण कधी आपल्याला शंकाही आली नाही कि तिच्याबाबतीत अस काही घडलेलं असेल.

त्यांच्या लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस तिला आठवले. तेव्हा वहिनी फार कोणाशी बोलत नाही, सगळ्यांमध्ये मिसळत नाही याचं कोड तिला आणि जितेंद्रला पडलं होतं ज्याचं उत्तर आता मिळालं होतं. तिची काय अवस्था होती असेल या विचाराने नीतूला वाईट वाटायचं आणि समोर विक्रमला पाहिलं कि तळपायाची आग व्हायची. अनघा तिच्या घरी निघून गेल्यानंतर नितूने तिला भेटायचं ठरवलं पण तिच्या घरी जाणं जीवावरती आलं. तिचे आईबाबा, रिया यांना सामोरं कस जायचं हा प्रश्न होताच म्हणून ती कॉलेजला तिला भेटायलाही जाऊन आली पण ती रजेवरती असल्याचं समजलं मग तिची रजा संपल्यानंतर दुसर्‍या दिवशीच नितू पुन्हा कॉलेजला गेली. 
...............................................
कॉलेज सुटलं आणि अनघा एकटीच चालत बाहेर पडली. नेहमी विक्रम गाडीपाशी तिची वाट पाहत उभा असायचा. तो दिसला कि ती हसत हात उंचावून ' हाय ' म्हणत धावत त्याच्याकडे यायची. ' किती लेट ' गाडीचा दरवाजा उघडताना नेहमीचं त्याचं ठरलेलं वाक्य मग तिची बडबड सुरु व्हायची. घरी पोचेपर्यंत गाडीत त्यांच्या गप्पा व्हायच्या. तिला वाटायचं, रस्ता संपूच नये असाच सुरु राहावा प्रवास! तिने गेटमधून बाहेर पडताना पार्किंगकडे नजर टाकली. प्राध्यापक आपापल्या गाड्या बाहेर काढत होते. कोणी दुपारसत्राच्या प्राध्यापकांसोबत गप्पा मारत तिथेच उभे होते. तिने लक्ष दुसरीकडे वळवलं आणि चालू लागली. प्रवेशद्वारातून बाहेर पडते तोच समोर स्कुटीला टेकून नितू उभी! अनघाला बघताच ती धावत तिच्याकडे आली.
" वैनी " अनघाला बघून तिने तिला आनंदाने मिठी मारली.
" तू! इकडे कशी ?" अनघाने विचारलं.
" सांगते, चल तिकडच्या पार्कमध्ये बसु " तिने म्हटलं तस हो म्हणून अनघा गप्पपणे तिच्यामागे स्कुटीवरती बसली.
.................................... 
कॉलेजपासून पंधरा मिनिटांवरती असणार्‍या पार्कसमोर नितूने स्कुटी थांबवली. अनघा उतरली आणि शांतपणे चालत आत गेली. नितूने हातातला स्कार्फ गळ्यात टाकला आणि ती तिच्यामागून आत आली. 
अनघा एका बाकावरती एकटीच येऊन बसली. नीतू आत आली. तिने बसलेल्या अनघाला निरखून पाहिलं. किती छान दिसत होती ती नेहमीसारखीच! कोणाला वाटणारही नाही तिच्या मनात काहीतरी सुरु आहे. तिच्या आयुष्यात किती उलथापालथ होऊन गेलीय याची कल्पनासुद्धा आजूबाजूच्या कोणाला येणार नाही. तिच्या चेहर्‍यावरचा मेकअप, साडीला साजेसे कानातले, गळ्यातला सिंगल लाईन नेकलेस, पाठिवरती रुळणारे मोकळे सोडलेले केस सगळं तर त्याच्या आवडीचं! ती तिच्या बाजूला येऊन बसली.

" वहिनी "  तिने तिच्या खांद्यावरती हात ठेवला तसा अनघाने चेहरा तिच्याकडे वळवला. तिच्या डोळ्यांत अश्रु होते.
" नीतू " ती नीतूला मिठी मारुन ढसाढसा रडायला लागली. घरी हे अस रिया वा आईला मिठी मारुन रडत बसणं तिने टाळलेलं. घरातले आपल्याला रडताना बघून अजून खचतील या भितीपोटी ती अजिबात डोळ्यात अश्रु येऊ द्यायची नाही. घरी गेल्यानंतरही तिने श्रीधर कुमुदला आपली बाजू समजावून सांगितली पण मन मोकळं होईस्तोवर रडणं तिने टाळलं होतं. 

" वैनी, ए ऐक ना शांत हो तू आधी. Calm down " नितू तिला मोठ्या माणसासारखं समजावत म्हणाली.
" अग You are strong girl ना मग नी रडताना छान नाही न दिसत तू " तिने तिच्या गालावरुन ओघळणारे अश्रु पुसले. तीही थोडी शांत झाली.

" वैनी, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत " नितू तिला धीर देत बोलली.
" बरं, जितेंद्रचा काही फोन " नीतूने विचारलं तस अनघाने मानेनेच नाही म्हटलं.
" असो, तो तरी काय बोलणार म्हणा! त्याचीच बाजू घेणार तो "  नीतू नाराजीने म्हणाली.

" का ग वागले विक्रम असं! इतकं खोटं माझ्याशी! इतक सगळं लपवलं त्यांनी. स्वतःला वाचवण्यासाठी यांनी लग्न केलं आणि हे अस वर्षभर खोट वागत राहिले. किती काळ इतक सगळं लपवून ठेवणार होते! आयुष्यभर अस.....असच फसवत राहणार होते का मला! मला वाटायला लागलं, मीच मुर्ख ठरले जे त्यांना इतका जीव....."  अनघा हताशपणे बोलत होती.
" वैनी, तुझं नाही काही चुकलं ग. तो माणूसच कर्मदरिद्री निघाला त्याला काय करायचं. खरं सांगू मला....मला अक्षरशः लाज वाटते या अश्या माणसाला भाऊ म्हणायची. अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वागलेला आहे तो. एखाद्या मुलीने एखाद्या क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला, एखादी मुलगी वर्कींगप्लेसमध्ये पुरुषाच्या वरचढ ठरली की काहीतरी करुन तिचं मानसिक खच्चीकरण करायचं. प्रोग्रेस झाली म्हणजे ' कुणाला तरी खूश केलं तिने ' आणि प्रामाणिकपणे चुकीच्या गोष्टीला विरोध केला तर तिच्यात अॅटीट्युड आला, फार शहाणी झाली हा असा अॅप्रोजच असतो अर्थात यात पुरुषांना तरी काय दोष द्यायचा म्हणा! आपल्या बायकासुद्धा याच नजरेनं बघत असतात हे सगळं पण वैनी मला तुमच्या कॉलेजच्या लोकांचं नाही माहित पण उद्या सगळं सगळ्यांसमोर आलं तरी मी तुझ्याच सोबत असेन "

" हो ग, मला माहितीय तू अाहेसच ग माझ्या बरोबर " अनघा म्हणाली.

" वैनी, तु आता धीराने सगळ्याला तोंड दे. तुला जे वाटतं ते कर आणि त्या माणसासाठी अजिबात रडत बसायची गरज नाही "   तिच्या गालावरुन हात फिरवत नितू म्हणाली तशी ती शांत झाली. नितूला वाटलं, किती हळवी आहे ही त्याच्या बाबतीत. हा माणूस इतकं खोट वागूच कसा शकला! किती खूश असायची ती, किती स्वप्नं रंगवली होती तिने आणि आता मात्र हे अस सगळं झालं. तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं का त्याला असे विचार तिच्या मनात आले आणि आज पहिल्यांदाच तिला वाटलं, ती आपली वहिनी नसती तर! खरंच, विक्रमपेक्षाही एखादा चांगला मुलगा तिला भेटला असता आणि सुखी असती ती.
.......................................
नितू दुपारी अचानक आपल्याला भेटायला अशी कॉलेजला येईल अस अनघाला वाटलं नव्हतं पण ती आली, तिच्यासोबत बोलली, तिला धीर दिला यामुळे अनघाला बरं वाटलं. मनात जे साचलं होतं ते बोलल्यामुळे मन शांत झालं. इतके दिवस आईबाबा, रियासाठी म्हणून तिने डोळ्यातलं पाणी दाबून ठेवलेलं पण नीतूसमोर मन मोकळं करुन तिला जरा शांत वाटत होतं आज. दिवसभर नितूचे ते शब्द तिच्या मनात घोळत राहिले. नीतूसोबत बोलताना तिला जाणवलं होतं, फक्त आपल्याला तोंडदेखला धीर द्यायला नीतू आपल्याला भेटायला आली नव्हती. तिलाही विक्रमच्या वागण्याचा धक्का बसला होता आणि चीडही आली होती. तिला माहित होतं, नीतूचं विक्रमवरती प्रेम आहे. तिला तिचा दादा ' हिरो ' वाटतो अगदी! पण या सगळ्यालाच विक्रमच्या वागण्याने तडा गेला होता आणि बहिण- भावामध्ये एक भिंत तयार झाली होती आणि आता ती पडेल आणि त्यांचं बहिण भावाचं नातं पुन्हा पुर्वीसारखं हसत-खेळतं होईल का असा प्रश्न आपसुक अनघाच्या मनात आलाच. पण तिने विक्रमवरुन नीतूला समजावणं टाळलं होतं. नीतू जे बोलत होती ते ऐकायला आपल्याला कितीही कटु वाटलं तरी ते सत्य आहे हे तिने स्वतःला समजावलं होतं. ती आपल्यासोबत आहे, आत्या, भाऊसाहेब आपल्या पाठिशी आहेत या भावनेनं तिला बळं मिळायचं. 

रात्री झोपायची वेळ होत आली की ती एकटीच बेडवरती डोक भिंतीला टेकून बसून राहायची. रात्री जेवल्यानंतर खोलीत आल्यावरती विक्रम आणि ती गप्पा मारत बेडवरती बसायचे.  त्या आठवणी नाही म्हटलं तरी तिच्या मनात यायच्या. तो कुठे बाहेर सेमिनारला जायचा त्यातलं काही ना काही तिला सांगत राहायचा. एखाद्या इन्सटिट्युटला त्याला लेक्चरसाठी बोलावलेल असेल तर त्या लेक्चरच्या टॉपिकवरुन तो बोलायचा मग तिही बोलायची. तो उन्हाळी सुटीतून लग्नाआधी मित्रांसोबत ग्रुपने ट्रिपला जायचा ती धमाल, किस्से, देशा विदेशातल्या वेगवेगळ्या शहरांची वर्णनं अस बरंच काही त्याच्याकडे सांगण्यासाठी असायचं. मग ती ऐकता ऐकता डोळ्यांवरती झोप आली कि त्याच्या मिठीत यायची नाहीतर ऐकता ऐकताच उशीवरती डोक टेकायची मग तो तिला हलक्या हाताने कपाळावरती थोपटत बोलत राहायचा. ती झोपली कि तिच्या पायांवरती ब्लँकेट ओढून मग तो झोपायचा. उगीचच आळस देत लोळत पडायला त्याला आवडायचं नाही. अलार्मच्या पहिल्या गजरासरशी त्याला जाग यायची. तिला मात्र अस छान ब्लँकेट घेऊन मस्त झोपायला आवडायचं आणि बेडवरती छान लोळत पडायलासुद्धा! पण त्यामुळे रात्री हातभर दूर एका कुशीवरती झोपलेली ती सकाळी मात्र त्याच्या मिठीत असायची! तिच्या लवकर जाग न येण्यामुळे मग त्याची सकाळची सुरुवात मात्र गोड व्हायची. त्याच्या घरुन आल्यानंतर दररोज रात्री झोपताना गळा दाटून यायचा तिचा.  ती घर सोडून आल्यानंतर रोज रात्री मात्र त्याचे मेसेजेस न चुकता असायचे. ' गुड नाईट डियर ',  ' स्विट ड्रिम्स माय स्विटहार्ट, ' मिसिंग यु.....वेटींग फॉर यु माय डियर ' अस काही ना काही प्रत्येक मेसेजमध्ये असायचं. कधी कधी व्हॉईसमेसेजेस असायचे. त्याचा आवाज ऐकला कि मन बेचैन होऊन जायचं तिचं. वॉट्सअप उघडलं की सकाळपासुनचे त्याचे ढिगभर मेसेजेस धडाधडा मोबाईलच्या स्क्रिनवरती कोसळायचे. तिला आवडत नाही म्हणून हल्ली फोन करणं तो टाळायचा पण हे सततचे मेसेजेस तिला नको वाटायचे. मोबाईलची गॅलरी उघडली तरी त्यात त्यांचे दोघांचे एकत्र कितीतरी फोटोज दिसायचे. तिला वाटायचं, किती खूश होतो ना आपण! ते फोटो आपले आहेत यावरही आता तिचा विश्वास बसायचा नाही आणि त्यातला विक्रमचा हसरा चेहरा आता खोटा मुखवटा वाटायचा तिला. चीड यायची तिला त्याने बोललेले शब्द, दिलेली वचनं आठवून! त्या रागातच तिने त्याला फोन केला. रात्रीचा एक वाजत आलेला. पलिकडून दुसर्‍याच सेकंदात त्याने फोन उचलला.

" हॅलो, अनु, काय ग! काय झालं...."  त्याने काळजीच्या सुरात विचारलं. इतक्या रात्री तिचा फोन अनपेक्षित होता.

" I'm fine आणि काहीही झालं तरी तुला मदतीला नक्कीच नाही बोलवणार. बरिच खरी माणसं आहेत त्यासाठी " ती रागाने बोलली. तो गप्प राहिला.

" मी इतकच सांगायला कॉल केलाय की इथून पुढे Don't call me आणि मेसेजेस सुद्धा नकोत.....I don't want to hear anything. बाय " तिने रागातच एवढच बोलून फोन ठेवून दिला. हातातला मोबाईल बाजूला ठेवण्याआधी तिने त्याचे सगळे मेसजेस, त्यांची दोघांची चॅटींग्जस, सगळे फोटोज सगळच डिलिट करुन टाकलं आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. वर्षभरातल्या त्यांच्या लग्नापासुनच्या आठवणी , मोबाईलच्या कॅमेर्‍यातले आनंदी क्षण सगळच क्षणात मोबाईलच्या वीतभर जागेतून पुसलं गेलं आणि सगळी जागा रिकामी झाली. फक्त प्रश्न होता रिकाम्या जागेचं करायचं काय? नव्या आठवणी, नवी माणसं मोबाईलच्या मेमरीत बसतीलही पण आपल्या मेमरीचं काय करायचं! तिने निर्धाराने मोबाईल बाजूला ठेवला. जे काही होतं, जे घडलं ते एक सुंदर स्वप्न होतं म्हणायचं आणि आता जे आहे तेच खरं आहे. हे अस जुन्या आठवणी कुरवाळत बसलं तर पुढे नाही जाता येणार या विचाराने तिने डोक उशीला टेकलं.
...........................................
तिने रागाने फोन ठेवून दिला होता ते त्याच्या लक्षात आलं. त्याने समोरचा लॅपटॉप बंद केला. तिला घरुन जाऊन दहाएक दिवस झाले होते पण त्याच्या सवयी जश्या आधी होत्या तश्याच राहिल्या. रात्री तिच्यासोबत गप्पा मारत बसायची सवय झालेली. खोलीत एकट्याने वावरणं जीवावरती यायचं. सकाळ घाईगडबडीत जायची पण दुपारी कॉलेजमधून निघताना गाडीतून एकट्याने येणं, दुपारी तिच्या शिवाय जेवणं नको वाटायचं आणि दुपारपासून ते रात्री झोपेपर्यंतचा वेळ संपता संपायचा नाही मग तो संध्याकाळी स्पोर्ट्स क्लबचं कारण काढून बाहेर पडायचा पण रात्र...रात्री खोलीत थांबणं नकोस वाटायचं. तिचं खोलीभर वावरणं, हसणं खिदळणं आठवत राहायचं, तिचं वॉर्डरोब, स्टडीटेबल, ड्रेसिंगटेबलवरचं मेकअपचं सामान सगळं जसच्या तस होतं फक्त ती नव्हती. ते सगळं पाहताना कितीतरी क्षण नजरेसमोर तरळायचे. रात्री काम संपवून तो तासनतास वाचत राहायचा. पुस्तकं किंवा लॅपटॉपवरती काही ना काही सर्च करुन जे मिळेल ते वाचायचा. एखाद्या ठिकाणी लेक्चरला जायचं असेल तर त्या विषयाच्या नोट्स काढणं असो कि प्रेझेंटेशन त्याची तयारी चार चार दिवस आधीपासून तो करायचा. अनघा होती तेव्हा कॉलेज, लेक्चर्स, तिच्याकडे लक्ष देणं यात वेळच पुरायचा नाही आणि आता वेळच वेळ असायचा इतका कि घरी थांबणं नकोस वाटायचं. त्याने लॅपटॉप उचलून टेबलवरती ठेवला. पुन्हा बेडवरती बसला तस मोबाईलकडे लक्ष गेलच. 


वॉलपेपरला असलेल्या तिच्या फोटोकडे त्याने पाहिलं. मोबाईल बाजूच्या कॉर्नरपिसवरती ठेवून दिला. डोक उशीला टेकलं आणि हाताची मुठ उघडली त्यात तिने दिलेलं Key chain होतं. तिने दिलेलं पहिलं गिफ्ट! त्याने त्या हार्टवाल्या किचेन ला उघडलं आणि एका बाजूला तिचा फोटो होता आणि दुसर्‍या बाजूला त्याचा.   

" किती दिवस चिडणार मॅडम! माझी आठवण येईलच मग बघ धावत येशील माझ्याकडे.....येशील ना? मी वाट बघेन अगदी शेवटपर्यंत "  त्याने तिच्या फोटोकडे बघत म्हटलं आणि छानस हसून ते Keychain चं हार्ट मिटून ते उशीच्या बाजूलाच ठेवून दिलं. तिचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्याने डोळे मिटून घेतले आणि ' ती आहे अजूनही सोबत आणि नक्की परत येईल ' या आशेनं त्याला झोप लागली.

क्रमशः

प्रत्येक भाग पोस्ट झाल्यानंतर तुम्ही तो अधिरतेने वाचता तसा पोस्ट झाल्या झाल्या मीही जाऊन वाचते. पुर्ण भाग वाचल्यानंतर एक समाधान मिळतं आणि आतापर्यंतचे सगळे भाग तुमच्या बरोबरीने मीही पोस्ट झाल्या झाल्या तितक्याच उत्सुकतेने वाचलेले आहेत. भराभरा लिहणं नी पोस्ट करणं हे मला आतापर्यंत जमलेल नाही अगदी सगळा भाग लिहून झाल्यानंतरही त्यातले काही सिन डिलिट करुन पुन्हा लिहिले जातात.....लिहण्याचं समाधान मलाही मिळू दे ते मिळालं तरच तुम्हाला वाचताना दुप्पट आनंद मिळेल....घाई नका करु भागांची....मला कल्पना आहे की ही एकच अशी कथा आहे ज्याला प्रतिसाद असूनही आठवड्यातून फक्त दोनदा भाग येतात......पण वाचत राहा भेटू पुढच्या भागात.
Thank You

🎭 Series Post

View all