बंधन भाग 88

Social Love

भाग 88
(  गेल्या भागात अनघाने शेवटी तिच्या मनात इतक्या दिवसांपासून जे सुरु होतं ते सांगितलं. त्यांचं नातं पुढे नेण्याविषयी त्यांच्यात बोलणं झालं ज्याला त्यानेही होकार दिला फक्त तिला सगळं सत्य सांगावं यावर तो मनातून ठाम होता पाहूया पुढे)

रविवारी रात्री ती विक्रमसोबत खुशीतच घरी परतली. तो रविवारचा अख्खा दिवसच तिच्यासाठी आनंदाचा होता. त्या रात्री रेस्टाँरंटमध्ये त्यांच्यात झालेलं बोलणं ती पुढचे एक - दोन दिवस तरी आठवून आठवून खूश झाली. तिला वाटलं, खरंच विक्रम किती समजून घेतो आपल्याला. तो एक चांगला माणूस आहे आणि चांगला नवरासुद्धा. तिला आपला हा निर्णय किती योग्य आहे आणि आपल्या नात्यासाठी किती महत्त्वाचा आहे याची कल्पना होती. तिने याविषयी कोणाला काही सांगितलं नाही पण आपण आयुष्यात केवढ्या मोठ्या घटनेला सामोरे गेलो आहोत आणि त्यातनं आता बाहेर येऊन नव्याने सुरुवात करतो आहोत याची तिला कल्पना होती त्यामुळे स्वतःत झालेल्या या सगळ्या बदलांमुळे ती स्वतःवरतीच खूश होती. तिला आता स्वतःचा अभिमान वाटायचा. स्वतःचं असणं- दिसणं आवडायचं. करिना कपूर ' जब वी मेट ' मध्ये कस म्हणते, ' मैं तो अपनी फेवरेट हूँ ' तशीच काहीतरी ' फिलिंग ' तिला वाटायची. आपल्याबाबतीत जे घडलं, त्यानंतर आईबाबांना झालेला मनःस्ताप, मोडलेला साखरपुडा, घाईत अनपेक्षितपणे झालेलं लग्न त्यानंतर या लग्नाकडे पाहताना, त्याला ' नवरा 'म्हणून आजूबाजूला पाहताना आपल्याला भूतकाळ आणि वर्तमानाचा न साधता आलेला मेळ आणि त्यातून कमकुवत झालेली मनाची अवस्था हे सगळे धक्के पचवल्यानंतर पदरी पडलेलं इतकं सुख - समाधान,आनंद आणि हक्काची साथ, आपली माणसं या सगळ्याचा विचार करुन तिला खूप छान वाटायचं. तिचा हाच मूड पाहून त्याने जयपूरला जायचा विषय काढला. कॉलेजचं काम आहे असं जुजबी कारण दिलं मग तीही बरं म्हणाली. त्याने फार वेळ न घालवता याच आठवड्यात विशालला भेटून यायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे बॅगासुद्धा पॅक केल्या. तिनेही त्याला मदत केली आणि मस्करीत मी पण येऊ का असही विचारलं तेव्हा मात्र त्याला मनातून धस्स झालं पण थोडस समजावल्यानंतर ती नंतर सुटीतून जाऊया म्हणाली. फेब्रुवारीही सुरु झाला होता. त्यामुळे कॉलेजला दांडी मारून चालणार नव्हती. अभ्यासक्रमही पूर्ण करायचा होता त्यामुळे तिनेही सोबत जायचा फार हट्ट धरला नाही.
.......................................
तो रात्री गॅलरीत एकटाच उभा होता. दुसर्‍या दिवशी निघायचं होतं त्याप्रमाणे विशालसोबत त्याचं फोनवरुन बोलणं झालं होतं त्यात विशाल काही महिन्यांसाठी यु.एस.ला जाणार असल्याचं त्याला कळलं त्यामुळे जयपूरला आता जाणं गरजेचचं होतं आणि विशालला भेटून अनघाची आताची सुधारलेली मनःस्थिती त्याच्या कानावर घालणं गरजेचं होतं. त्याने या विचारातच काळ्याभोर आकाशाकडे पाहिलं. चांदण्या लुकलुकत होत्या. मनातून वाटलं, या रात्रीने आपली किती तर्‍हेची रुपं पाहिलीयत ! आपला तो राक्षसी चेहरा त्यानंतर फार्महाऊसवर आपण तिला प्रपोज केलं तो आपल्यातला प्रियकर आणि रात्री तिच्यासोबत मोकळ्या रस्त्यांवरुन तिच्यासोबत चालणारा, तिची काळजी घेणारा आपल्यामधला नवरा. त्याने गच्चीतूनच मागे वळून बेडवरती शांतपणे झोपलेल्या तिच्याकडे नजर टाकली. किती शांत आणि समाधानी दिसत होता तिचा चेहरा! आपलं घर, आपला नवरा, आपला संसार आणि रंगीबेरंगी स्वप्नं या विश्वात ती रमली होती. त्या सुखाचं समाधान, आनंद तिच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वाहायचा हल्ली जे त्याला जाणवायचं. त्याला वाटायचं, हे असच छान सुरु राहावं अगदी आयुष्यभरासाठी! कधी कधी वाटायचं हातात टाईममशिन असतं तर भूतकाळात जाऊन आपल्या सगळ्या चूका सुधारल्या असत्या. कधी कधी त्याला वाटायचं, या अश्या घटनेनं ती आपल्या आयुष्याशी जोडली गेली यापेक्षा खरंच तेव्हाच आपण तिच्या प्रेमात पडण्यासारखं काही घडलं असतं तर किती बरं झालं असतं ना! अश्या सगळ्या जर - तर मध्ये तो अडकून जायचा. त्याला वाटायचं, कधी एकदा तिला खरं सगळं सांगतोय आणि मनावरचं ओझं हलकं होतय. ती माफ करेल का किंवा कशी असेल तिची प्रतिक्रिया या कश्याचाच विचार तो करत नव्हता. त्याला मनापासून वाटतं होतं, हळूहळू ती आपल्याला माफ करेल आणि कसलीही भिती न बाळगता आपण आपल्या तोंडून सगळं कबूल केलं याने तिला थोडं तरी बरं वाटेल. ती रडेल, ओरडेल, चिडेल याचीही त्याने तयारी ठेवली होती अगदी ती चिडून मला बोलायचं नाही म्हणेल आणि तिच्या आईबाबांकडे जाईल याचीही त्याने तयारी ठेवली पण आपण समजावलं, तिची माफी मागितली तर गोष्टी ठीक होतील. एक नवरा म्हणून तर आपण तिच्यावरती कसलाच अन्याय केलेला नाही हे तर तिला माहीत आहे त्यामुळे ती आपल्याला सोडून नाही जाणार काही असा विश्वास त्याला वाटायचा. तो तिथून आत आला. ती बेडवरती झोपली होती. त्याने तिच्या अंगावरती ब्लँकेट घातलं आणि सहज तिच्या पायातल्या अँकलेट्सकडे लक्ष गेलं तसा तो छानसं हसला. त्याने तिच्या कपाळावरुन अलगद हात फिरवला, ' अनु, लवकरच नविन सुरुवात होणार आहे आपल्या नात्याची. सगळं छान होईल बघ अगदी तुला हवं तस! ' तो मनातून म्हणाला. सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून त्यानेही जरा सगळे विचार झटकून झोपायचा प्रयत्न केला. उशीला पाठ टेकली अन बाजूला असलेल्या तिच्याकडे लक्ष गेलं का कोणास ठाऊक, आज पहिल्यासारखं अस्वस्थ वाटत नव्हतं. मन एकदम शांत होतं. कसला गोंधळ नाही कसला कोलाहल नाही. ही मनाची अतिशांतता मात्र आज त्याला अस्वस्थ करुन गेली. त्याने कूस बदलली, आज असं का होतय कळेना! तिच्यासोबतचे चांगले क्षण आणि तो कडु, वाईट क्षण आठवून नेहमी मनात विचार यायचे डोकं झोपण्यासाठी टेकलं की पण आज इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच त्याला काहीच वाटेना मन अगदीच शांत होतं. काय होतय हे असं कि कसलीशी चाहूल तर नव्हे नव्या माणसांची, भविष्याची की भूतकाळाच्या सावल्या वरती डोकावण्याची ! त्याने अस्वस्थ होऊन डोळे मिटून घेतले.
.............................................
सकाळी तो नेहमीप्रमाणे लवकर उठून जीमला जाऊन आला. तो निघणार आहे म्हणून तिनेही लवकर कॉलेजला जायची तयारी केली. तो दहा साडेदहाच्या दरम्याने निघणार होता. त्याला पुन्हा आपल्याला कॉलेजला सोडायचा त्रास नको म्हणून ती ड्रायवरकाकांसोबत जाणार होती. तिने नेहमीप्रमाणे कॉलेजला निघण्याची तयारी केली आणि खाली आली तर तो डायनिंगटेबलला नाश्ता करत बसला होता.
" चला सर निघते मी " ती खांद्याला पर्स अडकवित त्याच्यासमोर आली. 
"हो, नीट जा आणि टेक केअर हा, येऊ का ड्रॉप करायला ?" त्याने विचारलं.
" ए It's ok चल बाय मिस यु, टेक केअर " ती त्याच्या हातात हात देत म्हणाली.
" हो ग बाय " तो हसला इतक्यात ड्रायवरने गाडीचा हॉर्न वाजवला.
" चल बाय लेट होतोय " ती म्हणाली आणि त्याच्या हातातला तिचा हात सुटला.....ती पटकन दारापाशी गेली पुन्हा मागे वळून हसली. दोन क्षण तसेच गेले. तिने उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं आणि त्याला मनातुन तुटल्यासारखं झालं. वाटलं मोठ्याने ओरडावं, ' थांब ग नको जाऊस '. त्याचं मन अक्षरशः ढवळून निघालं. त्याने डोकं दोन्ही हातांनी धरून ठेवलं न डोळे बंद केले इतक्यात आत्याने टेबलवर पाण्याचा ग्लास आणून टेकवला आणि तो भानावर आला.
" काय र खा की पटापटा गेली र ती पोचलीबी कालिजला " आत्या हसून म्हणाली तसा तोही कसनुसं हसला.
.............................................


आज विक्रम कॉलेजला जाताना सोबत नव्हता म्हणून तिला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. तिने मग ड्रायवरकाकांसोबत थोड्याश्या गप्पा मारल्या. ड्रायवरकाकांच्या बोलण्याचा विषय भाऊसाहेबांशिवाय काय असणार! ते पुढचे चार पाच दिवस पक्षाच्या कामांसाठी मुंबईला जाणार होते मग काय कॉलेजला पोहचेपर्यंत ड्रायवरकाका साहेबांचे दौरे, कामं, मिटींग या बद्दल बोलत राहिले. कॉलेजला पोचल्यानंतरही तिने आपली लेक्चर्स नेहमीप्रमाणे घेतली पण काही लक्ष लागत नव्हतं. कधी दुपार होतेय आणि घरी जातेय अस वाटायला लागलं. शेवटी एकदाचे दुपारचे साडेबारा झाले आणि ती घरी आली. त्यांच्या खोलीत गेल्यानंतर तिला बरं वाटलं. त्यांचं खोलीतलं सामान, त्याचं वॉर्डरोब, त्याच्या वस्तू, फोटोज यासोबतच तो घरी नसला की तिला खोलीभर पसरलेल्या त्याच्यासोबतच्या क्षणांच्या आठवणी एकामागोमाग नजरेसमोर यायच्या मग तिला ती रुम सोडून जावस वाटायचं नाही. दुपारीही जेवणापूर्वी तिने त्याला फोन केला होता. संध्याकाळचा वेळ आत्यासोबत स्वयंपाकघरात गेला. त्यानंतर तिने नेहमीची तिची कॉलेजची कामं आटोपली. रात्री त्याने व्हिडीओ कॉल केला मग तिला छान वाटलं. त्याने तो थांबलेल्या हॉटेलमधली त्याची रुमही दाखवली. तिथली गच्ची आणि बाहेरचं रात्रीचं दृश्य, हॉटेलचा परिसर पण बोलता बोलता दाखवला. अस बोलून मग कंटाळा आला म्हणून मग कॉल ठेवून त्यांनी चॅटींगला सुरुवात केली. तिला त्यांचा साखरपुडा झाला होता ते दिवस आठवले. तेव्हाही तो तिला वॉट्सअॅप मेसेजेस करायचा पण तिला बोलायची इच्छाच नसायची आज मात्र ती खूप बोलत होती. तिला पहिल्यांदाच कळलं तो इतकं रोमँन्टीक बोलू शकतो मेसेजेसवरुन हे! मग ते बराचवेळ गप्पा मारत राहिले अगदी रात्री उशीरापर्यंत! 
...........................................
दुसर्‍या दिवशी सकाळी उठायला मात्र तिला थोडासा उशीर झाला मग कॉलेजला निघण्याची पटापट तयारी तिने केली. विक्रम आदल्या दिवशी गेला आणि अजून दोन- तीन दिवस तरी यायला लागणार होते त्यामुळे ती जरा हिरमुसली होती. अर्थात जयपूर काही कोल्हापूरसारखं हाकेच्या अंतरावरती नाही. यायला - जायला वेळ लागतोच याचीही तिला कल्पना होती मग तिने उत्साहाने त्याला ' गुड मॉर्निंग ' चा मेसेज केला. मोबाईल जरा बाजूला ठेवला आणि पटापट तयारी करायला सुरुवात केली. केसांवरुन हेअरब्रश फिरवला आणि ड्रेसिंगटेबलवरचा मोबाईल वाजला. तिला वाटलं, त्याने मेसेज वाचून कॉल केला असावा म्हणून तिने पटकन फोन उचलला तर अनोळखी नंबर होता आणि तिने उचलण्याआधीच कट झाला. तिने निघण्यासाठी पर्स हातात घेतली आणि पुन्हा फोन वाजला.
" हॅलो, कोण बोलतय ?"  तिने विचारलं.
" हॅलो, अनघा का ?" पलिकडून प्रतिप्रश्न.
" हो, आपण कोण ? मी ओळखलं नाही " तिने म्हटलं.
" हॅलो अनघा.....मी राजेश बोलतोय " 
तिला आश्चर्य वाटलं त्याचा असा सकाळीच फोन आलेला पाहून.
" हा....बोल अरे How're you ? नी तुला माझा नंबर I mean " 
" हा सॉरी असा कॉल केला ते डॅडकडून नंबर घेतला "  त्याने सामंतसरांचं नाव पुढे केलं. त्याला माहीत होतं, आपल्या आणि विक्रमच्या मैत्रीबद्दल तिला काही कल्पना नाही शिवाय विक्रम आणि आपले वडिल सामंतसर दोघांच्या सहमतीने कॉलेजमध्ये गैरव्यवहार झालेत याचीही तिला कल्पना नाही! त्यामुळे आता लगेच विक्रमचं नाव घेऊन काहीतरी बरळून चालणार नाही. तिला आधी भेटायला तरी बोलावूया मग पाहू काय आणि कस सांगायचं ते! 
" हॅलो राजेश बोल ना " ती बोलली तसा तो विचारातून भानावरती आला.
" हा अग एक इम्पोर्टन्ट काम आहे तुझ्याकडे म्हणजे महत्त्वाचं बोलायचं आहे " 
" महत्त्वाचं! हा बोल ना रे सॉरी मला कॉलेजला पण...." ती घड्याळात पाहत बोलली.
" हो हो I know तेच मलापण कॉलेजबद्दलच जरा बोलायचं होतं. नाही मी डॅडशी बोललो असतो पण afterall he's senior  सो....कस बोलायचं ते कळत नाहीय " तो काळजीच्या सुरात बोलायला लागला.
" ओके ओके पण झालय काय नक्की ?" तिने काळजीने विचारलं.
" हो सांगेन पण अस फोनवरती नाही सांगता येणार. आपण भेटू शकतो का आज? "
" आज.....हा ओके कुठे ?" तिने विचारलं. त्याला माहीत होतं संध्याकाळचे सामंतसर काही घरी नसतात. लायब्ररी, स्पोर्ट्स क्लब काय काय चाललेल असतं त्यांचं त्यामुळे संध्याकाळीच बोलावूया तिला. 
" आ...आमच्या घरी येतेस का?" त्याने विचारलं.
" हा ओके, अॅड्रेस मेसेज कर पोचते मी चार साडेचार पर्यंत " ती सहजपणे म्हणाली.
" ओके, थँक्स यार बाय सीयु "
" हा बाय " म्हणून तिने फोन ठेवला आणि विचार करायला लागली काय बोलायचं असेल त्याला? तेही कॉलेजबद्दल! विक्रमला सांगावं का असाही विचार आला पण नको, कॉलेज म्हटलं तर तो टेन्शन घेईल उगीच इतक्या लांब गेलाय तर कॉलेजची काळजी त्याच्यामागे लावायला नको. आपण बघू काय ते ! असा विचार करतच ती कॉलेजला जायला बाहेर पडली. 
..............................................
रात्री तिच्यासोबत गप्पा मारण्यात झोपायला मात्र त्याला उशीर झाला आणि सकाळी उठायलाही! त्याने पटकन आवरलं आणि मोबाईल पाहिला तर रात्रीचं त्यांचं चॅटींग होतं जवळपास तीनशे साडेतीनशे मेसेजेस होते जे त्याने अजूनही डिलीट केले नव्हते. सकाळी सातचा तिचा ' गुड मॉर्निंग ' चा मेसेज होता. तो छानस हसला. दिवसाची सुरुवात तर छान झाली होती. नाश्ता केल्यानंतर मग तो अकरा साडेअकरा पर्यंत विशालच्या क्लिनीकला पोहचला. बाहेर काही पेशन्ट्स आणि त्यांचे आई वा वडिल अस कोणी त्यांच्यासोबत बसलेलं होतं. तोही मग बाहेरच थांबला. त्याला वाटलं, शरिराच्या दुखण्यापेक्षा किती भयानक असतं मनाच दुखणं. आता या माणसांच्या धडधाकट शरीरांकडे पाहून वाटेल का हे आजारी आहेत! आपल्या अनुची पण कशी अवस्था झाली होती ना! असो नको त्या कडु आठवणी आता. आता तिला पुन्हा तसा त्रास अजिबात होऊ द्यायचा नाही आणि होणारही नाही म्हणा, आता खूप बदललीय ती अगदी पुर्वी होती तशीच बनलीय पुन्हा. तासभर तो बाहेर वाट पाहत थांबला. आपला मित्र असला तरी ही त्याची ' वर्कप्लेस ' आहे त्यामुळे पेशन्ट्सना डावलून आत जाणं त्याला नको वाटलं. थोड्यावेळाने विशालनेच केबिनमधून त्याला आपण फ्री झाल्याचं कळवलं तसा तो आतमध्ये गेला.
" या साहेब, काय अरे यायचस ना मघाशी आत!" विशाल त्याला पाहून खूशीत आलिंगन देत पुढे आला.
" अरे, It's ok तुझे पेशन्ट्स त्यांना जास्त गरज होती " तो हसत समोरच्या खुर्चीत बसला.
" हो राईट राईट, बरं माझी पेशन्ट काय म्हणते? All good ना "  विशालने हसत विचारलं.
" हो, Everything is good आणि मी फोनवरती बोललो होतो ना ती हल्ली खूप खूश असते रे. चाल्डिंगप्लॅनिंगपण करुन मोकळ्या मॅडम. आता सगळं स्टेबल झालय बर्‍यापैकी"  तो म्हणाला.
" बरं, पण आता हे तू जे सगळं सांगायचं म्हणतोयस तिला तर Be careful शांतपणे बोल तिच्यासोबत आणि तू सांगितलस तर ती मेबी चिडेल, रडेल पण तुझं प्रेम खरय हे तरी तिच्यापर्यंत पोचेल तुझ्या या वागण्यातुन पण जर तिला बाहेरून कळलं ना तर बरेच समज करुन घेईल ती तुझ्याबद्दल आणि मला वाटतं, तसही कधीतरी हे सांगावच लागणारय कारण सत्य फार काळ लपून नाही राहतं. " विशाल त्याला समजावत म्हणाला.
" हो राईट....."  तोही विशालच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला.
"ओके, सो बेस्ट लक आणि मी पुढचे काही महिने नसणार आहे इथे सो आता भेटू तेव्हा I'd like to see you both together हा "  विशाल हसत म्हणाला.
" हो रे, होईल ठिक सगळं "  विक्रम विश्वासाने बोलला.
" ओके, चल आता काय नेस्क्ट ?" विशालने विचारलं.
" आता, जरा युनिव्हरसिटीला जातोय तुमच्या. आलोच आहे तर काही प्रोफेसर फ्रेंन्ड्स आहेत त्यांनाही भेटतो " तो म्हणाला.
" हं....तरी म्हटलं तु फक्त मला भेटायला कसा काय आलास! चल ओके लन्चला जाऊया हा, जरा मित्रासोबत एन्जॉय पण कर " विशालने मस्करीत म्हटलं.
" हो जाऊया रे " विक्रम म्हणाला आणि मनातून मात्र आता घरी जायची ओढ लागली.
.....................................
नताशा अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत होती. तिने हातातल्या घड्याळात पाहिलं, संध्याकाळचे साडेचार वाजत आले होते. ती सोफ्यावरती बसली आणि डोक दोन्ही हातांनी धरलं.

" Come on यार नताशा, अग जरास खोट बोलायचय तुला त्यात काय इतका विचार करायचा ?"  राजेश तिच्यासमोर उभा होता.
" राजेश, तुम जो कह रहे हो मैं वो करुंगी उस के साथ जो कुछ विक्रम ने किया वो अच्छा नही था। मुझे भी लगता है उसके सामने सब सच आये और विक्रम को सजा हो। लेकीन उसके के लिए तुम्हारे पास की अॉडीओ क्लीप इनफ है बाकी कुछ......"   नताशा बोलत होती तसा राजेश तिला थांबवत म्हणाला,
" अग, पण ती त्याच्या प्रेमात पुरती फसलीय. तिला वाटतय तिचा नवरा देवमाणूस आहे. हे अस तु सांगितल्याशिवाय तिच्या मनात त्याच्याबद्दल नफरत नाही तयार होनार नी ती त्याचा तिरस्कार करायला लागली तरच ती निघून जाईल त्याच्या लाईफमधनं आणि बिचारी सुटेल एकदाची! किती डेज त्याच्या खोटेपणाला प्रेम समजणार ती! नताशा try to understand "    त्याने आपल्या सोयीचं जितकं आहे तितकच नताशाला सांगितलं होतं आणि तीही बिचारी आपण अत्याचाराने होरपळलेल्या मुलीला मदत करतो आहोत, तिचा गुन्हेगार तिच्यासमोर आणतो आहोत म्हणून राजेशची मदत करत होती. का! याचं उत्तर तिचं तिच्यापाशीच होतं. हे सगळे उद्योग ज्यांच्या घरात सुरु होते त्या स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यातही राजेशने धूळ फेकली होती तर नताशासोबत तो खरं बोलण्याची अपेक्षाच नव्हती पण तिने मात्र राजेशच्या प्रत्येक शब्दावर आतापर्यंत विश्वास ठेवला होता.


ते दोघं बोलत होते इतक्यात दारावरची बेल वाजली. त्याने नताशाला आत जाऊन बसायला सांगितलं. ती शांतपणे आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करुन बसली तरी मनातले विचार काही थांबेनात.
.........................................
राजेशने दरवाजा उघडला आणि समोर तिला पाहून त्याचा स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसेना! चॉकलेटी रंगाची सिल्क साडी, खांद्यावरती मोकळे सोडलेले केस, कपाळावरती भांगेत छोटुसा सिंदूर, चंदेरी रंगाची टिकली, चॉकलेटी शेडमधलीच लिपस्टीक, मस्कार्‍याने काळेभोर दिसणारे आकर्षक डोळे, हलकासा मेकअप, कानात छोटेसे इयरींग्ज आणि एका हातात नाजुकसं ब्रेसलेट, त्याच हातात क्लच, दुसर्‍या मनगटावरती चंदेरी पट्ट्याचं घड्याळ अशी ती हसत त्याच्यासमोर उभी होती. त्याचा विश्वासच बसत नव्हता ती अनघा आहे ! गेल्यावर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात खंदारेमॅडम सोबत तो तिला भेटला होता. तो सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशीपेक्षाही कित्येक पटींनी त्याला ती आज सुंदर भासत होती! आज तब्बल एक वर्षानंतर तो तिला पाहत होता. मध्यंतरी सामंतसरांकडून त्याच्या कानावर आलं होतं, ती चिंताग्रस्त वाटते, आपल्यातच हरवलेली असते, कॉलेजमध्ये तिचं लक्षच नसतं अस काही पण तितकच. त्याने प्रत्यक्ष तिला त्या घटनेनंतर पाहिलच नव्हतं अगदी लग्नाला जाणही त्याने टाळलं होतं. त्याला आता तिच्याकडे पाहताना मात्र पटेचना कि खरंच तिच्याबाबतीत तशी घटना घडली होती !  ' She's looking stunning ' तिच्या चेहर्‍याकडे पाहताना त्याचं मन म्हणालंच.

" हॅलो "  तिने राजेशच्या नजरेसमोर हसत हात हलवला तसा तो भानावरती आला.
" आ.....अग Welcome ये आत " तो दारातून बाजूला होत म्हणाला.  ती आत येताना तिच्या हायहिल्स सँडल्सचा आवाज पाहून त्याच्या एक लक्षात आलं, ती अजिबात अवघडलेपणा न राखता आत आली होती !  इतका आत्मविश्वास, इतकी करारी नजर हे सगळं कस झालं! एवढा आत्मविश्वास तिच्यात आला कुठुन! तिच्या बाबतीत जे घडलं होतं ते त्याला माहित होतं तरीही मनात हलकासा विचार आलाच, ' ती जर आपल्या आयुष्यात असती तर ! '  आणि क्षणभरासाठी त्याला विक्रमचा हेवा वाटला. 
ती आत आली. 

" काय अरे सर कुठे गेले ?"  तिने इकडेतिकडे नजर फिरवली.
" हा....अग ते स्पोर्टसक्लबला गेलेत म्हणजे जातात संध्याकाळचे. passionate people you know " तो कसतरी हसू चेहर्‍यावर आणत म्हणाला. 
" हं......"  ती म्हणाली.
" सॉरी तू काय घेणार टी कॉफी "  त्याने विचारलं.
" अरे, It's ok तू.....तू काय म्हणत होतास सकाळी कॉलवर"  तिने त्याला थांबवत म्हटलं. सकाळी त्याचा फोन आल्यापासून आणि कॉलेजबद्दल त्याला काही सांगायचय हे ऐकल्यापासून तिच्या जीवाला चैन नव्हती.
" हा....ते होय अनघा तू शांतपणे ऐकुन घे हा म्हणजे घेशीलच I hope. हा आता तुला थोडा धक्का बसेल पण आता नाईलाज आहे ग माझा. गोष्टी लपवून तरी किती लपवणार न आणि काहीही असलं तरी खोट ते खोटच असत ग "  तो अगदी केविलवाणा चेहरा ठेवून बोलायला लागला.
" हा पण काय म्हणतोयस तू ! काही लक्षात नाही आलं माझ्या !"  ती गोंधळून बोलली.
" हम्म.....कस कळणार म्हणा गोष्टी कळणारच नाहीत अश्या मॅनेज केल्यावर " 
" म्हणजे! काय ते स्पष्टपणे बोल तू प्लीज " ती कानात प्राण आणून त्याचं बोलणं ऐकत होती.
" हं.....सांगतो सांगतो पण इतक काही घडून गेलय ना सुरुवात कुठुन करावी तेच कळत नाही पण असो तर कॉलेजच्या इलिगल व्यवहारांबद्दलच बोलूया आधी " तो हळूहळू बोलायला लागला.
" त्याच काय! हा ते एकदा झालं होतं पण भाऊसाहेबांनी सगळे व्यवहार पाहिले होते आणि विक्रमने सुद्धा त्याच्याशी रिलेटेड अॉफिसमधले जे इनव्होलव होते त्यांच्यावरती कार..." ती पोटतिडकीने बोलली तसा राजेश हसला.
" वाव! कोणी...कोणी कारवाई केली ? विक्रमने का !" राजेशने हसत टाळी वाजवली.
" हा म्हणजे तसा तो म्हणाला साहेबांना " ती बिचारी तिला माहित होतं ते सांगत होती.
" वा! म्हणजे आता साहेबच फसले म्हटल्यावरती तू तर !" तो अंदाज घेत बोलला. ती पटकन वळली.
" म्हणजे ? "
" म्हणजे हेच ग त्याच्याच कृपेने तर कॉलेजमध्ये "
" काय ! छे उगीच काहीतरी बरळू नकोस तू ! " ती पटकन म्हणाली.
" उगीच कश्याला बोलेन मी! " राजेश म्हणाला.
" पण गेल्या वर्षी जूनमध्ये सगळी अॅडमिशन्स ठीक झाली होती फक्त त्याआधीच्या वर्षी....." अनघा म्हणाली.
" हो न त्याआधीच्या वर्षी बरच काही घडलं होतं !" राजेशच्या त्या बोलण्याने मात्र तिच्या डोळ्यासमोर ती सगळी घटना आलीच. 
" तू ! तुझा काय संबंध या सगळ्याशी " तिने विचारलं.
" असणारच ना! अग तुझा खोटारडा नवरा माझा मित्रसुद्धा आहे न आयमिन होता! त्याच्या निर्लज्ज वागण्यामुळे मी संबंध तोडले "  
" शटअप " ती रागाने बोलली तसा तो चाचरला. 
" बरं नसेल विश्वास माझ्यावर! पण त्याच्या बोलण्यावर आहे ना "  त्याने पटकन मोबाईलमधली अॉडीओक्लीप सुरु केली.

विक्रम -  " हॅलो, All plan ok न "
राजेश -   " हो...But it's so risky विक्रम God knows
                    कोणाला कळलं तर खूप प्रोब्लेम्स होतील.
विक्रम -  " Don't worry गॅदरिंग आहे रात्री  
                   सगळे कॉलेजलाच असतील नी सगळा प्लॅन
               झालाय न आता. त्या आगाऊ अनघामुळे         अॉलरेडी खूप लोस झालाय माझा. तिला अशी सहजासहजी नाही सोडणारय मी. 
राजेश -    "  तीपण कॉलेजलाच असेल रे रात्री प्रोग्रॅमला"
विक्रम -      "  Don't  worry काहीतरी कारण काढून ती Campus बाहेर कशी येईल ते बघ. आमच्या जून्या गोडावूनला आण तिला outside ला आहे नाही लक्षात येणार कोणाच्या "
राजेश   -    " तरीपण यार....अस नको वागायला तू थांब आधी सगळा नीट विचार कर.
विक्रम -    " च्च, कॉलेजच्या व्यवहाराबद्दल भाऊसाहेबांना समजून नाही चालणार रे. या पोरीने सगळ्याची वाट लावलीय. झालं तेवढं खूप झालं तिला लवकर गप्प बसवायला हवं."
राजेश  -    "   हं......"
विक्रम -      "   चल बाय. रात्री Sharp 10.30 ला कॉल कर मला. See you at night "  

ती सुन्न होऊन ऐकत होती. रेकॉर्ड थांबली तरी तिचा तिच्या कानांवरती विश्वास बसत नव्हता.
" कळलं! इलिगल व्यवहार, तुझ्याबाबतीत जे घडलं त्या सगळ्याचा कर्ताकरविता कोण ते! हा प्लॅन त्याने मला सांगितला होता पण मी साडेदहालाच तुझ्या समोरून बाहेर पडलो. आठव तुला मी विचारलं होतं, ' तुला घरी ड्रॉप करु का ' अग मी घरी पोहचलो मला वाटलं मी पोचलो नाहीतर पुढच काहीच घडणार नाही पण.....पण तो जिद्दीलाच पेटला होता त्या दिवशी. त्याने सगळं मॅनेज करुन तुला गोडावूनपर्यंत नेलंच."  तो बोलत होता.

त्याला माहित होतं, ती गोडावूनला जाईपर्यंत बेशुद्धच होती त्यामुळे आपल्याला तिने पाहिलच नव्हतं. याचाच फायदा घेऊन त्याने बरीचशी कथा रचली आणि आपला चांगुलपणा दाखवायचा प्रयत्न केला.

" खरच मी तेव्हा तिथे असतो तर खरंच काही होऊ नसत दिलं तुला "  तो काकुळतीनं बोलत होता. तिच्या हातापायातलं त्राणच निघून गेलं. तो काय बोलतोय ते तिच्या कानावर आदळत होतं मनापर्यंत पोचतच नव्हतं. ती तशीच स्तब्धपणे उभी होती.
" अनघा " त्याने हाक मारली.
" अस.....अस कसं होईल....त्याचं प्रेम " तिच्या तोंडून तितकेच शब्द आले.
" हा....प्रेम म्हणे! अग इतका नालायकपणा करुन त्यावर पांघरुण घालायला त्याने लग्न केलं नी नंतर तुला काही कळू नये म्हणून केलेलं नाटक होतं ते फक्त तू बिचारी समजत राहिलीस, माझ्या बाबतीत इतक काय काय झालं तरी माझा नवरा मात्र किती गुणी ! आणि प्रेमाचं म्हणशील तर मग हे काय आहे ?"  त्याने खिश्यातून फोटोज काढून तिच्या नजरेसमोर धरले.
तिने पटकन ते फोटोज हातात घेतले. त्यातल्या एका फोटोत एक मुलगी उभी होती आणि तिच्यासमोर तो ट्रॅवलबॅगला हात लावतोय. दुसर्‍या फोटोत त्याने तिचा हात हातात धरला आहे. तिने एकामागोमाग एक फोटोज पाहिले. एका फोटोत तर ती मुलगी त्याच्या गळ्याभोवती हात टाकुन उभी होती ते सगळे फोटोज तिला पाहवेनात.

" She's Natasha विक्रमची गर्लफ्रेंन्ड "  राजेशने अस बोलल्यावर तिच्या हातातली सगळी ताकदच संपली.
" नताशा "  त्याने हाक मारली तशी ती आतून बाहेर आली.
अनघाने तिच्याकडे फक्त पाहिलं. तिला काय बोलावं तेच सुचेना.
" नताशा, आता तूच सांग सगळं खरं " राजेशने तिला नजरेनेच बोलायला सांगितलं. धडधडत्या हृदयाने नताशाने बोलायला सुरुवात केली.
" मैं जयपूर में रहती हूं। हमारा अफेयर था। उसने कहा था हम शादी करेंगे लेकीन उसने घरपर मेरे बारेमें किसी को भी कुछ कहा ही नही। और एक दिन राजेशने मुझे कहा की उसकी.....उसकी एन्गेजमेंन्ट हुई मैं टुट गयी थी। उसने मुझे समझाया और तुमसे शादी की उसके बाद भी वो मुझे मिलने जयपुर आता था। ना जाने कितने सपने दिखाए उसने मुझे। और अब भी वो जयपूर गया है। ये हमारी आखरी मुलाकात होनेवाली थी। लेकिन मैं यहा आयी तुम्हे मिलने....पिछले कुछ दिनों से वो कह रहा था कि, मेरे जिंदगी से चली जाओ। उससे तुम्हारे साथ रहेना है वगेरा।" 

" अनघा ऐकतेयस ना, अग तो माणूस...त्याने तुझा नाही हिच्यापण प्रेमाचा विश्वासघात केला. त्याची लायकीच नाही कोणी त्याच्यावर प्रेम करण्याएवढी. He's character less person आता तरी डोळे उघड ग " 
ते दोघ जे सांगतायत ते ऐकूनच घर तिच्याभोवती फिरल्यासारख वाटायला लागलं. एखाद्या उंच कड्यावरुन अचानक नकळत कोणी ढकलून दिल्यावर कशी अवस्था होते तशीच तिची झाली.
" अनघा, तुला शॉक बसला असेल ऐकून समजू शकतो आम्ही.....बघ आम्ही आहोत ना....मी मी आहे न " राजेशने आधारासाठी हात पुढे केला. नताशा खाली मान घालून गप्पच होती.

" मला कोणाच्याही आधाराची गरज नाही.....मी लाचार नव्हे. बघेन मी काय करायचय ते!" तिचे हे उद्गगार त्यांच्यासाठी अनपेक्षितच होते. राजेशने पाहिलं, इतक सगळ होऊनही तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूसही नव्हता. ती जड पावलांनी तिथून बाहेर पडली. ते दोघं तिच्याकडे आवासून पाहतच राहिले.
..........................................
ती कशीबशी बाहेर आली. स्वतः कार चालवत ती आली होती. तिच्या पायातलं बळच निघून गेलेलं तरीही तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायविंगसीटला बसली.
' खूप प्रेम केलं मी....खूप जीव लावला....डोळे झाकून विश्वास ठेवला आणि माझ्या आयुष्याची, इमोशन्सची राखरांगोळी केलीस तू विक्रम. विश्वासघातकी माणसाला माझ्या आयुष्यात जागा नाही! मला दिलेली प्रत्येक वेदना तुला महागात पडेल नाही तुला जिवंतपणी मरणयातना दिल्या तर मीही अनघा नाही ' या विचाराने तिने गाडी स्टार्ट केली.

क्रमशः

विक्रमच्या शिक्षेला आता सुरुवात होईल....ही शिक्षा कायद्याची नसेल त्याचं वैयक्तीक, सामाजिक, मानसिक पातळीवरती अधःपतन हीच त्याची शिक्षा असेल आणि त्या अनुषंगाने घटना घडत जातील....भाग मोठा आहे त्यामुळे आता फार बोलत नाही.....सगळ्या पैलूंचा विचार करुन लिहिलं जाईल त्यामुळे घाई करु नका. शांत रहा. मझा
आता भाग पोस्ट करण्याआधीच आधीच्या भागाखाली कोणी म्हटलं, विक्रम खलनायक असुन चांगला रेखाटला....I was shocked to read that....तो खलनायक आहे का!  मग राजेश कोण आहे ? हे पहा प्रत्येक माणसात चांगले वाईट गुण असतात आता ' हिरो ' म्हणजे तो 'गूडी गूडी ' असावा, नायिकेला विनाकारण बाबू बच्चा म्हणणारा, तिच्यासोबत रोमांन्स करणारा तर सॉरी माझ्या कुठल्याच कथामालिकांमध्ये असे नायक तुम्हाला मिळणार नाहीत पुढेही नाहीत...मी काय मांडतेय नी बोलतेय ते अक्षरशः वाचकांच्या डोक्यावरुन जातय की काय अस आता वाटतय...गेल्या भागाखाली ' चाईल्डप्लॅनिंग ' चा विषय होता नी कुणीतरी खाली ' बोअरींग ' म्हटलं....असो भेटू नव्या भागात.

🎭 Series Post

View all